मला स्पेस हवी पर्व २ भाग ४
मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचा फोन आला त्यावर ऋषीचं बोबडं बोलणं ऐकून नेहाला रडायला आलं.आता या भागात बघू
“ हॅलो”
“बोल”
“नेहा तुझी तब्येत कशी आहे?’
“ठीक आहे. आज ऑफिस जाॅईन केलं.”
“मला त्यावेळेला सुट्टीच मिळाली नाही.”
“असूदे. तुझे बाॅस मला माहित आहे कसे आहेत. तू नको वाईट वाटून घेऊस”
“मी या शुक्रवारी रात्री ऋषीला घेऊन निघतोय.रवीवारी तिथून परत निघू.”
“हं”
“चालेल नं? ऋषी खूप आठवण काढतो आहे तुझी.”
“हं. मला पण त्याची आठवण येते. “
“मी आजच परवाचं तिकिट बुक करतोय. तुझ्या घराचा पत्ता सांग.”
“हो मी मेसेज करते. आईबाबा कसे आहेत?”
“चांगले आहेत. दोघांनाही तुझी खूप आठवण येते.”
‘त्यांना पण घेऊन ये.”
‘मी म्हटलं त्यांना तर ते म्हणाले आधी तुम्ही दोघं जा मग ऋषीच्या सुट्टीत जाऊ.”
“ठीक आहे.”
“नेहा तुझी तब्येत म्हणावी तशी सुधारलेली दिसत नाही.”
‘नाही रे मी बरी आहे आता.”
“आवाज तसा वाटत नाही. काही टेन्शन आहे का?”
सुधीरने असं विचारताच नेहाच्या मनात रमण बद्दल सांगावं असं आलं पण तिची हिम्मत झाली नाही.
“नेहा काय झालं? मी काय विचारतोय?”
“नाही रे काही टेन्शन नाही. तुम्ही या मग बोलू. आज माझा ऑफीसचा पहिलाच दिवस होता सुट्टी नंतर त्यामुळे थोडा थकवा आला आहे.”
“थकवा जायला वेळ लागेल. आराम कर. मी आणि ऋषी परवा रात्री निघू. तुझ्या घराचा पत्ता आत्ताच आठवणीने पाठव. गुड नाईट”
“हो पाठवते. गुड नाईट”.
सुधीरने फोन ठेवला. नेहा कितीतरी वेळ मोबाईल कडे बघत बसली. आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. आपण भविष्यात काय करायचं ठरवतो आणि होतं मात्र भलतंच. असं माझ्याच बाबतीत झालंय की सगळ्यांच्या बाबतीत असं घडतं. नेहा विचारात गुरफटली.
***
“सुधीर काय म्हणाली नेहा?”
सुधीरच्या आईने विचारलं
“आता ठीक आहे पण आवाज थकलेला वाटला.”
“तुम्ही जाऊन या म्हणजे नेहाला बरं वाटेल”
बाबा म्हणाले.
“हं. खरय बाबा तुम्ही म्हणताय ते. सहा महिने होत आले नेहाची भेट नाही.”
“सुधीर आता तरी तिला इकडे यावसं वाटतंय का?”
आईने विचारलं.
जरा वेळ सुधीर काहीच बोलला नाही कारण त्यालाच नेहाच्या मनाचा अंदाज नव्हता आला.
“हे बघ सुधीर आता तू जाशील तर तिला सारखं पुण्याला ये म्हणून आग्रह करण्याऐवजी तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर.”
सुधीरचे बाबा म्हणाले.
“मलासुद्धा असंच वाटतं. तिला पुण्याला चालण्याचा आग्रह करण्यासाठीच तू बंगलोरला आला आहेस असं तिला वाटायला नको. त्यापेक्षा या सहा महिन्यांत ती तिथे कशी राहिली? तिला त्रास नाही नं कसला? हे सगळं जाणून घे”
आई म्हणाली.
“सुधीर तिला सगळं विचारण्यापेक्षा तिच्या वागण्या बोलण्याचा निरीक्षण कर. नेहा इथून गेली तेव्हा तिचा जो मूड होता तो आताही तसाच आहे का ? हे ती तुझ्याशी आणि ऋषीशी बोलत असताना निरीक्षण कर.”
सुधीरला आईबाबांचं म्हणणं पटलं.
तेवढ्यात ऋषी तिथे आला आणि त्याने विचारलं,
“बाबा आपण आईतडे तधी जायचं?”
यावर हसतच सुधीरने ऋषीला जवळ घेतलं आणि म्हणाला,
“आता आपण लवकरच आईकडे जाणार आहोत पण तिथे गेल्यावर आईला त्रास द्यायचा नाही”
तेव्हा ऋषी म्हणाला
“ बिलकुल तास देणार नाही. मी आईचा शानं बाळ आहे “
यावर आई-बाबा आणि सुधीर तिघेही हसले. ऋषी लगेच खेळायला निघून गेला सुधीरची आई म्हणाली,
“ बघ हा ऋषी इतका लहान आहे त्याला किती आईची आठवण येत असेल ! किती समजूतदारपणे तो इतके महिने राहिला. आता ना सुधीर वेळ न घालवता परवा कसंही करून तुम्ही जा बर का?”
“हो आई मला तुझं म्हणणं पटलं. मला पण खरच नेहाची खूप आठवण येते पण इथून जाताना नेहाच्या वागण्यात जो बदल झाला होता तो बघून मला तिला फोन करायची सुद्धा हिम्मत होत नव्हती “
“खरंय रे शेवटी आपलं जोडीदार हाच आपला जवळचा असतो. ठीक आहे आता या दोन दिवसाच्या सुट्टीत तू फार काही तिला विचारून उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नकोस “
“नाही ग आई मला तर नेहाला कधी भेटतोय असं झालंय. कशाला तिला मी उपदेश करू ?पण काल तिचा फोनवर आवाज ऐकून मला वाटतंय की तिला खूप थकवा आहे. दोन दिवसात तिला जेवढी एनर्जी देता येईल तेवढी मी देणार आहे आणि वाटलं तर मी एक दोन दिवस सुट्टी वाढवीन सुद्धा”
“ बरोबर सुधीर अगदी बरोबर बोलतोय. गरज पडली तर सुट्टी घे कारण पुन्हा तुला कधी जायला मिळेल माहित नाही. आणि हे बघ उन्हाळ्याच्या सुट्टीत ऋषीची शाळा संपली की आम्ही जाऊ पण ऋषीला येथे ठेवून कसं जाणार ऋषीला घेऊन जाऊ आणि आम्ही तिघेही तिथे नेहा बरोबर छान राहू “
सुधीरचे बाबा म्हणाले.
‘बाबा तुम्ही नेहमीच खूप प्रॅक्टिकल विचार करता प्लस मायनस पॉईंट तुम्हाला कसे दिसतात ?”
यावर हसत सुधीर असे बाबा म्हणाले,
“काही नाही रे जेव्हा मी लहान होतो कॉलेजमध्ये तेव्हापासूनच घरातल्या बऱ्याच अडचणींना मला तोंड द्यावं लागलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने काॅलेजमध्ये असल्यापासून मी काम केलं. थोडाफार पैसा मिळवला त्याची घरात मदत झाली.”
“बाबा हे मला सगळं तुम्ही सांगितलं. मला आता आश्चर्य वाटतं इतक्या लहान वयात तुम्ही एवढी अडचणीची परिस्थिती असताना किती कष्ट केले.”
“खरं सांगू का सुधीर त्या काळात मला माझे सगळे मित्र म्हणायचे आता तर मुलांनी एन्जॉय करायचं असतं आणि तू काय असली काम करत बसतो ?”
“असे का म्हणायचे?”
सुधीरच्या स्वरात आश्चर्य होतं.
“अरे प्रत्येकाच्या घरातले संस्कार असतात. त्या संस्कारानुसार मुलं वागत असतात. माझ्या घरी माझ्या आई-वडिलांचे संस्कार वेगळे होते .मी एकुलता एक म्हणून त्यांनी मला फार जपलं नाही.लाडावलं नाही. मला सगळ्यांची सवय लावली. सगळ्या गोष्टींचा दूरवरचा विचार करण्याची सवय लागली. आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याची जाणीव करून दिली. मी जरी एकुलता एक असलो तरी आमच्या घरी सतत येणारे जाणारे असायचे. खरंतर माझे दोन्ही मोठे काका आणि दोन्ही मोठ्या आत्या या चांगल्या सुस्थितीत होत्या पण त्यांच्याकडे लोकांचं आगत स्वागत करण्याची वृत्तीच नव्हती. जी माझ्या आई बाबांमध्ये होती.”
क्षणभर थांबून सुधीरचे बाबा पुन्हा बोलू लागले.
“आई तर फारच गरीब कुटुंबातूनं आलेली होती .तिच्या घरी दोन वेळची जेवणाची भ्रांत असायची पण तिच्यामध्ये अतिथींचं मनमोकळेपणाने स्वागत करण्याची वृत्ती होती. तिच्या आणि बाबांच्या या सवयीमुळेच आणि त्यांना ते करताना मी बघितलं. ते बघत बघत मी मोठा झालो म्हणून त्या बिकट आर्थिक परिस्थितीत सुद्धा मी माझं कॉलेज, माझ्या कॉलेज मधले मित्र, सगळ्या स्पर्धा सगळं ऍडजेस्ट करून मी आई-बाबांना मदत करायचो.”
“ बाबा तुम्हाला सख्खी बहिण सख्खा भाऊ नाही तरी तुमचे चुलत भाऊ चुलत बहिणी कौतुकाने नेहमीच आपल्याकडे येत राहिले आणि येतात. मलाही कधी असं वाटलं नाही की ते माझे सखे नाहीत म्हणून.”
यावर सुधीरची आई म्हणाली,
“ सुधीर अरे वागण्या मधला फरक हा प्रत्येकाला कळत असतो. आज तू कोणाच्या घरी गेलास आणि तुला जर सन्मानाने वागवलं नाही तर तू पुन्हा त्या घरी जाशील का? माझ्या सासूबाईंमध्ये हा गुण नव्हता ते त्यांचे पुतणे असो की त्यांचा मुलगा असो त्या प्रत्येकाला समान वागणूक द्यायच्या .”
“सुधीर अरे आमच्याकडे दूध घ्यायचं ना गवळ्या कडून ते सुद्धा अगदी कमी किमतीचं आम्ही मागवायचो. जेव्हा हे सगळे पाहुणे येणार असतील ना तेव्हा त्या गवळ्याला आई सांगायची जरा काही दिवस तू दूध जास्त घाल रे बाबा पण पैसे नंतर देते. गवळी सुद्धा आईच ऐकायचा कारण त्याला आईचा स्वभाव माहिती होता त्यामुळे किराणा दुकानदार असो गवळी असो भाजीवाला असो आमच्याकडे पाहुणे आल्यानंतर कधीही कुठल्याही वस्तूंची कमतरता जाणवली नाही .सगळ्या गोष्टी मुबलक मिळत होत्या.”
“पण बाबा तुमची जर एवढी परिस्थिती खराब होती तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचे पैसे कसे देत होते?”
“ अरे पाहुणे जोपर्यंत आहे तोपर्यंत पैशाचा विषय माझे आई-बाबा काढायचे नाहीत.जे पाहिजे ते आणायचे. पाहुणे गेल्यानंतर मग मात्र माझे आई-बाबा जमाखर्चाची वही घेऊन बसायचे आणि महिन्याभरात किंवा पाहुणे आहेत त्या दिवसात दूधाचं बिल किती झालं? किराण्याचं बिल किती झालं? हे सगळं मांडून किती खर्च झालाय हे बघून मग पुढील महिन्यातचं बजेट बसवायचे.”
“ बाबा आजी काय करायची हो?”
“ अरे आईला न फार सुंदर भारत काम यायचं. तेव्हा आजूबाजूच्या बायकांना दुपारच्या फावल्या वेळात आई हे भरतकाम शिकवायची. आईला हौस नव्हती पैसे कमवायची कारण तिला ही कला शिकवताना आनंद मिळायचा. पण शेवटी कुठेतरी पैशाचा विचार करावाच लागतो ना. पैशाचा सोंग घेता येत नाही . तेव्हा अत्यंत कमी फी घेऊन ती बायकांना शिकवायची.”
“ बाबा आजी ग्रेट होती. “
“ हो. सुधीर आजी खरच ग्रेट होती.बाहेर खूप फी भरून जे शिकायला मिळत नाही ते आईकडून शिकायला मिळायचं म्हणून खूप गर्दी व्हायची. आईला क्लास साठी दुपारचे दोन तीन तास रिकामे ठेवावे लागायचे. तेव्हा मी आणि बाबांनी आईचं काम वाटून घेतलं होतं. “
“ बापरे ! बाबा तुम्ही आणि आजोबांनी आजीच्या कामाला किती आदर दिलात.”
“ सुधीर माझे बाबा म्हणायचे पुरूषांच्या प्रत्येक कामाचा आदर केल्या जातो. बाईला मात्र तेवढी किंमत दिली जात नाही. आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया.”
“ सुधीर अरे तुझे आजी आजोबा दोघंही खूप प्रगल्भ आणि पुढारलेल्या विचारसरणीचे होते. माझ्या छोट्याश्या नोकरीचा पण आजीला खूप अभिमान होता. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी पोस्टाची एजंट म्हणून घरोघरी फिरू शकत असे.”
“ आई तू कशी फिरायची? रिक्षाने?”
सुधीरने विचारलं.
“ नाहीरे बाबा. रोज रिक्षा कशी परवडणार?
“ मग कशी जायची पायी?”
सुधीरने विचारलं.
“ अरे तुझी आई लाडकी सून होती माझ्या आईबाबांची. माझ्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला सायकल भेट दिली म्हणाले आता तू छान काम कर.आता तुझी धावपळ कमी होईल.”
“ सासरे एवढे सपोर्टीव्ह असणं खूप कमी दिसतं.”
“ खरय. हिला सायकल घेऊन दिली आणि मला म्हणाले तू सुद्धा तुझ्या सुनेच्या पाठीशी असाच उभा रहा. मुली आपलं माहेर सोडून येतात. मुलगा त्याच्या नातेवाईकांच्या घोळक्यात असतो. मुलींना सास-यांकडून वडलांसारखा पाठींबा हवा असतो. तो देण्याचा मी प्रयत्न करतोय. तूसुद्धा असाच वाग.”
“ आजोबा एवढे स्पष्ट विचारांचे होते?”
“ फक्त आजोबा नाही आजीसुद्धा. तुझा जन्म झाला तेव्हा आईंनी मला स्पष्ट सांगितलं की आईकडून घरी आलीस की तुझी जबाबदारी आम्हा तिघांची. इथे जसा आराम करतेय तसाच आराम घरी पण करायचा. सहा महिने झाले की मग काम कर. सुधीर त्या फक्त बोलल्या नाहीत हे तिघं त्या म्हणाल्या तसेच वागले. माहेरी मिळाला नाही एवढा आराम मला इथे मिळाला.”
“ आजी आजोबांचा सहवास मला जास्त मिळाला. प्रियंकाला नाही मिळाला. आई प्रियंका केवढी होती जेव्हा हे दोघं गेले?”
सुधीरने प्रियंकाच्या उल्लेख करताच आईबाबा एकदम गप्प झाले. सुधीरला आपली चूक लक्षात आली.
“ साॅरी “ सुधीर म्हणाला.
“ साॅरी कसला म्हणतोस? इतकी वर्षे झाली प्रियंकाला जाऊन तरी तिचं नाव निघालं की जखमेवरची खपली निघते आणि मन रक्तबंबाळ होतं.”
सुधीरने काही न बोलता आईच्या हातावर हात ठेवला.
तिघही मौनाच्या प्रदेशात बुडून गेले.
________________________________
क्रमशः