Kamini Traval - 17 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग १७

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग १७

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १७
या भागात आशू हर्षवर्धनमध्ये कसा बदल घडवेल बघू.

आशूशी बोलणं झालं त्याप्रमाणे ती आजपासून येणार हे प्राची कामीनी बाईंना सांगीतलं आणि प्राची ऑफिसमध्ये निघाली.

ऑफीसमध्ये गेल्यावर एक दोन मिटींग होत्या त्यातील पहिली मिटींग झाली. दुसरी मिटींग चालू असतानाच कामीनी बाईंचा फोन आला.यावेळी कामीनी बाईचा फोन बघून प्राचीला आश्चर्य वाटलं.तिने मिटींग थोडावेळ थांबवून फोन घेतला.

" हॅलो.आई आत्ता कसा काय फोन केला? घरी सगळं ठीक आहे ना?"

प्राचीने पलीकडून कामीनी बाईंनी फोन उचलल्या उचलल्या प्रश्न केला.

"हर्षवर्धन खूप उदास आहे मी त्याला खूप विचारलं पण तो त्यांना काही सांगायलाच तयार नाही. काय करायचं?"

प्राचीला कामीनी बाईंचा आवाजात कंप जाणवला. त्यांनी जास्त घाबरू नये म्हणून प्राची त्यांना म्हणाली,

"काहीच बोलला नाही तुम्हाला,? ठिक आहे ही मिटींग आटोपली की मी घरीच येते. मग बोलते.

"ठीक आहे." कामीनी बाईंनी फोन ठेवला.

***

मिटींग आटोपली तशी प्राची यादवला काही सूचना देऊन घरी निघाली.

" मॅडम तसं काही सिरीयस नाही नं?" यादवने विचारलं.
" घरी गेल्यावर कळेल."
प्राची निघाली.गाडी चालवताना मात्र तिच्या डोक्यात असंख्य विचार होते. काय कारण असावं हर्षवर्धनला एवढं नाराज व्हायला. हर्षवर्धनला समजून घेताना कधी कधी फार कठीण जातं. आशू यायला लागली कि त्याचा मूड कसा सांभाळायचा यांची काही ट्रिक कळेल.

विचारांच्या नादात प्राची घरी पोचली.गाडी ठेऊन ती तडक घराजवळ गेली. प्राचीने दाराची बेल वाजवली. काही क्षणात कामीनी बाईंनी दार उघडलं.

"कुठे आहे हर्षवर्धन?" घरात शिरताच प्राचीने विचारलं.

"आपल्याच खोलीत बसलाय."

प्राची आत गेली. हर्षवर्धनला असं उदास बसलेलं बघून तिने विचारलं.

""काय झालं हर्षवर्धन? आज का एवढा उदास आहेस?"
पहिले तर तो काहीच बोलला नाही. जेव्हा प्राचीने पुन्हा विचारलं तेव्हा तो म्हणाला.

"प्राची मला काहीच जमत नाही."

"असं का वाटतंय तुला?"

"त्या शब्द कोड्यातलं मला काही येत नाही.मी ढ आहे."

एवढं बोलून तो रडू लागला.
.
प्राची त्यांच्या डोक्यावरुन हळूच हात फिरवत म्हणाली,

"हर्षवर्धन तू ढ नाहीस. हे बघ तू ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहेस. जर तू ढ असता तर एका झटक्यात पास झाला असता का ?"

हर्षवर्धनने नाही म्हणून मान हलवली.

"मी नवरा आहेत तुझा?"

अचानक एकदम जरबेच्या सुरात हर्षवर्धन बोलला.

"हो आहेसच तू माझा नवरा यात शंका कसली आली तुला? हे बघ हे मंगळसूत्र तूच घातलय माझ्या गळ्यात. आठवतय नं?"

""मी नवरा आहे तर मी काम केलं पाहिजे न? पैसे मिळवले पाहिजे." हिरमुसल्या स्वरात हर्षवर्धन म्हणाला.

प्राचीला आता त्याच्या ऊदास होण्याचं कारण कळलं.ती तेवढ्याच प्रेमानी ती म्हणाली.

"नव-यानी काम केलं पाहिजे,पैसे मिळवले पाहिजे हे तुझं म्हणणं बरोबर आहे पण कधीकधी नव-याला काम करणं शक्य नसलं,त्याला बरं नसलं तर बायकोनी काम करायला हवं नं.पटतय तुला ?"

" हो."

" इतकी वर्ष व्यसनामुळे तुझं शरीर आणि मेंदू दोघंही आळसावले आहेत.व्यायामानी तुझं शरीर बघ कसं पिळदार झालंय तसा मेंदूपण पिळदार व्हायला हवा. जेव्हा असं होईल तेव्हा तू सहज काम करू शकशील."

"कधी होईल असं?"

हर्षवर्धननी प्राचीला विचारलं.तशी प्राची म्हणाली

"लवकरच होईल. माझी मैत्रीण आहे आशू ती तुला आजपासून मेंदूसाठी व्यायाम द्यायला येणार आहे. तो व्यायाम छान कर म्हणजे लवकर तू काम करायला लागशील. पैसे मिळवायला लागशील."

प्राची आणि हर्षवर्धनचा संवाद कामीनी बाई दारात उभं राहून ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या.

त्यांच्या मनात आलं भय्यासाहेबांनी वाईट हेतू मनात ठेऊन आपल्या घरची सून म्हणून प्राचीला पसंत केलं. वाईटातून चांगलं निघतं म्हणतात तसं झालं. प्राची आली आपल्या घरात म्हणून हर्षवर्धनवर उपचार करणं शक्य झालं.नाहीतर माहित नाही हर्षवर्धनचं आयुष्य कसं झालं असतं!

प्राचीनीच आपल्या काळजाच्या तुकड्यांना चांगलं केलं. नाहीतर आजही आपला मुलगा असाच राहीला असता.त्यांनी देवाची प्रार्थना केली.

"देवा दोघांचा संसार सुखाचा होऊ दे." त्या हळूच खोलीच्या दारापासून लांब झाल्या.

कामीनी बाईंना त्यांचा मुलगा परत मिळाला याचा आनंद होता. प्राचीच्या धाडसाचं त्यांना कौतुक वाटतं असे. हर्षवर्धन व्यसनाच्या विळख्यातून आता पूर्णपणें बाहेर पडला होता. आता त्याच्या मेंदुची शक्ती वाढवायची होती.

प्राचीच्या समजावण्यामुळे हर्षवर्धन बराच सावरला.आपण काहीच करत नाही,पैसा कमवत नाही ही खंत जरा कमी झाली. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं.ते बघून प्राचीच्या मनावरचं टेन्शन दूर झालं.

"हर्षवर्धन आज तू नाश्ता सुद्धा केला नाहीस. होनं?"

"हो.खावसच वाटलं नाही.पण तुझ्याशी बोललो नं आता छान वाटतंय."

हर्षवर्धन प्राचीकडे बघून हसत म्हणाला.

" अरे ! मग तू मला बोलायचं.मी तुला सांगितलं आहे नं की मला घाबरायचे नाही.मी आधी तुझी मैत्रीण आहे नंतर बायको आहे.आता मनाला काहीही खुपलं तर मला बोलशील नं? की असा मूड घालवून बसशील. आई किती घाबरल्या."

प्राचीचं शेवटचं वाक्य ऐकून त्याला थोडा धक्का बसला.

" आई घाबरली. माझ्या लक्षात नाही आलं."

हर्षवर्धनचा चेहरा आणखी कावरा बावरा झाला.

"मी सांगेन त्यांना तुझा मूड का गेला होता.पण यापुढे लक्षात ठेव मनात काहीतरी ठेउन कुढत बसायचं नाही. मला नाहीतर आईंना सांगायचं.कळलं?"

" हो.कळलं."

" लक्षात ठेवशील नं?"

" हो. मी लक्षात ठेवीन. आई घाबरेल असं वेडंवाकडं वागणार नाही."

" गुड बाॅय नाही नाही गुड हजबण्ड."

हे बोलून प्राची हसायला लागली तसा हर्षवर्धन पण हसू लागला.

हर्षवर्धन आणि प्राचीचं हसणं कामीनी बाईंच्या कानावर आलं तसा त्यांनी मोकळा श्वास घेतला. दोन्ही हात जोडून परमेश्वराला नमस्कार करून म्हणाल्या,

" परमेश्वरा दोघांची अशीच जोडी राहू दे रे.हसरी आणि खेळकर. तुझे उपकार राहतील माझ्यावर."

"हर्षवर्धन आता मी निघू. ऑफीसला जाण्याआधी आपण तिघही जेऊ.चलतोस नं?" प्राचीने हळुवार स्वरात विचारलं.

" हो.चल."

दोघेही जेवायला खोलीबाहेर पडले.

***

प्राचीचं मंगेशभाईंकडून या व्यवसाया विषयी छोट्या छोट्या टिप्स घेणं चालूच होतं. तिला त्यांचा खूपच पाठींबा होता.

एकाच क्षेत्रात असून मंगेशभाई त्यातील ट्रेंड सिक्रेट सहजपणे प्राचीला सांगत होते हे विशेष होतं.प्राचीलाही याचं कौतूक वाटतं असे.

एकदा मंगेशभाई फोनवर शशांकला म्हणाले,

" शशांक प्राची हुशार आहेच पण धोरणी सुद्धा आहे. तिने जे धैर्य दाखवलंय हर्षवर्धनला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी त्याला तोड नाही. ती या क्षेत्रात नवीन आहे पण तिचे काही प्रश्न असे असतात जसं काही ती या क्षेत्रात फार वर्षांपासून आहे. तिला मार्गदर्शन करायला मला खूपच आनंद होतो. खरतर प्राची ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात माझी प्रतीस्पर्धी आहे. तरी मला तिची मदत करावीशी वाटते. प्राचीने या क्षेत्रात खूप लांबचा पल्ला गाठावा अशीच माझी इच्छा आहे."

" मंगेशभाई प्राचीशी माझी ओळख राधा मुळे झाली. पण प्रत्येक भेटीत तिचा समजूतदारपणा आणि हर्षवर्धनला या व्यसनामुळे बाहेर काढण्याची जिद्द मला दिसायची. म्हणून ती मला ग्रेट वाटते."

" खरंय शशांक. ड्रग्ज सारख्या विषारी विळख्यातून कोणाला बाहेर काढणं हे खायचं काम नाही. प्राचीने जे धाडस केलं त्याला तोड नाही."

" मंगेश भाई प्राचीने हर्षवर्धनला नुसतच ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढलं नाही तर त्याला पूर्वीसारखा करण्यासाठी ती धडपड करतेय.अजून बराच काळ तिची लढाई चालू राहणार आहे."

शशांक कौतुकाने म्हणाला.

"शशांक म्हणूनच मी ठरवलंय की या ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात ती स्थीर होईपर्यंत तिच्या पाठीशी उभं राहायचं. हे करताना मला खूप आत्मिक समाधान मिळतं."

" मंगेश भाई माझ्या मनात पण त्याच भावना येतात. चला फोन ठेवतो. काम आहे." शशांक म्हणाला.

" हो चालेल. मलाही एक क्लायंट भेटायला येणार आहे. तो मिलते फीर."

" नक्की."

मंगेश भाई आणि शशांक दोघांनी फोन ठेवला.

***

दोन वर्षांपूर्वी राधा आणि शशांक यांचं लग्न झालं. ते दोघं अजूनही प्राची आणि हर्षवर्धनच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत.

सुरवातीच्या काळात टूरवर प्राची बरोबर राधा आणि शशांक पण असतं. प्रत्यक्ष प्रवासात काय अडचणी येऊ शकतात हे मंगेशभय्यांनी प्राचीला सांगीतलं होतं. पण तोंडी सांगणं वेगळं आणि प्रत्यक्षात ती अडचण आल्यावर सोडवणं हे वेगळं.

स्वत: प्राची प्रवासात असल्याने दोन गोष्टी झाल्या.
एक गोष्ट म्हणजे अडचणी अशाप्रकारच्या येऊ शकतात हे तिला कळलं. दुसरी गोष्ट ट्रॅव्हल कंपनीची मालकीण आपल्याबरोबर आहे. आपल्याशी बोलते. आपल्या अडचणींची लगेच दखल घेते. हे लक्षात आल्याने प्रवासी खूष असायचे.

प्राचीला अश्या प्रवाशांनी केलेली जाहीरातच आणखी प्रवासी मिळवून द्यायचे.प्रवासी मिळवण्यासाठी प्राचीला वेगळ्या आकर्षक गोष्टींची मदत व्यवसायाची सुरुवात असूनही घेण्याची गरज पडली नाही. प्रवाशांनी आपल्या कंपनीतर्फे प्रवास करावा म्हणून काही मोह दाखवून प्रत्यक्षात त्यातील एकही गोष्ट न देणं प्राचीला मुळीच पटत नव्हतं.

***

प्राची जेव्हा टूरवर असे किंवा टूर डिझाईन करण्याआधी त्या भागाचा सर्व्हे करण्यासाठी जाई तेव्हा कामीनी बाई हर्षवर्धनची देखभाल करण्यासाठी घरी असतं.

हळुहळू हर्षवर्धन मध्ये आत्मविश्वास जाणवू लागला होता. बोलतांना सुरवातीला तो अडखळायचा कारण पुढचं वाक्य कसं म्हणायचं हे त्याला पटकन कळत नसे.

मेंदूला आलेल्या शिथीलतेमुळे असं होतं होतं. हीच शिथीलता काढून टाकण्यासाठी आशू त्याला वेगवेगळे खेळ खेळायला देत असे. कोणताही खेळ उपचार पद्धती म्हणून वापरत असताना त्या रूग्णाला कंटाळा येईपर्यंत वापरून चालत नाही. रुग्णाला सतत काही नाविन्य दिलं तर तो हिरीरीनी त्या उपचार पद्धतीला प्रतीसाद देतो.

आशू असच नाविन्यपूर्ण उपचार पद्धत दर आठवड्याला हर्षवर्धनला देत असे. सुरवातीला त्याचा मेंदू शिथील जरी असला तरी पटकन सोडवू शकेल अशी कोडी किंवा खेळ देत असे. आता हळुहळू तिने उपचार पद्धतीतील काठीण्य पातळी वाढवून त्याला तसे खेळ द्यायला सुरुवात केली. याचे रिझल्ट्स चांगले दिसू लागले होते.

आता हर्षवर्धन ब-यापैकी समोरच्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर विचार करून देऊ लागला होता.

या वेळच्या टूरमध्ये हर्षवर्धनला बरोबर घेऊन जावं असं प्राचीला वाटत होतं.

मागच्या वेळी विचार करूनही प्राचीने तो अमलात आणला नाही कारण आशूचं म्हणणं पडलं की त्याच्या मेंदूला जरा कार्यक्षम होउदे. मग घेउन जा.

तिने हा विचार यावेळी आशूला फोन करून बोलून दाखवला. तसं आशू म्हणाली

"हरकत नाही. या टूरमुळे कदाचीत आणखी फरक पडेल. मेंदूची जी समजून घेण्याची प्रक्रिया असते तिचं प्रात्यक्षीक त्याला मिळेल. तुझी कल्पना चांगली आहे.घेऊन जा."

यावर प्राचीने आशूला विचारलं

" तू आमच्याबरोबर टूरवर असणं तुला आवश्यक वाटत असेल तर तू चल. म्हणजे ऐनवेळेवर त्याचा काही गोंधळ झाला तर तो कशामुळे झाला?तो कसा दूर करायचा? हे कदाचित आम्हाला समजणार नाही म्हणून विचारतेय तुला."

"हो तू म्हणते आहेस ते बरोबर आहे. येईन मी तुझ्याबरोबर फक्त मला तारखा कधीच्या ठरवणार आहेस ते सांग. म्हणजे माझं शेड्यूल त्याप्रमाणे मला ठरवता येईल."

"ठीक आहे."

प्राची म्हणाली.आणि तिनं फोन ठेवला.

ही आनंदाची गोष्ट प्राचीने कामीनी बाईंना सांगण्यासाठी फोन लावला.
_________________________________
क्रमशः हर्षवर्धनला टूरवर नेण्याचा प्राचीचा विचार प्रत्यक्षात उतरेल का बघू पुढील भागात.
लेखिका मीनाक्षी वैद्य