Radhika Anant and Bandya in Marathi Comedy stories by Nagesh books and stories PDF | राधिका अनंत आणि बंड्या

The Author
Featured Books
Categories
Share

राधिका अनंत आणि बंड्या

राधिका अनंत आणि बंड्या

राधिका भल्या पहाटेच उठली. अनंत अजून घोरतच होता. रुखवतात आलेलं समान बेडरूम मध्ये एका कोपऱ्यात ठेवलं होत. त्यातल्या साखरेच्या रूखवताला मुंग्या लागल्या होत्या. रंगी बेरंगी घोटीव कागद पुठ्ठ्यावर चिकटवून सजवलेली काव्यमय सप्तपदी, शोच्या बाहुल्या, खेळण्यातली बैलगाडी, प्लास्टिक मध्ये व्यवस्थित पॅक केलेले फराळाचे जिन्नस, मैत्रिणींनी हौसेने केलेले हलव्याचे दागिने, गुलाबी आणि हिरव्या रंगात ‘राधिकास आंदण’ असं लिहिलेलं गोदरेज कपाट आणि वॉशिंग मशीन हे सर्व पाहून माहेरच्या आठवणीने तिला भडभडून आलं.

बेडखाली ठेवलेली तिची बॅग तिने बाहेर ओढली. बॅगेतून टूथब्रश, कपडे घेऊन ती बाथरूम मध्ये गेली. आर्ध्या तासाने बाहेर येऊन खांद्यावर पिळून ठेवलेली साडी आणि टॉवेल कुठं वळत घालावा हे रूमभर शोधून शेवटी बेडच्या बाजूला ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्चीवर तिने कपडे पसरून टाकले. अनंत अजूनही घोरतच होता. तिने पर्स मधून मोबाईल काढला आणि कुरवली म्हणून सोबत आलेल्या तिच्या मावस बहिणीला तिने फोन लावला.

“ऐक ना तायडे, उठले काय ग सगळे...?”

“….”

“काय?”

“….”

“उठले लवकरच, अगं नवीन जागी झोप नाही येत मला, अन् बरं बी दिसत नाही ना सासरी उशीर पर्यंत झोपणं... बरं ते जाऊंदे, अगं माझी घरात घालायची स्लीपर आली का ग तुझ्या बॅगेत ?

“…”

बरं झालं रे देवा...! मी म्हणल आता हरवली..!. लागला तीनशेला चुना...!

असं म्हणून तिने फोन बंद करून पर्स मध्ये ठेवला. अनंतला उठवावं असं तिला वाटलं पण त्याच्या घोरणाऱ्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तिने तो विचार तसाच सोडून दिला.

नंतर आवाज न करता तिने हळूच दरवाजा उघडला. बाहेर हॉल पाहुण्यांनी भरून गेला होता. स्वतः मुकेशमामांजी-नीतामामी, आकाशभाई, इशादिदी-आनंद भाई, नीनाआत्या-कोठारी अंकल, दीप्तीआत्या-साळगावकर अंकल (मुकेशमामांजी त्यांना प्रेमाने दत्तगुरु म्हणतात.) गप्पा मारत बसले होते. पृथ्वी, आदिया आणि कृष्णा डेकोरेशनमधले फुगे फुगवत होते फोडत होते. बेडरूम पासून हॉल पर्यंत त्यांनी नुसता धुडगूस घातला होता. श्लोकाभाभी वेदाची ओली चड्डी बदलत होत्या. वेदा कर्कश्श आवाजात किंचाळत होता. त्याला मुतलेल्या ओल्या मध्येच खेळायच होतं.

“वेदा, थोबाड फोडीन आता. घाणीत नाही खेळायच. पृथ्वी याला एक फुगा दे रे फुगवून.” श्लोका भाभी त्याला शांत करत म्हणाल्या. तो शांत होत नाहीस पाहून शलोकाभभी आकाश भय्याकडे पाहून म्हणाल्या, “घ्या हो याला, अन् तुमचा मोबाईल द्या त्याला खेळायला. दोन दिवसात माझा पूर्ण नेटपॅक यानेच संपवलाय.” आकाश भय्यानी त्याला उचलून घेतलं आणि बाजूलाच पडलेली फराळाची प्लास्टिक फोडून त्यातला बुंदीचा लाडू त्याच्या हातात दिला, तसा तो शांत झाला. राधिकाची मावसबहीण नितामामींच्या बाजूला बसून पोरांकडे लाडाने पाहत होती. तेवढ्यात तिचं लक्ष नुकत्याच बाहेर आलेल्या रधिकाकडे गेलं, आणि तिने तिला पाय पडायला खुणवल. ती पटकन सासरेबुवांच्या पाया पडली.

“आयुष्यमान भाव...! अनंत उठला नाही का अजून...?” मुकेशभईनी विचारलं.

“नाही मामांजी” राधिका जमिनीकडे पाहतच उत्तरली आणि ती निताभाभीच्या पाय पडायला वाकली.

“अगं असू दे बेटा. इथे सगळ्याच्या पाय पडत बसली तर आख्खी आयोडेक्स ची बाटली तुला एकटीलाच लागेल. आणि सगळेजण मोठ्याने हसायला लागले.

“मामंजी, नाश्त्याला काय करू?” विषय बदलावा म्हणून राधिकाने विचारलं.

“अग, आत्ताच तर लग्न झालंय तुमचं. तू बैस निवांत. नीता करेल. नंतर तुलाच करायचं आहे की...”गडगडाटी हसत मुकेशभाई म्हणाले.

“करेन ना मी...” राधिका घुटमळत म्हणाली.

“जा, तू अंतुला उठव.” मुकेश भाईंनी फर्मान सोडलं. आणि नीताकडे पाहत ते म्हणाले, “नीता चहा टाक बरं फक्कड, आणि माझा मोबाईल आणून दे बर जरा, वाजतोय केव्हाचा...! त्या केटरर्सवाल्याचाच फोन असेल. त्याचे पैसे ट्रान्स्फर करतो आधी. आजकाल धीरच नाही लोकांना, अरे काय पळून चाललोय काय आम्ही...?

पण फोनची रिंग वाजतच राहिली, आणि बंड्याची झोप चाळवली. बंड्याचा फोन एकसारखा वाजत होता.

बंड्या स्वप्नातून खाडकन् जागा झाला आणि त्याला आठवलं, रात्री अनंत-राधिकाच्या लग्नाचा व्हिडिओ यू ट्यूब वर पाहात पाहतच त्याला झोप लागली होती.

त्याची जुनी स्कूटर काल पुन्हा बंद पडली होती, म्हणून तो जग्याबरोबर ऑफिसला जाणार होता. त्यासाठीच जग्या फोन करत होता. “शी...! आज पुन्हा ऑफिसला उशीर होणार आणि बॉस च्या शिव्या खाव्या लागणार... शिवाय आजची तिसरी लेट म्हणजे हाफ CL पण कटणार...शी....!!!”

त्याने जग्याला फोन लावला, तशी तिकडून आवाज आला, “Out going services for this JIO number are stopped due to insufficient balance. Please recharge your JIO Number with New plans…” बंड्याने चिडून फोन बेडवर फेकून दिला आणि तो चरफडत बाथरूम मध्ये घुसला.

-शिवनागेश.