Kamini Traval - 13 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग १३

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग १३

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १३

ठरल्याप्रमाणे राधा शशांक आणि शशांकनचे मित्र मंगेश भाई प्राचीच्या घरी ठरल्याप्रमाणे आले.
शशांकने प्राचीला मंगेश भाई ची ओळख करून दिली.

" नमस्कार मंगेश भाई."

" नमस्कार."

" मंगेश भाई हे माझे मिस्टर हर्षवर्धन आणि या सासूबाई."

मंगेश भाईंनी दोघांना नमस्कार करतात.

" मंगेश भाई शशांकने तुम्हाला सगळं सांगितलं असेल."

" हो. त्याचं कामासाठी मी शशांक बरोबर आज आलोय."

" शशांक म्हणाला ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकतो."

" हो. मीच तसं सुचवलं होतं शशांकला."

" ट्रॅव्हल एजन्सीचं खूप मेहनतीचं काम आहे तर सद्य परिस्थितीत हर्षवर्धन कडून ही जबाबदारी पेलवल्या जाईल का हा प्रश्न मला पडलाय." प्राची म्हणाली.

" मॅडम मेहनत तर कोणत्याही क्षेत्रात आहेच. तुम्ही मेहनत किती घेता त्यावर मिळणारं यश अवलंबून असतं. हर्षवर्धन साहेबांना मदतीला आपण सगळे आहोत.मग भीती कशाची? सुरवातीला छोट्या ट्रिप्स घेऊन जायच्या मग हळूहळू वाढवायचे.एक दोन ट्रीप ओळखीनी जमवून मग ट्रॅव्हल एजन्सीचं नावं रजीस्टर करावं. "

" तुम्ही म्हणालात तसं करता येईल?" प्राचीने मंगेश भाईला विचारलं.

" हो.करता येईल. हवतर सुरवातीला पहिली ट्रिपची जुळवाजुळव मी करून देतो.एका ट्रिपनंतर तुम्हाला कल्पना येईल. दुसरी ट्रिप जमविण्यासाठी तुम्ही काम करा मी मदत करेन. मग ट्रॅव्हल एजन्सीचं नाव रजीस्टर
करतानाही हवी ती मदत करेन."

मंगेशभाईचं बोलणं ऐकून कामीनी बाईं आणि प्राची दोघींना मनातून बरं वाटलं.

मंगेश भाई प्राची हर्षवर्धनची गोष्ट ऐकून फारच प्रभावीत झाला होता. त्याने शशांकजवळ हर्षवर्धन आणि प्राचीला मार्गदर्शन करायचं मान्य केलं. त्यामुळे सगळ्यांना हुरूप आला. प्राची, राधा,आणि शशांक यांच्या नोकरीमुळे नेहमीच या लोकांची रवीवारी संध्याकाळी मिटींग होत असे. या सगळ्यात हर्षवर्धन नुसताच बसलेला असे.

हर्षवर्धन अजून स्वतःहून कोणत्या गोष्टीवर विचार करेल इतका बरा झालेला नव्हता. ही मंडळी चर्चा करत त्यातील अर्ध्या गोष्टीसुद्धा हर्षवर्धनला कळायचं नाही. प्राचीला याची जाणीव होती पण तरीही ती हर्षवर्धनला चर्चा चालू असताना तिथे बसायला लावायची.

मागच्या रविवारची गोष्ट राधा,शशांक, मंगेश भाई चर्चा झाल्यावर निघून गेले. त्यानंतर हर्षवर्धन प्राचीला म्हणाला,

" प्राची तुम्ही काय बोलता मला कळत नाही. इथे इतका वेळ बसून मी खूप कंटाळतो."

हर्षवर्धनची कुचंबणा प्राचीच्या लक्षात आली. प्राची समजावणीच्या स्वरात म्हणाली,

"हर्षवर्धन मला कळतंय तुला बोर होतं पण उद्या तुला या धंद्यात लक्ष घालायचं आहे. तुझ्याबरोबर मी आणि आई आहोतच. तुला एकटं सोडणार नाही.पण तू प्रत्येक मिटींगमध्ये काळजीपूर्वक सगळं ऐकायची सवय कर. कंटाळा तरी ऐक. काही बोलणं, काही शब्द तुझ्या कानावर सतत पडले तर काही दिवसांनी तुला त्याचा अर्थ कळेल. हळुहळू तू तुझ्या पायावर उभा राहशील. असं जेव्हा होईल तो दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा असेल."

एवढं बोलून प्राची हर्षवर्धनकडे बघून हसली. हर्षवर्धनमात्र हसला नाही. तो म्हणाला,

"तुला जसं वाटतंय की मी एक दिवस स्वतःच्या पायावर उभा राहीन पण मला तसं होईल असं वाटत नाही."

" का? हर्षवर्धन असं का वाटतं तुला?"

" त्या शशांकला बघ किती हुशार आहे.मला एक वाक्य नीट बोलता येत नाही.खूप विचार करावा लागतो. मग एवढं मोठं काम मला कसं जमेल?" हर्षवर्धनचा सूर नाराजीचा होता.

" हर्षवर्धन बेटा तू इतका स्वतःला निराश होऊ देऊ नकोस. तुझ्यात पण खूप गूण आहेत.हळुहळू सगळं नीट होईल."

कामीनी बाईं हर्षवर्धनच्या पाठीवर थोपटत प्रेमाने म्हणाल्या.

"हर्षवर्धन तुझ्या मेंदूला ड्रग्जमुळे शिथीलता आलेली आहे. ती शिथीलता घालवण्याचे आपण प्रयत्न करणार आहोत.तू निराश होऊ नको फक्त थोडा वेळ दे . तूसुद्धा शशांक सारखा चटचट बोलू लागशील. कळतंय नं?"

प्राचीने हर्षवर्धनच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. हर्षवर्धन क्षणभर गडबडला. प्राची त्याला खूप आवडतं असली तरी तिच्या हुशारीने तो अचंबीत व्हायचा. हर्षवर्धन त्यामुळे प्राचीला थोडा घाबरायचा.

" हो" असं कसंबसं त्याने प्राचीला उत्तर दिलं. प्राचीने त्याच्या हातावर थोपटलं आणि उठून ती तिच्या वडिलांना फोन करायला आत गेली.

सध्या हर्षवर्धनसाठी व्यवसायाची जी चर्चा चालू होती त्याबाबत प्राची आपल्या वडिलांना फोन करून सगळं कळवत असे. प्राची आता गेल्यावर कामीनी बाई हर्षवर्धनला म्हणाल्या,

"हर्षवर्धन आता कच खाऊन मागे फिरू नकोस. तुझ्यासाठी प्राचीची सगळी धडपड चालू आहे. बेटा तू स्वतःला तिच्या जागी ठेवून विचार कर जर तुझ्या बाबतीत असं घडलं असतं म्हणजे तू चांगला असता आणि प्राची ड्रग्ज ॲडीक्ट असती तर? तू तिला सावरायला प्रयत्न केला असता तिला व्यसनातून बाहेर काढलं असतं आणि तिला नीट मार्गाला लावण्यासाठी काही काम सुरू करून द्यायचं ठरवलं असतं आणि त्यात प्राची कच खाऊन मागे फिरली असती तर तुला कसं वाटलं असतं? तुझ्या जीवाची तगमग आणि चिडचीड झाली असती नं ! तसं होईल प्राचीचं जर तू आता मागे फिरलास तर. कळतंय का तुला मी काय म्हणतेय?"

" हो." कामीनी बाईंच्या बोलण्याने हर्षवर्धन फार घाबरला.

" आई प्राचीला त्रास नाही होऊ द्यायचा."

" नाही नं. मग ती जे सांगते तसं वाग.थोडे दिवस तुला सगळ्या गोष्टी समजाउन घेताना त्रास जाईल पण त्यानेच हळूहळू तुझ्या मेंदूला आलेली शिथीलता जाईल. तुझ्यासाठी फक्त प्राची नाही तर राधा आणि शशांकसुद्धा धडपडतात आहे. तुला दिसतेय नं त्यांची धडपड?"

कामीनी बाईं हर्षवर्धनकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होत्या.

" हो आई मला दिसतंय सगळं. प्राची,राधा, शशांक माझ्यासाठी खूप करतात. मी तू सांगीतलं ते लक्षात ठेवीन. प्राचीचं सगळं ऐकीन."

" शाबास.तू आता निराश होशील?"

" नाही.प्राचीला वाईट वाटेल असं मी काही वागणार नाही."

" हर्षवर्धन माझं गुणी बाळ. तू चिंता करू नकोस.प्राची आपल्याला कधीही एकटं सोडणार नाही."

" आई मी तुझ्या मांडीवर डोकं ठेऊ?"
हर्षवर्धनने गोरामोरा होत विचारलं.

" अरे! विचारतोस काय? ठेव डोकं माझ्या मांडीवर."

हर्षवर्धनने हळूच कामीनीबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटले. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. कामीनीबाई हळुवारपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.

*****

दर रविवारच्या चर्चेतून विचारातून गाडी पुढे सरकली. एक दोन ट्रीप मंगेशभाईच्या एजन्सी तर्फे केल्या गेल्या. नंतर ट्रॅव्हल कंपनीचं नाव रजीस्टर करते वेळी काय नाव ठेवावं यावर चर्चा सुरु होती.


प्राची अचानक म्हणाली " मी एक नाव फायनल केलंय. साॅरी.. पण तुम्हाला कोणाला विचारलं नाही. मी ठरवलय की आपल्या ट्रॅव्हल एजन्सीचं नाव 'कामीनी ट्रॅव्हल' ठेऊया." प्राची नी सगळ्यांकडे बघीतलं.

सगळ्यांना नाव आवडलं.पण कामीनी बाई मात्र अवघडल्या

"आपण दुसरं कोणतं नाव ठेऊ." कामीनी बाईं आढेवेढे घेत म्हणाल्या. सगळ्यांनी कामीनी बाईंना समजावलं शेवटी हर्षवर्धन म्हणाला,

"आई तुझ्यामुळे मी आहे. नाहीतर केव्हाच स्वतःला संपवलं असतं."

"असं नको बोलू राजा. ठीक आहे ठेवा हे नाव. तुम्हाला आवडलंय नं." सगळ्यांनी एकसुरात हो म्हटलं.आणि नाव फायनल झालं.

***
कामीनी बाईं,प्राची आणि हर्षवर्धन तिघही ट्रॅव्हल एजन्सीचं नाव रजीस्टर झाल्यामुळे आनंदात होते.घरी येतानाच प्राचीने तिच्या आईबाबांना फोन करून हे काम झाल्याचं कळवलं.

" बाबा कामीनी ट्रॅव्हल्स हे नाव रजीस्टर झालं."

" अभिनंदन.तुम्ही निघालात का ऑफीसमधून?"

" हो बाबा निघालो.आता तिकडेच येतो आहे."

" या वाट बघतोय." बाबा म्हणाले.

" हो." प्राचीने फोन ठेवला. प्राची कामीनी बाईं आणि हर्षवर्धन आता प्राचीच्या माहेरी जेवायला जाणार होते.आज एजन्सीची नाव रजीस्टर झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अशोक आणि वासंतीने या तिघांना आपल्या घरी जेवायला बोलावलं होतं.

रस्त्याने जाता जाता प्राचीने एका स्वीट मार्ट पाशी गाडी थांबवली. दुकानात जाऊन फ्रेश गुलाबजाम विकत घेतले.

कामीनी बाईंना तिचा चाणाक्षपणा आवडला. हर्षवर्धन गाडीत समोरच्या सीटवर बसलेला होता त्याने सहज मागे वळून कामीनी बाईंकडे बघीतले तसं त्या हर्षवर्धनकडे पाहून हलकसं हसल्या.

" काय झालं आई हसायला?" हर्षवर्धनने विचारलं.

" प्राची खूप चाणाक्षपणे वागते हे बघून आनंदाने हसू आलं.कोणाच्याघरी जाताना कधीही रिकाम्या हाताने जाउ नये. तूपण लक्षात ठेव."

" हो" हर्षवर्धन हे बोलताना दुकानातून हातात स्वीटचं पाकीट घेऊन ऐटीत येणा-या प्राची कडे बघून तोही हसला.

हर्षवर्धन आणि कामीनी बाईंच्या मनातील स्पंदनाविषयी प्राची अनभिज्ञ होती. ती आपल्याच नादात झपझप चालत गाडीपाशी आली.

****


कामीनी ट्रॅव्हल्स हे नाव ट्रॅव्हल एजन्सीचं ठेवल्या गेलं.आता यानंतर प्राची आणि कामीनी बाईंना व्यवसाय वाढीसाठी अथक प्रयत्न घ्यावे लागणार होते.

कामीनी ट्रॅव्हल्स मध्ये काम करणारे टूर्स अँड ट्रॅव्हलचं शिक्षण घेतलेलेच निवडावे लागणार होते.सुरवातीला ऑफीसमध्ये कामाला लोक ठेवण्यासाठी कराव्या लागणा-या निवडप्रक्रिया पासून शशांक आणि मंगेश भाई प्राची आणि कामीनी बाईंना मदत करणार होते. राधा तर प्राची बरोबर होतीच.

***
निवडप्रक्रियेची जाहीरात मंगेशभाईंनी त्यांच्या नेहमीच्या जाहीरात एजन्सी कडून तयार करवून घेतली.

ऑफिस थाटायचं तर जागा चांगली हवी. त्यासाठी मंगेशभाईंनी त्यांच्या ओळखीच्या ब्रोकरला सांगीतलं.या कामात मंगेशभाई जातीनं लक्ष घालतात आहे बघील्यावर त्या ब्रोकरला वाटलं की ही पार्टी भाईंच्या बहुतेक नात्यातील असावी.तसं त्याने मंगेशभाईंना विचारलं सुद्धा,

" मंगेश भाई ही पार्टी काय तुमच्या सगेसोयरे होय का?"

"भावा सगेसोरेपेक्षा भी जादा समजले. काम आपको अच्छेसे करना है. बादमे पार्टीकी कोई शिकायत नहीं आनी चाहीए."

" नहीं भाई आपका सगासोयरा तो मेराभी सगासोयरा है. आप चिंता मत करो. मैं अच्छी जगह ढुंडके देता हूं. रखता हूं."

मंगेशभाई प्राची हर्षवर्धनच्या कहाणीने खूप भारावून गेले होते आणि प्राचीच्या बद्दल त्यांच्या मनात खूप आदर निर्माण झाला होता त्यामुळे ते स्वतःहून कामीनी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कष्ट घेत होते.

****

हर्षवर्धनला स्वतःच्या पायावर उभं करण्याची प्राचीची धडपड त्यासाठी ती घेत असलेले कष्ट बघून राधा, शशांक आणि मंगेशभाई तिघही स्तिमीत होत होते.

कामीनी बाईं तर सतत देवाचे आभार मानायच्या. त्यांना त्यांची सून प्राची आपल्या हर्षवर्धनसाठी घेत असलेले कष्ट बघून आनंद होत असे पण त्याचबरोबर नववधूला मिळणारे आनंदाचे क्षण प्राचीला मिळू शकले नाही याचं त्यांना वाईट‌ वाटायचं.

लग्नाच्या पहिल्या रात्री जे स्वप्न प्राची डोळ्यात सजवून हर्षवर्धनची वाट बघत असेल पण तिला मात्र ड्रग्स न मिळाल्याने वेदनेने विव्हळत असलेला हर्षवर्धन दिसल्यावर तिच्या मनाची किती काहिली झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही हे कामीनी बाईंना कळत होतं.


हे झालं थोडं म्हणून की काय त्यात भय्यासाहेबांची तिच्यावर असलेली वाईट नजर. छि: किती ओंगळवाणा घाव बसला असेल प्राचीच्या मनावर.परमेश्वरा मला माफ कर तेव्हा मी काही करू शकले नाही. पण बहुदा हर्षवर्धनमधे सुधारणा व्हावी म्हणूनच तू प्राचीला आमच्या घरी पाठवलं असावं. तिच्यासारखी धीट मुलगीच हे करू शकली. परमेश्वरा तुझे लाख‌ लाख आभार मानते.

***

मंगेशभाईंच्या बरोबर दोन ट्रीप केल्यावर प्राची आणि कामीनी बाईंमध्ये बराच आत्मविश्वास आला.दोघींनाही सध्या पूर्ण वेळ व्यवसायाला द्यावा लागणार असल्याने प्राचीने काहीतरी मनाशी ठरवलं.जे ठरवलं ते तिने कामीनीबाईंना सांगीतलं.

" आई आपल्या दोघींना काही दिवस नाही एक दोन वर्षं तरी कामीनी ट्रॅव्हल्स या आपल्या व्यवसायाकडे पूर्ण वेळ लक्ष द्यावं लागणार आहे.त्यामुळे मी माझी नोकरी सोडायची ठरवलं आहे."

" निर्णय पक्का आहे नं तुझा. नाहीतर काही दिवसांनी तुला वाटेल उगीच नोकरी सोडली."

" नाही. असं नाही वाटणार. हर्षवर्धनसाठी काही तरी सुरू करायचा मी जेव्हा विचार केला तेव्हा हे लक्षात आलं की हर्षवर्धनला आता नोकरी मिळणं शक्य नाही. त्याने पुन्हा ड्रग्ज कडे वळू नये यासाठी छोटा का होईना व्यवसाय सुरू करणे योग्य ठरेल त्याचवेळी हेही माझ्या लक्षात आलं की व्यवसाय सुरू केल्यावर तो छोटा असला तरी पूर्ण वेळ त्यात एकटा हर्षवर्धन लक्ष देऊ शकणार नाही. आपल्या दोघींनाही लक्ष द्यावं लागेल. हळुहळू हर्षवर्धन सगळं शिकेल.तो जसा व्यवसायातील सगळ्या गोष्टी आत्मसात करेल तसं आपण दोघी हळूहळू त्याच्या हातात व्यवसायाची सूत्र देउन त्याला गरज असेल तेव्हा आपण त्याला मदत करू शकू. पण हे सगळं होण्यासाठी मला आत्ताची नोकरी सोडावी लागेल. नोकरी करून मला व्यवसायात लक्ष घालता येणार नाही." प्राचीने सविस्तरपणे कामीनी बाईंना सांगीतलं.

" बरोबर बोलतेय तू. सुरवातीला आपल्या दोघींना एवढी मेहनत घ्यावीच लागेल.मी कायम तुझ्या बरोबर आहे. तू जे सांगशील ते काम माझ्यातले शंभर टक्के प्रयत्न देऊन करीन."

"मला हे माहित आहे आई. तुम्हीच सुरवातीपासून माझ्या पाठीशी आहात म्हणून आजचा दिवस आपण बघतो आहे.उद्या मी मंगेशभाईंच्या ऑफीसमध्ये जाणार आहे.राधा,शशांक पण येणार आहेत. आपल्या व्यवसायाची पूर्ण माहिती असणारं एक आर्टिकल तयार करायचं आहे. ते पेपरमध्ये द्यायचं आहे.जेव्हा ऑफिस आपल्याला मिळेल तेव्हा त्याचं ओपनींग केल्यानंतर हे आर्टिकल पेपरमध्ये छापायला द्यायचं आहे." प्राचीचं बोलणं ऐकून कामीनी बाईंनी विचारलं,

"अगं पण ऑफिस कधीपर्यंत मिळतय? कारण ऑफिस मिळाल्याशिवाय लोकांना टूर बुक करायला येण्यासाठी निश्चीत पत्ता आपल्या जवळ नाही राहणार."

"त्याचसाठी ते आर्टिकल पेपरमध्ये द्यायचं थांबावं लागेल. मंगेश भाई करतात आहेत ऑफिस साठी प्रयत्न. ते आहेत म्हणून ब-याच गोष्टी लवकर होतात आहे."

" खरंय तुझं म्हणणं.मंगेशभाईच्या रुपाने देवच आपल्या मदतीला आला." कामीनीबाईंनी बोलता बोलता आकाशाकडे बघून नमस्कार केला.

" प्राची तू काही काळजी करू नकोस.तू सावित्री बनून आपल्या सत्यवानासाठी लढतेय.परमेश्वर तुला यश देणारा लिहून घे."

कामीनी बाईंचं बोलणं ऐकून प्राचीचं मन भरून आलं. आपली सासू अगदी आई होऊन आपल्या पाठीशी प्रत्येक क्षणी उभी आहे यासाठी तिने मनापासून सासूबरोबर परमेश्वराचे ही आभार मानले.
" आई तुम्ही माझ्या सासू नाही तर आई होऊन माझ्या पाठीशी कणखरपणे उभ्या असतात.हे माझं भाग्य आहे."
" प्राची अगं तू माझ्या ओंजळीत केवढं मोठं सूख दिलय त्यापुढे मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही."
दोघी बराच वेळ मौनपणे एकमेकींच्या हात हातात घेऊन बसल्या.बराच वेळाने प्राची म्हणाली,
" उद्या बघू मंगेश भाई काय म्हणतात?"
___________________________________
क्रमशः
मीनाक्षी वैद्य