Kamini Traval - 2 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग २

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग २

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २रा
मागील भागावरून पुढे.

मागील भागात आपण बघीतले की कामीनी ट्रॅव्हल्स ला पुन्हा एकदा पुरस्कार मिळाल्याने कामीनी बाई,प्राची आणि हर्षवर्धन आनंदात आहेत.बघूया आता काय होईल...

कार्यक्रमात असूनही प्राची नसल्यासारखीच होती. ती भूतकाळात कधी शिरली तिलाच कळलं नाही.

त्यादिवशी पाटणकरांकडे सकाळपासून धावपळ सुरु होती. कारण प्राचीला बघायला मुलाकडची मंडळी येणार होती. प्राचीनी आज साडी नेसावी असं तिच्या आईचं वासंतीचं म्हणणं होतं तर प्राचीचं म्हणणं होतं.

"आई आता तुझ्यावेळचा काळ राहिला नाही.मी सुटसुटीत ड्रेस घालीन "

" होका मग घाल जीन पॅन्ट आणि टी शर्ट किंवा टाॅप."

असं वासंतीनं म्हटल्याबरोबर प्राचीनं जागच्या जागी उडीच मारली.

"आई खरच घालू. किती छान ऑप्शन आहे हा."

" ए वेडाबाई गप जरा. प्रत्येक गोष्टीत कसला ऊथळपणा. पॅंट वगैरे नाही घालायची."

"बाबा आई बघा कशी करतेय आत्ता तिनीच हा ऑप्शन दिला नं "

"तुला पिकनिकला नाही जायचं प्राची. तुझा बघण्याचा कार्यक्रम आहे आज. आज साडी नको असेल तर पंजाबी सूट घाल पण पॅन्ट नाही."

प्राचीचे बाबा म्हणजे अशोक खूपच प्रेमळपणे बोलत होते.

" हं बोला अजून प्रेमानी बोला. अग काहीतरी काॅमन सेन्स वापर. प्रसंग काय आणि तू काय बोलतेस. साडी नाही म्हणतेस तर ठीक पण पॅन्ट अजीबात नाही."

"आई कीती हायपर होते आजकाल. तुला वाटतंय मी खरंच पॅन्ट घालीन. मी पंजाबी सूटच घालणार आहे."

प्राचीनी हसतच आईला मिठी मारली.

" बाबा मी अभीनय बरा करते नं"

हसत अशोक म्हणाले

"बरा काय चांगला करते. त्याशिवाय का वासंती चिडली."

" आता हे काय नवीन ?"
वासंती ने विचारलं.

"नवीन काही नाही. तुझी गंम्मत करण्यासाठी मी आणि बाबांनी हे नाटक केलं.आम्हाला जाम मजा आली."

प्राची आणि बाबा दोघंही हसायला लागले.

"तुमचं काय जातंय हसायला. मला इथे घाम फुटला होता. प्राचीचा काही भरवसा आहे का?"

" आई मी इतकी पण तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही."

" हो हो कळलं बरं."
असं म्हणत आईनी तिचा गालगुच्चा घेतला.

"आई राधाला बोलवणार आहे "

"कशाला?"

"कशाला म्हणजे मला ती मदत करेल तयार व्हायला."

"काही गरज नाही तिला बोलवायची. आणि तयारी काय करायची आहे? ड्रेसच घालायचा आहे नं त्याला राधा कशाला हवी."

" ऐ... हॅलो... माॅम राधा माझी खूप चांगली मैत्रीण आहे .तिला का नको बोलावू."

" खूपदा जिला बघायला येतात तिच्या मैत्रीणीलाच मुलाकडचे पसंद करतात. म्हणून नको."

"अरे ...हे कुठलं लाॅजिक आहे. मी बोलवणार."

" नाही म्हणजे नाही."

आई फणफणतच आतल्या खोलीत गेली. प्राचीला अशोकनी समजावलं,

" नको वाद घालू. ती म्हणते तसं कर. समजा आज तुझं लग्नं ठरलं तर साखरपुड्याला आणि तुझ्या लग्नात राधा येईलच नं."

शेवटी इच्छा नसून प्राचीनी आईची इच्छा मान्य केली.

प्राची पण नाराजीनीच आपल्या खोलीत गेली.तेवढ्यात राधाचा फोन आला.

"प्राची कधी येऊ. मला नं गंम्मतच वाटतेय तुला बघायला येणार आहेत याची."

"नको येऊ."

"काय तू गंम्मत करतेय की खरंच म्हणतेय?"

" खरच म्हणतेय. तू रागावशील माहिती आहे.पण आईचा हुकूम आहे."

" पण का? ऐ हे बरोबर नाही.तुला बघायला मुलगा येतोय आणि मी नाही. तुला पटतंय हे."

"नाही.पण माझ्या आईला भिती वाटते की मला बघायला आलेला मुलाने जर तुला पसंद केलं तर.. म्हणून नाही म्हणतेय."

" अगं असं कधी होतं का?"

" तीने ऐकलंय. काही अश्या घटना घडल्यात म्हणे."

" ऐ हे बरोबर नाही. मी आज तुझ्यासाठी वेळ ठेवला. तेजू आणि मावशींनी ठरवलाय सिनेमाचा प्रोग्राम पण मी नाही म्हणाले."

"साॅरी राधा. तू जा सिनेमाला. तू मज्जा कर."

"हं जाईन कारण घरात बसून मला बोअर होईल. बाय"

राधाशी बोलणं झाल्यावर प्राचीचा मूडच गेला. ती नुसतीच बसून राहिली. तेवढ्यात वासंती आली आणि प्राचीला ढिम्मासारखं बसलेलं बघून चिडलीच.

"अगं प्राची कोणता ड्रेस घालायचा आहे संध्याकाळी. ते बघीतलं का?"

"माझा मूडच नाही."

"मूड नसायचला काय झालं. चल. बघता बघता संध्याकाळ होईल. चल लवकर आटोप. आज जरा शांपू करा मॅडम."

वासंती चिडली की प्राचीला मॅडम म्हणायची.

प्राचीने काही उत्तर दिलं नाही. वासंतीला तिच्या उत्तराची अपेक्षाही नव्हती. तिने फक्त वेळेवर तयार व्हावं असं तिला वाटतं होतं.

संध्याकाळचे पाच वाजले होते. कोणत्याही क्षणी मुलाकडची मंडळी आली असती. प्राचीचे आई-बाबा वाट बघत होते. भय्यासाहेब पटवर्धन खूप वक्तशीर आहेत हे प्राचीच्या वडिलांनी ऐकलं होतं. सगळे वाट बघत होते तेव्हाच त्यांची कार सोसायटीच्या गेटपर्यंत आली.

नियमानुसार गेटवर त्यांना थांबवून विचारल्या गेलं. गेटवर प्राचीच्या वडिलांनी आमच्याकडे पाहुणे येणार असल्याची कल्पना दिली होती. त्यामुळे गेटवरून त्यांना लगेच सोडलं.
पार्किंगमध्ये गाडी उभी करून गाडीमधून मुलगा आणि मुलांचे आई वडिल उतरल्याचे प्राचीनं तिच्या खोलीच्या खिडकीतून बघीतले. मुलगा चालतांनाच तिला नेभळट वाटला. तिचा उरला सुरला मूडपण गेला.

मुलाकडील लोकांचं प्राचीच्या आईबाबांनी स्वागत केल. हात जोडून
"नमस्कार भय्यासाहेब." प्राचीने वडील म्हणाले.

"नमस्कार." तिघही बसले. थोड्या हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर भय्यासाहेब म्हणाले.

" मुलीला बोलवा.अर्ध्यातासानी मला एक मीटिंग आहे तेव्हा घाई आहे."

" हं काही हरकत नाही. वासंती प्राचीला घेऊन ये."

"हो" असं म्हणत वासंती आत गेली.

वासंती प्राचीला घेऊन आली. प्राचीच्या हातात ट्रे होता. ट्रेमध्ये पोह्यांच्या प्लेट्स होत्या. प्राचीला बघताचं भय्यासाहेब चकीत झाले. तसं तिला त्यांनी आधी एका लग्नात बघीतलं होतं.तेव्हा ती नटल्यामुळे फारच सुंदर दिसत होती.पण आज कुठल्याही मेकअप शिवाय सुंदर दिसत होती.

भय्यासाहेब तिच्याकडे बघतच राहिले. तिनी पोह्यांची प्लेट असलेला ट्रे समोर धरला तरी त्यांना कळलं नाही इतके ते तिच्याकडे बघण्यात गुंतून गेले होते. प्राची त्यांच्या अशा बघण्यामुळे अवघडून गेली होती. ट्रे धरून हातसुद्धा अवघडला होता.

भय्यासाहेबांच्या बायकोच्या कामीनी बाईंच्या हे लक्षात आलं त्या हळूच म्हणाल्या ,

" अहो पोहे घेता नं "

भय्यासाहेब तंद्रीतून बाहेर आले. आपलं वागणं कोणाला खटकू नये म्हणून सारवासरव करतांना ते म्हणाले.

"पाटणकर तुमची मुलगी खूपच सुंदर आहे. भुरळच घातली तिनी मला."

या वाक्यावर प्राची तडकलीच पण आईकडे लक्ष जाताच गप्प बसली. प्राचीचे बाबा हसायचे म्हणून हसले.

" वा! पोहे मस्त झालेत.नक्कीच प्राची नी केले असतील.हो नं?"

प्राची कडे भय्यासाहेबांनी बघीतल्यावर ती हसायचं म्हणून हसली.वासंती म्हणाली.

" हो प्राचीनीच केलेत.येतो तिला स्वयंपाक."

"भय्यासाहेब मुलाला प्राचीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारु दे"

अशोक म्हणाला.

"नाही .त्याची काही गरज नाही. तुमच्याबद्दल आणि प्राचीबद्दल सगळी माहिती मला पाठकांकडून कळली आहे. आमची पसंती आहे. तुम्ही विचार करा आणि कळवा."

"एकदा मुलगा मुलगी दोघं बोलले असते तर बरं झालं असतं."

"नाही त्याची गरज नाही. मला पसंत आहे म्हणजे मुलालाही पसंत आहेच. चला निघतो आम्ही. तुम्हीच कळवा."

एवढं बोलून भय्यासाहेब उठले.

कामीनीबाईंनी मुलाला हलवत म्हटलं

" हर्षवर्धन चल उठ."
हर्षवर्धननी आईकडे बघीतले आणि निरागसपणे विचारलं

" झालं. जायचं आता?"

" हो"

त्या म्हणाल्या आणि दोघं उठले. तोपर्यंत भय्यासाहेब आणि प्राचीचे बाबा खाली ऊतरलेसुद्धा.

प्राचीला हे स्थळ पसंत नव्हतं. तिला मुलामध्ये गडबड वाटली. तिनी आपल्या आईला बोलून दाखवलं.पण वासंतीनी काही तिला उत्तर दिलं नाही. तिच्या डोक्यात वेगळे विचार चालू होते.

"आई मी काय म्हटलं ते ऐकलं का?"

"आधी बाबांना वरती येऊ दे. मुलाचे वडील काय म्हणाले ते ऐकू दे.मग ऐकते तुझं"

प्राचीला आईचं वागणं काही कळत नव्हतं.तिच्या मनात आलं आपल्याला मुलांबद्दल जशी शंका येतेय तशी आई बाबांना नाही आली का?आली असेल तर ती इतकी गप्प कसे राहिले आहेत.

प्राचीचे बाबा घरात येऊन वासंतीला म्हणाले.

"त्यांना प्राची पसंत आहे. देण्याघेण्याचं काही नको म्हणाले.‌तुम्हाला मुलीला काही द्यायचं असेल तर ते द्या. आम्हाला मुलगी आणि नारळ सुद्धा चालेल. पैसा भरपूर आहे म्हणे आमच्याकडे. हुंडा वगैरे नको. तरी मी एकदा त्यांना म्हटलं मुलाला एकदा विचारून मग सांगा. तशी ते म्हणाले. मुलगा माझ्या आज्ञेत आहे.त्याने सांगीतलय तुम्ही जी मुलगी पसंत कराल तिच्याशी मी लग्नं करीन. आता यावर मी काही बोललो नाही. आता आपल्याला विचार करून निर्णय द्यायचा आहे."

प्राचीनी बाबांच़ बोलणं ऐकल्यावर म्हटलं

" मला हा मुलगा पसंत नाही."

"का?अगं पैशांनी चांगले आहेत, मुलगा दिसायला चांगला आहे मग नाही का म्हणतेस "

प्राचीला बाबांनी विचारलं.

" बाबा पैसा आणि चांगलं रूप एवढंच लागतं का लग्नं करण्यासाठी. ज्या मुलाशी लग्नं ठरवताय तो एक शब्द तरी बोलला का माझ्याशी? जे काही बोलले ते त्याचे वडीलच बोलले. मला हे स्थळ पसंत नाही." प्राचीने निक्षून सांगीतलं.

"प्राची तुझे नखरे खूप वाढलेत."

वासंती रागानीच प्राचीला म्हणाली.

"आई तुम्हा दोघांनाही कळलं नाही तो मुलगा अजीबात बोलला नाही. त्याच्या वडीलांची किती घाणेरडी नजर होती माझ्याकडे."

"प्राची तोंड सांभाळून बोल.ते मुलांचे वडील आहेत.आपल्या मुलासाठी ते मुलगी बघायला आले होते. हे घाणेरडे विचार कुठून आलेत तुझ्या डोक्यात?"

"मुलासाठी मुलगी बघायला आले होते नं मग त्या मुलांनी बघीतले का मला? विचारले का मला प्रश्न? सगळं त्याचे बाबांचं बोलत होते."

" प्राची बेटा काही ठिकाणी वडलांचच चालतं. तसंच यांच्याकडे पण आहे.ते बोलले मला.माझ्यापुढे एकही शब्द बोलायची प्राज्ञा नाही मुलांची म्हणून तो बोलला नाही."

"वा! हे छान आहे.जिथे मुलांनी बोलायला हवं तिथेही त्याची मुस्कटदाबी करतात का ते भय्यासाहेब?" " अगं मुस्कटदाबी वगैरे काय शब्द वापरतेस तू. काही घरात असेच नियम असतात. आपल्याकडे नाहीत. पण मला आता वाटतंय आपल्याकडे पण असेच नियम असायला हवे होते. हिला भडकवणारी ती राधा असेल."

वासंती रागानी बोलली.

"आई प्लीज राधाला मधे आणू नकोस. ती आली होती का आपल्याकडे? बघण्याचा कार्यक्रम संपल्यावर मी अजून तिच्याशी बोलली पण नाही. ती काय भडकवणार मला? आणि मी कुकुलं बाळ आहे का कोणी सांगेल आणि मी ऐकीन" प्राचीच्या अंगाला रागामुळे थरथर सुटली होती. रागातच ती तणतणत तिच्या खोलीत गेली.

"वासंती आपणच प्राचीला लहानपणापासून तिचे विचार, तिची मतं मांडण्याची मोकळीक दिली आहे नं.मग आता का चिडतेस?" प्राचीचे बाबा म्हणजे अशोक म्हणाले. "मला वाटतं तेच चुकलं आपलं. तिची ती मैत्रीण कश्मीरा परधर्मीय मुला बरोबर पळून गेली नं तेव्हापासूनच मला भीती वाटतेय." वासंती म्हणाली.
"कसली भीती वाटतेय? प्राची असं काही करेल असं वाटतंय तुला. अग सूतावरून स्वर्ग गाठायची तुझी ही सवय सोड." थोडंसं चिडूनच अशोक बोलला.

"तुम्हाला त्या मुलात काही दोष दिसला का?"वासंतीनं अशोकला विचारलं "नाही. तो फक्त काही बोलला नाही एवढंच. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं मला." " हिच्या मनात कुणी दुसरं नाही नं? म्हणजे त्याच्यासाठी हे स्थळ एवढ्याश्या कारणांनी ही नाकारतेय. माझं डोकंच चालेनासं झालंय."

वासंतीला थोपटत अशोक म्हणाला "तू नको काळजी करू. आपण एक-दोन दिवसांत त्यांना आपला निर्णय सांगू. तोपर्यंत प्राचीला मी समजावतो." " ठीक आहे.पण ती होकार देईल असं समजवा. तसही तुम्हा बापबेटीचं गुळपीठ आहे. मला कोण विचारत? तेव्हा तिला नीट समजवा" वासंती जरा घुश्श्यातच बोलली.

त्यावर तिच्या गालावर हळूच चापटी मारत अशोक म्हणाले" बाकी काही म्हणा तू रागावलीस की छान दिसते." " अहो आपली मुलगी लग्नाची झाली आहे.हा थिल्लरपणा सोडा आता." "आता यात कसला थिल्लरपणा आला. कमाल आहे. तुला प्रेमानी सांगतो आहे." " पुरे तुमचे प्रेमाचे बोल मला काम करू द्या." हे वासंतीचं लटकं रागावणं आहे अशोकच्या लक्षात आलं तसंच वासंतीलाही स्वतःचा लटकेपणा लक्षात आला होता म्हणूनच तिचा चेहरा लाजरा झाला.

प्राची आपल्या रूममध्ये होती.तिथला एसी चालू होता तरी तिचं अंग तापलेलच होतं. रात्री जेवायची सुद्धा तिला इच्छा नव्हती. पण बाबांच्या आग्रहाखातर ती चार घास जेवली. जेवतांना रोज तिघांची खूप मस्करी चाललेली असायची. पण आज तिघही शांतपणे जेवत होते. प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे वीचार चालू होते.

प्राचीचं डोकं चांगलंच तापलं होतं तेवढ्यात राधाचा फोन आला." काय ग आले होते का मुलाकडचे?" " हो.आले होते." " कसा होता मुलगा?" " राधा प्लीज आत्ता फोन ठेव. मी उद्या तुझ्याशी बोलते. माझं डोकं खूप दुखतंय. आणि माझा मूडपण नाही आत्ता." "अरे झालं काय?" £ "मी सगळं सविस्तर बोलेन तुझ्याशी ऊद्या.पण आत्ताफोन ठेव." "ओके ठेवते.ऊद्या तू तुझा मूड बघून मला फोन कर." "रागाऊ नकोस राधा. प्लीज मला समजून घे. ऊद्या बोलते तुझ्याशी." एवढं बोलून प्राचीनं फोन ठेवला.

तो मुलगा आपल्याशी का बोलला नसेल.एवढा घाबरत असेल का आपल्या वडलांना? की त्याला बोलता येत नसेल? नाही शेवटी जाताना त्यांच्या आईशी बोलला. म्हणजे बोलता येतं. आपल्याकडे एकदाचं त्यांनी बघीतलं पण त्याच्या डोळ्यात एका तरूण मुलीकडे बघतोय असे भाव दिसले नाहीत.त्याची आईपण फारशी बोलली नाही. त्यापण त्यांच्या नव-याला घाबरत असतील का?

त्यांच्यापेक्षा आपली आईच त्यांच्याशी बोलत होती. काही कळत नाही. काय गडबड आहे.मला ज्या गोष्टी जाणवल्या त्या गोष्टी आई-बाबांना कशा जाणवल्या नाहीत. आत्ता डोक्यात एवढे प्रश्न असल्याने राधाशी बोलावंसं वाटलं नाही. ऊद्या आपल्याला जे जाणवलं ते राधाला सांगायला हवं.यावर ती काय म्हणते बघायला हवं. आई कितपत ऐकेल माहित नाही. बाबांना आपलं म्हणणं सांगून बघू. डोक्याला थापडा मारुन घेतल्यासारखे करून कानात हेडफोन घालून ती गाणी ऐकत झोपण्याचा प्रयत्न करू लागली.

झोपपण आज तिच्यावर रूसली होती. झोप न आल्याने पुन्हा विचारांची गाडी तिच्या मनाच्या रस्त्यावरून बेफाम धावू लागली. त्या मुलांबद्दल नको ते विचार यायला लागले. मुलगा दिसायला बरा होता.पण बोलला का नाही हा प्रश्न तिला भेडसावत होता. काय असेल रहस्या त्याच्या न बोलण्यामागे!

त्याची आईपण मख्ख चेहे-यानी बसली होती.पण त्यांचे डोळे कारूण्यानी भरलेले वाटले प्राचीला.त्यांचा चेहरा शांत होता पण त्या चेहे-यामध्ये काहीतरी खास होतं ज्यामुळे आपण त्यांच्याकडे ओढले जातो आहोत असं प्राचीला वाटायला लागलं. विचार करून शिणलेलं डोकं कधी शांत झालं आणि केव्हा तिला झोप लागली हे तिलाच कळलं नाही.
-------------------------------------------------------------
क्रमशः.
लेखिका….मीनाक्षी वैद्य.