Mala Spes Habi Parv 2 - 16 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग १६

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग १६

मला स्पेस हवी पर्व २ भाग१६

मागील भागात आपण बघीतलं की रमणच्या विचित्र वागण्यामुळे छकू आणि त्याचे वाद होतात. रमणचं बोलणं दाराआडून ऐकल्यावर दिशा स्तंभित होते.या भागात बघू.


कितीतरी वेळ दिशा त्या धक्क्यातून बाहेर आली नाही. हर्षदने दिशाला हलवून भानावर आणलं

“काय झालं? अशी काय दिसते आहेस?”

“हर्षद तू आलास?”

दिशाने हर्षदचा हात घट्ट पकडून ठेवला.

हर्षद तिच्या बाजूला बसला.

“दिशा काय झालंय? तू खूप अस्वस्थ दिसतेय?”

“हो.मी अस्वस्थ आहे?”

“कशाने? तुझी तब्येत बरी नाही का?”

“मी बरी आहे.बाबा बरे नाहीत.”

“बाबा बरे नाहीत? बाबांना काय झालं?”

हर्षद पलंगावरून उठू लागला तशी दिशा म्हणाली,

“बाबांना बघायला नको जाऊ.”

“का?”

“मी सांगते म्हणून.”

“अरे यार! दिशा तू कोड्यात नको बोलून. स्पष्ट बोल.”

दार निट लागलंय का हे बघून दिशा म्हणाली,

“हर्षद बाबांनी खूप मोठा घोळ केलाय.”

‘घोळ केलाय? कसला?”

“सांगते. हर्षद बाबा या वयात प्रेमात पडलेय.”

“काय? “

हर्षद किंचाळला.

“ऐ .. चूप ओरडतोस का?”

“ओरडण्यासारखीच गोष्ट तू बोललीस.”

हर्षद एवढ्या जोरात ओरडला होता की छकू खोलीचं दार उघडून आत आली.छकूला बघताच दिशा आणि हर्षद दोघांनाही काय बोलावं कळलं नाही.

“हर्षद! तू कधी आलास? “
छकूने विचारलं.

“मघाशीच.”

“आल्या आल्या दिशाच्या खोलीत का आलास? आणि आत्ता ओरडला का?”

“ आई आम्ही असंच भांडलो .”

दिशा म्हणाली.

यावर छकुचा विश्वास बसला नाही तरी ती म्हणाली,

“तुम्ही न भांडता बोलणार नाही हे मला माहिती आहे पण मला आत्ता ओरडण्याचा आवाज आला? काय झालं? हर्षद तू का ओरडलास?”


यावर काय बोलायचं दोघांनाही कळलं नाही. तेव्हा छकू म्हणाली ,

“तुम्ही दोघं बाहेर येऊन बसा.”

“कशाला?”

दोघांनी एकदमच विचारलं.

“ याच्यासाठी की मला दोघांच्या बद्दल डाऊट येतोय.”

“ डाऊट ? कसला डाउट आहे ? काहीतरी काय बोलतेस आई तू?”

हर्षद म्हणाला.

“तुम्ही दोघं काय बोलत होता हे मला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही जर मला स्पष्ट सांगितलं तर ठीक आहे नाहीतर समोरच्या खोलीत येऊन बसा आणि काय बोलायचं ते माझ्यासमोर बोला.”


“ आई मी हर्षदला मी गणिताचं विचारत होते. तेव्हा तो माझ्यावर ओरडला. तुला माहितीये ना तो नेहमीच मला म्हणतो की तू डफर आहे. आता नाही मला समजत गणीत हा विषय म्हणून त्याला विचारते ना !”

“तू डफरच आहेस कळलं ना ?”


प्रसंगावधान राखून हर्षद म्हणाला .त्यावर लगेच दिशा भांडायला लागली,

“ तू स्वतःला खूप हुशार समजतोस? कारण मी तुला गणीतातलं विचारते. तुला चांगलं गणित जमत म्हणून तू माझ्यावर दादागिरी करू नको.”


यावर छकु म्हणाली,

“ भांडणं बंद करा. आता लहान नाही तुम्ही .”

त्यावर हर्षद म्हणाला ,

“बघ ना आई एक तर हिला मी गणित समजावून सांगतो त्यातही माझ्याशीच भांडते.”

यावर छकुली लक्ष न देता खोली बाहेर पडली. ती गेल्यावर दिशा आणि हर्षद दोघांनी एक सुटकेचा निष्वास सोडला आणि हर्षद पलंगावर बसत म्हणाला,


“ सुटलो.मला तर वाटलं आईने काही ऐकलं की काय?”

“ म्हणून तुला मी म्हणाले की हळूहळू बोल तर तू ओरडलास.”

“अगं पण तू गोष्टच अशी सांगितली तर मला धक्का नाही का बसणार? म्हणून मी ओरडलो. पण बाबा आत्ता या वयात प्रेमात पडले. तुला नीट माहिती आहे नं की नेहमीसारखी अर्धवट काहीतरी ऐकून बडबडतएय?”

“ हर्षद तू प्रत्येक वेळी मला मूर्ख ठरवू नकोस.मी हे माझ्या कानांनी बाबांना बोलताना ऐकलं.”

दिशाचं बोलणं ऐकल्यावर हर्षदला काय बोलावं सुचेना.

“ हर्षद आता काय करायचं?”
थोड्या वेळाने हर्षद म्हणाला,

“ दिशा आपण काय करणार? आईच काहीतरी करेल. आपण लहान आहोत. जोपर्यंत आपल्याला आईकडून काही कळत नाही तोपर्यंत आपण आईला या गोष्टीबद्दल विचारू शकत नाही.”

“ तू म्हणतोस ते बरोबर आहे. आईची अवस्था खूपच विचित्र झाली आहे. आपल्या पर्यंत बाबांचं असलेलं प्रकरण पोहचू नये याची ती काळजी घेत असेल. मला महिनाभर संशय येतोय की बाबांना असं काय झालं आहे की त्यांची तब्येत बरी होत नाही. मी आईला एकदोनदा विचारलं पण आईने काही ऊत्तर दिलं नाही.”

“ आईलाच कळलं नसेल बाबांची तब्येत बरी न होण्यामागचं कारण आपल्याला कसं सांगायचं?”

“ बरोबर. मग आपण काय करायचं?”
दिशाने विचारलं.

“ काही करायचं नाही. हे खूप नाजूक प्रकरण आहे. आईसाठी जरा त्रास दायक आहे. आपण तिला काही विचारायचं नाही. अपण नेहमीसारखच वागायचं फक्त घरात काय चाललंय याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं.”

“ आईला कोणं सपोर्ट करेल?”

“ दिशा ही गोष्ट आई कोणाला सांगू शकेल का?”

“ होनं. सांगीतली तरी कोणाला कळली पाहिजे. मला न हर्षद बाबांची गंमत वाटते. या वयात कसे ते कोणाच्या प्रेमात पडले.?”

“ हे आपल्याला कसं कळणार? आपले बाबा आहेत म्हणून आपल्याला असंच वाटणार की त्यांनी मॅच्युअर असायलाच हवं. पण कोणाच्या मनावर आपण कंट्रोल नाही करू शकत. “

“ हे प्रकरण वाढलं तर?”

दिशाच्या मनात घोळणारा प्रश्न तिने विचारला.

“ नाही वाढणार.”

“ कशावरून तू एवढं ठामपणे बोलतोय?”

“ दिशा आपली आई खंबीर आहे.‌ ती हे प्रकरण वाढू देणार नाही.”

“ काय करेल आई असं तुला वाटतं?”

“ माहिती नाही. पण आई घाबरून जाणार नाही.”

रमणला काही स्त्रियांबरोबर पाहिल्याचे हर्षदने दिशाला सांगत नाही. त्याला दिशा अजून लहानच वाटते. रमणचं वागणं कधी ना कधी आईला कळणार हे हर्षदच्या लक्षात आलं होतं. पण रमण कोणाच्या प्रेमात पडला असेल असं हर्षदला वाटलं नव्हतं.

बाबा म्हणून रमणबद्दल हर्षदचं वाईट मत नव्हतं पण रमणचं हे रूप जेव्हा हर्षदला कळलं तेव्हा तो नुकताच काॅलेजमध्ये गेला होता त्यामुळे बराच निरागस होता म्हणून गोंधळला. हळुहळू रमणच्या वागणं पचवायला शिकला. रमण घरात योग्यच वागायचा. त्यामुळे हर्षदने छकूला वाईट नको वाटायला म्हणून त्याने जे पाहिले ते सांगीतलं नव्हतं.

बराच वेळ दोघं काहीच बोलले नाही. थोड्यावेळाने हर्षद उठला कारण हर्षदच्या ट्युशनची वेळ झाली होती.

****
आज सुधीर, नेहा आणि ऋषी तिघ बंगलोर फिरायला जाणार होते. ते जरी बाहेर जेवणार खाणार असले तरी नेहाने ऋषीसाठी खाण्याचे कोरडे आणि हलके पदार्थ घेतले होते.

तिघं तयार होत असतानाच सुधीरच्या बाबांचा फोन आला,

“ हॅलो.बोला बाबा.”
मोबाईल उचलल्याबरोबरच सुधीर म्हणाला.

“तू बंगलोरला पोचल्याचा मेसेज वाचला. ऋषी काय म्हणतोय आईला भेटल्यावर?”

“ आईबरोबर सतत पटर पटर चालू आहे. सगळं आईनेच करायचं आहे.”

“ बरोबर आहे. ऋषीला आई सहा महिन्यांनंतर भेटली आहे. नेहा पण खूष आहे नं?”

“ हो बाबा.”

“ नेहाची तब्येत कशी आहे आता?”

“ छान आहे. आज आम्ही बंगलोर बघायला चाललो आहे”

“ अरे व्वा ! जाऊन या.रात्री आल्यावर त्राण असेल तर बोलू म्हणजे तुझ्या आईला बोलता येईल.”

“ हो बाबा.”

सुधीरने फोन ठेवला.

आज कितीतरी महिन्यांनी नेहा मनापासून तयार झाली होती. आरशात स्वतःला न्याहाळतांना तिच्या मनात विचारांच्या रेशमी लडी उलगडू लागल्या.

‘काय ग नेहा किती दिवसांनी मला तुझं हे प्रसन्न रूप बघायला मिळतंय.’

नेहा या कुजबुजीने भानावर आली. तिच्या समोरचा आरसा तिला मिस्किलपणे विचारत होता.

नेहाच्या चेहऱ्यावर एक हलकासा लाजेचा लालीमा पसरला. ती मनातच म्हणाली,

‘किती महिन्यांनी मला नटावसं वाटतंय. काही महिन्यांपूर्वी सुधीरचा हलकासा स्पर्श सुद्धा नकोसा झाला होता. काल मात्र सुधीरचा स्पर्श खूप मुलायम,आश्वासक वाटला. इतक्या महिन्यांनी भेटून ही त्याच्या स्पर्शात, वागण्यात कुठेही धसमुसळेपणा नव्हता,वासना नव्हती म्हणूनच आपल्याला खूप मानसिक आधार मिळाला. रमणच्या त्रासदायक वागण्यातून सुटल्या सारखं वाटलं. आता मला मधून मधून पुण्याला जायची ओढ वाटतेय.”

या विचारांनी नेहाच्या ओठांवर एक हलकसं स्मितहास्य उमटलं. नेमका त्याचवेळी सुधीर खोलीत आला. नेहाला स्वतःशीच हसताना बघून सुधीरला तिची मस्करी करण्याची लहर आली.

“ आरशाचा नशीब खुललं बाॅ! नेहा मॅडम हसल्या आरशाकडे बघून.”

हे सुधीरचं बोलणं ऐकताच नेहा हसत म्हणाली,

“ सुधीर काहीही हं. आरशाशी कशी बोलणार आहे मी?”

तिला ऊत्तर न देता सुधीरने मागून अलगद नेहाला मिठी मारली आणि म्हणाला,

“ हं. आरसा तुला खूष ठेवतो. तुला खुष ठेवायला अस्मादिकांनी काय करावं?”

“ ऐ सुधीर काय रे तुझी नौटंकी.”

सुधीरची मिठी सोडवत नेहा सुधीरकडे वळून म्हणाली,

“ तू मला असाच आयुष्य भर समजून घे. एवढीच इच्छा आहे. काल तू आलास आणि माझ्या मनावर असलेले नवे जुने वळ खूपच अस्पष्ट झाले. त्यामुळे आज मनाला आनंदाची झालर लागलीय. या झालरीत दडलेला मंद मंद सुगंधित दरवळ प्रसन्न करतोय. हा गंध मला आयुष्यभर हवा आहे.”

यावर सुधीरने नेहाच्या गालावर टिचकी मारत म्हटलं,

“ तू जसं म्हणशील तसा मी तुझ्या बरोबर असणार आहे. दुधात जशी साखर विरघळते तसा मी तुझ्या प्रेमात, आयुष्यात विरघळलोय. “

नेहाने समाधानाने सुधीरच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे
अलगद मिटून घेतले. दोघंही एका वेगळ्याच आनंदात होते त्याच वेळी दारावरची बेल वाजली. पुन्हा वाजली तसे दोघं भानावर आले.

“ तू थांब मी बघतो कोण आहे?”

सुधीरने समोरील दार उघडले. दारात अनोळखी व्यक्ती बघून विचारलं,

“ आप कौन?”

समोरील व्यक्ती जरा गोंधळली अडखळत त्या व्यक्तीने विचारलं,

“ नेहा मॅडम यही रहती है नं? उन्हे मिलना है.”

“ हां नेहा मॅडम यहीपर रहती है.‌ नेहा तुझ्या कडे कोणीतरी आलंय.”

सुधीरच्या हाक मारण्याने नेहाने बाहेर येत विचारलं,

“ कोण आहे?”
नेहाने खोलीबाहेर येत विचारलं.

________________________________
क्रमशः