कामीनी ट्रॅव्हल्स भाग २५
मागील भागात आपण बघीतले की भय्यासासेबांच्या आजारपणामुळे कामीनी बाईं अस्वस्थ झाल्या.आता पुढे काय होईल ते बघू.
.दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर कामीनी बाई देवघरातील देवासमोर हात जोडून नि:श्चल उभ्या राहून मनातच देवाजवळ आपली चिंता,काळजी सांगू लागल्या.
"देवा परमेश्वरा प्राची आपल्या आयुष्याची छान सुरुवात करायला केवढ्या ऊत्साहानी प्रवासाला निघाली होती. मध्येच यांचं आजारपण का निघालं? परमेश्वरा यांच्या दुखण्याचे पडसाद प्राची आणि हर्षवर्धन यांच्या आयुष्यावर संसारावर नको उमटू देऊ. त्याची काळजी तूच घे.
तुझ्या मनात काय आहे हे कोणालाच कधीही कळत नाही. तू कश्या चाली चालतोय ते कोणालाच माहित नसतं. यांच्या आजारपणातून काही चांगलं घडवणार आहेस का? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. यांच्या स्वभावात बदल कर रे बाबा. या उतारवयात तरी हर्षवर्धनला प्रेम देण्याची त्यांना बुद्धी दे. एवढच मागते. ते आमच्याबरोबर राहिले,चांगलं वागले तर आमचं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटेल."
एवढं बोलून त्या नमस्कार करून मागे वळल्या तर प्राची उभी असलेली दिसली.
"कधी ऊठलीस?थांब काॅफी करते."
" आई तुम्ही बसा.मी करते काॅफी.तुमचा चहा झाला?"
" नाही.फारसा उत्साह नाही."
"ठीक आहे मी चहा आणि काॅफी दोन्ही करते.तुम्ही बाहेरच्या खोलीत निवांत बसा.मी आले."
हो अशी मान बोलावून त्या समोरच्या खोलीत येऊन बसल्या खरं पण डोक्यात खूप विचारांचं जाळं गुंफल्या गेलं. त्यातून त्यांचं मन काही केल्या बाहेर येत नव्हतं. डोळ्यातून आसवांच्या धारा लागलेल्या असताना मन कुठेतरी भरकट होतं.त्यांच्याही नकळत त्यांच्या तोंडून हुंदका बाहेर पडला.
प्राची चहा,काॅफी करता करता मध्येच एकदा बाहेर डोकावली तेव्हाच तिला कामीनी बाईंच्या तोंडून हुंदका फुटलेला दिसला. त्यांची नजर कुठेतरी गुंतलेली दिसली. विचारांच्या तंद्रीतच त्या गुरफटलेल्या दिसल्या.प्राचीच्या लक्षात आलं की यांना सावरायला हवं.
प्राची चहा,काॅफी आणि बिस्कीट घेऊन समोरच्या खोलीत आली.
"आई चहा घ्या."
त्या तंद्रीतच असतात. त्यांचे डोळे पाण्यानी भरून आलेले असतात.
"प्राची दवाखान्यात फोन केलास?मला हिम्मत नाही होत तिकडे फोन करायची." बोलताना कामीनी बाईंचा सूर रडवेला झाला.
"मी मघाशीच बोलले शशांकशी कालपेक्षा आज भय्यासाहेबांची तब्येत बरी आहे. आत्ता सकाळचे रेसीडेन्शीयल डाॅ.नी सांगीतलं. बाकी सविस्तर जेव्हा मोठे डाॅ. राऊंडवर येतील तेव्हा कळेल. आता चहा घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही काळजी करू नका.आम्ही सगळे आणि डाॅक्टर आहेत. खूप काळजी कराल तर तुमचीच तब्येत बिघडेल."
"प्राची हे खूप विचीत्र स्वभावाचे आहेत पण यांच्यामुळेच माझी लहान भावंडं शिकली ,नोकरीला लागली,त्यांची लग्नं सुद्धा यांनीच करून दिली. यांच्यामुळे माझ्या घरच्यांना चांगलं ताज अन्न बघायला मिळालं हे मी कधी विसरणार नाही. त्यांचे उपकार आम्ही सगळेच कधी विसरू शकणार नाही. प्राची अग माझ्या भावाना आणि बहिणीला कळवलं का? आईला पण कळायला हवं. नाहीतर तिला वाईट वाटेल."
"कळवते लगेच. तुम्ही खूप विचार करू नका. तुम्हालाच त्रास होईल. हेपण दिवस जातील."
"हो जातील ग पण ही वेळ आत्ताच का आली मला कळत नाही. जेव्हा तुम्ही आयुष्याची नवी सुरुवात करायला निघाला तेव्हाच का हे घडलं? आधीच तुमचं वैवाहिक जीवन सुरू व्हायला वेळ झाला आहे. त्यात आता ही अडचण."
"तुम्ही नका विचार करू. इतके दिवस वाट बघीतली आणखी थोडे दिवस आणखी थांबू. भय्यासाहेब आपल्याला परके नाहीत. इतरांसाठी आपण आयुष्यात खूप तडजोडी करतो नं मग आपल्या माणसांसाठी का नाही करायची?"
"त्यांनी कधीच आपल्याला आपलं मानलं नाही.आपणच म्हणत बसलो ते आपले आहेत. आपण म्हणजे मी."
"आई कदाचित हे त्यांचं आजारपण त्यांचा स्वभाव बदलण्यासाठी देवांनी दिलं असेल. देवाची खेळी कुठे कळते आपल्याला?" प्राची कामीनी बाईंना समजावत म्हणाली.
प्राचीने अलगद सासूचा हात हातात घेऊन थोपटला.
"आई प्रत्येक गोष्टींकडे आजपर्यंत आपण दोघी सकारात्मकतेनी बघत आलो. म्हणूनच आपण संकटासमोर कधी खचलो नाही. हर्षवर्धनला ड्रग्ज सारख्या एवढ्या घट्ट व्यसनाच्या विळख्यातून आपण बाहेर काढलं. हेही संकट टळेल. यातूनही आपण बाहेर पडू."
"त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाली की त्यांची देखभाल कोण करेल? मला चिंता लागली आहे. भय्यासाहेबांना इथे आणायचं का?" कामीनी बाईंच्या स्वरात काळजी होती.
"आणायला हरकत नाही. पण ते खूप स्वाभीमानी आहेत. हे घर आम्ही घेतलंय त्यामुळे आत्ताच्या परीस्थितीत त्यांना इथे येणं आणि राहणं आवडेल का? यात शंका आहे. त्यापेक्षा त्यांना त्यांच्याच घरी जाऊ दे. आई तुम्ही काही दिवस जा तिकडे. इकडे राहीलात तर तुम्ही मनातून अस्वस्थ रहाल."
"हो. तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी जाऊ नं तिकडे? तुला चालेल?"
आपले पाझरणारे डोळे पुसत त्यांनी विचारलं.
"आई असं का विचारता? मला चालेल. तुम्ही आमच्यासाठी ते घर सोडलं. तुमचा जीव तिथे असणं स्वाभाविक आहे. आत्ता भय्यासाहेबांना तुमची गरज आहे. तुम्ही त्यांच्या जवळच असायला हवं. फक्त स्वतःच्या तब्येतीचीपण काळ्जी घ्या."
" प्राची किती समजूतदार आहेस तू. किती छान समजून घेतेस मला."
"आई काही वर्षांपूर्वी माझी किती कठीण परिस्थिती होती. त्यावेळी तुम्ही मला आईच्या मायेने आपलंसं केलं आणि मला मानसिक आधार दिला. आता माझी वेळ आहे. तुमच्या पाठीशी उभं राहण्याची. तुम्ही निश्चिंत मनाने भय्यासाहेबांबरोबर आपल्या घरी जा. तुम्ही तिथे असलात की भय्यासाहेबांची काळजी व्यवस्थीत घेतल्या जाईल. हं"
कामीनी बाईंन डोळे पुसत प्राचीकडे बघून हसल्या.
***
दवाखान्यात प्राची पोचली तेवहा सकाळीच अशोक दवाखान्यात आलेला होता. तो आल्यावर शशांक घरी जात असे. अशोक दवाखान्यात असल्यामुळे प्राची स्वतःबरोबर हर्षवर्धन आणि कामीनी बाईंना खायला लावते. तिला माहिती असतं आपण दवाखान्यात गेलो की या काही खाणार नाहीत. आपल्यासमोर त्यांना खायला लावून मगच ती दवाखान्यात जात असे.
"बाबा डाॅ. येऊन गेलेत?"
" इथल्या डाॅ.चा राऊंड झालाय. मोठे डाॅ.अकरा वाजेपर्यंत येतील. तुझ्या सासूबाई अशा आहेत?"
अशोकने विचारलं.
"ठीक आहेत.पण अस्वस्थ असणारच कारण शेवटी त्यांचा नवरा आयसीयू मध्ये आहे. म्हणूनच मी त्यांचा नाश्ता झाल्याशिवाय घरातून बाहेर पडले नाही."
"बरं केलंस. थोड्यावेळानी वासंती येईन.म्हणाली."
अशोक म्हणाला.
"होका .येऊ द्या. एकदम भय्यासाहेबांचं बीपी का वाढलं असेल कळत नाही."
भय्यासाहेबांचा ड्रायव्हर शंकर दवाखान्यात आलेला असतो. त्याला प्राची विचारते.
" शंकर इतक्यात बाबांचं बीपी सारखं वाढत होतं का?आणि कशामुळे वाढत होतं.?"
"कशामुळे वाढत होतं माहीत नाही.पण एक दोनदा तुमच्या कंपनीची जाहीरात टिव्हीवर लागली होती तेव्हा खूप आरडाओरडा करून बोलत होते. गाडीत बसल्या बसल्या मला झोप लागली होती. त्यांच्या ओरडण्यानी मी जागा झालो. घराचं दार आतून बंद होतं म्हणून मी खिडकीतून बघीतलं. तर ते टिव्हीवरील जाहीरात बघून तुमच्या नावांनी आणि कंपनीच्या नावांनी आरडा ओरडा करत होते."
प्राचीला त्यांचं बीपी वाढण्यामागचं कारण कळलं. आपल्याबद्दल अजूनही त्यांच्या मनात राग आहे. या परीस्थितीत आपण त्यांच्यासमोर न जाणं योग्य हे प्राचीच्या लक्षात आलं.
अकरा वाजता डाॅ. राउंडला आले. अशोक त्यांच्या बरोबर गेला पण आयसीयू बाहेरच त्याला थांबवलं.
***
इकडे कामीनी बाई उदास बसल्या होत्या.त्यांना तसं बघून हर्षवर्धननी त्यांना विचारलं
" आई तुला काय झालं?"
"अरे बाळा तुझे बाबा अजून सिरीयस आहेत. मला काळजी वाटते.तुला काहीच वाटत नाही?"
"नाही. मला ते माझे बाबा आहे असं वाटतं नाही."
"का?"
"त्यांनी लहानपणी मला तुझ्यासारखे कधी जवळ घेतलं नाही. मी शाळेत पहिला नंबर मिळवला तरी कधी कौतुक नाही केलं. जे केलं ते तूच केलं. मग मला कशाला वाईट वाटेल? तुला काही झालं असतं तर मी खूप रडलो असतो."
एवढं बोलून हर्षवर्धन आत निघून गेला.
कामीनीबाई त्यांच्या बोलण्यानी अवाक् झाल्या. हा एवढा विचार करू शकतो आहे? लहानपणीचं सगळं याला आठवतंय म्हणजे याच्या मेंदूवरचा नशेचा विळखा गेला पण वडिलांच्या विचीत्र वागणूकीने त्याच्या मनावर उठलेले वळ अजून तसेच आहेत. हे कसे काढावे? हा प्रश्नच आहे.
कामीनी बाई आपल्याच विचारात असतानाच प्राचीचा फोन आला.
" हॅलो."
"आई आत्ताच मोठे डाॅ.येऊन गेलेत. त्यांनी सांगीतलय घाबरू नका. पेशंट आता धोक्याबाहेर आहे म्हणाले. तुम्ही ठीक आहात नं?"
"हो मी ठीक आहे. मी आत्ता हर्षवर्धनला सांगीतलं की तुझे बाबा सिरीयस आहेत तर म्हणाला मला काही वाईट वाटलं नाही. मी लहान असतांना ते कधीच चांगले वागले नाही माझ्याशी. प्राची हा विचार करायला लागला आहे. नशेचा वेढा निघाला आहे पण वडलांच्या विचीत्र वागणूकीचा वळ त्याच्या मनावर तसाच आहे. तो कसा निघेल ग? याची काळजी वाटते मला."
"तुम्ही खूप काळजी करू नका. हे सगळं नीट होऊ द्या. मग मी समजावीन हर्षवर्धनला. भय्यासाहेबांबरोबर तुम्ही घरी जाल तेव्हा शालीनीला स्वयंपाकाला बोलावून घ्या. तुम्ही खूप दगदग करू नका.ठेऊ."
"हो."
फोन ठेऊन कामीनीबाई पुन्हा विचारात हरवल्या.
***
बारा वाजत आले होते. तेव्हाच वासंती अशोकसाठी डबा घेऊन आली.राधा शशांक पण आले. प्राचीनी त्यांना डाॅ.काय म्हणाले ते सांगीतलं. अशोक शशांकला म्हणाला
" शशांक मी थांबतो इथे. तू रात्री उशीरा आलास तरी चालेल."
"ठीक आहे काका तसच करतो.""
" संध्याकाळी मी आईंना घेऊन येईन."
"हर्षवर्धन येणार आहे का?"
राधानी विचारलं.
"नाही येणार बहुदा.तो आईंना म्हणाला भय्यासाहेब आजारी आहेत तर त्याला काही वाटलं नाही. म्हणून मी त्याला येण्याची जबरदस्ती करणार नाही."
"असं म्हणाला हर्षवर्धन?" राधानी आश्चर्यानी विचारलं.
" हो. त्याची नशेच्या विळख्यातून सुटका झाली आहे म्हणूनच लहानपणापासून भय्यासाहेब त्याच्याशी कसे वागले ते त्याला आठवतंय.ते वळ त्याच्या मनावर आहेत. ते निघाल्याशिवाय त्याला भय्यासाहेबां विषयी आत्मीयता वाटणार नाही.""
"मग आपण काय करणार त्यासाठी?" वासंतीनी काळजीनं विचारलं.
"आई आपण तो नशेतून बाहेर येण्याची जशी वाट बघीतली तशीच आताही वाट बघायची. हळुहळुच ते वळ नाहीसे होतील. शेवटी कितीही झालं तरी ते त्याचे वडील आहेत. त्याला प्रेम वाटेलच. त्याचबरोबर भय्यासाहेबांचा स्वभाव जर या आजारामुळे थोडा निवळला तरच हे शक्य आहे. म्हणून घाई करून चालणार नाही."
"भय्यासाहेब आणि हर्षवर्धन ही स्वभावाची दोन टोकं झाली आहेत. यातून कोण दोन पावलं पुढे येईल? कसा एकमेकांशी कसं पटवून घेईल? काही कळत नाही." अशोक म्हणाला.
"बाबा ते तर येणारा काळच ठरवेल. सध्यातरी भय्यासाहेबांची तब्येत महत्वाची आहे. त्याना डिस्चार्ज मिळाला की आई त्यांच्याबरोबर घरी जाणार आहेत."
" का?"वासंती नी प्रश्न केला.
"आई त्या त्यांची बायको आहे. घरी गेल्यावर भय्यासाहेबांकडे कोण लक्ष देईल? म्हणून त्या जाणार आहे"
"इतकी वर्ष केली का भय्यासाहेबांनी तुझ्या सासूची काळजी?" वासंतीने जरा घुश्श्यात विचारलं.
"आई ही वेळ मागचं उकरून काढायची नाही. त्यांना वाटतंय त्यांना जाऊदे. कदाचित त्यांच्या सेवेमुळे भय्या साहेबांचा स्वभाव जर बदलला तर चांगलं आहे नं. कधी कधी वाईटातून चांगलं निघतं. आपण तेच अपेक्षीत करायचं. आपण सकारात्मक राहीलो तरच सगळे प्रश्नं सुटतात."
"मला काय वाटतं सांगू प्राची.मी एका काऊंन्सलरच्या लेक्चरला बसले आहे."
" राधा तुझं खरं आहे. पण प्रत्यक्षात ती आहेच काऊंन्सलर." शशांक हसत म्हणाला.
"शशांक मस्करी कसली करतो?" प्राची म्हणाली.
"अगं मस्करी नाही करत प्राची खरच बोलतोय. ऑफीसमध्ये स्टाफशी बोलताना, मिटींग मध्ये बोलताना तू अशीच बोलतेस. तू सगळ्यांना छान समजावतेस. म्हणून आपल्या ऑफीसमध्ये वातावरण खेळीमेळीचे असतं."
"प्राची प्रायव्हेट रुममध्ये केव्हा हलवतील?" राधाने विचारलं.
" पक्कं माहीत नाही पण आयसीयू मध्ये दोन तीन दिवस तरी ठेवतीलच. अजून त्यांना सिडेटिव्ह देणं चालू आहे. सगळ्या गोष्टींना ते प्रतीसाद द्यायला लागले की कदाचित प्रायव्हेट रूम मध्ये हलवतील."
जरा वेळ सगळेच गप्प होते.शशांक त्याच्या ऑफीसला जायला निघाला.राधा सुद्धा निघाली.अशोक प्राचीला म्हणाला.
"तू जा ऑफीसला. मी आहे इथे. वासंतीपण आहेच. संध्याकाळी घरी जाऊन सासूबाईंना घेऊन ये."
" ठीक आहे तसंच करते. काही औषध सांगीतली तर घेऊन या. हे घ्या पैसे."
प्राचीने पर्समधून पैसे काढून दिले. ते बघून अशोक म्हणाला,
"अगं वेडे लागलं का? मला पैसे कसली देतेस? व्याही आहेत माझे."
"हो बाबा कळतं मला.पण तरी ठेवा."
" नाही.फालतूपणा करू नकोस.बाबा आहे मी तुझा.ऐक माझं.राहू दे पैसे." प्राचीनी शेवटी पैसे पर्समध्ये ठेवले.
प्राची ऑफीसला निघाली.ती गेल्यावर वासंती अशोकला म्हणाली.
" या मुलीच्या नशीबी आणखी किती संकटं येणार आहेत माहित नाही."
"हो खरय तुझं. येणारी संकट येतातच आपण कसं त्यांना थांबवणार? या संकटामुळे भय्यासाहेब बदलावेत असं वाटतं. त्यांना आपल्या कुटूंबाविषयी आणि हर्षवर्धनला आपल्या वडलांविषयी प्रेम वाटलं पाहिजे. प्राचीची याचंसाठी धडपड चालू आहे. कामीनी बाई साध्यासरळ आहेत. शेवटी त्यांचा नवरा आजारी आहे म्हणून चिंता वाटणारच. बघू काय होतं पुढे."
"तुम्ही जेऊन घ्या.मग मी निघते."
"ठीक आहे." अशोक ने जेवणाचा डबा उघडला. जेवताना अशोक आणि वासंती अवांतर गप्पा करू लागले.
***
प्राचीला ऑफीसमध्ये बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. कारण काल प्राची गावाला गेली होती आज इथे कशी? हा प्रश्न सगळ्यांना पडला.त्यांचे चेहरे प्राचीनी वाचले. तीनी रिसेप्शन काऊंटरवर सांगीतलं सगळ्यांना केबीनमध्ये पाठवायला आणि ती केबीनमध्ये शिरली.
थोड्यावेळात सगळे केबीनमध्ये आले.त्यांना प्राची म्हणाली
" तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल. काल मी गावाला गेले होते आणि आज इथे कशी? मी कालच रात्री परत आले कारण माझ्या सास-यांना म्हणजेच हर्षवर्धन साहेबांच्या वडलांना मासीव्ह हार्ट अटॅक आल्यामुळे ते आयसीयू मध्ये आहेत. हर्षवर्धन साहेब सध्या येणार नाहीत ऑफीसला. मी पण थोड्यावेळासाठी येत जाईन. तुम्हा सगळ्यांना माझी ही विनंती आहे की सगळ्यांनी आम्हाला या कठीण परीस्थितीत सहकार्य करावं. तुम्हाला काही अडचणी आल्या तरच मला फोन करा. यादव ऑफीसमध्ये आहेत. सगळेजण मी ऑफीसमध्ये नाही म्हणून टाईमपास न करता आपल्या कामाकडे लक्ष द्या. आता सगळे आपापल्या कामाला गेलात तरी चालेल. संदीप तू थांब."
" हो मॅडम." सगळे गेल्यावर प्राची संदीपला म्हणाली,
"मागच्यावेळी सुबोध पाटकरांशी मिटींग होऊ शकली नाही. आत्ता फोन लाव. ऊद्या जमतं असेल तर बोलावून घे.आज आत्ता आलेत तरी मला चालेल."
"ठीक आहे मॅडम. त्यांच्याशी बोलून तुम्हाला सांगतो."
"संदीप डिटेक्टीव्ह हा शब्द फोनवर बोलताना वापरू नकोस. ऑफीसमध्ये इतरांच्या कानावर हा शब्द पडायला नको
" ठिक आहे मॅडम."" संदीप केबीनबाहेर गेल्यावर प्राचीनी एक नि:श्वास सोडला आणि खुर्चीवर डोकं मागे टेकवलं.
--------------------------------------------------------क्रमश:
लेखिका...मीनाक्षी वैद्य.