Blackmail in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | ब्लॅकमेल - प्रकरण 8

Featured Books
Categories
Share

ब्लॅकमेल - प्रकरण 8

प्रकरण ८
तिथून निघाल्यानंतर पाणिनी टॅक्सी करून आपल्या ऑफिसमध्ये आला " सौम्या, प्रचिती बद्दल काही कळलं? काही बातमी कानावर आली आहे?" त्याने विचारलं
तिने नकारार्थी मान हलवली. पाणिनीने समाधानाने निश्वास सोडला.
“देवनार वरून काही फोन आला तर सांग. मला बोलायचंय. पुढच्या पंधरा मिनिटात जर मला अपेक्षित असलेला फोन आला नाही तर आपणच देवनारच्या पोलीस स्टेशनला फोन लावू आणि चौकशी करू आणि त्याने काही प्रतिसाद दिला नाही तर आपण तिथल्या कोर्टात प्रचिती पारसनीसला जिवंत किंवा मृत प्रत्यक्ष हजर करा म्हणून अर्ज देऊ. रिट ऑफ हेबिअस कोर्पस.”
“का? काय घडलं एवढं?” सौम्यान विचारलं
“त्यांनी प्रचिती पारसनीसला अटक केल्ये ” पाणिनी म्हणाला
“अफरातफरीच्या आरोपावरून? ” –सौंम्या.
पाणिनीने मान हलवली.
“अफरातफर हा किरकोळ विषय आहे सौम्या.” तो म्हणाला “अर्थात अफरातफर हा त्यांनी अटक केल्यानंतरचा एक आरोप असू शकतो, पण त्यानं तिला अटक केले आहे ते विवस्वान याच्या खुनच्या आरोपाखाली.”
“काय !” सौम्या एकदम किंचाळली.
पाणिनीने मन डोलावली. “कोणीतरी विवस्वानच्या फ्लॅटमध्ये शिरलं, त्याला मारलं आणि पळून गेली ती व्यक्ती नंतर.”
“आणि पोलिसांना वाटतय की ती व्यक्ती म्हणजे प्रचिती आहे?”-सौंम्या
पाणिनीने मान डोलावली.
“कधी झालं हे सगळं?” सौम्यान विचारलं
“ तो एक मोठा विषय आहे. पोलीस असं दाखवायचा प्रयत्न करतील की ते गुरुवारी दुपारी झालं पण आज प्रेत सापडलं. यामुळे होणारे काय की या क्षेत्रातील विविध तज्ज्ञ आपली विविध मतं मांडतील आणि ती एकमेकांच्या विरोधातील असतील म्हणजे असं नेहमीच घडत.”
“आपलं अशील प्रचिती पारसनीस तुम्हाला एअरपोर्टवर भेटणार होतं आणि ती आलीच नाही?”
पाणिनीने होकार अर्थी मान हलवली.
“तुम्हाला काय वाटतंय?” सौम्यानं विचारलं
“मी जेव्हा तिला देवनार मध्ये भेटलो, तेव्हा ती म्हणाली की, तिकिटाचे पैसे देण्यासाठी ती क्रेडिट कार्ड घ्यायला गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्याकडे क्रेडिट कार्ड नाहीये. मग तिला आठवलं की तिला तिकिटाचे पैसे द्यायलाच लागणार नव्हते. मी त्याचे पैसे आधीच दिले होते मग तिने तिचं तिकीट तिथून घेतलं ती म्हणाली नंतर ते पैसे ती मला देणार होती.”
“बर मग पुढे?” सौम्यानं विचारलं.
“ नंतर दोन पोलीस डेल्मन हॉटेलात आले,प्रचितीचं क्रेडीट कार्ड त्यांनी समिधाला दाखवलं,आणि तिला विचारलं की ते तुझं आहे का म्हणून. ” असं म्हणून पाणिनीने त्या पुढे जे जे घडलं ते सौंम्याला सांगितलं.शेवटी तो म्हणाला “ अपहारापेक्षाही मोठा म्हणजे खुनाच्या संशयात तिला अटक केली आहे. ”
“ आणि ती तुम्हाला फोन करेल असं तुम्हाला वाटतंय?” –सौंम्या
पाणिनी काहीतरी बोलणार तेवढ्यात फोन वाजला.पाणिनीने तो घेतला,
“ अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन बोलतोय.”
“ प्रचिती पारसनीस चे तुम्ही वकील आहात?” फोन मधील आवाजाने विचारलं.
“ होय.” पाणिनी म्हणाला
“ तिला अटक झाल्ये आणि तिला तिच्या वकिलांशी बोलायची संधी तिला हव्ये, म्हणून तुम्हाला फोन केलाय. बोला इथे.” असं म्हणून पलीकडून प्रचिती ला फोन देण्यात आला. ती एकदम उत्तेजित आवाजात काहीतरी बोलणार होती पण पाणिनीने तिला गप्प करत म्हंटलं,
“ एकही शब्द बोलू नकोस तिकडून, फक्त ऐक. विवस्वानच्या खुनाचा आरोप ते तुझ्यावर ठेवणार आहेत. इथे रीवा ला आणण्यापूर्वी ते तुला तिथे देवनार च्या न्यायाधिशांसमोर हजर करायचा त्यांचा विचार असेल.मी तुला इथे आणवं म्हणून प्रयत्न करणार आहे.त्यांनी तुला काहीही विचारलं तरी तुझं उत्तरं नो कमेंट असंच दे.माझा वकील इथे हजर असल्याशिवाय मी काही बोलणार नाहीस असं निक्षून सांग. तू जमवू शकशील हे? ” पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“ ठीक आहे परत त्या पोलीस अधिकाऱ्याला फोन दे,मला बोलायचंय.” पाणिनी म्हणाला तिने पुन्हा पोलिसाकडे फोन दिला. पाणिनी त्याला म्हणाला, “ हे पहा मगाशी मी सांगितलंय त्या नुसार मी प्रचिती चं वकीलपत्र घेतलंय.मी तिच्याजवळ हजर असल्याशिवाय काहीही बोलायचं नाही अशी सूचना मी तिला दिल्ये.पुढच्या कारवाईसाठी तिला देवनार ऐवजी रीवाला तिला तुम्ही घेऊन यावं अशी माझी सूचना आहे.हवं तर तशी कोर्टाची ऑर्डर मी तुम्हाला मिळेल असे पाहतो.”
“ मिस्टर पटवर्धन, तुम्ही मला तिच्याशी बोलायला परवानगी दिलीत आणि तिने सहकार्य केलं तर बऱ्याच गोष्टी मार्गी लागतील आणि तिला रीवा ला आणायची गरजच भासणार नाही.ती खूप चांगली मुलगी आहे,ती विनाकारण या भानगडीत अडकली आहे.” फोन वर बोलणारा पोलीस म्हणाला.
“ मला माहित आहे की तुम्ही पोलीस किती चांगले वागता ते.तुमच्या या शब्दांनीच अनेक आरोपींना तुरुंगाची हवा दाखवली आहे.माझ्या गैरहजेरीत तुम्ही किंवा कोणीही तिला प्रश्न विचारायचे नाहीत आणि विचारलेच तर उत्तरं न देण्याचा सल्ला मी तिला दिलाय.आपल्यात अत्ता जे संभाषण होतंय त्याचं मी रेकोर्डिंग करतोय म्हणजे भविष्यात काही विपरित घडलं तर तिच्या वैधानिक अधिकारापासून तिला वंचित केलं गेलं असं म्हणायला मी मोकळा ! ” पाणिनी म्हणाला
“ तिचा वकील म्हणून काही गोष्टी स्पष्ट कराल तुम्ही?”
“ मी कशाचाही खुलासा करणार नाही.” पाणिनीनं वाजवलं त्याला.
“ आपलं क्रेडीट कार्ड हरवल्याचं तुमच्या अशीलाच्या नेमकं लक्षात कधी आलं?”-पोलिसाने विचारलं
पाणिनी हसला.
“ यात हसण्यासारखं काय आहे?” पोलिसाने विचारलं
“ तुम्हीच!” पाणिनी म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.


त्यानंतरच्या सायंकाळी प्रचिती आणि पाणिनी तुरुंगातल्या एका खोलीत समोरासमोर बसले होते.प्रचितीचे डोळे रडून रडून सुजले होते.
“ तुला पोलिसांनी त्रास दिला?” पाणिनीने विचारलं.
“ ते खूपच चांगले वागले माझ्याशी.अगदी प्रेमाने.त्यांना काही गोष्टी सांगून टाकल्या आपण तर नुकसान होईल का आपलं?” प्रचितीने विचारलं
“ कुठल्या गोष्टी?”
“म्हणजे पैसे सापडल्याबद्दल किंवा प्रयंक बद्दल किंवा मी पेपरात दिलेल्या जाहिरातीबद्दल.”
“आणि हे कुठपर्यंत सांगत जाणार आहेस तू?”
“नाही, म्हणजे कुठेतरी थांबावच लागेल मला. पण मला वाटलं की तसं मी सांगितलं तर चालेल” –प्रचिती म्हणाली.
“फाशीच्या तक्तापर्यंत तू जात नाहीस तोपर्यंत तू बोललीस तरी हरकत नाही कारण त्यानंतर तुला काही बोलताच येणार नाहीये” पाणिनी चिडून म्हणाला
“रागवू नका तुम्ही पण ते एवढं चांगले वागले माझ्याशी की.....”
“अगं ते त्यांचं तंत्र आहे. काही लोकांशी ते चांगलं वागतात, विशेषता स्त्री आरोपी असेल तर ते चांगलं वागतात. ते जमलं नाही, म्हणजे त्यातून काही त्यांना हवी ती माहिती मिळाली नाही तर ते दुसरं तंत्र अवलंबतात म्हणजे दमदाटी वगैरे करून, घाबरवून, पण ते त्यांना हवी ती माहिती मिळवतातच कुठल्यातरी मार्गाने. आणि आरोपीला ते मजबूर करतात माहिती देण्यासाठी.त्याला माहीत नसलेली वस्तुस्थिती त्याच्याकडून बदलून घेतात” पाणिनी म्हणाला
“पण मला तर वस्तुस्थिती माहिती आहे.” ती म्हणाली
“खरंच माहित्ये तुला वस्तुस्थिती?”
“हो माहितीये.”
“बर मग सांग बर विवस्वान ला कोणी मारलं?”
ती एकदम गप्प बसली .
“सांग ना तू मारलयस त्याला?”
“नाही.”
“हे बघ प्रचिती, तू माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतेस.किंबहुना मी एकमेव असा माणूस आहेस की ज्याच्याशी तू मोकळेपणाने बोलू शकतेस. लक्षात ठेव तो माणूस म्हणजे मी आहे पोलीस नाहीत. समजतंय मी काय म्हणतोय ते ?” पाणिनीने विचारलं.
“हो “
“तर मग मला सांग तू आणि मी एकत्रच विमानानं देवनारला जाणार होतो गुरुवारी रात्री.पण तू तिथे आलीच नाहीस मी दुसऱ्या दिवशी तुझ्या ऑफिसला पोहोचलो तेव्हा तिथे मला भेटलीस आणि काहीतरी थापा मारल्यास की तुझा कोणीतरी पाठलाग करत होत आणि त्याला चुकवण्यात तुझा वेळ कसा गेला, मग तू रात्रीच उशिराच विमान पकडून कशी आलीस वगैरे वगैरे. वस्तुस्थिती अशी आहे प्रचिती की आपण ज्या विमानाने एकत्र जाणार होतो त्या विमानात वेळेवर पोहोचण्याचा तू प्रयत्न सुद्धा केला नाहीस. आणि तुझा कोणीतरी पाठलाग केल्याची कहाणी तू जी सांगत आहेस ना, ती कहाणी तू यासाठी सांगत्येस की दरम्यानच्या काळात तू जे काही केलंयस ते मला कळू नये म्हणून. लक्षात ठेव मीच तुला माहिती दिली होती की विवस्वान हा ब्लॅकमेलर आहे. मीच तुला त्याचा पत्ता सांगितला तुला माहीत होतं की मी ब्लॅकमेलर ला पैसे देणार नाही पण तुझ्या भावाच्या हिताच्या दृष्टीने ती गोष्ट योग्य नाही असं तुला वाटत होतं. तू टॅक्सी करून विवस्वान राहत असलेल्या रत्नगर्भ अपार्टमेंट मध्ये गेलीस तुमच्या दोघात काहीतरी झालं तू तुझी पर्स उघडून त्यातनं रिव्हॉल्व्हर काढलस ते काढत असतानाच तुझं क्रेडिट कार्ड खाली पडलं पण ते तुझ्या लक्षात आलं नाही नंतर तू विमानतळावर गेलीस आणि तिथे विमानाच्या तिकिटाचे पैसे देताना तुझ्या लक्षात आलं की तुझं क्रेडिट कार्ड सापडत नाहीये.” पाणिनी म्हणाला
प्रचिती काही बोलली नाही.
“तर मग पोलिसांना मी आत्ता सांगितलं ते सगळं माहिती आहे किंवा त्यांनी तसा अंदाज काढलाय की तसंच घडलंय किंवा तसा पुरावा ते जमा करतील तसंच घडलं असल्याबाबत.” पाणिनी म्हणाला
तिने नकारार्थी मान हलवली
“तू नाही म्हणून उपयोग नाही. तू कल्पनाही करू शकत नाही एवढे पोलीस हुशार असतात. ज्याने तुला रत्नगर्भ अपार्टमेंट मध्ये नेलं त्या ड्रायव्हरला ते बरोबर शोधून काढतील.”
तिने घाबरून एक मोठा उसासा सोडला.
“ओह! अगं वेडे म्हणजे तू तुझी टॅक्सी डायरेक्ट रत्नगर्भ अपार्टमेंटला नेलीस. दुसरीकडे कुठेतरी थांबवून तिथून चालत गेली असतीस तर पोलिसांना टॅक्सी चा पत्ता तरी लागला नसता.” पाणिनी म्हणाला
“मी खूप घाईत होते. मला अत्यंत तातडीने त्याला भेटायचं होतं आणि तुमच्याबरोबर विमानाने यायचं होतं. मला वाटलं होतं की या दोन्हीसाठी माझ्याकडे पुरेसा वेळ मिळावा म्हणून मी टॅक्सी डायरेक्ट त्याच्या अपार्टमेंट पर्यंत नेली.” प्रचिती उत्तरली.
“थोडक्यात तू असा विचार केलास की मी सांगितल्यानुसार बँकेत जाऊन स्वतःच्या नावाने ड्राफ्ट घेण्याच्या ऐवजी तीच रक्कम त्या ब्लॅकमेलरला देऊन विषय संपवावा आणि आपल्या भावाला संकटातून बाहेर काढावं?” पाणिनीने विचारलं.
“हो तसंच थोडसं म्हणजे....”
“पण मग तसं तू का केलं नाहीस प्रत्यक्षात?” पाणिनीने विचारलं.
“कारण तो आधीच मेलेला होता मी तिथे गेले तेव्हा...”-प्रचिती
“बोल पुढे सविस्तर सांग पटापट” पाणिनी म्हणाला
“मी त्याच्या फ्लॅटमध्ये गेले. नव्या मजल्यावरच्या ९०६ नंबरचा फ्लॅट मी शोधून काढला आणि दार वाजवलं. काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी पुन्हा एकदा दार वाजवलं. दार उघडलं गेलं नाही तेव्हा मला काय बुद्धी झाली कोण जाणे पण मी दाराची मूठ फिरवली.. दार उघड होतं मी आत गेले मला तो आधी दिसलाच नाही म्हणजे आत कोणीच दिसलं नाही. म्हणून मी आवाज दिला की कोणी आहे का आत मध्ये ? तेवढ्यात मला तो दिसला. भयानक होता तो प्रकार बघायला! तो पूर्ण रक्तात माखून गेला होता.”
“मेला होता तेव्हा तो?” पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“तुला कसं कळलं तू मेला आहे म्हणून?”
“मी त्याचा हात उचलून बघितला, तो बर्फासारखा थंड झाला होता.”
“पुढे काय केलस तू?”
“मी बाहेर पळून गेले.”
“खोटं बोलते आहेस तू लगेच बाहेर नाही पडलीस तू तुझी पर्स उघडलीस.मला सांग का उघडलीस तू पर्स?” पाणिनीने विचारलं.
“खरं म्हणजे मला नाही सांगता येणार पण तो सगळा प्रकार बघून मला खूप रडू आलं आणि पर्समधून रुमाल काढण्यासाठी बहुदा मी पर्स उघडली” प्रचिती म्हणाली.
“एक नंबरची खोटारडी आहेस तू. सांग मला खरं काय ते. सत्य सांग. का उघडलीस तू पर्स?” पाणिनी कडाडला.
“मी सांगितलं तेच कारण आहे. पुन्हा पुन्हा का विचारताय मला?”
“तू खोटं बोलते आहेस. तू एकतर रिव्हॉल्व्हर बाहेर काढण्यासाठी पर्स उघडलीस किंवा रिव्हॉल्व्हर पर्स मध्ये ठेवण्यासाठी.”
“तुम्ही प्रत्येक वेळेला उलट तपासणी घेतल्यासारखं का विचारता हो?” –प्रचिती
“माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला मी उलट तपासणी सारखेच प्रश्न विचारतो”
“ठीक आहे, सांगते मी. प्रेता जवळ ची रिव्हॉल्व्हर उचलली मी ”
“का उचललीस तू रिव्हॉल्व्हर?”
“कारण ती प्रयंकची रिव्हॉल्व्हर होती”
“कशावरून?”- पाणिनीने विचारलं.
“मला माहितीये ना! प्रयंक कडे पॉईंट 22 ची रिव्हॉल्व्हर होती जेव्हा तो रोख रक्कम बरोबर घेऊन कंपनीसाठी मोठी खरेदी करायला जायचा त्यावेळेला त्याच्याबरोबर असायची. मला ती पक्की लक्षात आहे. त्याला छान पॉलिश केलेलं लाकडी हँडल होतं. पटवर्धन मी वर्णन जरी नीट पूर्ण करू शकले नाही तरी मला माहिती आहे की ती प्रयंकचीच रिव्हॉल्व्हर होती. मी पण नेमबाजी शिकावी असं प्रयंक ला सतत वाटायचं. त्याच रिव्हॉल्व्हर मी बरेच वेळा नेमबाजीचा सराव केलेला आहे.”
“म्हणजे थोडक्यात तू जवळ पडलेली प्रयंकची रिव्हॉल्व्हर उचललीस आणि तुझ्या पर्स मध्ये टाकण्यासाठी तू तुझी पर्स उघडलीस.बरोबर?” पाणिनीने विचारलं.
“हो बरोबर आहे.”
“पुढे काय झालं नंतर?” पाणिनीने विचारलं.
“मी नंतर तिथून पळून गेले.”
“बंदुकीचं काय केलस नंतर?” पाणिनीने विचारलं.
“मी बरोबर बंदोबस्त केलाय त्याचा पटवर्धन साहेब. कोणालाही ती बंदूक सापडणार नाही पुन्हा मी खात्री देते.”
“ती बंदूक शोधायची त्यांना गरजही पडणार नाही.” पाणिनी म्हणाला
“म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला?”
“प्रत्येक बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळीवर त्या बंदुकीच्या नळीच्या आतल्या भागाचे विशिष्ट ठसे उमटत असतात. पोलीस काय करतील माहिती आहे? तुझा भाऊ ज्या ठिकाणी नेमबाजीचा सराव करायचा त्या ठिकाणच्या बंदुकीच्या गोळ्या ताब्यात घेतील आणि त्याची तुलना विवस्वान च्या शरीरात घुसलेल्या गोळीशी करतील दोन्ही गोळ्यांच्या वर उमटलेले बंदुकीच्या नळीचे ठसे सारखेच आढळले तर त्याच्याच बंदुकीतून विवस्वान चा खून झाला असे अनुमान ते बांधतील आणि ते शास्त्रीय दृष्ट्या योग्यही ठरेल.”
ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली.
“तुझा भाऊ किंवा तू नेमबाजीच्या सरावाच्या वेळी टार्गेट म्हणून काय वापरायचा?”
“ लाकडाचा चुरा वापरून केलेले शीट” प्रचिती म्हणाली
“कुठे ठेवायचात ते?”
“आम्ही ते टार्गेट गाडीत ठेवायचो.”
“प्रयंक चा नेम चांगला होता?” पाणिनीने विचारलं.
“खूपच चांगला होता, आणि त्याच्या बरोबरीने सराव करून माझाही नेम चांगला सुधारला होता”-प्रचिती
“तुम्ही दोघेही प्रयंकच्याच बंदुकीने सराव करायचा की तुझ्याकडे तुझी वेगळी बंदूक होती?”
“प्रयंकlच्या या एकाच बंदुकीने आम्ही दोघेही सराव करायचो. माझी वेगळी बंदूक नव्हती.”
“तू नवीन बंदुकीसाठी कधी प्रयत्न केले होतेस? किंवा कुठे अर्ज केला होतास?”
तिने नकारार्थी मान हलवली. पाणिनी थोडा वेळ गप्प बसला.
“पटवर्धन सर तुम्ही फार काळजी करू नका त्या रिव्हॉलवरची. त्यांना ते कधीही सापडणार नाही . मी मगाशीच हे सांगितलंय पण तुम्हाला चैन पडत नाहीये ते ऐकल्याशिवाय ते मी कुठे ठेवलय ते सांगू का तुम्हाला? म्हणजे तुम्हीही निश्चिंत व्हाल.” प्रचिती ने विचारलं
“अजिबात सांगू नकोस मला आणि मलाच नाही तर कुणालाच सांगू नको.”
“पण मी तुम्हाला काही सांगितलं तर ते गोपनीयच राहील ना? त्यामुळे तुम्हाला सांगायला मला काहीच वाटणार नाही .”
“काही गोष्टी ज्या तू मला सांगतेस त्या गोपनीय असतात पण काही गोष्टी तू मला सांगितल्यास आणि मी त्या पोलिसांना सांगितल्या नाहीत तर मी पुरावा दडवण्याचा आरोप माझ्यावर येऊ शकतो. त्यामुळे तू ती बंदूक कुठे ठेवली आहेस हे जाणून घेण्यात मला काहीही रस नाही तू सुद्धा ती बंदूक कुठे आहे हे कोणालाच सांगू नको आणि रत्नगर्भ अपार्टमेंट मध्ये तू गेल्याचं सुद्धा कुणाला सांगू नको. एकदम शांत रहा. एवढेच सांग की काहीही न सांगण्याचा सल्ला माझ्या वकिलांनी मला दिला आहे. काही कालावधीनंतर मी सगळं काही सविस्तर सांगेन. कदाचित ते तुला विचारतील की नंतर सविस्तर सांगणार म्हणजे नक्की कधी? त्यावर तू असं उत्तर दे की ते सुद्धा मी माझ्या वकिलांशी चर्चा करून ठरवीन.”
तिने होकारार्थी मान हलवली.
“तुम्ही नेमबाजी चा सराव करताना जे टारगेट वापरत होतात ते तुझ्या भावाने कुठे ठेवलय ?”
“नक्की माहित नाही पण बहुदा त्याच्या गॅरेजमध्ये”
“म्हणजे तो जिथे राहतो त्या अपार्टमेंट मधल्या त्याच्या नावाने केलेल्या गॅरेजमध्ये?”
“ हो.”
“त्याची गाडी कुठे आहे?” पाणिनीने विचारलं.
“ती त्या अपघातात पूर्णपणे चेंदामेंदा झाली आणि ती पोलिसांनी उचलून नेल्ये बहुतेक.”
“अपघातानंतर ती गाडी तू पाहिल्येस?”
“नाही पाहिली”
“हे टार्गेट त्याने गाडीच्या डिकीत ठेवले असायची शक्यता तुला वाटते?” पाणिनीने विचारलं.
“नाही, नक्की सांगता येणार नाही मला.”
“असू शकतं?”
“हो असू शकतं.”
“अचानक पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. ठीक आहे. प्रचिती बरंचस आता नशिबावरच अवलंबून आहे. आणि तू गप्प राहून किती सहकार्य करतेस यावरही अवलंबून आहे.”
आता ती नीट लक्ष देऊन ऐकत होती.
“आतापर्यंतचा माझा प्रत्येक सल्ला तू धुडकावून लावला आहेस आणि स्वतःच्या मनाप्रमाणे वागत आलीस आणि आता तू चांगलीच अडचणीत आल्येस.”
“अहो पण मला विवस्वानला भेटणं आवश्यकच होतं तुमच्या लक्षात येत नाही का पटवर्धन?” “ब्लॅकमेलर बरोबर व्यवहार करताना थोडा धोका स्वीकारायलाच लागतो. तुम्ही म्हणाला होतात की ब्लॅकमेलर ला पैसे द्यायला आवडत नाही पण तसं केलं असतं तर माझ्या भावाचं खूप मोठे नुकसान झालं असतं.”-प्रचिती
“पण तू जस वागायचं ठरवलं होतंस, त्यांने आणखीनच धोका वाढला असता.” पाणिनी म्हणाला
“ प्रचिती एक लक्षात घे ब्लॅकमेलर ला पैसे देऊन त्याला आपल्या मार्गातून कधीच हटवता येत नाही उलट त्यामुळे त्याची हाव वाढत जाते त्याच्यातून फार तर एक दोन आठवड्याचा किंवा काही महिन्याचा कालावधी तुम्ही निश्चिंत जगू शकता परंतु तो पुन्हा तुमच्याकडे येतोच आणि जेवढे पैसे तुम्ही त्याला देता तेवढा त्याचा तुमच्यावर जास्त वचक निर्माण होतो.” पाणिनी म्हणाला
तिने नकारार्थी मान हलवली. “सगळे वकील लोक असंच समजतात. पण मला नाही तसं वाटत. त्याला नेमकं काय हवं होतं तुम्हाला माहित नाहीये म्हणून तुम्ही असं बोलताय. त्याचा माझ्या भावावर काय वट होता ते तुम्हाला माहीत नाहीये. एकदा त्याला पैसे देऊन टाकले असते की त्याने ब्लॅकमेल करण्यासारखं जे काही होतं म्हणजे उदाहरणार्थ काही फोटो किंवा काही छापील मजकूर ते सगळं मला परत दिलं असतं.”
“असं तुला वाटतंय प्रचिती. पण ते फोटो किंवा छापील मजकूर च्या कॉपीज ब्लॅकमेलर स्वतःकडे काढून ठेवू शकत होता त्याच्यातून तुला पुन्हा लुबाडू शकत होता.”
पाणिनीने आपली चर्चा संपली आहे हे तुरुंगाच अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी तिथे ठेवलेली बेल वाजवली
“काय होणार आहे माझं?” -प्रचिती
“बऱ्याच गोष्टीवर ते अवलंबून आहे. पण एक मी सांगतो तू काही बोलायला सुरुवात केलीस आणि तू विशिष्ट प्रकारे का वागलीस याचा खुलासा करायला लागलीस, पोलिसांच्या वर विश्वास ठेवून तर तू १००% फाशीच्या तक्तावर जाणार.”
“माझी जामिनावर वगैरे सुटका होऊ शकत नाही का?”
“नाही. या प्रकारच्या गुन्ह्यात नाही.” पाणिनी म्हणाला
तेवढ्यात तिथे तुरुंगाचा अधिकारी आला आणि त्यांने पाणिनीला विचारलं की त्यांची चर्चा संपली आहे का? चर्चा संपल्याच पाणिनीने त्याला सांगितलं पण जाताना तो प्रचितीच्या हातावर हात थोपटून तिला धीर द्यायला विसरला नाही.तिथून ऑफिसला आल्यावर पाणिनी पटवर्धन ने आपला सहकारी कनक ओजस याला प्रचिती पारसनीस बरोबर झालेल्या बोलण्याचा सर्व वृत्तांत सांगितला.
“आता माझ्यासाठी नेमकं काय काम आहे?” कनक नं विचारलं
“ज्याचा खून झालाय त्या विवस्वान बद्दल मला सगळी माहिती हवी आहे. तो एक नंबरचा ब्लॅकमेलर आहे. त्याच्या सगळ्या वैयक्तिक बऱ्या वाईट सवयी, व्यसन, तसच मित्र कोण आहेत वगैरे सर्व माहिती काढ. विशेषतः काही बाईची भानगड आहे का? तो जरा बाईल वेडा असावा किंवा बायकांच्या संदर्भात कोणी काही अडकले असेल तर त्याबद्दल ब्लॅकमेल करत असावा.त्याच प्रमाणे पोलीस केस बद्दल काही माहिती काढता आली तर पहा.”
“ठीक आहे.”-कनक
“या प्रचिती ला सल्ला देताना माझी चूकच झाली.”
“तू म्हणतोयस हे पाणिनी! तू कधीच चुकीचा कायदेशीर सल्ला देणार नाहीस.”
“कायद्याच्या बाबतीतला नाही म्हणत मी. वकिलांचा सल्ला ती मानत नाही या बाबत मला सावध केलं गेलं असतांना सुद्धा मी त्याकडे दुर्लक्ष करून तिला माझ्या नजरेपासून दूर ठेवण्याची चूक केली.” पाणिनी म्हणाला
“नेमकं कोणत्या क्षणी?” –कनक
“ज्या कालावधीत विवस्वानचा खून झाला त्याच वेळी.”
“ठीक आहे असू दे.मी यावेळी माझ्या कामाचे पैसे आकारताना तुला सूट देईन थोडी.”-कनक ओजस म्हणाला.
“त्या पेक्षा माहिती काढतांना सूट दे म्हणजे नेहेमी पेक्षा लवकर काढ माहिती.”
(प्रकरण ८ समाप्त)