मला स्पेस हवी पर्व २ भाग १
मागील भागावरून पुढे…
मला स्पेस हवी या कथा मालिकेच्या मागच्या पर्वातील अंतिम भागात आपण बघीतलं की नेहा आजारी असते. तेव्हाच रमण तिच्या घरी आलेला असतो आणि तिच्यावर आपलं प्रेम आहे असं सांगतो त्याच्या अचानक या बोलण्याने नेहा गांगरते आणि तिचा त्रास आणखीनच वाढतो इथेच या कथा मालिकेचं हे पर्व संपलं होतं. आता या पुढल्या पर्वत काय होतं ते आता आपण बघूया
मला स्पेस हवी पर्व २ भाग १
नेहा आज खूप दिवसांनी ऑफिसला जॉईन झाली. आजारपणामुळे तिचा चेहरा कोमेजला होता. तिचं स्वागत करण्यासाठी अपर्णा आणि अनुराधा तिच्या केबिनमध्ये आल्या. अपर्णाच्या हातात फुलांचा गुच्छ होता. अपर्णांनी तो गुच्छ नेहाला देऊन,
‘ मॅडम वेलकम “
असं म्हटलं. अनुराधा ने खूप छान स्वीट आणलं होतं ते नेहाला दिलं आणि म्हणाली,
“मॅडम वेलकम.
दोघींच्या या स्वागतामुळे नेहा खूप भावना विवश झाली आणि उत्तेजितही झाली. ती म्हणाली,
“ बसा”
दोघीजणी तिच्या समोरच्या खुर्च्यांमध्ये बसल्या. नेहा म्हणाली,
“अपर्णा, अनुराधा तुम्हाला खूप धन्यवाद कारण तुम्ही जर एवढं लक्ष देऊन माझी काळजी घेतली नसती तर मी आज इथे आले असते की नाही कुणास ठाऊक? कारण मी एकटीच असते इथे. मी कसं लक्ष देणार होती स्वतःकडे ?”
यावर अपर्णा म्हणाली ,
“मॅडम तुम्ही आता बऱ्या झाला आहात ना त्यामुळे आता फार विचार करू नका. आता आपल्या कामावर आपण फोकस करायला हवं.”
नेहा म्हणाली,
“ नक्कीच आपण आता उरलेलं आपलं काम करूया. मी कितीतरी दिवस जवळपास वीस पंचवीस दिवस मी ऑफिसला नव्हते. त्या काळात काय काम थकली आहेत ती बघायला हवीत.”
अनुराधा यावर म्हणाली,
“ मॅडम हे सगळं होत राहील पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरी आम्ही दोघेही येऊन राहिलो त्यामध्ये काहीतरी निश्चितच परमेश्वराची योजना असेल. वाचनाच्या आधारे मला लक्षात आलंय आता की जे काही असतं ते सगळं मागच्या जन्मीचे ऋणानुबंध असतात. नाहीतर आपण कशाला दोघी भेटलो असतो? आम्ही दोघी कशाला तुमच्याकडे येऊन राहिलो असतो? आम्हालाही आमचं संसार आहे की पण तुमच्याकडे यावसं वाटलं कारण तुमच्याशी आमचा जो सहवास आहे तो मागच्या जन्मी अर्धवटच राहिला असावा म्हणून या जन्मात तो पूर्ण झाला.”
“ बापरे अनुराधा तू किती विचार करतेस? तुझं वाचन खूप आहे मला माहिती आहे पण तू एवढं विचार करतेस हे माहिती नव्हतं.”
नेहा म्हणाली. यावर अनुराधा म्हणाली,
“ मॅडम हे सगळं माझ्या वाचनातूनच मला कळलं. पण त्या पंधरा-वीस दिवसात तुमचा स्वभाव पूर्णपणे आम्हाला कळला तुम्ही ऑफिसमध्ये जितक्या कडक असता तेवढ्याच घरी खूप मऊ असता प्रेमळ असता. आम्हाला एक छान मैत्रीण मिळाली याचा आम्हाला आनंद झाला म्हणून अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आम्हाला अहो जाऊ न करता नावाने हाक मारा.”
अनुराधाच्या या म्हणण्यावर अपर्णा लगेच म्हणाली,
“ हो मॅडम तुम्ही खरंच आम्हाला नावाने हाक मारा ते अहो जाहो ऐकता ऐकता खूपच आम्हाला अवघडल्यासारखं होतं.”
यावर नेहा हसली म्हणाली,
“ हे बघा जरी मी तुमची ऑफिसमध्ये बॉस असले तरी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे. तुम्ही माझ्यापेक्षा निदान पाच वर्षांनी तरी मोठ्या आहात मग तुम्हाला मी अरे तुरे कसं करायचं?”
“मॅडम पाच वर्ष म्हणजे काही फार नाही. तुम्ही आम्हाला नावाने हाक मारा. तुम्ही नावाने हाक मारलं तर आम्हाला असं वाटेल आमची मैत्रीणच आहे. पंण आम्ही ऑफिसमध्ये तुम्हाला मॅडमच म्हणणार.”
यावर नेहा म्हणाली,
“ ठीक आहे मी तुम्हाला नावाने हाक मारेन पण मग तुम्ही पण मला नावाने हाक मारा कारण मी तर लहानच आहे तुमच्यापेक्षा.”
तर यावर अनुराधा म्हणाली,
“ मॅडम ऑफिस मध्ये तर आम्ही मॅडम म्हणणार एरवी आपण तिघीच असताना आम्ही तुम्हाला नावाने हाक मारू चालेल?”
“चालेल.”
नेहा म्हणाली .नेहा यानंतर म्हणाली ,
“हे बघा अपर्णा, अनुराधा आता वीस पंचवीस दिवस मी नव्हते म्हणजे आपलं बरंच काम थकलं असेल. मी आजारी पडायच्या आधी एक जाहिरातीचं स्क्रीप्ट तयार झालं होतं आणि मला ते आवडलं होतं. त्याच्यावरची जाहिरात शूट होणार होती. ती झाली का?”
“हो मॅडम ते जाहिरात शूट झाली मी तुम्हाला सांगितलं ही होतं पण तुम्ही विसरला असाल .”
अपर्णा म्हणाली.
“ठीक आहे पण नंतरच्या विषयावर स्क्रिप्ट तयार झालं की नाही? “
अनुराधा म्हणाली,
“ मॅडम नाही झालं ते अजून. त्या मॅडमना आम्ही काहीच सांगितलं नाही कारण तुम्हीच तेव्हा आजारी पडल्यामुळे ताम्हाणे सरांनी सांगितलं होतं की जरा थोडे दिवस जाऊ द्या. नेहा मॅडम ऑफीसला आल्या की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम करू.”
“हो का बर ठीक आहे. आता कुठल्या विषयावर जाहिरात तयार करायची राहिली आहे? राजेश सरांनी पुढचे काही टूर प्लॅन केले आहेत का? “
“ बहुदा नाही. मीपण तुमच्याकडे असल्याने राजेश सरांशी बोलणं झालं नाही.”
अपर्णा म्हणाली.
अपर्णा नेहा आणि अनुराधा बोलत असताना अचानक केबिनमध्ये कोणीतरी प्रवेश केला. नेहाच्या समोर केबिनचे दार असल्यामुळे तिला कोण आलंय केबिनमध्ये ते दिसलं आणि ती थक्क झाली. ती काही बोलूच शकली नाही. कारण केबिनमध्ये शिरलेला माणूस हा रमण होता.
रमण अचानक असा ऑफिसमध्ये आल्यामुळे नेहा गडबडली. कारण नेहाला रमणच्या मनात काय आहे हे कळलेलं असल्यामुळे ती या सगळ्यापासून जरा स्वतःला लांब ठेवायचा प्रयत्न करत होती. नेहाच्या डोळ्यात आश्चर्य दिसल्यामुळे अपर्णा आणि अनुराधा दोघींनी मागे वळून बघितलं
त्यांना रमण दिसल्याबरोबर दोघीही चमकल्या. अपर्णा अनुराधा लगेच उठल्या आणि म्हणाल्या
“मॅडम आम्ही नंतर येतो.”
असं म्हणून दोघीही आपल्या फाईल घेऊन बाहेर पडल्या. रमण नेहाकडे टक लावून बघत होता आणि समोर येऊन खुर्चीत बसत म्हणाला,
“कशी आहेस ? तुला खूप भेटायची इच्छा होत होती पण तुझ्या घरी यावं की नाही याचा विचार करत होतो. आज तू ऑफिस जाॅईन करणार आहे हे कळल्यावर मी लगेच आलो. तुला बघीतलं मनाला खूप बरं वाटलं.”
रमणने भलामोठा संवाद म्हटला.तो बोलत असताना नेहाच्या लक्षात आलं की रमण जेव्हा नेहाच्या घरी आला होता तेव्हा त्याची तब्येत खूपच खराब झालेली दिसत होती. आता जरा बरी दिसत होती पण नेहा ऑफिसला जॉईन झाल्यानंतर रमण जसा दिसायचा तसा मात्र आता दिसत नव्हता.
नेहाला काय बोलावं कळत नव्हतं तरी ती बोलली,
“ रमण सर तुमची तब्येत अजूनही का सुधारले नाही? तुम्ही व्यवस्थित औषध घेत नाहीत का? डायट घेत नाहीत का?”
यावर रमण म्हणाला,
“ सगळं व्यवस्थित औषध घेणं चाललय. डायट प्रमाणे जेवण चाललंय पण मला झोप येत नाही.”
“ का झोप येत नाही सर तुम्हाला ?ते तुम्ही सांगितलं का डॉक्टरांना ?”
“नेहा मला झोप येत नाही कारण माझी झोप तू हिरावली आहेस .”
रमणच्या या बोलण्याने नेहा एकदमच स्तब्ध झाली. आणि रमण आता एकेरी संबोधन करत होता. त्यामुळे तिला कळेना आता काय करावं? तरीही ती बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाली,
“ सर मी काय केलं? तुमची झोप मी कशी हिराऊन घेणार?”
“मला झोप कशी येणार? तू स्वप्नात येतेस ना आणि स्वप्नात येऊन मला जागवतेस. माझ्याशी गोड बोलतेस. माझ्याबरोबर हवं तेवढा वेळ घालवतेस मग मी झोपणार कसा? मला झोप येतच नाही कारण तू बरोबर असताना मी झोपू कसा? हे बरोबर नाही ना म्हणून माझी झोप होत नाही.”
रमणच्या चेहऱ्यावर हे बोलताना एक वेगळंच भाव दिसत होता. जो भाव एखाद्या प्रियकराच्या चेहऱ्यावर आपल्या प्रेयसीला खूप दिवसांनी बघितल्यावरचे जे भाव येतात तसे भाव होते. नेहा अजूनही गोंधळलेलीच होती तिला समजत नव्हतं रमणला याच्यातून बाहेर कसं काढावं?
नेहा म्हणाली,
‘ सर तुम्ही माझा फार विचार करू नका म्हणजे तुम्हाला झोप लागेल. कारण तुम्ही माझ्या मध्ये गुंतले आहात हे बरोबर नाही.”
यावर ताडकन रमण म्हणाला,
“ बरोबर नाही म्हणजे ? मनाला कुठे कळतंय बरोबर काय चूक काय ? त्याला जे जसं वागायचं तसच तो वागतो. तुझ्यात त्याला गुंतायचं होतं तो गुंतला आणि आता त्याला तुझी आठवण येते. ती त्याला येतच राहणार.”
नेहाला आता काही कळत नव्हतं की रमणला काय सांगावं. कोणत्या भाषेत सांगावं. सगळ्यावर त्याचं उत्तर तयार होतं. नेहाच्या आता लक्षात आलं की तो तिच्या मध्ये खूप गुंतलाय. तो तिच्यासाठी वेडा झालेला आहे. पण हे योग्य नाही हे नेहाला कळत होतं. कारण नेहा अशा विचारांची नव्हती की लगेच एखादा सुंदर राजबिंडा पुरुष दिसला की त्याच्यामध्ये गुंतून जावं. नेहाची विचारसरणी खूप वेगळी होती ती स्थिर स्वभावाची होती त्याच्यामुळे तिला रमणला या स्थितीतून बाहेर काढायला हवे एवढंच सुचत होतं. कसं ते कळत नव्हतं आणि रमण ऐकायला तयार नव्हता. रमण तिला म्हणाला,
‘ नेहा मला माहितीये मी तुझ्यात गुंतलो हे तुला पटत नाहीये. कारण आज पर्यंतच माझं आयुष्य तुला कळलंच असेल. ब-याच बायका तुझ्या पूर्वी माझ्या आयुष्यात आल्या. पण त्या स्वतःहून आल्या मी कोणाशीही ओळख करायला गेलो नव्हतो. त्या माझ्या रूपावर, माझ्या बोलण्यावर, माझ्या बिजनेस वर माझ्या श्रीमंत असण्यावर भाळल्या होत्या. त्या माझ्याशी नुसत्या बोलायच्या नाही तर त्या माझ्यात गुंतून जायच्या आणि गुंतल्यावर त्या स्वतःहून स्वतःला मला समर्पण करायच्या. मी कधीही कुठल्याही स्त्रीकडून फिजिकल रिलेशन मागितलं नाही किंवा अपेक्षितही केलं नाही. पण त्या स्वतःहून सगळ द्यायच्या मग मीही थोडा तसा चंचल होतोच.
कुठलाही पुरुष होणारच. मी पण झालो मी कशाला नाही म्हणतोय ? पण माझ्या बायकोला हे सगळं कळणार नाही आणि माझ्या कुटुंबाला याचा धक्का बसणार नाही याची मात्र मी काळजी घेतली. त्या स्त्रियांनीही कधीही उघडपणे समाजासमोर माझ्या या गोष्टीचा उल्लेख केला नाही कारण त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता त्यांनी जर सगळे सांगितलं असतं तर त्यांचं आयुष्य बरबाद झालं असतं त्यामुळे त्या गप्प बसल्या. मी ही गप्प बसलो पण या सगळ्या बायकांच्या तुलनेमध्ये तू खूप वेगळी निघालीस. तुझ्या डोळ्यात माझ्या राजबिंड्या रुपाला पाहून त्या स्त्रियांच्या डोळ्यांत मला जसे भाव दिसायचे तसे भाव कधीच दिसले नाही आणि म्हणून मला एक वेगळं चॅलेंज वाटलं.
ते चॅलेंज स्वीकारून मी तुला माझ्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करत होतो पण नंतर लक्षात आलं की तू तशी नाहीस त्याच्यामुळे तू माझ्या राजा बिंड्या रुपाला पाहून माझ्याशी बोलत नाही. तू फक्त काम बघतेस आणि कामाचाच विचार करतेस. तेव्हा मला तुझ्या क्रिएटिव्ह आयडियाज कळायला लागल्या. तुझी हुशारी कळायला लागली आणि मग मी माझ्या नकळत तुझ्या प्रेमात पडलो. आता सांग मी काय करू? मी स्वतःहून हे काहीच केलं नाही हे घडलंय आणि हे घडण्यासाठी तू जबाबदार आहेस. आता तू सांग मी काय करू? “
एवढं लांबलचक बोलून रमण थांबला. त्याला खूप धाप लागलेली होती. नेहाने तिच्या समोर असलेला पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर केला. त्याच्याकडे बघून नेहाला वाटलं की या प्रेम वेड्या मजनूचं काय करावं आता ? नेहा चांगलीच बुचकळ्यात पडली.
बराच वेळ नेहाला काही बोलता आलं नाही कारण रमणला कसं समजवावं ? कोणत्या शब्दातून समजवावं? हेच तिला कळत नव्हतं. तिला शब्द सापडत नव्हते. त्यामुळे ती खाली मान घालून नुसता विचार करत बसली. विचार करून करून तिलाही दमल्यासारखं झाल.
रमण मात्र तिच्याकडे टक लावून बघत होता. रमणला ती बोलत नाही याहीपेक्षा ती त्याच्याकडे बघत नाही याचं वाईट वाटलं होतं. तो म्हणाला,
“ नेहा माझ्याकडे बघ. काय होतंय तुला ? मी हे जे बोललो त्याचि तुला त्रास होतोय का ? मी बोलणार नव्हतो पण तू कधी माझ्याशी बोलशील? तुझ्या बोलण्यातून, तुझ्या वागण्यातून, माझ्याबद्दल प्रेम दिसत नाही फक्त काम दिसतं. तू कधी अशी वागशील ज्याच्यातून मला दिसेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे?”
हे रमण बोलताच नेहा ताडकन बोलली
“रमण तुम्ही माझ्यात गुंतला म्हणून मी तुमच्यात लगेच गुंतावं ही तुम्ही अपेक्षा कशी काय करता? ही अशी जबरदस्ती कशी काय करू शकता? हा मनाचा प्रश्न आहे तुम्हीच म्हणता ना? मग माझं मन याला मानत नाही. मी तुमच्यात गुंतलेले नाही. इथे जे आपलं रिलेशन आहे ते तुम्ही ॲडव्हर्टायझिंग कंपनीचे क्रिएटिव्ह हेड आहात आणि मी ट्रॅव्हल कंपनीची एडवर्टाइजमेंट आणि प्लॅनिंग डिपार्टमेंटची हेड आहे. या पोस्टमुळे मी तुमच्या कंपनीकडे एडवर्टाइजमेंट साठी आले त्याच्या पलीकडे माझ्या मनात कुठलाही हेतू नव्हता. त्यामुळे सॉरी मला माफ करा पण तुम्ही या सगळ्यातून बाहेर काढा स्वतःला एवढेच मी तुम्हाला सांगेन.”
नेहाने अत्यंत ठामपणे त्याला सांगितलं आणि तेही त्याच्याकडे बघत सांगितलं. रमणला वाईट वाटलं पण तो म्हणाला
“ नेहा माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे. तू माझ्याशी कशीही बोललीस आणि माझ्याशी कितीही कठोरपणे वागलीस तरी मी याच पद्धतीने तुझ्याशी बोलणार. पुढची जाहिरात कधी शूट करायला येते ते सांग तशाप्रमाणे आपण पुढे बोलू.”
रमण अचानक वेगळं बोलून गेला त्यामुळे नेहा चमकली. नेहाच्या लक्षात आलं की तो खरोखरच आपल्यात गुंतलाय. त्याच्या बोलण्यामध्ये कुठलाही मानभावी पणा तिला आढळला नाही. माणसाचे डोळे कधी खोटं बोलत नाही. जर त्याचा अभ्यास नीट केला तर आपण समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकतो हे नेहाला माहिती होतं.
“ रमण सर मी आजच ऑफीसला जाॅईन झाले आहे. तुमचं बोलणं ऐकून माझं डोकं दुखायला लागलं आहे. प्लीज तुम्ही जा. “
रमणकडे बघून बोलताना नेहाने नजरेत ठामपणा आणला. रमण अतिशय थकल्या अंगाने खुर्चीवरून उठला आणि धिम्या गतीने नेहाच्या केबीबाहेर पडला.
परत आत येऊन रमण म्हणाला,
“ नेहा माझ्या बद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. तू माझ्या अंगावर ओरड, मला वाट्टेल तसं बोल. मी ऐकून घेईन. मला राग येणार नाही. पण माझ्याशी मैत्री तोडू नकोस. “
रमणचा आवाज ऐकून नेहाने चमकून टेबलावर ठेवलेलं डोकं वर केलं. रमणचा चेहरा दुःखाने विदीर्ण झाला होता.
“ रमण सर मी का म्हणून तुम्हाला वाट्टेल तसं बोलू? का तुमच्या वर रागाऊ? आपलं काहीच नातं नाही. तुम्ही प्लीज जा.”
नेहाने हात जोडून म्हटलं. नेहाला हात जोडलेलं बघितल्यावर रमण तत्क्षणी समोर झाला आणि नेहाचे जोडलेले हात खाली करून म्हणाला,
“ नेहा असे हात नकोस जोडू माझ्यासमोर. मी जातो. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस.”
ताबडतोब रमण नेहाच्या केबीनबाहेर पडला. नेहा रमणचं हे रूप बघून घाबरली. तिने अति थकव्यामुळे खुर्चीवर मागे डोके टेकवून डोळे मिटून बसली.
मनात नेहा घाबरली होती.
रमणला नेहाच्या केबीबाहेर पडताना बघून अपर्णाने लगेच कॅंटीनमध्ये फोन करून नेहासाठी चहा सांगितला.
नेहाच्या डोक्यात विचारांचं तांडव सुरू झालं होतं. त्याचा ताण नेहाला सहन होईना तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागलं.
नेहा बंगलोरला आली ती तिला स्पेस हवी होती म्हणून पण या स्पेस मध्ये हा रमण कसा काय आला याचं तिला अजून उत्तर सापडत नाही हे तिला कळत होतं पण नेहा त्याच्यात गुंतलेली नव्हती आता या प्रसंगाला कसं तोंड द्यावं आणि याच्यातून आपण बाहेर कसं पडावं हे नेहाला कळत नव्हतं.
________________________________
क्रमशः