मला स्पेस हवी पर्व २ भाग ३०
मागील भागात आपण बघीतलं की नेहा पुण्याला येईन असं सासूला म्हणाली खरच जाईल का? बघूया या भागात.
रात्री सुधीरच्या आईच्या मोबाईल वर नेहाचा मेसेज आला. मी ऊद्या रात्रीच्या बसने निघतेय. सुधीर ,ऋषी आणि माझ्या माहेरी सांगू नका. हे आपलं गुपीत आहे. मेसेज बरोबर नेहाने स्माईली टाकला.
मेसेज वाचून सुधीरच्या आईला खूप आनंद झाला.तिने लगेच तो मेसेज सुधीरच्या बाबांना दाखवला. त्यांनाही मेसेज वाचून आनंद झाला.
“ अहो किती महिन्यांनी नेहाला बघणार आहोत.”
“ हो ना. मला वाटतं आता ती बरीच मोकळी झाली असेल म्हणून तिला इकडे मावस वाटलं.”
“ खरय. प्रियंकाच्या जाण्यानंतर आपल्या नातेवाइकांनी फारच घोळ घातला. नेहा दु:खात असून सगळ्यांची मर्जी राखत राहिली. आपण का नाही तेव्हा बोललो. मला तर बोलता नाही येत पण तुम्ही तर स्पष्ट बोलता. तुम्ही का गप्प बसले?”
“ प्रियंकाच्या जाण्याने माझं डोकं बधीर झालेलं होतं. खरच त्या वेळी मी बोलायला हवं होतं. प्रियंका आणि नेहा एकमेकींच्या मैत्रीणी झाल्या होत्या. प्रियंकाचं जाणं
नेहाला खूप लागून राहीलं असेल.”
एवढं बोलून सुधीरच्या वडिलांनी एक सुस्कारा टाकला.
“ सुधीर म्हणाला, या पाहुण्यांनींच नेहा वैतागली होती्
“ ठीक आहेजे व्हायचं ते होऊन गेलं. आता येतेय तर नक्कीच तिच्या मनातील खळबळ शांत झाली असेल.”
“ वाटतंय तसंच. नेहा मला म्हणाली सुधीरला आणि ऋषीचा सांगू नका त्यांना मला सरप्राइज द्यायचय.”
“ मी तर तिचा मेसेज वाचूनच आनंदीत झालो आहे. मला वाटतंय आपली प्रियंकाच येतेय.”
“ हो खरय. मला नेहा गेल्यापासून खूप पोकळी जाणवतेय. मला सारखे भास व्हायचे की नेहा आली आहे आणि माझ्याशी बोलतेय. “
हे बोलून सुधीरच्या आईने एक दीर्घ निःश्वास सोडला. सुधीरच्या बाबांनी हलकेच बायकोचा हात थोपटला. सुधीरच्या आईच्या डोळ्यातून पाणी ओघळलं.
“ अहो नेहा येणार आहे दोनच दिवस पण किती चैतन्य येईल नं घरात. तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी मी करीन. कढी, पुरणपोळी, घावनं अगदी लसणाची चटणी सुद्धा “
तिच्या खांद्यावर थोपटत बाबा म्हणाले,
“ कर. अगदी नक्की कर. नेहालासुद्धा खूप आनंद होईल.”
बाबांनी हळुच आपल्या बायकोला कुशीत घेतलं आणि हलके हलके थोपटू लागले. सुधीरची आईसुद्धा अश्वस्त होऊन आपल्या पतीच्या कुशीत शिरल्या.
सुधीरच्या बाबांच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होतं. पाच महिन्यांपूर्वी नेहा सगळे पाश बाजूला करून वैतागून बंगलोरला गेली. तेव्हापासून सुधीरच्या बाबांच्या आणि आईच्या मनावर एक ताण होता. तो ताण आता कमी झाला होता. इतके दिवस त्या ताणामध्ये सुधीररचे आईबाबा दोघंही वरवर हसून बोलायचे. मनावरचा ताण सुधीर समोर व्यक्त होणार नाही याची दोघंही काळजी घ्यायचे.
सुधीरच्या मनातील खळबळ त्याच्या चेहऱ्यावर दिसायची. ती बघून सुधीरच्या आईबाबांच्या मनात तुटायचं. आता नेहा येणार म्हणून दोघंही खूप आनंदात होते. सुधीरच्या आईला सारखं नेहा स्वप्नात आल्याचं दिसतं होतं. ते स्वप्न बघून त्यांचा चेहरा समाधानी दिसत होता.
****
सकाळी सुधीरचे बाबा समोरच्या खोलीत पेपर वाचत बसले होते पण त्यांचे कान मात्र डोअर बेल कधी वाजते याकडे होते.आईची पण अवस्था अशीच होती. नेहाला आवडतो म्हणून शेवयाचा उपमा करत होत्या पण त्यांचेही कान डोअर बेल कधी वाजते याकडेच होते.
डोअर बेल वाजली तसं बाबांच्या चेहऱ्यावर हसू आलं पण ते दार उघडायला उठले नाहीत आणि आईसुद्धा स्वयंपाक घराबाहेर आली नाही.सुधीरच बेडरूम मधून बाहेर आला त्याने बघीतलं बाबा समोरच्या खोलीतच पेपर वाचत बसले आहेत. त्यांना बेल ऐकू गेली नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं.
“ बाबा अहो दोन तिनदा बेल वाजली.तुम्हाला ऐकू नाही आली.एवढी काय महत्वाची बातमी आली आहे.”
बाबा हसले. फार प्रश्न न विचारता सुधीरने दार उघडलं .जसं सुधीरने दार उघडलं तसं हातातील पेपर बाजूला ठेवून बाबा सुधीरचा चेहरा न्याहाळू लागले.आईसुद्धा स्वयंपाक घरातून बाहेर आली.
दारात प्रत्यक्ष नेहाला बघून आश्चर्य चकीत झाला आणि आनंदाने त्याने नेहाला मिठीच मारली. दारातच सुधीरने मिठी मारल्यामुळे नेहा अवघडून गेली.
“ सुधीर अरे सोड. दारात उभी आहे मी”
सुधीर काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यातून मात्र अश्रु वाहत होते. एवढ्यात टाळ्यांचा आवाज ऐकून सुधीर भानावर आला त्याने आणि नेहाने मागे वळून बघीतलं तर आईबाबा दोघेही टाळ्या वाजवत हसत होते.
सुधीर आणि नेहा दोघंही लाजले.
“ ये नेहा. मला एक सुखाची झप्पी दे गं.”
सुधीरच्या आईने असं म्हणताच नेहाने धावत येऊन सुधीरच्या आईला घट्ट मिठी मारली.
“ भेटली ग मला माझी लेक”
आईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.नेहाच्या डोळ्यातून पण अश्रू ओघळले.
सुधीरचे बाबा आणि सुधीर दोघही आई आणि नेहाच्या स्नेह मिलनाचं दृष्य बघून सुखावले. बाबांनी सुधीरच्या खांद्यावर हात ठेवून थोपटलं सुधीरने प्रेमाने बाबांकडे बघीतलं.
“ चला नेहा बाई फ्रेश व्हा आणि ऋषीला सरप्राइज द्या. तुझ्या आवडीचा शेवयाचा उपमा केला आहे.”
“ आई किती दिवसांनी मी तुम्ही केलेला शेवयाचा उपमा खाणार आहे. तुमच्या हाताची चव माझ्या हाताला नाही येत.”
“ बरं बरं. मस्का पाॅलीश पुरे.”
नेहा आपल्या खोलीत गेली.
“ आईबाबा तुम्हाला माहिती होतं नेहा आज येणार आहे?”
“ हो कालच तिचा मेसेज आला मला. सुधीर आणि ऋषीला सांगू नका म्हणाली. मी सरप्राइज देईन.”
“ अच्छा म्हणून दोनतीनदा बेल वाजून ही बाबा दार उघडायला उठले नाही. मला तेच आश्चर्य वाटलं एरवी एकदा बेल वाजल्यानंतर बाबा लगेच उठतात.”
सुधीरच्या बोलण्यावर आईबाबा दोघेही हसायला लागले.
नेहा हळूच आपल्या खोलीत गेली.ऋषी गाढ झोपलेला होता.त्याचा निरागस चेहरा बघून नेहाला लगेच त्याचे लाड करावेसे वाटले पण प्रवासातून आल्याने नेहा आधी फ्रेश झाली. मग हळूच ऋषीच्या गालाची पापी घेतली.ऋषीने थोडी चुळबुळ केली पण डोळे मिटलेलेचं होते.
“ऋषी उठतोस नं.आई आली बघ.”
ऋषीने नेहाचा आवाज ऐकला. हळूहळू डोळे उघडले. समोर नेहाला बघून आश्चर्य चकीत झाला. आणि क्षणात पांघरूण उडवून पलंगावर ऊभा राहिला आणि जोराने ओरडला आई आणि नेहाला घट्ट मिठी मारली.
थोड्या वेळाने मिठी सोडून ऋषीने पलंगावरून खाली उडी मारली. नेहाचा हात पकडून तिला खोलीबाहेर नेउन लागला.
“ अरे अरे थांब.”
ऋषी बाहेरच्या खोलीत आल्यावर जोरात ओरडून म्हणाला,
“ आजी आजोबा बदा आई आली.”
“ अरे व्वा! ऋषीची आई आली.”
आजी आजोबा अगदी आश्चर्य वाटल्यासारखं बोलले.
“ ए ऋषी ती माझी आहे तुझी नाही.”
“ नाही ती माझी आई आहे.हो तिनाई आई?”
“ हो रे मी तुझीच आई आहे.”
नेहाने ऋषीला पटकन उचलून कडेवर घेतलं.
नेहाच्या येण्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात आनंद होता पण प्रत्येकाच्या आनंदाची छटा वेगवेगळी होती.
ऋषीची अखंड बडबड चालू होती. इतरांना तो नेहाची बोलूच देत नव्हता. त्याच्याजवळ शाळेच्या खूप गोष्टी साचल्या होत्या. नवीन मित्र कोणकोण झाले ते सांगायचं होतं. फोनवर एवढं सांगायचं नाही असं सुधीर ने सांगीतल्यामुळे तो आता नेहाशी कोणालाच बोलू देत नव्हता. सुधीर आणि त्यांच्या आईबाबांना गंमत वाटत होती.
“ ऋषी बाळा आईला भूक लागली असेल तिला खाऊ दे. मग सांग. तूपण चल तुला अंड आवडतंनं ते उकडलय.”
“ ऋषी चल आपण दोघं खाऊ. तू अंड खा मी उपमा खाते.चालेल?”
नेहाने असं विचारताच हो असं जोरात ओरडून डायनिंग टेबल पाशी गेला.तेव्हाच नेहाला आठवलं,
“ ओ हिरो ब्रश नाही केला उठल्यावर “
नेहाने असं म्हणताच ऋषी जीभ तोंडाबाहेर काढून कान पकडून मग म्हणाला,
“ साॅरी आई चल.” ऋषी नेहाला बाथरूम मधे घेउन गेला.
नेहा आल्या पासून सुधीरची मधाळ आणि प्रेमळ नजर नेहाभवती भिरभिरत होती. नेहालाही ते कळत होतं. तिच्या अंगावर रोमांच उठत होते तर चेहरा लाजेने लाल झाला होता. ऋषीमुळे अजून दोघांना नीट भेटता आलं नव्हतं.
सुधीर आणि नेहाच्या नजरेचा रंजक खेळ आईबाबांच्या कधीच लक्षात आला होता. हे त्या दोघांनी एकमेकांना नजरेतूनच सांगीतलं. दोघांचं खूप मनोरंजन होत होतं.
सुधीर कावरा बावरा होतं उगीचच पेपर चाळत बसला.
“ अगं चहा करतेस नं? की लेक आली म्हणून सगळं विसरली. सुधीर तुला नकोच असेल चहा?”
आपला एक डोळा मिचकावून बाबांनी विचारलं.
“ का बरं? मला चहा हवाय.”
“ तुझ्या साठी पण चहा करतेय.बाबा तुला उगीच चिडवतात आहे.”
आई हसतच स्वयंपाक घरात गेली. सुधीर प्रश्नार्थक नजरेने बाबांकडे बघत बसला. बाबांनी मुद्दाम काही ऊत्तर न देता पेपर वाचायला घेतला आणि तिरप्या नजरेने सुधीर ची अवस्था बघून गालातल्या गालात हसत होते.
_________________________________
क्रमशः सुधीर आणि नेहा ची एकांतात भेट होईल नं?