Lagnachi Gosht - 4 in Marathi Anything by Pralhad K Dudhal books and stories PDF | लग्नाची गोष्ट - भाग 4

Featured Books
Categories
Share

लग्नाची गोष्ट - भाग 4

लग्नाची गोष्ट भाग ४

माझ लग्न ठरलं लग्नपत्रिकाही छापून आल्या. निमंत्रण करायला सुरूवात करायची होती.त्यावेळी मी पुण्यात नागपूर चाळीत भावाच्याकडे रहायचो.
मी असा विचार केला की ज्या वस्तीत आपण इतके दिवस रहातोय, जिथे राहून आपण शिकता शिकता नोकरी मिळवली,आपल्या वाईट काळात ज्या वस्तीने आधार दिला तेथील प्रतिष्ठीत व्यक्तींना आपण प्रथम निमंत्रण पत्रिका देवू या!
या वस्तीत आमच्या छत्रपती शिवाजी मंडळाने साईबाबा मंदिर बांधले होते. या साईं मंदिराचा मी सुरूवातीपासून क्रियाशील सदस्य होतो.
सर्वप्रथम मी बाबांच्या मुर्तीसमोर लग्नपत्रिका ठेवली. साईबाबाना मनोभावे नमस्कार करून पत्रिका देण्यासाठी पहीली व्यक्ती निवडली- श्रीयुत गाडेकील! या वकील साहेबांचे आणि माझी जरी फक्त तोंडओळख होती तरी कधी समोरासमोर येऊन बोलणे झाले नव्हते.
कोर्टात जाता येता मला ते मंदिराच्या चौकात उभा असताना कायम बघायचे.त्यांचा चेहराच असा होता की ते कायम थोडे घुश्शात असल्यासारखे दिसायचे, त्यामुळे मीसुध्दा स्वत: होवून कधी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला नव्हता.
असे असले तरी त्यांची बायको मात्र मला ओळखायची.बऱ्याचदा ती माझ्याशी गप्पा मारायची, येता जाता आस्थेने विचारपूही करायची.अशा वस्तीत राहून, शिकून मी सरकारी नोकरी मिळवल्याने वकीलीनबाईना माझे नेहमी कौतुक असायचे...
तर..,,माझी लग्नपत्रिका द्यायची सुरूवात या वकीलसाहेबांपासून करायच्या हेतूने मी त्यांचा दरवाजा वाजवला. वकीलसाहेब घरीच होते. साहेबांनी दरवाजा उघडला.
मला दरवाजात पहाताच त्यांची मुद्रा थोडी त्रासिक झाली.
एक अत्यंत तुच्छ नजरेचा रागीट कटाक्ष माझ्याकडे टाकून ते फिस्कारले -
" काय आहे रे ?"

" सर पत्रिका द्यायची होती ." मी चाचरत बोललो.

" कसली पत्रिका?" त्यांचा तोच तुच्छतेचा स्वर होता.

" सर पुढच्या सोळा तारखेला माझे लग्न आहे,त्याची पत्रिका द्यायची होती ."
. माझ्या आवाजाला नको एवढा कंप आलेला होता.
माझ्याकडे अविश्वासाने बघत त्यांनी माझ्या हातातून पत्रिका जवळ जवळ हिसकावून घेतली.आता बाईसाहेबही बाजूला येवून उभ्या राहिल्या होत्या.
हातात आलेल्या पत्रिकेवर भराभर नजर फिरवत वकीलसाहेबानी मला आपादमस्तक न्याहळले! अत्यंत कुत्सित व् हेटाळणीपूर्ण आवाजात कडाडले .
" तर आता लग्न करणार तू ! नोकरी ना धंदा तुला ! एक पै कमवायची अक्कल नाही, दिवसभर वस्तीतल्या फालतू कारट्यांबरोबर चकाट्या पिटत फिरतोस आणि लग्न करतोय!"

" “आणि काय रे बायकोला कसा पोसणार आहेस? पहिलं काम धंदा बघ, स्वत:च पोट भरायची सोय कर आणि मग लग्न कर! मुर्ख कुठला! "

. गाडे वकीलांच्या तोंडाचा पट्टा जोरात सुटला होता,आवाजही बऱ्यापैकी वाढला होता शेजारीपाजारी जमा झाले होते!
मला काय आणि कसे बोलावे तेच उमजेना.
बाजूला उभ्या असलेल्या बाईसाहेब त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत्या,पण ते ऐकायच्या मनस्थितीत ते बिल्कूल नव्हते!
शेवटी एकदाची कीलीनबाईना बोलायला संधी मिळाली-
" अहो असे काय बोलताय त्याच्याशी?"

" मग काय करू,खेटराने पूजा करू त्याची? कमवायची काडीची अक्कल नाही आणि चाललालग्न करायला !"

" अहो कुणी सांगितलं तुम्हाला तो नोकरी करत नाही म्हणून? अहो टेलिफोन खात्याची चांगली सरकारी नोकरी आहे त्याला! चांगला ग्रॅज्युएट झालाय तो!"

आता मात्र वकील साहेब शांत झाले,पण तरीही माझ्याकडे अविश्वासाने बघत होते.मी खिशातले माझे खात्याचे ओळखपत्र थरथरत्या हाताने त्यांच्या हातात दिले.त्यांनी ते नीट बघितले व परत मला दिले.
" नोकरीला आहे तर मग नोकरीला कधी जातोस? कायम दांडी मारतो वाटतो. जेंव्हा जेंव्हा बघतो तेंव्हा त्या मंडळाच्या फालतू पोरांबरोबर पडीक असतोस!"
आता मात्र मला त्यांचा माझ्याबद्दल असलेला गैरसमज दूर करणे आवश्यक वाटले.
" सर मी रात्रपाळी करतो.दोन दिवसातुन एकदा संध्याकाळी पाच ते सकाळी सात अशी डबल ड्युटी करतो! "

आता साहेबाना माझ्याशी रागाने बोलल्याचा पश्चात्ताप झालेला दिसत होता.माझा हात धरून त्यानी मला घरात नेले.
बाईसाहेब हातावर द्यायला साखर घेवून आल्या.
चुक त्यांची नव्हती, मी ज्या वस्तीत रहात होतो, ज्या मित्रांच्या सहवासात वावरत होतो,त्यातली अनेक मुले विविध व्यसनांच्या आहारी गेलेली होती.कित्येकानी शिक्षण अर्धवट सोडलेले होते, अनेकाना कामधंदा नव्हता! ही मुले मनाने खुप चांगली होती. पण माणूस म्हणून ही मुले कितीही चांगली असली तरी समाजाने त्याना वाया गेलेली व टारगटपणाचे लेबल चिकटवलेले होते! आणि अशा मुलांच्यात वावरणारा मी त्यांच्यातलाच एक असणार, असे वाटणे अगदी साहजिक होते!
शेवटी तुम्ही कितीही सज्जन आणि चांगले असला तरी तुमच्या कपाळावर थोडेच ते लिहिलेले असते?
समाजात तुमचे मूल्यमापन होताना तुम्ही काय काम धंदा करता,तुम्ही किती कमावता,तुम्ही कोठे रहाता,तुमचे मित्र कोण आहेत,तुम्ही घालत असलेले कपडे,इत्यादि वरवरच्या बाबींवरून होते! या गोष्टींवरून तुम्हाला लावायचे लेबल ठरते!
तर अशा प्रकारे माझ्या लग्न पत्रिका वाटायची सुरुवात झाली.
- प्रल्हाद दुधाळ (9423012020)