mala spes habi parv 2 bhag 6 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व २ भाग ६

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व २ भाग ६

मला स्पेस हवी पर्व २ भाग ६

मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाकडे जाण्याचं निश्चित करतो. या भागात बघू काय होईल?


सकाळी उठल्यावर रमणला काहीच करायची इच्छा होत नव्हती. त्यांची तहानभूक नेहाने हिराऊन घेतली होती. त्यांच्या दोन मनामध्ये वाद सुरू झाला.त्याला दुसरं मन म्हणायला लागलं.

“घे भोग आपल्या कर्माची फळं.”

“.मी काय केलं? कोण बोलतय?”

“मी तुझं दुसरं मन. का मला ओळखलं नाही?”

“कसं वाटतंय आता तुझ्या प्रेमाला नेहा प्रतिसाद देत नाही तर?”

“वाईट वाटतंय.”

“ज्या बायकांच्या प्रेमाला तू झिडकारले त्यांनाही असच वाईट वाटलं असेल नं?”

“मी काय करू शकतो त्याला?”

“अच्छा म्हणजे तू दुसऱ्यांचं मन मोडलस त्यात तुझा दोष नाही आणि नेहाने तुझं मन मोडलं तर तुला राग येतोय.”

“मी खरंच तिच्या प्रेमात पडलोय. “

“ती कुंदन,ती तारा ,ती जया सगळ्या तुझ्या प्रेमात वेड्या होत्या तू जसा नेहाच्या प्रेमात वेडा आहेस.”

“मी म्हटलं नव्हतं त्यांना माझ्या प्रेमात पडा म्हणून.”

“नेहा काय तुला आमंत्रण. द्यायला आली होती की ये रे रमण माझ्या प्रेमात पड.”

“माझी चेष्टा नको करू. माझा जीव जायची वेळ आली आहे.”

“हो का? त्या बायकांचा पण अशीच जीव जायची वेळ आली होती. त्या ताराने तर आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला होता .आठवतंय नं ?”

“हं.”

रमणने फक्त हुंकार दिला.

“का? आता का तोंड शिवल? बोलायला हिंमत नाही होत का?”

“मी ताराला स्वच्छ शब्दांत सांगितलं होतं. माझ्या प्रेमात अडकून नकोस मी तुझ्या वर प्रेम करत नाही.”

“नेहाने पण स्वच्छ शब्दांत सांगितलं आहे मग तिचं का ऐकत नाही?”

“मी तारासारखा नाही.”

“मग कोणा सारखा आहेस?”

“तारा माझ्या जवळ असलेल्या संपत्ती वर प्रेम करायची. माझ्यावर तिचं प्रेम वगैरे काही नव्हतं.”

“हो का? तुला बोलली तारा?”

“ती कशाला बोलेल? मलाच कळलं.”

“ कसं? आणि तुझं प्रेम होतं का तारांवर?”

‘मी महागडी गिफ्ट दिली की तारा खूष असायची.नाही दिलं तर अंगाला हात लावून द्यायला टाळाटाळ करायची.”


“वा! महागडी गिफ्ट देण्याची तुझीच इच्छा होती. तारा नव्हती म्हणाली. नंतर तिला ती सवय लागली. मग जेव्हा ती गिफ्ट नाही तर मला हात लावायचा नाही असं म्हणू लागल्यावर तिचा उपभोग घेता यावा म्हणून तू तिला गिफ्ट देत गेलास यात तुझीच चुकी आहे.”

“हो मी ताराबरोबर वेळ घालवता यावा म्हणून तिला गिफ्ट द्यायचो. एक हातसे दे एक हाथ से ले हा व्यवहार होता प्रेम नव्हतं त्यात.”

“असं तू म्हणतोस. ताराला काय वाटतं हे कुठे तू बघीतलं. इतर बायकांसारखी नेहा पण आपल्याला सगळं काही समर्पित करेल असं तुला वाटलं?”

रमण काहीच बोलला नाही. तो बाल्कनीत खुर्चीवर बसला होता आणि आकाशात कुठेतरी नजर लावून बसला होता. तेवढ्यात त्याची बायको तिथे आली.

“रमण काय झालं तुम्हाला? असे काय आकाशात बघत बसले?”

रमण अजूनही तंद्रीत होता. त्या हलवत बायकोने विचारलं.

“रमण काय झालं? अंगात ताप आहे का?”

तिने अंगाला हात लावून बघीतलं. ताप नव्हता

“रमण थकवा वाटतोय का? जाऊ नका ऑफिसमध्ये रमण .”

बायकोचा चढलेला आवाज ऐकून रमण भानावर आला.

“काय ग केवढ्यांदा ओरडतेस?”

“कितीवेळ झाला मी बोलतेय तुमच्याशी. तुम्ही कुठेतरी आकाशात बघत बसलात. काय झालं?”

“चला काहीतरी बोलू नकोस. मी कशाला आकाशात बघणार आहे?”

“छान. म्हणजे मी खोटं बोलतेय. मी तुमचा फोटो काढायला हवा होता प्रूफ म्हणून. हल्ली सरळ तुम्ही करत असलेल्या गोष्टी मी केलं नाही म्हणून म्हणता.”

“कधी मी असं म्हटलंय?”

रमण मनातून घाबरला.त्याला वाटलं की आपण मनात जे बोलत होतो ते चुकून जोरात नाही नं बोललो.

त्याच्या खांद्यावर हात ठेवत हसत त्याची बायको म्हणाली

“केवढे मिनीटा मिनिटाला घाबरता ! चोरी पकडल्यावर माणूस जसा सारवासारव करतो नं तसं करताय आजकाल. काही चुकीचं वागलात का?”

रमणच्या अंगाला दरदरून घाम फुटला.चिडून म्हणाला,

“जा तिकडे काम कर. मला बरं वाटत नाही.त्रास देऊ नकोस.”

“तुमचा सकाळचा चहा राह्यला आहे. तो पुन्हा गरम करावा लागेल तो करू का असं विचारायला आले होते. करू का चहा गरम?”

“कर.”

रमणकडे त्रासिक नजरेने बघत कपाळावर हात मारून बायको खोलीबाहेर पडली.

दुसऱ्या सेकंदाला त्याला हसण्याचा आवाज आला.रमण दचकून इकडे तिकडे बघू लागला.

“अरे मीच हसतोय.तुझं दुसरं मन. इकडे तिकडे बघू नकोस. तुझ्या मनातच आवाज घुमतो आहे.”

“बसं कर आता तुझी प्रश्नावली. मला शांत बसू दे.”

“तुला आता शांतता नाही.”

“का शाप देतोस?”

“मी कशाला शाप देऊ? ज्या बायकांचं मन तू दुखावलं आहेस त्यांचा तळतळाट तुला त्रास देतोय. स्वत:ची परिस्थिती ओळखून यापुढे तरी कोणत्या स्त्री ला आपल्या राजबिंड्या रूपाने जाळ्यात ओढून तिला फसवू नकोस. तसही आता तू राजबिंडा राहिला नाहीस.”

असं म्हणून दुसरं मन हसायला लागलं.

“ऐ गप हसू नकोस. “

“हसू नको तर काय करू? उसाचे चिपाड झाला आहेस आता कोणती स्त्री तुझ्या वर भाळणार आहे हे लक्षात येताच हसू आलं.”

“मला शांत राहू दे.”

“रहा शांत. शांत राहणच आता तुला फायद्याचं आहे.त्या नेहाला मात्र त्रास देऊ नकोस.”

“मला जे करायचं ते मी करीन. तू सांगू नकोस.”

“ठीक आहे जशी तुझी इच्छा.मग म्हणू नको मला की मी तुला सांगीतलं नव्हतं म्हणून.”


खुर्चीवर मागे डोकं ठेवून हताशपणे रमणने डोळे मिटून घेतले. रमणचए डोळे घळाघळा वाहू लागले. रमणने वाहू दिले. तेवढ्यात चहा घेऊन त्याची बायको आली आणि रमणच्या डोळ्यातून पाणी ओघळताना बघून ती आश्चर्य चकित झाली. कारण ती नेहमी म्हणत असे की रमण दुस-याला रडवेल पण स्वतः नाही रडणार पण आज तिला उलटंच घडलेलं दिसलं.

डोळे ओले झाले नाही तर चक्क घळघळ वाहतात आहे.

काय करावं? काय झालं असेल? या माणसाला आयुष्यात कधी रडताना बघीतलं नाही.असं काय याच्या आयुष्यात घडलंय. मला माहित नाही असं काही आहे का? माझा नवरा फ्लर्ट आहे .बायका त्याच्या मागे धावतात, वेड्या होतात. तेव्हा हा खूप खूष असतो. आता काय झालं? हा कोणासाठी वेडा झाला आहे का? याची तब्येत इतकी का खालावली आहे?

बायकोच्या मनात असंख्य प्रश्न फिरू लागले. त्या नवरा बायको मध्ये पारदर्शक नातं नाही हे तिला माहिती आहे. म्हणून तर सत्यम ॲडव्हर्टायझिंग कंपनीचे उत्तराधिकारी म्हणून आपलंच नाव ठेवायचं हे तिने खूप कष्टाने आपल्या आईवडिलांच्या गळी उतरवलं होतं.

सगळा व्यवसाय हातात आल्यावर रमण आपल्याला त्याच्या आयुष्यातून बाहेर करू शकतो याचा ब-यापैकी अंदाज तिला होता.

रमणचं हे विषण्ण रूप ती गेल्या महिनाभरापासून बघतेय. आज जेवढे विचार तिच्या डोक्यात येतात आहे तेवढे आधी आले नाहीत. कारण आधी साधं बरं नाही असं तिला ‌वाटलं होतं. आजमात्र हे जरा वेगळं आजारपण आहे हे तिच्या लक्षात आलं.

याच्या आजारपणाचं मूळ कशात आहे? हे कसं शोधायचं? शोधलं तरी सापडेल का? माझा ऊगाच संशय आहे की ते कारण खरं आहे हे कसं कळेल?

रमण स्वैर वागणारा आहे. त्याला खूप मैत्रिणी आहेत. हे माहिती आहे. त्याने कधी सांगीतलं नाही पण तो सगळ्यांबरोबर फिजीकल झाला असावा याची शंका आपल्याला येत होती हे तिने आत्ता स्वतःशीच कबूल केलं.

आपला नवरा असं वागतो ही शंका ज्यादिवशी पहिल्यांदा आली तेव्हा आपल्याला खूपच असुरक्षित वाटलं होतं हेही तिने स्वत: शी कबूल केलं. नंतर तिच लक्ष मुलांमध्ये गुंतलं . मुलांच्या शाळा, अभ्यास,परीक्षा यामुळे ती त्याचं वागणं विसरली.

आज त्याचे पाण्याने डबडबलेले डोळे बघून तिच्या लक्षात आलं की किती महिने झाले आपण नवरा बायको या नात्याने एकमेकांच्या जवळ आलोच नाही. त्याच्या सगळ्या इच्छा बाहेर पुर्ण होतात आहे का आणि माझ्या हे कसं लक्षात आलं नाही. त्यातील कोणत्या स्त्री मध्ये हा मनाने गुंतला आहे का?

आता तिच्यावर फारच ताण आला.

तिने रमणकडे दुर्लक्ष करत त्याच्यासाठी आणलेला चहा परत घेऊन गेली. तिने तो चहा चक्क सिंक मध्ये ओतला आणि त्यावर नळ सोडून शुन्य नजरेने नळातून पडणाऱ्या पाण्याकडे बघत बसली.

“ आई काय झालं? असा नळ सोडून का उभी आहेस?

मुलीच्या आवाजाने ती भानावर आली आणि लगेच बाथरूममध्ये गेली.

आरशात स्वतःला बघून स्वतःच्या आयुष्यात झालेला गुंता कसा सोडवायचा हे आपल्याला कळत नाही याची वेदना डोळ्यातून तिने वाहू दिली.

आरसा तिच्या चेहऱ्यावर तिची वेदना चित्रीत करून दाखवत होता.

या प्रश्नाने उग्र स्वरूप घेतलं तर काय करायचं? कोणाला दोष द्यायचा? रमणला की त्या स्त्रीला? जिच्या मुळे याची अशी अवस्था झाली आहे.

मुलांकडे बघून सगळं सहन करायचं की पाळंमुळं खोदून काढायची? असं खोदकाम केलं तर आपल्या आयुष्याचं त्याचबरोबर मुलांच्या आयुष्याची पण फरफट होईल. जर शांत राहून जे जे होईल ते ते बघायचं असं ठरवलं तर काय होईल? दुसऱ्या पर्यायामध्ये मुलांच्या भावविश्वाला आणि भविष्याला धोका पोचणार नाही. रमणचं आयुष्य उध्वस्त होईल पर्यायाने आपलं आयुष्यही मातीमोल होईल.

आज रमणची अवस्था बघून तो परत धडधाकट होईल का याची शंका तिला आली आणि एक भितीची थंडगार शिरशिरी तिच्या अंगातून फिरली त्याबरोबर एक जबरदस्त हुंदका तिच्या तोंडून बाहेर पडला. डोळे भीतीने घळघळ ओघळू लागले.

आपल्या वैवाहिक जीवनाची आणि सहवासाची इतिश्री होणार आहे का? हा नको असलेला प्रश्न तिच्या मनात घुमू लागला आणि ती थकल्या अंगाने बाथरूम बाहेर येऊन आपल्या पलंगावर कोसळली. तिचे डोळे मिटले होते पण भयानक भविष्याचं चित्र तिला रडवू लागलं. डोळे पाणी गाळत होते पण तोंडातून मात्र आवाज निघत नव्हता इतकी ती घाबरली होती.

कितीतरी वेळ ती स्तब्ध होती. तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला म्हणून तो घेऊन तिची मुलगी आत आली.
“ आई … अगं काय झालं? बरं नाही का?”
तिने आईला हलवून विचारलं.

“ अगं. थोडं बरं वाटत नाही.”

“ बरं तू आराम कर. आजीचा फोन आहे काय सांगू?”

रमणची बायको काही न बोलता पडून राहिली.तिला आज कोणाशीच बोलायची इच्छा नव्हती. थोड्यावेळाने मुलगी काही न कळून फोन घेऊन खोलीबाहेर गेली.
__________________________________

क्रमशः
पुढे काय होईल या दोघांच्या आयुष्यात सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे. बघू काय होईल.