Pension should be available to all senior citizens in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | पेन्शन सर्व वयोवृद्धांना मिळावी

Featured Books
Categories
Share

पेन्शन सर्व वयोवृद्धांना मिळावी

पेन्शन सर्व वयोवृद्धांनाच मिळावी?

अलिकडे पेन्शनचं फॅड आलं आहे. जो तो व्यक्ती मी म्हातारा आहे. मला पोषायला कोणीच नाही म्हणून मला पेन्शन हवी अशी मागणी करुन पेन्शनचा दावा करीत आहे. अशी माणसं काही दाखले मिळविण्यासाठी डीलींग (काही पैसे) करुन पेन्शन मिळवीत असतात नव्हे तर पेन्शनसाठी ही माणसं ओळखपत्र म्हणून गावातील काही लोकांच्या स्वाक्षऱ्या घेत असतात. जसे सरपंच, ग्रामसेवक वा पटवारी. तसेच सरपंचांना राजकारण करायचं असतं. त्याला जिंकून यायचं असतं. तो अशा वयोवृद्ध माणसांची कामं शंभर प्रतिशत करीत असतो. कारण त्याला वयोवृद्धांचं मतदानही हवं असतं. तोच सरपंच पटवारी वा ग्रामसेवकावर दबाव टाकून निराधारांना त्यांची स्वाक्षरी मिळवून देत असतो. शिवाय तपासणी करण्यात आलीच तर त्या तपासणी अधिकाऱ्यालाही सेट केलं जातं आणि सर्वच निराधारांच्या हो ला हो मिळवत वृद्धांना पेन्शन मिळवून दिली जाते आणि आपलं काय जातं? सरकारचं जातं असा फतवा काढत कित्येक वयोवृद्ध माणसं निराधार नसूनही आपण निराधार असल्याचं सिद्ध करुन पेन्शन उचलत असतात.
खरंच सर्वच निराधार पेन्शनधारी निराधार असतात का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. बरेचसे असे निराधार पेन्शनधारी निराधार नसतात. त्यांना दोन दोन, चार चार मुलं असतात आणि ते सबळ असतात. परंतु पेन्शन मिळते, म्हणून ते आपल्या मायबापांना निराधार दाखवतात. कारण सरकारचा पैसा येतो. आपला जात नाही. ही त्यांची भुमिका असते. काही वयोवृद्ध माणसांच्या घरी त्यांची मुलं सरकारी नोकरीवर असतात व ती त्यांना पोषायला समर्थ असतात. तरीही ती माणसं पेन्शनसाठी अर्ज करीत असतात व पेन्शन मिळवून जातात. काही असेही निराधार असतात की ज्यांच्या घरी त्यांच्याच नावावर भरपूर शेती आहे. अलिकडील काळात त्यांची संख्या सगळं ऑनलाईन दिसत असल्यानं कमी झालेली आहे. काही निराधार असेही असतात की जे पती मरण पावला असे दाखवतात व पेन्शन उचलतात. त्याला विधवा पेन्शन असे म्हणतात. परंतु त्यांनी पती केलेला असतो व केवळ पेन्शन मिळते म्हणून तो पतीही झाकून ठेवलेला असतो.
पेन्शन........ पेन्शन मिळावी म्हणून सारेच बहाणे. आपले काय जाते? सरकारचे जाते म्हणून साऱ्याच उपद्व्यापीपणा. परंतु त्यात सर्वांचा टॅक्सचा पैसा जातोय. जो टॅक्स आपण या पेन्शनधारीसाठी भरत नाही. तो भरतो आपल्या देशाचा विकास त्या पैशातून व्हावा म्हणून. परंतु तो पैसा अशा खोट्या पेन्शनमध्ये जास्त प्रमाणात खर्च होत असेल, तर देशाचा विकास कसा करायचा? हा एक प्रश्न पडतो. जो प्रश्न देशाच्या हितासाठी महत्वपुर्ण असतो.
पेन्शन सर्वांनी स्वेच्छेने सोडावी. जर त्यांच्या घरी कमावणारे सर्व सक्षम असतील तर........ परंतु तसं कोणीच करणार नाही आणि करीतही नाही. कारण तो एक स्वार्थाचा भाग आहे. जिथं आमदार, खासदारच सर्वात जास्त प्रमाणात पैसा असून पेन्शन सोडत नाहीत. तिथं ही सामान्य जनता कशी काय सोडणार आपली पेन्शन. हा एक ऐरणीचा प्रश्न आहे.
पेन्शन दोन स्वरुपाची आहे. एक निराधार म्हणून मिळणारी पेन्शन व दुसरी सरकारी नोकरीवर असलेल्या लोकांना मिळणारी पेन्शन. निराधारांना कमी पेन्शन असते. सरकारी नोकरीवर असलेल्या लोकांना कितीतरी जास्त प्रमाणात पेन्शन मिळत असते. म्हणतात की जीवनभर नोकरीत त्या व्यक्तीनं सेवा केली. म्हणून त्याला पेन्शन द्यावी. कारण तो सेवेचा एक मोबदलाच आहे. यातही काही लोकांना सहज पेन्शन मिळत असते तर काहींना सतत संघर्ष करीत पेन्शन मिळत असते. ज्यांना सहज पेन्शन मिळत असते. जे सरकारी नोकरीवर असलेले लोकं साहेबांच्या मर्जीतील असतील किंवा त्यांचे लागेबांधे असतील किंवा ते एकमेकांचे नातेवाईक असतील. इतरांचे कार्य कितीही चांगले असेल, तरी त्यांना पेन्शन मिळत नाही.
पेन्शन...... पेन्शन म्हणजे वृद्धापकाळी वृद्धांना आधार व्हावा म्हणून सरकारद्वारे मिळणारी रक्कम होय. ही रक्कम म्हाताऱ्या वर्गाला एक मदत म्हणून मिळत असते.
कालपर्यंत पेन्शन ही सरकारी नोकरीवर असलेल्या लोकांनाच मिळायची. आता ही पेन्शन कुणालाही मिळत असते. याचाच अर्थ असा की ती सर्व म्हाताऱ्या वर्गाला मिळते.
पेन्शन का दिली जाते? असा विचार करुन याची पाश्वभुमी विचारात घेतली तर असं आढळून येतं की निराधार लोकांना मदत करण्यासाठी पेन्शन अस्तित्वात आली. जे खरोखरच निराधार आहेत. मग वयोवृद्ध मंडळी खरोखरच निराधार असतात का? असा जर प्रश्न विचारल्यास याचं उत्तर संभ्रम निर्माण करणारं आहे. कारण एका अंगानं विचार केल्यास सर्वच पेन्शनधारी निराधार नसतात. त्याचं कारण आहे, त्यांची मुलं नोकरीवर असणे. काहींच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काहींच्या घरी त्यांची सर्वच मुलं. सर्वच स्नुषा, सर्वच नातवंडं नोकरीवर असतात. शिवाय दोन्ही पती पत्नी नोकरीवर असल्यानं त्या दोघांनाही पेन्शन असते आणि ती पेन्शन काही कमी नसते.
अलिकडे पेन्शन बहुतेकांनाच मिळते. कोणाला जास्त तर कोणाला कमी मिळते. पेन्शनही भेदभावच करुन दिली जाते. जशी जे कमी शिकलेले आहेत, त्यांना कमी पेन्शन आणि जे जास्त शिकलेले आहेत त्यांना जास्त पेन्शन.
पेन्शनबाबतीत सांगायचं झाल्यास पेन्शन दिली जाते. कारण त्यांची मुलं पोषत नाहीत त्यांना म्हणून. का पोषत नाहीत? तर त्यांनी संस्कार केलेले नसतात. तसं पाहिल्यास सुशिक्षीत असणाऱ्याच व्यक्तींची मुलं त्यांना पोषत नाहीत. हीच वास्तविकता आहे. कारण ती विदेशात गेलेली असतात. तशीच त्यांना म्हाताऱ्या त्यांच्या मायबापाची कटकट वाटत असते.
प्रत्येक म्हाताऱ्यांना आधार म्हणून पेन्शन असावीच. असू नये असं नाही. कारण त्याशिवाय ते सुखदायक जीवन जगूच शकणार नाहीत. परंतु ती पेन्शन सरकारी खजिन्यातून नसावी. तर ती प्रत्येक त्या वृद्धांच्या वारसांच्या मिळकतीतून देण्यात यावी. त्यांच्या खात्यातून काही कपात करुन दरमहिन्याला त्यांच्या वृद्ध मायबापाच्या खात्यात गोळा करायला सांगावे. त्याशिवाय त्या त्या दांपत्यांना कोणतेही सरकारी लाभ देण्यात येवू नयेत. ही पेन्शन सर्व वयोवृद्धांना असावी. तसंच सरकारी पेन्शन द्यायची झाल्यास ती वास्तविक स्वरुपात जे खरोखरच निराधार आहेत. ज्यांना एकही मुलबाळ नाही. ज्यांच्या घरी विश्वकोटीचं दारिद्र्य आहे. त्यांनाच द्यावी. त्याशिवाय इतरांना देवू नये म्हणजे झालं. मग ते सरकारी नोकरदार का असेना. जेणेकरुन वाचलेल्या पैशातून देशाचा विकास करता येईल. देशाला सृजलाम, सुफलाम करता येईल. तसंच देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून देशाला महासत्ता बनवता येईल. हे तेव्हाच घडेल, जेव्हा खासदार, आमदार आपली स्वतःची पेन्शन सोडतील. कदाचीत सरकारी नोकरदारही आपली पेन्शन सोडतील यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०