Mala Spes Habi Parv 2 - 21 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग २१

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग २१

मला स्पेस हवी पर्व २ भाग २१

मागील भागात आपण बघीतलं की सुधीर निशांतला आणि अक्षयला रमण बद्दल सांगतो.या भागात बघू काय होईल.

छकूच्या बोलण्यावर रमण विचार करू लागला.आज त्याची नेहाच्या नव-याशी ओळख झाली. रमण जेव्हा नेहाच्या घरी गेला तेव्हा त्याला कल्पना नव्हती की नेहाकडे तिचा नवरा आला असेल.

दरवाज्याची बेल वाजवण्यापूर्वी रमणच्या मनात आनंद संगीत वाजायला लागलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की तो नेहाला भेटण्यासाठी किती उत्साहीत झालेला आहे. क्षणभर त्याच्या मनात नेहाबद्दल ऊचंबळून आलेलं प्रेम नेहाच्या घराचा दरवाजा उघडल्यावर दारात नेहा ऐवजी कोण्या पुरूषाला बघून एकदम भुईसपाट झालं.


नेहाच्या आयुष्यात आपल्या शिवाय दुसरा पुरूष माणूस रमणने अपेक्षितच केला नव्हता जरी त्याला माहीत होतं की नेहाचं लग्न झालंय.

क्षणभर रमणला नेहाच्या आयुष्यात तो दुसरा माणूस असल्या सारखं वाटलं. तो दुसरा माणूस म्हणजे ज्याला पहिल्या क्रमांकाचं महत्त्व कधीच नसतं. हे लक्षात आल्यामुळे रमण जरा हिरमुसला.

“आप कौन?”

दरवाज्यात उभ्या असलेल्या पुरूषाने हा प्रश्न विचारताच रमण गडबडला. त्याला तो कोण आहे हे कसं सांगायचं तेच कळलं नाही. नेहाचा मित्र, नेहाचा प्रियकर की नेहाचा कामामधील सहकारी! काय सांगायचं? क्षणभर रमणची बुद्धी कुंठीत झाली होती.

“ नेहा तुझ्या कडे कोणीतरी आलंय.”

हे वाक्य जेव्हा तो दारातील पुरूष म्हणाला तेव्हा रमण भानावर आला.

त्यानंतर नेहाने त्याला घरात बोलावलं आणि तो पुरुष तिचा नवरा आहे हे सांगितल्यावर नेहाशी बोलण्याचा रमणचा ऊत्साह मावळला. त्याला काय बोलावं तेच सुचेना. नेहाशी काय बोलायचं याचं तो पाठांतर करून आलेला होता. ते सगळं तो क्षणात विसरला.

“ सर काही काम होतं का?”

नेहा ने विचारलेल्या प्रश्नाला रमणने मनातच ऊत्तर दिलं.

“ नेहा तुझ्याशी खूप बोलायचं होतं ग. अगदी मनातलं पण आता कसं बोलू? तुझा नवरा माझ्यासाठी ति-हाईत माणूस आहे. मी त्यांच्यासमोर माझ्या मनातील प्रेमाचे हिंदोळे कसे तुला दाखवू? माझी प्रेमळ सुरावट त्याच्या समोर कशी गाऊन दाखवू?”

रमण प्रत्यक्षात मात्र काही तरी थातूरमातूर जाहिरातीच्या कामाबद्दल बोलला.

रमणला तिचा नवरा खूप तरूण आणि देखणा असल्याचं लक्षात आलं. या माणसापुढे आपण जरा म्हतारे दिसतो हे लक्षात आल्यावर रमणला वाईट वाटलं. नेहा भेटण्यापूर्वी आपण असेच देखणे होतो. नेहाने आपली प्रेमभावना स्विकारायला नकार दिला आणि आपण पूर्णपणे खचलो. आज प्रत्यक्ष वयापेक्षा दहा वर्षे मोठं झालोय असं वाटतंय.

रमण आता फार काळ तिथे थांबू शकला नाही कारण नेहाने स्पष्टपणे सांगितलं की त्यांना बाहेर जायचंय. हे सांगताना नेहाच्या डोळ्यात रमणला कोरडेपणा दिसला. रमण नेहाची कोरडी आणि अलिप्त नजर सहन करू शकला नाही. नाईलाजाने तो नेहाच्या घरून पराभूत भावनेने निघाला.

घरी आल्यावर छकूने त्याला कानपिचक्या दिल्या. त्या ऐकून रमण आता गंभीरपणे विचार करायला लागला. छकू म्हणते तसा मी खरंच भावनेत वाहून वेड्यासारखा वागतोय का? नेहाच्या आयुष्यात एक वादळ निर्माण करतोय का? का असं झालं? माझ्या भवती कितीतरी सुंदर, हुशार आणि श्रीमंत बायकांचा गराडा असायचा.

रमण नावाच्या देखण्या पुरूषांनी मैत्री व्हावी, त्याच्याबरोबर एक नातं निर्माण करता यावं एवढंच काय त्या सगळ्या बायका एकदा तरी माझ्या मिठीत येण्यासाठी आतूर झालेल्या असायच्या. तरी मी एवढा प्रॅक्टिकल राह्यलो. यातील एकाही स्त्री मुळे माझ्या आयुष्यात कधी वादळ निर्माण झालं नाही. त्यांच्या आयुष्यात काय उलथापालथ झाली असेल तरी मला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं.

मी एक मस्त कलंदर माणसासारखा जगत होतो. मला प्रत्येकीमधला स्ट्राॅंग आणि विकपाॅईंट माहिती होता. ज्या स्त्री बरोबर मला माझे धुंद क्षण जगायची इच्छा होत असे ती माझ्या एका फोनवर माझ्याकडे धावून यायची.

शृंगाराचे मोहक आणि धुंद मळे फुलवायची. मी जिला बोलवायचो ती महत्वाचं काम बाजूला ठेवून धावत यायची कारण ती माझ्या बोलवण्याची आतुरतेने वाट बघत असायची. मी इतक्या सहज कोणत्याही स्त्रीला भेटायला तयार होत नसे. म्हणून माझी वट निर्माण झाली होती.

मी स्त्री साठी हपापलेला नव्हतो.माझा संसार, माझं घर आणि माझं घरातील हक्काचं प्रेम छकूच्या रूपाने अबाधित होतं. छकूने उभारलेल्या शृंगार महालात आपुलकी, जिव्हाळा असायचा पण त्या बायकांसारखी अभिसारिका छकुमध्ये नव्हती. म्हणूनच तर त्या स्त्रियांशी आपण मैत्री ठेवली. माझ्या अश्या वागण्यानेच त्या सगळ्या स्त्रियांमध्ये चढाओढ लागायची की कोणाला मी बोलावतो.


असा मी रमण शहा. छकूच्या मते मी फ्लर्ट माणूस आहे. छकू मात्र माझ्याशी एकनिष्ठ आहे. मी पण आधी तिच्याशी एकनिष्ठ होतो. मग मी असा फ्लर्ट कधी आणि कोणामुळे झालो? एखाद्या स्त्री मुळे? एखाद्या अनपेक्षित प्रसंगामुळे की पत्रिकेतील ग्रहांमुळे? कोणत्या गोष्टीमुळे मी बिघडलो?

रमणचं डोकं गरगरायला लागलं अजूनही तो डोळे मिटुनच बसला होता पण त्याला छकूची चाहूल लागली. त्याने डोळे उघडले. बाजूच्या खुर्चीवर बसता बसता छकूने विचारलं,

“ कसला विचार करतोयस?”

“ माझ्या वागण्याचा.”

“ खरच?”

छकूच्या आवाजात आश्चर्य होतं.

“ का? मी माझ्या वागण्याचा विचार करू शकत नाही?”

“ मी असं कधी म्हटलं?”

“ तुझ्या बोलण्याचा टोन असाच आहे.”

“ रमण तू नेहमीच माझ्या वागण्या,बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतोस. मला आश्चर्य वाटलं कारण मला पुर्वीच्या रमणचं वाक्य आठवलं जे या दहा वर्षांत मी ऐकलंच नाही.”

“ तुझ्या मते मी फ्लर्ट आहे.”

“ तुझा फ्लर्टपणा जोपर्यंत शाब्दिक होता तोपर्यंत ठीक होतं. नंतर तुझी हिम्मत वाढली हे मला कळलं नाही असं तुला वाटतंय का? सात आठ वर्षापूर्वी हे माझ्या लक्षात आलं.”

“ तेव्हा तर तू आत्ता सारखं आकांडतांडव केलं नाहीस.”

“ सुरवातीला मोकाट सुटलेला बैल लाथा खाऊन गोठ्यात परत येईल असं वाटलं होतं. सभ्य शब्दात सुबह का भूला शामको घर लौटके आता है. असं होईल असं वाटलं होतं.”

“ सगळा दोष माझ्यावर थोपवू नकोस. तू कशी वागलीस ते बघ.”

“ मी काय ‌वागले?”

“ नव-याला घरी परत येण्याचं आकर्षण तू ठेवलच नाही. मग मी बाहेर माझं आकर्षण शोधलं.”

“ व्वा! किती सुंदर स्पष्टीकरण दिलं. मानलं तुला. संसार आपला दोघांचा होता पण या संसारातील एकच गोष्ट तू केलीस ती म्हणजे सत्यम ॲडव्हर्टायझिंग एजन्सी मध्ये बसून महिन्याचा पगार घेतला आणि सुंदर तरुणींच्या मागे नाचला बागडला. तू कधी मुलांना आंघोळ घातली? कधी त्यांना जेवायला भरवलं,? कधी त्यांचा अभ्यास घेतला? कधी त्यांना शाळेत सोडायला गेलास? घरातील इतर कामं केली? भाजी आणली? कामवाल्या बायका नीट काम करतात की नाही हे बघीतलं. कामवाल्या कधी नाही आल्या तर तू कामं केलंस? तू काहीही केलं नाही.”

“ मी काय घरातील कामं करत बसायचं का?”

“ आपली बायको कामांनी थकते, मुलांकडे लक्ष देताना थकते हे तू समजुन घेतलं असतं तर तुला माझ्याविषयी ओढ वाटली असती. तुला घरी यावसं वाटलं असतं. मुलांच्या प्रेमापोटी घरी धावत आला असता पण तू स्वतःच्या देखण्या रूपात मश्गूल होतास. लोकांकडून मिळणार खोटं कौतुक अंगभर मिरवत राहिलास. आपल्या संसाराचं आपल्या घराचं कौतुक जर तुझ्या मनावर रेंगाळलं असतं तर तू हा छचोरपणा केला नसता.आपल्या घरट्याच्या ओढीने आमच्या कडे आला असता. “

“ कळलं.”

“ रमण वयाची पन्नाशी जवळ आली आहे. मुलं बघता बघता घरट्यातून उडून जातील. नंतर त्यांना जीव लावायचा प्रयत्न केलास तरी उपयोग होणार नाही.त्या नेहाच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस. आपल्या घरट्यात परत ये. खोटा प्रेमाचा मुखवटा घातलेल्या त्या मैत्रिणींना विसर आणि घरी परत ये. हर्षद आणि दिशा कळत्या वयात आली आहेत. आता स्वतःला बदल मुलांसाठी.”

एवढं बोलून छकू निघून गेली.

रमण पाठमोऱ्या छकूकडे बघत सैरभैर झाला.

छकू म्हणते तसं इतक्या चुका केल्या का आपण? आपण संसारात रमलोच नाही का? कुठे आणि कसं चुकत गेलो आपण? छकू म्हणते तसं मी नेहाचा विचार करणं सोडायला हवा का? मी नेहामध्ये गुंतलोय ही चूक झाली का? मी पंचेचाळीस वर्षाचा आहे म्हणून ही चूक आहे का? पंचवीस वर्षांचा असतो तर हे गुंतणं बरोबर झालं असतं?

रमण अजूनही गोंधळलेलाच होता.

विचारांच्या लाटा बेधडकपणे टकरा देत होत्या त्यामुळे रमण खूप थकून गेला.
________________________________
क्रमशः