mala spes habi parv 2 bhag 9 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग ९

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग ९

मला स्पेस हवी पर्व २ भाग ९


मागील भागात आपण बघितलं की रमण बेशुद्ध पडला होता तो अर्धवटशुद्धीत असताना काहीतरी बडबडला त्यात त्याच्या तोंडून नेहाचं नाव ऐकल्यावर छकुला फारच धक्का बसला होता पुढे काय होतं ते बघू

रमण आठ दिवस झाले घरी होता. छकुला रमणच्या मनात कोणीतरी नेहा आहे हे कळलं होतं कारण रमण अर्धवट शुद्धीत असताना बडबडला होता. त्यात नेहाचं नाव आलं होतं.

‘ नेहा मी तुझ्या खूप प्रेमात आहे. तुझ्याशिवाय मला करमत नाही. वगैरे पद्धतीचे जी वाक्य रमण बोलला होता ते ऐकून छकुला खूपच धक्का बसला होता .

आज आठ दिवस झाले रमण घरीच आहे आत्ता कुठे त्याची तब्येत थोडी सुधारते आहे तेव्हा छकुने ठरवलं की आज रमणशी स्पष्ट बोलायला हवं. कोण नेहा आहे त्याला विचारायचं. म्हणजे पुढे काय करायचं हे ठरवायला सोपं जाईल. त्याचे जेवण झाल्यावर त्याला विचारायचं हे छकुने ठरवलेलं होतं पण छकूला तेवढा वेळ धीर धरवला नाही कारण ती प्रचंड अस्वस्थ झालेली होती.

“रमण मला सांग ही नेहा कोण आहे ?”

अचानकपणे छकुच्या तोंडून नेहाच नाव ऐकताच रमण घाबरला. त्याच्या हातातला पोळीचा घास खाली ताटात पडला. रमणला दचकलएलं बघून छकूने विचारलं,

“एवढं दचकायला काय झालं? कोण आहे ही नेहा?”

छकुने रमणला पुन्हा विचारलं.यावर रमण म्हणाला,

“ कोण नेहा ?मला माहिती नाही.”

“ मला अंदाज होताच की तू हेच उत्तर देशील. जेव्हा तू अर्धवट शुद्धीवर होता तेव्हा तू नेहाचं नाव घेतलस.”

डोळे मिटून तो छकूचं ऐकत होता. रमण मनातून हादरला होता. तो भीतीने काहीच बोलू शकला नाही.

“ मला सांग नेहा तुला कुठे भेटली तीपण तुझ्यावर प्रेम करते का?”

हे प्रश्न छकुने न थांबता विचारले . यामुळे रमण फार गोंधळून गेला होता. त्याला वाटलंच नाही नेहाची गोष्ट समोर येईल. तो सगळ्या गोष्टी खूप जपून करत असे कारण छकुच्या कानावर हे सगळं जाऊ नये यासाठी. पण नेमका घात झाला.


“ तू इतर बायकांबरोबर फ्लर्ट करतोस हे मला माहिती होतं कारण मी दोन-तीनदा तुला आणि त्या बायकांना बघीतलं होतं.”


छकूचं बोलणं ऐकून रमणची दातखिळी बसली होती ती अजूनही सुटली नव्हती. तो काहीच बोलू शकला नाही. यावर छकु म्हणाली,

“ रमण तुला बायकांशी बोलायला आवडतं याची मला कल्पना आहे. तू नेहमी खुश असतो तेव्हा का असतो हे सुद्धा मला कळलेलं आहे पण जोपर्यंत तू काही वेगळं वागत नाहीस तोपर्यंत तुला बोलायचं नाही हे मी ठरवलं होतं. पण आता मला शंका येते की ज्या बायकांबरोबर तू फिरलास हे ते मला कळू दिलं नाहीस आज तिचं नाव कळलं तर मला खरं सांग ही कोण आहे आणि तिच्यात किती गुंतला आहेस? तिच्यात गुंतत असताना आपल्या एवढ्या वर्षाच्या वैवाहिक आयुष्याला तू लक्षात घेतलं नाहीस का आणि आपल्या मुलांचा विचार केला नाहीस का? इतका कॉलेजमधल्या मुलांसारखा तू वाहवत कसा गेलास याचे उत्तर मला तू दे .”


त्यावर रमण बराच वेळ काही बोलू शकला नाही पण मग हळूच म्हणाला,

“ मी नेहा मॅडमशी स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स ची एम्प्लाॅई म्हणूनच बोलायचो. सत्यम एडवर्टाइजमेंटकडे स्वस्तिक ट्रॅव्हल टुरिझमची नेहमीच जाहिरात करायला येत असते. नेहा मॅडम जेव्हा जॉईन झाल्या तेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो पण माझ्या लक्षात आलं बाकीच्या बायका माझ्या मागे जशा धावायच्या तशी ही बाई नाही. नेहा मॅडम मधली हुशारी त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांचा समजूतदारपणा या सगळ्या गोष्टींच्या मी मोहात पडलो. आणि नंतर तिच्याशी मी एवढा बोलायला लागलो की माझं मलाच आश्चर्य वाटलं. नेहा मॅडम किती हुशार आहे, स्मार्ट आहे आणि किती महत्त्वाकांक्षी आहे हे कळल्यावर मी आणखीन त्यांच्याकडे खेचलो गेलो. मी कधी त्यांच्यात इतका गुरफटत गेलो मलाच कळलं नाही. मी तुझी माफी मागतो .”

यावर छकु म्हणाली,

“ तू ज्या अर्थी तिच्यामध्ये इतका गुंतून गेलास आणि अर्धवट शुद्धीत जे बोललास त्यावरून माझ्या लक्षात येतेय की आपल्या दोघांमध्ये जे नवरा बायको म्हणून बॉण्डिंग होतं ते संपलय. तू दुसऱ्या स्त्रीकडे सहजपणे आकर्षित झाला आणि तिच्यामध्ये एवढा गुंतला कारण तू फ्लर्ट असल्यामुळे तुला भरकटायची पुष्कळ संधी होती. जर आपल्या जोडीदाराबरोबर आपलं जबरदस्त बंधन असेल तर ती व्यक्ती भरकट नाही पण तुझ्याबद्दल मला कधी पासूनच शंका होती. पण आज ती शंका खरी ठरली तेव्हा हरल्या सारखं वाटतंय.’

छकू कोलमडून खुर्चीवर बसली. रमणला आता वास्तवाची जाणीव झाली तरीपण नेहाची आठवण त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो रडतच छकूजवळ बसला आणि तिचे हात धरून विनवणी करू लागला,

“ मला खरंच नेहाची खूप आठवण येते. मला तिचं नसणं सहन होत नाही. माझ्या मेसेजना ती रिप्लाय देत नाही. तू सांग नं तिला रमणशी असं नको वागू म्हणून.”

रमणचं बोलणं ऐकून छकू खाडकन खुर्चीवरून उठली.

“ रमण तू वेडा झाला आहेस का? काय बोलतोय तुझं तुला तरी कळतय का? तू जिच्या प्रेमात पडला आहेस तिच्या शिवाय तू राहू शकत नाही हे मी तिला सांगावं अशी तुझी अपेक्षा आहे”

“ एकदाच. एकदाच फक्त एकदाच मला तिला भेटायचंय.’

रमण छकुला हात जोडून विनंती करत होता. रमणचा चेहरा बघून छकुच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

“ मूर्ख माणूस आहेस. आपल्याला दहावी बारावीतील मुलं आहेत हेही विसरला? असं काय आहे त्या नेहामध्ये? इतकी वर्ष तुझ्या सगळ्या माकड चेष्टा कोणी सहन केल्या मी की त्या नेहाने?

“ मी तुझी माफी मागतो पण मी खरंच नेहामध्ये गुंतलोय.”

“ त्या नेहाने इतकं तुझं डोकं पागल केलंय की तुझी सारासार विवेक बुद्धी नष्ट झाली आहे?”

रमण हमसून हमसून रडायला लागला. त्यांचं हे विचित्र आणि त्याच्या वयाला न शोभणारं वागणं बघून छकू हवालदिल झाली. त्यांचं वेळी दिशा आपल्या खोलीतून बाहेर आली. तिने रमणला रडताना बघीतलं.

“ बाबा तुम्ही रडताय? काय झालं? काही दुखतंय का?”

दिशाने रमण जवळ जाऊन विचारलं

रमण काहीच बोलला नाही. छकूच्या नजरेत तिरस्कार भरलेला होता. आईची नजर अशी का आहे हेही दिशाला कळलं नाही.

“ आई अगं काय झालं? बाबा असे का रडतात आहे? तुझा चेहरा पण रागीट दिसतोय. काय झालं नक्की सांगा दोघांपैकी कोणीतरी?”

दिशा एवढी बोलूनही दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. तेवढ्यात हर्षद तिथे आला. त्यालाही दोघांकडे बघून काही कळेना. त्याने दिशाला नजरेनेच काय झालं विचारलं. तिनेही माहीत नाही असे नजरेनेच सांगीतलं.


हर्षद आईजवळ गेला आणि तिलाही त्याने नजरेनेच रमणबद्दल विचारलं. छकू नुसतीच हर्षदकडे बघत राहिली. हर्षदला कळेना या दोघांना झालं तरी काय?


रमण हरवलेल्या दृष्टीने कुठे तरी बघत होता. छकू जळजळीत नजरेने रमणकडे बघत होती.

छकूच्या मनात प्रचंड वादळ घोंघावत होतं. एखाद्या वाईट घटनेबद्दल अंदाज लावणं आणि ती घटना प्रत्यक्षात घडणं या दोन्हीचे परीणाम वेगवेगळे होत असतात.

या निर्बुद्ध माणसाच्या या विचीत्र वागण्यामुळे सगळंच विचीत्र झालं होतं. हा माणूस त्या नेहाच्या प्रेमातून बाहेर येईल की नाही याचा छकूला काही अंदाज येत नव्हता. छकूला वाटलं आपल्या बुद्धीला टाळं लागलय त्यामुळे काही विचारच सुचत नाही.

हर्षद आणि दिशा बराच वेळ तिथे बसले. आई बाबा वेगळ्याच मनस्थितीत आहे बघितल्यावर दोघंही ऊठली आणि खोलीच्या बाहेर पडली.

खोलीच्या बाहेर आल्यावर हर्षदने विचारलं,

“ दिशा आज अचानक काय झालं? तसं तर महिन्याभरापासून बाबा काहीतरी विचीत्रच वागतात आहे.पण आज ! ”

“ हो ना रे. काय झालं आहे बाबांना तेच कळत नाही. आईपण सांगत नाही. आताही बघीतलंस नं कशी बसली आहे.”

“ नक्की काहीतरी गडबड आहे.”

“ गडबड कसली असणार?”

दिशाने काही न कळल्याने विचारलं.

“ गडबड आहे पण काय याचा अंदाज येत नाही. बाबा पूर्वी असं कधी वागले‌ नाही.”

“ होनं. माझे सगळे मित्र मैत्रिणी म्हणतात की दिशा तुझे बाबा काय मस्त डॅशींग आहेत,स्मार्ट आहे. खरच किती तरी सुट्टीत आपण किती एन्जॉय केलं.”

“ होग. पण या काही महिन्यांत बाबांना आपल्याशी बोलायला पण वेळ नसतो. कोणत्या वेगळ्याच दुनियेत वावरत आहेत असं वाटतं.”

“ तुझ्या एवढं मला नाही कळत पण आज एकदम ते बेशुद्ध का झाले कळलं नाही. बाबांना कोणता आजार पण नाही झालेला फक्त काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्याने बेशुद्ध पडण्यासारखं काय झालं?”

दिशा दहावीत आणि हर्षद बारावीत होता. ते दोघंही सतत आपला क्लास आणि अभ्यास यातच बिझी असायचे

दोघंही तसे अर्धवट वयातील होते. त्यामुळे त्यांना रमण विचीत्र वागतोय हे कळत होतं पण नेमकं कशामुळे असा वागतोय हे कळत नव्हतं. दोघंही बराच वेळ रमणच्या वागण्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होती.


छकू अजूनही संतापाच्या लाटांवरच आपला तोल सांभाळायचा प्रयत्न करत होती. ऊद्या आधी त्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये फोन करून त्या नेहा बद्दल चौकशी केली पाहिजे.आपल्या संसारावर आलेलं हे वादळ किती तीव्र आहे हे बघीतलं पाहिजे. दिशा आणि हर्षद दोन्ही मुलं आता अडनेडी वयात आहेत.

नेहाच्या आधी कोणत्या स्त्री मध्ये रमण इतका गुंतला नव्हता. अगदी काठावर सुद्धा नव्हता याची खात्री छकूला आहे म्हणूनच या नेहामध्ये रमणची गुंतवणूक काळजी करण्यासारखी आहे असं छकूला तीव्रतेने जाणवलं.

छकू एका कठोर निश्चयाने ऊठली आणि रमणकडे न बघता आपल्या पलंगावर जाऊन झोपली. छकू पलंगावर येऊन झोपली खरी पण या विचीत्र तणावपूर्ण वातावरणात तिच्या डोळ्यात झोप शिरायला तयार नव्हती. तिचे डोळे मिटले असले तरी झोपेपासून मैलभर अंतरावर होती.

नेहा या प्रश्नाचं नेमकं ऊत्तर लवकर शोधण्याची निकड आहे हे मनात घेऊन छकूला कधीतरी झोप लागली.

रमण पलंगावर झोपला पण तोही अस्वस्थ होता. नेहाच्या आठवणीने व्याकुळ झाला होता पण त्याचवेळी त्याच्या बाजूला झोपलेल्या त्याच्या आयुष्याच्या जोडीदारापासून लांब फेकल्या गेला आहे याची जाणीव अजूनही रमणला झाली नव्हती. तो नेहाच्याच विचारात गुरफटलेला होता.

उद्याची सकाळ या दोघांच्या आयुष्यात कोणता रंग घेऊन उगवणार आहे?
_________________________________
क्रमशः