Kamini Traval - 19 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग १९

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग १९

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १९

मागील भागात आपण बघीतले की कामीनी बाईंना काही तरी सांगायचं होतं. काय सांगायचं होतं बघू या भागात.
" आई काहीतरी सांगायचं होत तुम्हाला.सांगा."
प्राचीने पुन्हा असं म्हणताच जरा घाबरत का होईना कामीनी बाईं बोलल्या.

"आपल्या ऑफीस मध्ये अकाऊंट सांभाळणारे आहेत का कोणी?"

"सध्या बाहेर देतोय आपण अकाऊंट तपासायला. शशांक ठेवतो सगळे अकाऊंट. पण त्याला त्याच्या ऑफीसचं कामपण असतं. बाहेर सगळं व्यवस्थित आहे नं हे बघायला देतो. म्हणूनच मी विचार करतेय अकाऊंटट हवा अशी जाहीरात द्यावी."

"मला वाटतं जाहीरात देऊन नवीन कोणी माणूस घेतला तरी त्यांच्यावर कोणीतरी आपला माणूस हवा. मी म्हणत होते. तुझे बाबा रिटायर्ड झालेत त्यांना द्यायची का ही जबाबदारी? त्यांना आपण पगार देऊ. फुकट नाही करायचं त्यांच्याकडून काम."

कामीनी बाई एवढ्या बोलल्या पण जरा घाबरतच बोलल्या.

प्राचीच्या हे लक्षात आलं.ती म्हणाली

"आई तुम्ही किती छान पर्याय सांगीतला. माझ्या डोक्यातच आलं नाही. मी आजच बाबांना विचारते. बाहेरचा माणूस ठेऊच म्हणजे बाबांवर खूप लोड येणार नाही आणि शशांकलाही त्यांच्या ऑफीसच्या कामाकडे लक्ष देता येईल."

"मला वाटलं माझी कल्पना तुला आवडेल की नाही."

"ते आलं लक्षात माझ्या. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरून. तुम्हाला असं का वाटलं की तुमची कल्पना मला आवडणार नाही. तुम्ही आपल्या कंपनीचाच भाग आहात नं माझ्यासारखा. तुम्हीपण आपल्या कंपनीच्या भल्याचाच विचार करणार. इथून पुढे तुमच्या मनातलं काही सांगायचं असलं तर नि:संकोचपणे सांगत जा. कंपनी बद्दल असो किंवा आपल्या घरातलं असू दे."

एवढं बोलुन तिने सासूच्या खांद्यावर थोपटलं. कामीनी बाईं मंद हसल्या.

" थोडी भीती वाटली खरं.पण आता बोलत जाईन."

"बोलायचं आई. तुम्हाला मुलगी असती तर तुम्ही बोललाच असता नं? तुम्ही माझ्या आईचं आहात. आईसारख्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या, माझे निर्णय ऐकले,मला प्रेमाने जवळ घेतलं हे सगळं एक आईचं करू शकते नं? मग का तुम्ही मला घाबरलात? माझ्यावर तुमचा हक्क आहे. त्या हक्काने तुम्ही माझ्याशी बोला.बोलाल नं?"

प्राचीने असं विचारताच कामीनी बाईंच्या डोळ्यात पाणी आलं. ते अलगद आपल्या हाताने पुसत प्राची म्हणाली,

"आई नाही. आता रडायचं नाही. आपले रडण्याचे दिवस गेले. आता उत्साहाने रोजचा दिवस जगायचा आहे.आलं लक्षात?"

" हो ग बाळा. कधी कधी मी आईच्या भूमिकेत जाते आणि माझे डोळे पाणावतात. कशावरून तरी मागचे दिवस आठवतात आणि भावना आवरत नाही. पण आता असं नाही होणार. तू काळजी करू नकोस."

कामीनी बाईं प्राची कडे बघून हसल्या.

***

त्यादिवशी प्राची रात्री घरातलं आवरून झोपायला आपल्या खोलीत गेली. तेव्हा हर्षवर्धन एक ट्रॅव्हल्सचं मासिक वाचत होता. ते बघून प्राचीला आनंद झाला.

हर्षवर्धन आता ऑफीसमधे पण वावरतांना सराईतपणे वावरत असतो. आता पुढचे टूर आखण्यासाठी जेव्हा मिटींग घेतल्या जाते तेव्हा तोही हजर असतो. तो सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो. शेवटी प्राची मुद्दाम त्याचं मत विचारत असते.

हळूच थांबत थांबत तो आपले विचार मांडतो. त्याने मांडलेला विचार योग्य नसेल तर तो लगेच टाकाऊ म्हणून बाजूला टाकल्या जात नसे तर त्यावर चर्चा होत असे. तो विचार आपल्याला का घेता येणार नाही हे हळुहळू हर्षवर्धनला या चर्चेतून कळायचं पण समजायला थोडा वेळ लागायचा. तो यावर विचार करतोय असं दिसल्यावर प्राची टी ब्रेक घ्यायची आणि खुणेनीच सगळ्यांना गप्प रहा सांगायची.

या वेळेत हर्षवर्धनच्या चेह-यारचे बदलते भाव सगळे बघायचे. तो विचार करतोय हे सगळ्यांच्या दृष्टीनी आनंदाचं होतं. हळुहळू हर्षवर्धनला आपलं व्यक्तीमत्व गवसतय हे प्राचीसाठी महत्वाचं होतं.

आजूबाजूला खूप आवाज असतील तर त्यात हर्षवर्धनचा मेंदू सारासार विचार करू शकत नसे. म्हणून तो विचार करतोय असं दिसलं की टी ब्रेक व्हायचा आणि सगळे गप्प असायचे.

''त्याने सुचवलेल्या पर्याय एकदम टाकाऊ ठरवला तर त्याला आपला अपमान वाटू शकतो आणि असं झालं तर तो बोलणंच सोडेल. असं होऊ शकतं. तसच हर्षवर्धन पुन्हा मागे फेकल्या जाउ शकतो.असं व्हायला नको." असं आशूनी प्राचीला सांगीतलेलं असतं.

ती हेही म्हणाली,

"त्याचे विचार चुकत असले तरी प्रत्येक मिटींग मध्ये त्याला घ्या. त्याला त्या वातावरणात वावरू द्या. हळुहळू त्यांच्या मेंदूला विचार करण्याची चालना मिळेल. त्याचा विचार चुकला हे एकदम न सांगता हळूहळु चर्चेतून सांगा. त्याला कळेल. पण वेळ लागेल. तो ज्या पद्धतींने आपले विचार व्यक्त करील त्याने कुणाच्याही चेह-यावर हास्य येऊ देऊ नका. त्याला थोडी जरी शंका आली की आपल्या बोलण्यावर तुम्ही हसताय अशी तर तो बोलणं बंदच करेल. याबाबतीत सगळेच काळजी घ्या." आशूचं बोलणं लक्षात ठेऊन प्राची हे करत असे.

प्राचीची इच्छा आहे की हर्षवर्धनला एक सामान्य व्यक्ती म्हणून उभं करायचं. हे हळुहळूच होणार असतं त्यासाठीं एवढा वेळ आणि संयम ठेवण्याची प्राचीची तयारी आहे. प्राचीला झटपट काही नको आहे. आयुष्यभरासाठी तिचा जोडीदार खमका झालेला हवाय. म्हणूनच प्राची मनावर संयम ठेवून आशूने सांगीतलेल्या गोष्टी लक्षात ठेऊन वागत असे.

***

आजकाल अधून मधून जेवतांना हर्षवर्धन मनातल्या शंका प्राचीला विचारत असे. कामीनी बाई पण कधीतरी त्यांच्या शंकांना उत्तरं देत असत. आपल्या व्यवसायाबद्दल त्याच्या डोक्यात सतत विचार चालू असतात ही दोघींसाठी आनंदाची गोष्ट होती.

***

प्राचीने तिच्या वडलांना म्हणजे अशोकला फोन करून विचारलं की त्यांना कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसला रोज येऊन अकांऊट बघणं जमेल का? त्यांच्या हाताखाली ती असीस्टंट देणारच आहे.

रिटायर्ड झाल्यामुळे अशोकला काहीच हरकत नव्हती. त्याचा वेळ छान जाणार होता. आपल्या मुलीला मदत करण्याचं समाधान मिळणार होतं. प्राचीने मात्र त्यांना पार्ट टाईम करायला सांगीतलं. ऊरलेला वेळ तुमचे छंद जोपासा असं म्हणाली.

अशोक तयार झाला. दुस-या दिवशी पासूनच तो कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये येतो म्हणाला तसं प्राची म्हणाली,

"बाबा तुमच्या हाताखाली आपण एक माणूस नेमू. त्याला सगळं सांगा. मी एक जाहीरात देतेय. तुम्हीच इंटरव्ह्यू घ्या. तो माणूस जाॅईन झाला की त्या दिवशी पासून तुम्ही या.आत्ता घाई करू नका."

" ठीक आहे. मला आधी अकाउंट विभागाबद्दल सगळं जाणून घ्यावं लागेल. तू ज्यांच्याकडे अकाउंट बघायला देत होतीस त्यांच्याबरोबर बसून सगळं समजावून घ्यावं लागेल."

" ठीक आहे.मी त्यांना कधी वेळ आहे विचारते.तसं तुम्ही ऑफिसमध्ये या."

" चालेल. ठेऊ बेटा फोन?"

" हो बाबा.ठेवा."

दोघांनी फोन ठेवले.

****

अशोक आता नियमीतपणे कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये जाऊन लागल्याने शशांकचं काम कमी झालं. तो त्याच्या ऑफीसमध्ये लक्ष घालू लागला. अशोकच्या हाताखाली हेमंत नावाचा माणूस नेमला गेला. अशोक सकाळी ऑफिसला येऊन जेवणाच्या वेळेपर्यंत थांबत असे. उरलेल्या दिवसांच्या कामाच्या सूचना हेमंतला अशोक देत असे. अशोक घरी गेल्यावर काही काम असलं तर हेमंत फोनवर अशोकजी बोलत असे.

***

रोज ऑफीसमध्ये जात असल्याने प्राचीचा ऑफीस मधला वावर बघून अशोक आश्चर्याने स्तिमित झाला. प्राचीने एवढा मोठा व्यवसाय आपल्या बळावर उभा केला याचं अशोकला कौतुक वाटतं होतं.

कालपर्यंत अवखळ असणारी प्राची आज किती बदलली आहे.एक ठहराव आला आहे तिच्या वागण्यात बोलण्यात. हर्षवर्धनची जबाबदारी संयतपणे ती पेलत होती. एकाच वेळी दोन आघाड्या सांभाळणं सोपं नाही.

अशोक ऑफीसला जायला लागल्यानंतर दोन-चार दिवसांनी घरी चहा घेत असतांनाच अशोक वासंतीला म्हणाला,

" वासंती आपली प्राची लग्नानंतर खूप बदलली. किती शांत आणि संयमी स्वभावाची झाली आहे."

"होनं. मला जेव्हा हर्षवर्धन बद्दल कळलं तेव्हा खूप वाईट वाटलच पण त्याहीपेक्षा आपण तिच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं नाही याचं वाईट वाटलं."

"वासंती खरंतर आपली चूक नाहीच. आपण भय्यासाहेबांच्या वरवरच्या चेह-याला भुललो. तो चेहरा त्यांचा मुखवटा आहे हे आपल्याला कसं कळणार? आपण सरळ साधं आयुष्य जगत आलो. छक्के पंजे आपल्याला नाही जमले कधी."

"हो खरय. आणि भय्यासाहेब अशा नीच पातळीवर विचार करणारे असतील हे तरी डोक्यात कशाला येईल?"

""वासंती तसं बघीतलं तर प्राची खूप मोठ्याच संकटात सापडली होती. ती धीट आहे म्हणून आणि तिच्या सासूबाई तिच्या बाजूने असल्यामुळे ती खंबीरपणे भय्यासाहेबांना तोंड देऊ शकली."

"हो तुम्ही खरं बोलताय. पण आता संकटांचे ढग निवळत चालले आहेत. हर्षवर्धन जेव्हा पूर्वीसारखा होईल तेव्हा प्राची संकटातून बाहेर पडली असं म्हणता येईल."

"वासंती मी रोज प्राचीला बघतो तेव्हा मला लग्ना आधीची प्राची आठवते.अवखळ मस्तीखोर आता खूपच शांत झाली आहे."

"अहो परीस्थिती माणसाला शिकवते. हर्षवर्धन चांगला असता,भय्यासाहेब असे नसते तर कदाचित प्राची अशीच अवखळ राहिली असती. तुम्ही रोज तिला भेटता त्यामुळे माझ्याही जीवाला शांतता आहे."

"वासंती मला वाटतं एकदा रवीवारी या तिघांना जेवायला बोलावू. त्या निमीत्तानी तुला प्राची आणि कामीनी बाईंशी बोलता येईल. हर्षवर्धनशीपण आपल्याला बोलता येईल. ऑफिसमध्ये बोलतो माझ्याशी पण कामापुरतं."

""कल्पना छान आहे.ऊद्या ऑफीसला गेलात की बोला प्राचीशी."

"नाही ऑफीसमधे असं बोलणं बरं दिसत नाही.आत्ताच करतो तिला फोन."

एवढं बोलून अशोकने प्राचीला फोन लावला.

"हॅलो बाबा काय झालं ? एवढ्या रात्री फोन केलात?" प्राचीने घाबरून विचारलं.

"अगं काही झालं नाही. या रवीवारी तुम्ही तिघं इकडे याल का जेवायला हे विचारायला फोन केला. ऑफीसमध्ये इतक्या पर्सनल गोष्ट बोलायला बरं वाटतं नाही म्हणून आत्ता फोन केला."

अशोकने स्पष्टीकरण दिलं.

"हरकत नाही आत्ता केलात फोन तरी. एवढ्या रात्री तुमचा फोन कधी आला म्हणून जरा घाबरले. तुमची तब्येत तर बिघडली नाही असं वाटलं."

"साॅरी. तुला असं वाटणं स्वाभाविक आहे. मला वासंती म्हणतही होती. पण.."

"जाऊ द्या. मी ऊद्या आईंना विचारते आणि सांगते ऑफीसला भेटल्यावर."

"ठीक आहे"

असं म्हणून अशोकने फोन ठेवला.

"अगं वासंती मी म्हणत होतो की राधा आणि शशांकला पण बोलावू राधा प्राचीची चांगली मैत्रीण आहे आणि राधा बरोबर शशांकलाही बोलावता येईल. कसं वाटतं तुला?"

"बोलावू काही हरकत नाही."वासंती म्हणाली.

रवीवारी काय बेत करायचा आता याबद्दल अशोक वासंती बोलू लागले.वासंती म्हणाली,

"अहो प्राचीला ऊद्या विचारा. हर्षवर्धनला कोणता पदार्थ आवडतो. तो आता थोडा सावरलाय. आपल्या कडच्या जेवणामध्ये त्याच्या आवडीचा पदार्थ बघून आणखीन मोकळा होईल असं मला वाटतं."

"वासंती तुला वाटतंय ते बरोबर आहे. मी ऊद्या विचारतो. तुझा स्वयंपाक व्हायचा आहे नं. मी कोप-यापर्यंत जाऊन येतो. येतांना काही आणायचं असेल तर सांग. आणि किराणा दुकानात जर बन्सल भेटला तर उशीर होईल मला यायला. फार गप्पीष्ट आहे आणि बरेच महिने आम्ही भेटलो नाही. त्यामुळे सांगता येत नाही.चल निघतो."

" अहो आता नऊ वाजत आले. माझा स्वयंपाक व्हायला किती वेळ लागतो? दोघांचा स्वयंपाक म्हणजे भातुकली असते. माझा स्वयंपाक होईपर्यंत टिव्ही बघा."

वासंती म्हणाली.

"जाऊन येतो. दुकान उघडं असतं दहापर्यंत.चला निघतो. पिशवी दे.काही हवं असेल तर फोन कर."

अशोक एवढं बोलून निघाला.

यावर वासंतीनं अशोकच्या हातात पिशवी देताना फक्त मान डोलावली. बोलण्यासारखं काहीच नव्हतं. बन्सल प्रकरण तिला माहिती होतं. मनातच म्हणाली,
'तुम्ही घरी येईपर्यंत माझा दोनदा स्वयंपाक होईल.' वासंतीनी समोरचं दार लावलं आणि गालातल्या गालात हसत स्वयंपाकाला लागली.

------------------------------------------------------
क्रमशः कामीनी ट्रॅव्हल्स मध्ये पुढे काय होईल बघू पुढील भागात.
लेखिका - मीनाक्षी वैद्य.