कामीनी ट्रॅव्हल्स भाग २०
मागील भागात आपण बघीतले की हर्षवर्धन आणि प्राचीचं एक हळूवार नातं तयार होऊ लागलं. आता बघू या भागात काय होईल.
सकाळी प्राची उठली तेव्हा तिला खूपच ताजतवानं वाटतं होतं. तिचं हर्षवर्धनकडे लक्ष गेलं.एखाद्या निरागस मुलाप्रमाणे तो झोपला होता. प्राची आपलं आवरून खोलीबाहेर आली.
कामीनी बाई स्वयंपाकघरात चहा करत होत्या.प्राचीकडे लक्ष जाताच म्हणाल्या
" अरे व्वा! आज गडी खूष दिसतोय.काॅफी करु का तुझी?"
त्यांच्या प्रश्नावर प्राचीनी त्यांना घट्ट मिठी मारली. कामीनी बाईंच्या लक्षात आलं आजचा आनंद काही वेगळाच आहे. हिची मिठी थरथरतेय. ही थरथर एक संवेदनशील गोष्ट आनंदाने आपल्यापर्यंत काहीतरी पोचवते आहे.
बराच वेळ हळव्या, संवेदनशील प्रेमात बुडालेल्या आपल्या सुनेची नव्हे लेकीची मिठी कामीनी बाईं अनुभवत होत्या. आपल्या मुलाचा संसार आता लवकरच सुरू होणार आणि एका सुंदर वैवाहिक जीवनाची वाटचाल दोघं सुरू करणार ही भावना कामीनी बाईंना खूप उत्तेजीत करून गेली.
प्राचीचा इतके वर्षाचा संघर्ष आता संपणार आणि प्रेमाचं मधूर फळ तिच्या ओटीत येणार हा विचारच कामीनी बाईंना रोमांचित करून गेला.
त्या एक आई म्हणून या क्षणाची किती वर्ष वाट बघत होत्या. प्राचीसारख्या समंजस मुलीच्या आयुष्यातील संघर्ष कधी संपेल याची वाट बघत होत्या.आता तो क्षण जवळ आल्याचं त्यांना जाणवलं. तशा त्या मनोमन सुखावल्या.
कामीनी बाईंनी स्वतःला सावरून हळूच प्राचीची मिठी सोडवली. तिच्या हनुवटीला पकडून अलगद चेहरा वर केला. तिचा चेहरा गोड संवेदनांनी भरला होता. तिला काही न विचारता त्या म्हणाल्या,
" प्राची कळलं मला सगळं. आता लवकरात लवकर फिरायला जाऊन या."
मानेनी हो म्हणत प्राची हसली आणि लाजलीसुद्धा.
हा क्षण फक्त दोघींचा होता. त्यात दुसरं कोणीही त्यांना नको होतं. कामीनी बाईंनी प्राचीला अलगद टेबलजवळील खुर्चीवर बसवलं. प्रेमानी तिचा हात हाती घेऊन म्हणाल्या.
""प्राची तू अर्ध्याहून जास्त हे युद्ध जिंकली आहेस. या क्षणाला पूर्णपणे तुझी ओळख करून द्यायची वेळ आली आहे. तुम्ही फिरायला जा. तिथे निवांतपणा मिळेल. एकमेकांना खोलवर समजून घ्या. या दिवसात तू कामाचं टेन्शन अजीबात घेउ नकोस. मी ऑफीसमध्ये जात जाईन. राधा आणि शशांक येतीलच माझ्या मदतीला. शिवाय यादव आहेच मला मदतीला. तुम्ही परत आल्यावर मला हर्षवर्धन पुर्वी सारखा दिसेल याची खात्री आहे. इथली काळजी करू नकोस. तुझं जे धेय्य होतं ते आता तुझ्या खूप जवळ आलं आहे. आता प्रयत्न न सोडता धेय्य गाठ. माझा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे."
प्राची मनातून इतकी सुखावली होती की मान वर करून कामीनी बाईंना काही उत्तर देणं तिला अशक्य झालं होतं. मान खाली घालूनच प्राची कितीतरी वेळ नुसतीच बसली होती.
कामीनी बाईंनी तिच्यासाठी काॅफी केली.दोघींचे काॅफीचे कप आणि बिस्कीटे घेऊन त्या तिच्यासमोर खुर्चीवर येऊन बसल्या.
"प्राची काॅफी घे बेटा. आज तू इतकी छान बातमी दिली आहेस आज देवाला प्रसाद म्हणून शीरा करते. हर्षवर्धन मध्ये झालेला हा बदल तू तुझ्या आईला पण सांग त्यांनाही आनंद होईल. सांगशील नं ?"
"हो." मान खाली घालूनच प्राची बोलली.
"अगं किती लाजशील.माझ्याकडे बघशील की नाही?"
"आई हा क्षण आला आहे यावर माझा अजून विश्वास बसत नाहीय. हां क्षण इतक्या अचानक माझ्यासमोर आला म्हणून माझी जरा तारांबळ उडाली आहे."
"असंच असतं.आता आलाय तर या क्षणाचं तुम्ही तितक्याच ऊत्साहानी स्वागत करायला हवं." कामीनी बाईं म्हणाल्या.
" हो आई. मी आजच ऑफीसला गेले की राधाला टूरचं प्लॅन करायला सांगते. पुढच्या आठवड्यातच आम्ही जाऊ. आई पण माझी छाती अजून धडधडतेय."
""बाळा असं होतं. ज्या क्षणाची आपण वाट बघत असतो तो अचानक समोर आला की धडधडायला होतच. त्यानी आपण आणखी उत्साहीत होतो.तो उत्साह संपण्या आधी नवीन आयुष्याची सुरुवात करायला हवी. तशी झाली की माझी हर्षवर्धन बद्दलची काळजी खूपच कमी होईल. तुझ्या कठोर परिश्रमांना यश मिळालं याचा आनंद होईल."
""आई काळजी करू नका. आता आपले चांगले दिवस आलेत.आता सगळं नीट होईल."
" तुझ्या तोंडात साखर पडो."कामीनी बाई म्हणाल्या.
प्राची आनंदानी नाश्ता तयार करायला लागली. तिच्या चेह-यावर वेगळाच आनंद होता. तिच्या आनंदाचं प्रतीबिंब कामीनी बाईंच्या चेहे-यावर पडलं होतं.
***
कामीनी ट्रॅव्हल्सनी नवीन टूरचं प्लॅन करून तशी जाहीरात दिली होती. त्याचा फिडबॅक द्यायला म्हणून प्रिया प्राचीच्या केबीनपाशी येते.दारावर नाॅक करते.
" कोण आहे?"
"मॅम मी प्रिया"
" हं ये आत."
केबीनमध्ये आल्यावर तिचा आनंदी चेहरा बघून प्राची म्हणाली.
" काय... एवढा आनंद कसला झालाय? लग्नं ठरलय का?"
" नाही हो मॅडम. आपण परवा आपल्या नव्या टूरची जाहीरात दिली होती नं. पूर्ण बुकींग झालंय."
"अरेवा! छान बातमी आहे."
प्रिया म्हणाली ,
"मॅम मनवाच्या रूपात आपल्याला विलक्षण एनर्जी असलेली आणि जबरदस्त व्हीजन असलेली आर्टिस्ट मिळाली आहे. दोन दिवसांत फुल झालेलं बुकींग याची साक्ष आहे."
"खरं आहे. प्रिया तुझ्यामागची धावपळ थोडी कमी झाली की माझी आणि तिची गाठ घालून दे. तिचं कौतुक करणं आवश्यक आहे. ही आर्टीस्ट कामीनी ट्रॅव्हल्सच्या हातून निसटायला नको. ॲप्रीसीएशन वेळच्या वेळी व्हायला हवं"
प्राची थोडं थांबून हातात असलेल्या कागदावर एकदा नजर टाकून प्रियाला म्हणाली.
"प्रिया आपण नंतर जी टूर घेणार आहोत त्यात आधी आपल्याबरोबर आलेले कोणी प्रवासी जर येणार असतील तर त्यांचा फोटो आणि त्यांच्या दोन ओळी म्हणजे आम्ही जाणार आहोत तुम्हीपण या अश्या पद्धतीच्या. हे पेपर मध्ये देऊ. टिव्ही साठी पण यांना जाहीरातीमध्ये सहभागी करून घेऊ."
" मॅडम छान कल्पना आहे. मला एक वाटतंय आपण एक वेगळा प्रयत्न करून बघायचा का?"
"कोणता?"
प्राचीने उत्सुकतेने विचारलं.कारण प्रिया नेहमीच काहीतरी वेगळ्या कल्पना सुचवते हे प्राचीच्या इतक्या दिवसात लक्षात आलं होतं.
" जे विकलांग असतात अश्या लोकांना ट्रॅव्हल्स बरोबर प्रवास करणं जमत नाही. आपण त्यांची काळजी घेऊन नेलं तर?"
"कल्पना छान आहे तुझी. पण ही कल्पना प्रत्यक्षात कशी आणायची यावर चांगली चर्चा व्हायला हवी. त्यांची काळजी आपण घ्यायची म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात? यावर चर्चा व्हायला हवी. वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात विकलांग प्रवाशांना त्रास व्हायला नको. कामीनी ट्रॅव्हल्सचं ब्रीद आहे.प्रवाशांना त्रास व्हायला नको. त्यांनी भरलेल्या पूर्ण पैशांचा मोबदला म्हणजे त्यांना मिळणारा आनंद असावा. कळतय?"
" हो मॅडम बरोबर आहे तुमचं."
प्रिया हसून म्हणाली.तिच्या डोळ्यात प्राची बद्दल नितांत आदर झळकत होता.
"आपण करू यावर विचार. जाहीराती बद्दल जे बोलले ते करता आलं तर बघ."
प्राचीने प्रियाला आठवण करून दिली.
"हो मॅम. मी बघते. टीव्हीसाठी जी जाहीरात आपण करणार आहोत त्यासाठी माॅडेल कोण घ्यावेत हे विचारायला ओम ॲड एजन्सीचा फोन आला होता.
प्राची काहीतरी विचार करत होती. अचानक ती म्हणाली.
"प्रिया माॅडेल आपण घ्यायचे ते आपले प्रवासीच. त्यांच्या घरी जाऊन लाईव संभाषण करायचं. ही जाहीरात अशी केली की त्याचा परीणाम जास्त चांगला होईल. प्रिया दुपारी तीन वाजता आपण यावर एक मिटींग घेउ तेव्हा यावर सविस्तर बोलू. चालेल?"
"ओके मॅम. मला वाटतं या ट्रीप पासूनच केलं तर?"
"हरकत नाही. ऊलट छान होईल. या ट्रीपमधे नवीन लोक कोण आहेत आणि एकदा येऊन गेलेले कोण आहेत बघ. त्या दोघांना जाहीरातीत घेऊ. मनवाला यावर छान जाहीरात तयार करायला सांग. पेपर आणि टिव्ही दोन्हीसाठी."
" ठीक आहे मॅडम."
एवढं बोलून प्रिया प्राचीच्या केबीनबाहेर पडली.
****
ठरल्याप्रमाणे प्रियाने ओम ॲड एजन्सीला प्राचीची कल्पना सांगीतली. त्यांनाही ती आवडली. प्रवाशांना फोन करून प्रियाच त्यांच्या तारखा ठरवणार होती.
" मॅडम आत येऊ?"
दरवाज्यावर नाॅक करून प्रियाने विचारलं.
" ये." समोरच्या फाईल्स बघता प्राची म्हणाली.
" बस प्रिया."
" हो. "
प्रिया खुर्चीवर बसली. काही क्षण शांततेत गेले कारण प्राची समोरची फाईल खूप काळजी पूर्वक वाचत होती. प्रियाला प्राचीचा स्वभाव माहिती असल्याने तीही प्राचीचं काम आटोपेपर्यंत शांत पणे बसली.
" बोल." हातातील काम पूर्ण करून प्राचीने म्हटलं.
" मॅडम आपल्या बरोबर प्रवास केलेल्या प्रवाशांची ही यादी."
प्रवाशांची नावं लिहीलेल्या कागद प्रियाने प्राची समोर ठेवला. प्राचीने सगळी नावं नजरेसमोरून घातल्यावर विचारलं.
" यातील कोणाशी काॅंटॅक्ट झाला?"
" अजून कोणाला फोन केलेले नाही. "
" प्रिया आज दुपारी आपण मिटींग घेउ त्यावेळी मी आत्ता काय सांगते त्या गोष्टी लक्षात ठेव. वेगवेगळ्या ठिकाणच्या टूरवरचा एकेक प्रवासी घे. मला खूप मोठ्या वेळेची जाहीरात नकोय पण त्या प्रवाशाबरोबर त्या जाहीरातीत मला त्यांच्या कुटुंबातील लोक हवेत. त्यांना आपल्या कामीनी ट्रॅव्हल्स बद्दल जे अनुभव व्यक्त करायचे आहेत ते करू द्यायचे. यासाठी कुठल्याही प्रकारचं स्क्रिप्ट राहणार नाही."
" ठीक आहे मॅडम."
"दुसरं ही जाहिरात शूट करण्यापूर्वी त्या लोकांना आपल्या ऑफीस कडून फोन जाईल. ते तयार झाले की त्या लोकांबरोबर आपण एक मिटींग घेउ. त्यांच्या वेळेनुसार मिटींगची वेळ ठरव."
" हो."
" त्यांना सगळं व्यवस्थित सांगू. त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. या जाहीरातीमध्ये ज्या व्यक्ती असणार आहेत त्यांना त्यांची नेहमीची कामं करताना दाखवू.जसं की स्वयंपाक करताना, झाडाला पाणी घालताना, पूजा करताना वगैरे.त्यांना कोणताही प्रश्न विचारायचा नाही.त्यांचं स्वागत शूट करूया. सविता म्हणजे कळलं का?"
" नाही." प्रिया म्हणाली.
" नाटकात किंवा सिनेमात एखादी व्यक्ती स्वतः शीच बोलताना दाखवतात तसं मला अपेक्षीत आहे."
" ठीक आहे मॅडम."
"आपली मिटींग झाली की मग मनवाला टूर ची जाहिरात तयार करायला सांग.नेहमीसारखी जाहीरात नाही. कामीनी ट्रॅव्हल्स च्या ऑफीसला पत्ता,मेल आयडी, फोन नंबर त्या लाईव्ह ॲडच्या तिथे द्यायचा. कळलं?"
" हो. मॅडम त्या प्रवाशांशी कोण बोलेल? तुम्ही बोलाल."
"हो.मीच बोलेन. प्रिया एक आणखी लक्षात ठेव.या जाहीरातीत आपल्या बरोबर आलेल्या सगळ्या वयातील एकेक प्रवासी निवड. काही कपल असतील तर काही एकटे असतील.काही गृप सुद्धा असतील."
"मॅडम गृप असतील तर त्यातील प्रत्येकाला बोलू द्यायचं?"
" नाही. गृप मधे जे चांगले बोलणारे असतील त्यांना बोलायला द्यायचं. आणि हे सगळं एकाच जाहीरातीत नाही करायचं. एकेका टूरचे दोन किंवा तीन जाहीराती तयार करायच्या. त्यांना मोकळेपणाने बोलू द्यायचं. नेहमी आपण जाहीरातीमधून सांगतो की कामीनी ट्रॅव्हल्स कशी आहे. या जाहीरातींमधून प्रवासी सांगतील. घरच्या कपड्यांमध्ये, विना मेकअप, त्यांच्या घरात त्यांचं काम करताना ते बोलतील. घरातील इतर सदस्यांना त्यांची कामं करत राहू दे.लहान मुलं असतील घरात तर ती दिसू दे.
आपल्याला या जाहीरातीला सेलिब्रिटी टच नकोय तर घरगुती टच हवंय.ज्ञमधूनच त्यांच्या घराबाहेरचं वातावरण दाखवायचं बॅकग्राऊंडला त्यांचं बोलणं चालू ठेवायचं. याने फायदा हा होईल की जाहीरात बघणा-यांना ती आपली वाटेल. कदाचीत कोणाच्या तरी घराबाहेरील वातावरण ओळखीचं वाटेल यातून जाहीरात खरी वाटेल.मला अशी जाहिरात हवी आहे."
प्राची बोलायचं थांबली पण प्रिया अजूनही आश्चर्य चकित नजरेने प्राचीकडे बघत होती. प्राचीने जाहीरातीवर एवढा विचार केला असेल याची प्रियाला अजीबात कल्पना नव्हती.
प्रियाच्या विस्फारलेल्या चेहरा बघून प्राचीला कळेना की आपण जे आत्ता बोललो ते हिला कळलं आहे की नाही!
" प्रिया…काय झालं? अशी का बघतेय?"
" अं…मॅडम तुम्ही या जाहीरातीवर एवढा विचार केला असेल असं मला वाटलं नव्हतं म्हणून आश्चर्य वाटलं."
प्रिया म्हणाली.
यावर प्राची हसून म्हणाली,
"प्रिया मला चाकोरीबद्ध वाटेवरून जायला आवडतं नाही. सगळे जे आणि जसं करतात तसच केलं पाहिजे असं नाही. वेगळं काही तरी केलं पाहिजे. अशा वेगळेपणामुळे आपला व्यवसाय वाढीस लागेल. मला तेच करायचं आहे. तुझा आउटऑफ द बाॅक्स जाऊन विचार करण्याचा स्वभाव मला आवडतो.म्हणून तुला जे विचार स्वातंत्र्य मी दिलंय ते जास्तीत जास्त वापर.आलं लक्षात?"
" हो.मॅडम तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला हॅट्स ऑफ."
हे बोलून प्रिया हसली.प्राचीपण हसली.
" मी आत्ता जे बोलले ते मिटींगमध्ये पुन्हा बोलीन.पण या गोष्टी तू लक्षात ठेव. मी आत्ता बोलले त्याच्या नोट्स काढल्यास नं ?"
" हो मॅडम."
" तू जी विकलांग प्रवाशांसाठी कल्पना सुचवली त्यावर कधी मिटींग घेता येईल बघ. माझ्या अपाॅंइन्टमेंट कशा आहेत ते बघून ठरव. मग मला दाखव."
" ठीक आहे.मी निघते."
प्रिया केबीनबाहेर पडली. तेवढ्यात प्राचीला फोन आला. फोनवरचं नाव बघताच प्राचीच्या चेहे-यावर आनंद झळकला.
_________________________________
क्रमशः प्राचीला कोणाचा फोन आला असेल? बघू पुढील भागात.
लेखिका मीनाक्षी वैद्य