Blackmail in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | ब्लॅकमेल - प्रकरण 9

Featured Books
Categories
Share

ब्लॅकमेल - प्रकरण 9

प्रकरण ९
दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर पाणिनीने सौंम्याला देवनार मधे काय काय घडलं ते सर्व सांगितलं.म्हणजे अगदी प्रचिती विमानात आलीच नाही त्या क्षणापासून सर्व.
“ सौंम्या, मला सर्वात धक्कादायक होतं ते म्हणजे,मी धारवाडकर ना भेटून निघताना कंपनीतल्या एका स्टेनोग्राफर मला उद्देशून ही चिट्ठी लिहून ठेवली होती आणि मोठ्या शिताफीने कोणाच्याही नकळत मला दिली.” पाणिनी म्हणाला आणि त्याने ती सौंम्याला दाखवली. तिने ती वाचली.
“ तुम्हाला कंपनीकडून काही वस्तू खरेदी साठी ऑफर नाही का दिली गेली? डिस्काऊंट देऊन?” –सौंम्या.
“ नाही.ते फक्त घाऊक स्वरूपातच विक्री करतात सौंम्या.मला फार उत्सुकता आहे हे लोक खरेदी आणि विक्री कुठून करतात याची. त्या आधी मला कनक कडून, समिधा कडून काय अद्ययावत बातमी आहे ते जाणून घ्यायचय. तुला सांगतो सौंम्या, या सगळ्या रोख रकमेतील तुटी बद्दल शाल्व फारच किरकोळीत घेतोय सगळच. म्हणजे वीस लाख रोकड कमी आहे असं आपल्याला जे कळल होतं,त्यातली दहा लाख तर त्यानेच नेली होती.ती त्याने परत आणून दिली.माझा अंदाज आहे की त्यांच्या व्यवहारात काहीतरी गडबड आहे की ते हा विषय कोर्टात जाऊ देणार नाहीत.आयकर किंवा कस्टम ड्यूटी चुकवण्यासाठी ते मोठा लोचा करत असावेत.” पाणिनी म्हणाला
“ स्मगलिंग करतात ते ?” –सौंम्या
“ ते ज्या लोकांशी व्यवहार करतात ते लोक स्मगलिंग मधे गुंतलेले असावेत.सौंम्या, प्रचिती च्या भावाचे क्रिया कर्म आहे आज.कदाचित प्रचिती त्यानंतर आपल्याला संपर्क करेल किंवा आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही.शाल्व त्या विधीला हजर राहील आणि तिला सांगेल की हा अपहार झाला हा निव्वळ गैरसमज होता.अरे हो, सौंम्या. प्रचिती ने बँकेतून तिच्या नावाने ड्राफ्ट काढून आणलाय पाच लाखाचा.” पाणिनी म्हणाला आणि त्याने सौंम्याच्या हातात ड्राफ्ट दिला.
“ मी आता निघतो, कनक कडे. काही अर्जंट असेल तर मला कळव.” पाणिनी म्हणाला पाचव्या मिनिटाला कनक ओजस समोर होता. त्याने त्याला मागील दोन दिवसातील सर्व घटना सांगितल्या.
“ मला वाटतंय कनक प्रचिती ने माझ्या बरोबर विमानाने देवनारला येणे टाळले असावे.ती काहीही खुलासा देत असली तरी तो मानायला मन तयार होतं नाहीये.”
“ तुझ्या मनात काय आहे पाणिनी?”
“ आपण प्रचिती ची डुप्लीकेट म्हणून हॉटेलात बसवलेली तुझी गुप्तहेर मुलगी.”
“ तिचं काय पाणिनी?”
“ तिला आपण हॉटेलातून बाहेर काढू आणि काही काळ काही न करता फक्त काय घडतंय त्यावर नजर ठेऊ.” पाणिनी म्हणाला कनक ने हॉटेल डेल्मन ला फोन लावला आणि रूम नंबर ७६७ मागितला.फोन जोडला जाताच तो म्हणाला, “ समिधा, काम झालंय आता आपलं.तू तुझं सामान भर आणि हॉटेल सोडून ये.... काय? खरंच खात्री आहे तुझी?.... थांब जरा एक मिनिट.” कनक म्हणाला आणि पाणिनीकडे म्हणाला, “ तिचं म्हणण आहे घटना घडायला लागल्या आहेत. ती नाश्ता करायला बाहेर गेली तेव्हा एक माणूस तिच्या मागावर होता असा संशय आहे. तिला वाटतंय की सातव्या मजल्याच्या टोकाशी एक माणूस लिफ्ट कडे आल्या गेलेल्यांवर नजर ठेऊन आहे.”
“ कनक. तिला म्हणावं,आम्ही लगेच येतोय तिथे.”- पाणिनी म्हणाला
“ अरे मला इथून कसं येत येईल लगेच? मी माझा माणूस पाठवतो ”
“ ठीक आहे, मी एकटाच हाताळतो हा विषय.विवस्वान ने त्याचा माणूस ७६७ रूम वर नजर ठेवण्यासाठी नेमला असेल तर तर तो निघून कसा जाईल हे बघायला मला आवडेलच.” पाणिनी म्हणाला
“ बेताने आणि काळजीपूर्वक हाताळ रे बाबा हे प्रकरण. अशी माणस कधी कधी क्रूर असतात.” कनक त्याला सावध करत म्हणाला.
“ मी स्वत: ‘अक्रूर’ नाहीये.” पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडला.जाता जाता कनक च्या रिसेप्शानिस्ट ला म्हणाला, “ सौंम्या ला निरोप दे प्लीज की मी एका मोहिमेवर निघालोय इथूनच, तासभर तरी येणार नाही.” पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडून त्याने सरळ हॉटेल डेल्मन चा रस्ता पकडला.हॉटेलात आल्यावर सरळ रूम नं ७६७ च्या दरवाज्याची बेल वाजवाण्यापूर्वी त्याने इकडे तिकडे नजर टाकली. लॉबीच्या टोकाला हातौडी आणि दुरुस्तीची इतर अवजारं हातात घेऊन बसलेल्या एका माणसा व्यतिरिक्त तिथे कोणी नव्हतं. त्याने रूम ची बेल वाजवली. “प्रचिती” बाहेरून त्याने हाक मारली. समिधा ने दार उघडलं त्याला आत घेतांनाच ती म्हणाली, “ या आत पटवर्धन सर, आणि मला पुन्हा अशा प्रकारच काम मला देऊ नका.”
“ का? कुणीतरी सतत तुझ्या मागावर आहे म्हणून म्हणत्येस? ” पाणिनीने विचारलं.
“ उलट आहे सर.काहीच घडत नाहीये म्हणून मी कंटाळून गेल्ये.वर्षभराची झोप मी गेल्या काही तासात काढल्ये. टी.व्ही.वर सुद्धा बघायला काही नाही. तरी रिसेप्शन ला सांगून मी अर्धा पाऊण तास बाहेर फिरून आले. ” समिधा म्हणाली.
“ आतापर्यंत काही घडलं नसलं तरी अशा प्रकरणात........” पाणिनी बोलत असतांनाच दाराची बेल वाजली. पाणिनीने तिला दार उघडायची खूण केली.तिने दरवाजा उघडला. दारात दोन माणसे होती.ते वाटत होते ते पोलीस पण आधी आलेले नव्हते. ही माणसे वेगळी होती.
त्या पैकी एकाने एक क्रेडीट कार्ड समिधापुढे धरलं.आणि विचारलं, “ हे तुझं कार्ड आहे? हरवलं होतं का?”
तेवढ्यात दुसऱ्याला पाणिनीदिसला त्याने विचारलं, “ हा तुझा मित्र कोण आहे? ”
“ एका वेळी एकाने प्रश्न विचारा. बोला, कोण आधी बोलणारे? ” समिधा म्हणाली.
“ तुम्ही कोण आहात?” त्यातील एकाने विचारलं.
“ हे क्रेडीट कार्ड तुझं आहे?” दुसऱ्याने पुन्हा विचारलं.
समिधा ने पाणिनीकडे पाहिलं, “ प्रचिती पारसनीस च्या नावाने बँकेने इश्यू केलेलं क्रेडीट कार्ड आहे हे.” ती म्हणाली.
“ ते समजतंय आम्हाला सुद्धा.प्रश्न हा आहे की हे तुझं आहे का?”
समिधा बोलायला जाणार तेवढ्यात पाणिनी पटकन म्हणाला, “ उत्तर देऊ नकोस ”
“ तुला विचारलंय मी? ” एक पोलीस म्हणाला. “ मधेच नाक खुपसू नकोस.”
“ थांब,थांब विशू, मी ओळखलं याला अत्ता.हा पाणिनी पटवर्धन आहे.अॅडव्होकेट.” दुसरा पोलीस विशू नावाच्या पोलिसाला म्हणाला.
“ तुम्ही काय करताय इथे?” विशू ने पाणिनीला विचारलं.
“ तुम्ही काय करताय इथे?” पाणिनीने प्रतिप्रश्न केला.
“ आमच्याकडे प्रचिती पारसनीस च्या नावाने इश्यू झालेलं क्रेडीट कार्ड आहे, आम्हाला हे जाणून घ्यायचय की ते हिचे आहे का?”
पाणिनीने क्षणभर विचार केला, आणि म्हणाला,“ तम्ही गुन्ह्याचा तपास करत असाल आणि हिच्यावर संशय असेल तर तिला तिच्या कायदेशीर हक्काची जाणीव तुम्ही करून द्यायला हवी प्रथम. ”
त्या पोलिसाने आपल्या खिशातून चामडी पाकीट काढलं,त्यात त्याच आय कार्ड होतं ते पाणिनीला दाखवलं.
“आम्ही पोलीस आहोत साध्या वेषातले. उत्तरं न देता गप्प बसायचा हक्क तुम्हाला आहे, तसच तुम्हाला वकील नेमायचा असेल तर तो ही नेमू शकता किंवा त्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही सुद्धा तुमच्यासाठी ते करू.पण आमच्या प्रश्नाला उत्तरं दिलंत तर त्याचा वापर आम्ही तुमच्या विरुद्ध करू शकतो हे लक्षात ठेवा. तर आता सांगा, वकील नेमायचा आहे तुम्हाला?”
“ मी तिचा वकील आहे.आता मला सांगा तिच्यावर कुठल्या गुन्ह्याचा आरोप ठेवलाय तुम्ही?” पाणिनीने विचारलं.
“ अजून कुठला आरोप ठेवला नाहीये.आम्ही विवस्वान वाटीकर नावाच्या माणसाच्या खुनाचा तपास करतोय.तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही इथे येऊन पोचलोय.आता सांग मला तू बोलणार आहेस की नाही? ”
“ मला विचार करु दे जरा.” पाणिनी म्हणाला
“ जे काही करायचंय ते पटापट कर.इथे अत्ता आम्ही लगेच कुणाला कशात अडकवायला आलो नाही.पण तिचं क्रेडीट कार्ड खून झालेल्या माणसा शेजारी कसं सापडलं याचा खुलासा ही बया करत नाही तो पर्यंत ती अडचणीत राहणारच.तिला काय सांगायचं असेल ते आम्ही शांतपणे ऐकून घ्यायला तयार आहोत.त्या नंतर तिने दिलेल्या माहितीची शहानिशा आम्ही करू. ” एक पोलीस म्हणाला.
“ नक्की कधी खून झाला या विवस्वान चा?” पाणिनीने विचारलं.
“ प्रश्न तूच आम्हाला विचारायला लागलास की! आम्ही तुला विचारायच्या ऐवजी. पटापट बोला तुम्ही दोघे.”
“ तुम्हाला पटापट बोलायला हवं असेल तर आम्हाला विचारायच्या ऐवजी या खोली बाहेरच्या लॉबीत हातात हातौडी घेऊन बसलेल्या माणसाला विचारा की तो काय करतोय तिथे.” पाणिनी म्हणाला
“ तो आमचाच माणूस आहे.सकाळ पासूनच आम्ही इथे तुमच्या खोलीवर नजर ठेऊन आहोत. आम्हाला अपेक्षा होतीच की हिचा कोणीतरी पुरुष साथीदार असेल आणि तो तिला भेटायला इथे येईल. आणि तुम्हीच ते आहात हे आता कळलं.”-पोलीस म्हणाला.
“ समिधा, तुझं ओळखपत्र दाखव यांना.” पाणिनी समिधाला म्हणाला. समिधाने पर्स मधून आपलं ओळखपत्र काढून पोलिसाकडे दिलं.
“ मीच इथे सापळा लावला होता जाळ्यात सावज पकडायला.आमिष म्हणून समिधा होती.तिलाच मी प्रचिती ची तोतया म्हणून इथे आणलं.तुम्हालाही सकृत दर्शनी ती प्रचितीच आहे असं वाटलं.” पाणिनी म्हणाला
“ तुम्हाला तोतयाची गरज काय होती?” पोलिसाने विचारलं.
“ नो कॉमेंट ” पाणिनी म्हणाला
“ विवस्वान शी संबंधित काही?”
“ नो कॉमेंट ” पाणिनी म्हणाला
“ ही प्रचिती पारसनीस तुमची अशील तर नाही?” एका पोलिसाने विचारलं. “ आणि असेल तर तिच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कायद्याच्या विरोधात केलेली गोष्ट ठरेल आणि .....”
“ समिधा, प्रचिती ला फोन लाव.” पाणिनी म्हणाला
समिधा फोन लावण्यापूर्वीच एका पोलिसाने तिच्या हातातून फोन काढून घेतला आणि देवनार च्या पोलीस हेड क्वार्टर ला फोन लावला.
“ मी रीवामधून इन्स्पेक्टर पुष्ण मार्कण्डे बोलतोय.तिथल्या एकादषम अर्वाचिन कंपनी मधे काम करणाऱ्या प्रचिती पारसनीस नावाच्या स्त्रीला उचला. ही मुलगी रीवामधे हॉटेल डेल्मन मधे आहे असं तुम्ही आम्हाला कळवलं होतं पण ते धादांत खोटं आहे.इथे असलेली स्वत:ला प्रचिती म्हणवणारी वेगळीच मुलगी आहे.आल्याला हव्ये ती प्रचिती तिथे देवनार मधेच आहे.तिला शोधा आणि प्रश्न विचारण्यासाठी ताब्यात घ्या.पहिला प्रश्न विचारा की तिचं क्रेडीट कार्ड कुठे आहे.ते हरवलंय असं जर ती म्हणाली तर कुठे आणि कधी हरवलं ते शोधा. ती सापडली की कळवा मला.”
त्याने फोन बंद केला आणि पाणिनीला उद्देशून म्हणाला, “ तर मग माझ्या वकील मित्रा, आता पटापट बोलायला सुरुवात कर बर.”
“ मी बोलणार नाहीये.” पाणिनी म्हणाला
“ मला आवडत नाही असं काही.” पुष्ण नावाचा पोलीस म्हणाला.
“ बऱ्याच लोकांना माझ्या बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत. आम्ही निघतोय आता.” पाणिनी म्हणाला
“ छे छे! असं काही करणार नाहीयेस तू. अत्ता तरी.”
“ याचा अर्थ असा घ्यायचा का मी की मला इथे डांबून ठेवायचा तझा हेतू आहे?”
“ कायद्यानुसार जे काही योग्य करता येईल ते मी करणार आहे.”-पुष्ण
“ तुझं हे वागणं कायदेशीर ठरणार नाही.” पाणिनी म्हणाला “ आम्हला अटक न करता तू डांबून ठेऊ शकत नाहीस आणि अटक करायची झाली तर बेकायदा अटक केल्याबद्दल तुझ्यावरच केस होवू शकते.”
“ शांतपणे घे जरा नंतर तूच मला धन्यवाद देशील मी जे करतोय त्यासाठी. तुझ्या चांगल्या साठीच करतोय मी.” पुष्ण म्हणाला.
“ ते क्रेडीट कार्ड महत्वाचा दुवा ठरणारे या खुनात?” पाणिनीने विचारलं.
“ या वर्षी पाऊस कसा पडेल असं वाटतंय?” पुष्ण ने विषय बदलत प्रतिप्रश्न केला.
“ या वर्षी अधिक महिना नाहीये त्यामुळे चांगला होईल पाऊस असं म्हणतात.” पाणिनी म्हणाला
“ अधिक महिन्याचा काय संबंध? ”
“इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे काही महिने ३० तर काही ३१ दिवसांचे असतात. फेब्रुवारी चे २८ किंवा २९ हे दिवस विचारत घेऊन ३६५ दिवसाचं वर्षं असतं तर मराठी प्रमाणे चांद्र वर्षं हे ३५४ दिवसाचं वर्षं असत.हा ११ दिवसांचा फरक राहू नये म्हणून मराठी कॅलेंडर प्रमाणे दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो.त्यामुळे ३३ दिवसांचा अधिक मास असतो. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ग्रंथात म्हटलंय की ज्या वर्षी अधिक मास असेल तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो.” पाणिनी म्हणाला
“ आम्हाला जाणून घ्यायचय की प्रचिती ला तुम्ही शेवटचे कधी भेटला होतात? त्यावेळेला तुमचं तिच्याशी काय बोलण झालं आणि तुम्ही तिला काय सांगितलं? ”
“ माझ्या अशीलाच्या हिताला बाधा येईल अशी माहिती मी देऊ शकत नाही. ” पाणिनी म्हणाला
त्या पोलिसाने आता आपला मोर्चा समिधाकडे वळवला. “ तू तर खाजगी गुप्तहेर आहेस.प्रचिती ही काही तुझी अशील नाहीये त्यामुळे तू उत्तर दे. ”
समिधाने अगतिक होऊन पाणिनीकडे पाहिलं.
“ उत्तर दे तू.सगळ सांग त्यांना.” पाणिनीने तिला सूचना केली.
“ पाणिनी पटवर्धन यांनी कनक ओजस यांना फोन करून त्यांना विशिष्ट प्रकारची स्त्री गुप्तहेर हवी असल्याचं कळवलं.त्यानुसार माझी नेमणूक झाली आणि इथे येऊन मी प्रचिती खासनीस म्हणून मी बतावणी करावी असं ठरलं.तसच विशिष्ट सांकेतिक नंबरचा उल्लेख करून कोणी फोन केला तर मी तो घ्यावा असं ठरलं.” समिधा म्हणाली.
“ मग कोणाचा फोन आला? किंवा कोणी आलं इथे? ” पोलिसाने विचारलं.
“ एक विचित्र वागणारा माणूस इथे आला.त्याने एक प्रकारे ब्लॅकमेलिंगचा प्रस्ताव समोर ठेवला.”
“ मग तू काय सांगितलस त्याला?”
“ मी काहीच नाही बोलले त्याच्याशी.पटवर्धनच बोलतील असं मी सुचवलं.” समिधा म्हणाली.
“ ठीक आहे पटवर्धननी काय सांगितलं?”-पोलीस
“ ते मला कळायला मार्ग नाही,कारण तेव्हा मी खोलीउन बाहेर गेले होते.”
“ मोठ्या शिताफीने उत्तर देत्येस तू.”
“ मी वस्तुस्थिती सांगत्ये.”-समिधा
“ हा आलेला माणूस कसा होता दिसायला वगैरे?”
“तिशीच्या घरात असावा.सडपातळ, बारीक केस, दुमडलेली पँट, चकचकीत पॉलिश केलेले बूट. ”
“ हे फारच वरवरचं वर्णन आहे. नाव सांगितलं का काही त्यानं?”-पोलीस. समिधाने पाणिनीकडे पाहिलं.
“ त्याने सांगितल्यानुसार त्याचं नाव विवस्वान होतं. ” पाणिनी म्हणाला
“ अरे माझ्या कर्मा ! ” पोलीस पुटपुटला.थोडावेळ शांततेत गेला मग पोलीस पुन्हा समिधाला म्हणाला,
“ तर मग त्या विवस्वान नावाच्या माणसाला पटवर्धन बरोबर सोडून तू बाहेर गेलीस?”
“ कुठे?” –पोलीस.
समिधाने पुन्हा पाणिनीकडे पाहिलं.
“ सांगायला हरकत नाही.” पाणिनी म्हणाला
“ हा विवस्वान नामक माणूस जेव्हा इथून बाहेर पडला आणि त्याच्या गाडीत बसला तेव्हा मी याचा टॅक्सी मधून पाठलाग केला.” –समिधा म्हणाली.
“ कुठवर केलास?”
“ रत्नगर्भ बिल्डींग पर्यंत.”
“ पुढे?”-पोलिसाने विचारलं
“माझी टॅक्सी मी एक चौक मागेच थांबवली होती. विवस्वान ची गाडी रत्नगर्भ च्या बाहेर आली नाही म्हणून मी दुसऱ्याच एका इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या गाडीचा पाठलाग करायला माझ्या टॅक्सी ड्रायव्हर ला सांगितलं,म्हणजे त्याला संशय येऊ नये की मी विवस्वान च्या गाडीच्या मागे होते. ही दुसरी गाडी ट्राफिक मधे जाऊन दिसेनाशी झाल्यावर आमचा पाठलाग संपुष्टात आला आणि मी इथे येऊन सर्व पटवर्धन न कळवलं. ”-समिधा
“ हुषार आहेस.” पोलीस तिला म्हणाला आणि नंतर पाणिनीला उद्देशून म्हणाला, “ इथून पुढचं तू बोल.”
“ मगाशी सांगितल्यानुसार अशीलाची गोपनीय माहिती आणि त्याच्या हिताला बाधा येणारी माहिती मी नाही देऊ शकणार.या समिधा ने जे काही सांगितलंय त्यावर मला काही म्हणायचं नाहीये.”- पाणिनी म्हणाला
“ पण तुम्ही लगेच विवस्वान च्या गाडीचा नंबर शोधायचा प्रयत्न केलात?”-पोलीस
“ नो कॉमेंट” पाणिनी म्हणाला
“ आणि त्यावरून ती गाडी विवस्वान ची आहे आणि तो रत्नगर्भ मधे ९०६ नंबरच्या फ़्लॅट मधे रहात असल्याचं तुम्ही शोधून काढलंत? ”
“ नो कॉमेंट” पाणिनी म्हणाला
“ आणि जर का तुम्ही ही सर्व माहिती प्रचिती पारसनीस ला दिल्याचं आढळलं, तर तुम्हाला सांगतो मी, की, भरभक्कम पुराव्यानिशी तिच्या विरुद्ध विवस्वान च्या खुनाचा असा काही खटला उभा करू आम्ही, की सुप्रसिद्ध वकील पाणिनी पटवर्धन हे सुद्धा तिला सोडवू शकणार नाहीत.” पोलीस आव्हान देत म्हणाला.
“ नो कॉमेंट” पाणिनी म्हणाला त्याने शांतपणे आपल्या ओठात सिगारेट धरून शिलगावली. त्या पोलिसांना सुद्धा त्यामुळे तल्लफ आली. त्यांनी सुद्धा जरा बाजूला जाऊन आपापल्या सिगारेट्स पेटवल्या आणि हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजत राहिले.त्यात पंधरा वीस मिनिटे गेली तेवढ्यात फोन वाजला. त्या पोलिसाने पटकन पुढे जाऊन फोन घेतला आणि पलीकडील माणसाचे बोलणे ऐकत राहिला. ते ऐकताना अचानक त्याचा चेहेरा उजळला आणि तोंडातून शीळ बाहेर पडली.
“ तुम्ही आणि तुमची ही गुप्तहेर समिधा, आता अगदी बिनधास्त जाऊ शकता.” तो पोलीस पाणिनीला म्हणाला.
“ समिधा, तुझ्या सगळ्या चीज-वस्तू घे, आपण निघू.याचा अर्थ देवनार पोलिसांनी प्रचितीला उचलली आहे.” पाणिनी म्हणाला
( प्रकरण ९ समाप्त.)