Mala Spes Habi Parv 2 - 19 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग १९

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग १९

मला स्पेस हवी पर्व २ भाग १९


मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीर यांच्यातील दुरावा संपलेला आहे.या भागात बघू काय होईल

छकू आपल्या कामात असताना तिला जाणवलं की रमण बाहेरून आलेला आहे.तिने लगेच हातातील काम बाजूला ठेवून रमणकडे आली,

“रमण कुठे गेला होतास ? रमण मी काय विचारतेय? तू कुठे गेला होतास ?”

यावर रमण म्हणाला,

“ मी बाहेर गेलो होतो.?”

“ कुठे बाहेर गेला होतास?”

“ प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे का? असा काही नियम आहे का?”

“ नियम नाही पण सध्या तुझं वागणं आहे जे मला अजिबात पटत नाही त्यासाठी मला प्रश्न विचारावे लागतात. कुठे गेला होतास का?”

“का म्हणून सांगू ? घरातही मला शांती नाही. जरा बाहेर शांती मिळते म्हणून…”

“अच्छा घराबाहेर कुठे शांतता मिळाली तुला? आणि घरामध्ये तुला कोण त्रास देत आहे ?जरा नीट सविस्तर सांग मला.”

यावर रमणने तिच्याकडे जळजळीत नजरेने बघितलं आणि म्हणाला,

“मला गरज वाटत नाही तुला काही सांगायची.”

“ रमण आपण लॉजिंग बोर्डिंग मध्ये राहणारी माणसं नाही. आपण नवरा बायको आहोत आणि एकाच घरात राहतो. त्यामुळे दोघांपैकी एकाच वागणं खटकलं तर त्याला प्रश्न विचारण्याचा दुसऱ्याला अधिकार आहे हे तू विसरतोस.”

बऱ्याच वेळ रमण काहीच बोलला नाही. त्यानी बाहेरचे कपडे बदलून आपल्या बालक्नीतल्या नेहमीच्या खुर्चीवर जाऊन बसला.


“ रमण आता बाल्कनीतच रोज उठून ठिय्या मारून तुला बसायचे आहे का? तुझा कामावर जायचा विचार दिसत नाही. घरातही मदत करत नाही.”

रमण यावेळी चिडला,

“ मी का करायची घरातली कामं? तू मला सारखे काम सांगशील.मला शांतपणे बसता येणार नाही का?”

यावर छकु म्हणाली,

“ तुला शांतपणा मिळेल पण कधी तू जेव्हा नीट वागशील तेव्हा.”


“तुझ्या दृष्टीने तर ती नेहमी चुकीचं वागत असतो. बरोबर बोललो नं मी?”


“ हे बघ रमण जिथे तू चुकला आहेस तिथे मी तुला सांगणारच. तुझी चूक दाखवणारच. कारण शेवटी आपण दोघं नवरा-बायको आहोत. त्याच बरोबर घरात आपल्या मुलांची वयं लक्षात घ्यायला हवी. त्यांच्या अडनीडी वयात घरात योग्य वातावरण राहीलं याची जबाबदारी आपली आहे. आत्ताच तुझं जे विचित्र वागणं आहे ते मुलांना कळलं तर त्यांना वाईट वाटेल कारण सगळी मुलं आपल्या वडिलांना एका डिसेंट इमेज मध्ये बघू इच्छितात. माझ्यासाठी नाही तर आपल्या मुलांसाठी तू तुझ्या भावनांना आवर घातला पाहिजे. हे पंधरा सोळाव्या वर्षातलं प्रेम नाही .तुझं वागणं पंचेचाळीस वर्षाच्या माणसाला शोभत नाही हे लक्षात घे आणि त्याप्रमाणे वाग.”


“ प्रत्येक वेळेला माझ्या वयाचा उल्लेख करू नकोस. मला डॉमिनेट करायचा प्रयत्न करू नकोस.”

“ तुला मी कशाला डाॅमीनेट करणार आहे ?तुझे चुकले ते मी सांगते आहे. ती मुलगी खरंच छान आहे. तिचा संसार आहे. तिला लहान बाळ आहे .तुला तिच्याविषयी वाटत असलेली ओढ ही मैत्री पलीकडे असू नये हे सांगतेय. असं झालं नाही तर याचा वाईट परिणाम होईल. त्यामुळे तू आपलं वागणं सुधर.”



“बघतो”

असं म्हणून रमणने त्यावर काही न बोलता खुर्चीवर डोळे मिटून बसला. छकुकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तो आपल्या विचारात गढला. हे बघितल्यावर छकुला राग आलाच पण तिला थोडी काळजी वाटली. हा जर वेळेवरी सुधारला नाही तर काय करावे लागेल याच्याबद्दल ती विचार करू लागली.

***

इकडे सुधीर आणि नेहा यांच्यातल्या नात्याला लागलेलं ग्रहण काल सुटल्यामुळे दोघेही खुश होते.

“ नेहा मी सुट्टी वाढवू का? तुला वाटत असेल आणि जमत असेल तर दोन दिवस किंवा उद्याच्या दिवस तरी तू सुट्टी घे. आपण घरीच बसुया एकमेकांना समजून घेऊन आपण इथपर्यंत आलो. आता आपल्यातील नात्याला आणखी झळाळी देऊ या.”

“सुधीर मला आवडलं असतं सुट्टी घ्यायला पण मध्यंतरी मी आजारी असल्याने खुप कामं पूर्ण करायची राहिली आहेत.”

“हरकत नाही. पण एकटी राहतेस तर आमच्यापासून कांहीं लपवायचे नाही.”

“नाही.”

सुधीरने अलगद नेहाला मिठीत घेतलं. गेले सहा महिने सुधीर खूप होरपळून निघाला होता.आई वडील बरोबर असल्याने त्याला जरा मानसिक आधार मिळत होता. त्याच्या मनात आलं की नेहा इथे आली ते एका वेगळ्याच कारणासाठी आणि या रमणने तिच्या आयुष्यात घोळ घातला. संकोचामुळे ती आपल्याला काही सांगू शकली नाही कदाचित यापुढेही तिची होणारी घुसमट सांगू शकली नसती. पण परमेश्वराच्या कृपेनेच आपल्या समोर तो रमण आला आणि नेहाला होणारा त्रास कळला.

माझी नेहा खूप साधी आहे. ती अशी कोणाच्याही मागे धावणारी नाही. तिचे विचार स्पष्ट आहेत. आपल्या बरोबर तिच्या विचारांची छान सरगम जुळली आहे. माझी नेहा खूप गुणी आहे.
सुधीरचं मन नेहाच्या प्रेमाने इतकं ऊचंबळून आलं की त्याने नेहाच्या कपाळावर अलगद आपले ओठ ठेवून चुंबन घेतलं.

नेहाला सुधीरच्या चुंबनातील प्रेमळ स्पर्श जाणवला आणि तिने हळूच डोळे मिटून घेतले. तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे रंग उठले.

****

बराच वेळाने छकूच्या मनात काही तरी आलं आणि ती एका निश्चयाने रमणच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसली. हळुवारपणे रमणचा हात आपल्या हातात घेतला.तिच्या या कृतीमुळे रमणने डोळे उघडले. तिच्याकडे लक्ष जाताच रमण छकूच्या हातातील आपला हात काढून घ्यायचा प्रयत्न करू लागला पण छकूने त्याचा हात आपल्या हातातून निसटू दिला नाही.

“ रमण तू माझ्या वर खूप रागावला असशील हे मला कळतंय.”

“ तुला कळून उपयोग काय? तुला जे करायचं तेच करते.”
रमण ऊद्विग्नतेने म्हणाला.

“ रमण मी उगाच चिडत नाही. जरा तारतम्याने विचार कर. प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं हे मलापण मान्य आहे. या वयात तू तुझा पेक्षा लहान वयाच्या स्त्री च्या प्रेमात पडला आहेस. प्रेम वय बघत नाही हेपण मला मान्य आहे. प्रेमाला वय कळत नाही पण माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीला तर वय कळतंनं! वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी तू पंचवीस वर्षातील मुलासारखावागतो आहेस. हे योग्य नाही.”

“ कितीदा तेच सांगशील?”

“ मी एवढंच सांगेन की तुझ्या मनात तिच्याबद्दल असलेल्या प्रेमाला संयमाचं कोंदण घाल. त्याला भडक रंग देऊ नकोस. तुझ्या संयमित प्रेमाला तिने कदाचित दाद दिली असती. मी सुद्धा आक्षेप नसता घेतला. पण आता तुझ्या वागण्यातून रोडरोमीयोचं दर्शन होतं. जे चुकीचं आहे. साध्या आणि संयमित प्रेमाला कोणाची आडकाठी असेल? तुझ्या या विचित्र वागण्यामुळे ती मुलगी अडचणीत आली आहे. तिला त्रास होतोय. तू तिच्यात गुंतलाय म्हणून तिनेही तुझ्या प्रेमाला तेवढ्याच उत्कटतेने प्रतिसाद द्यावा ही जबरदस्ती तू कशी करू शकतोस?”

“ मला तिच्याशी बोलायला आवडतं.”

“ तू सभ्यपणे तिच्याशी मैत्री केली असतीस, तिचा आदर केला असतास तर ती मोकळेपणाने तुझ्याशी बोलली असती. पण तुझ्या अशा वागण्यामुळे तू तिच्या मनातून ऊतरलास. आता निदान तिला सतत भेटण्यासाठी धडपड करू नकोस. कामानिमीत्ताने पण मोजकं बोल. तुझ्या असण्याने तिला घुसमट वाटू देऊ नकोस. ती मुलगी हुशार आहे तिच्या हुशारीची कदर कर. तू मोकळा, सभ्य आणि शांत राहिलास, तुझ्याशी बोलताना तिला अवघडलेपणा वाटला नाही तर ती तुझ्याशी पूर्वी सारखं बोलेल. ऐक माझं रमण. वेळीच सावध हो.”

छकू कळवळून रमणला सांगत होती पण रमणला ते पटलंय असं काही वाटत नव्हतं.

रमण डोळे मिटून बसला होता.निराश होऊन छकूने आपल्या हातातील हात सोडून देत म्हटलं,

“ मी तुला सांगायचं काम केलं. कसं वागायचं हे तू ठरवायचं. तुझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून मी तुझ्या चुका दाखवते. आत्ताही दाखवली. माझं कर्तव्य मी केलं यापेक्षा जास्त मी काही करू शकत नाही.”

डोळ्यात आलेलं पाणी पुसून छकू तिथून उठून आतल्या खोलीत गेली.

***
इकडे सुधीरच्या आश्वासक मिठीमधून नेहाला बाहेर यायची इच्छा नव्हती. गेले काही दिवस ती या स्पर्शाची असोशीने वाट बघत होती. नेहा बंगलोरला आली वेगळ्याच कारणासाठी आणि नको त्या त्रासात अडकली थोडक्यात आगीतून फुफाट्यात पडल्या सारखी नेहाची अवस्था झाली होती.पण आता तिला चिंता नव्हती कारण तिने सुधीरला मोकळेपणाने सगळं सांगितलं होतं आणि सुधीरनेही तेवढ्याच मोकळेपणाने तिला समजून घेतलं होतं. त्याचा भक्कम पाठींबा मिळाल्याने नेहा आता अश्वस्थ झाली होती.

****


छकू निघून गेल्याचं रमणला कळलं. छकू बोलली तसं आपण खरंच चुकलो का? यावर रमण विचार करायला लागला.

__________________________________क्रमश: