Lagnachi Gosht - 2 in Marathi Anything by Pralhad K Dudhal books and stories PDF | लग्नाची गोष्ट - भाग 2

Featured Books
Categories
Share

लग्नाची गोष्ट - भाग 2

लग्नाची गोष्ट भाग २


मी पुण्यात जेथे रहात होतो त्याच गल्लीत एक बाई रहायच्या. त्यांचा मुलगा माझ्याच वयाचा होता. थोडीफार त्याच्याशी मैत्रीही होती. तर,या मावशी एका शनिवारी संध्याकाळी खास माझ्याकडे आल्या.

त्यांनी सहज विचारल्यासारखे दाखवत माझा रविवारचा कुठे जायचा कार्यक्रम आहे का विचारले."मी घरीच आहे", म्हटल्यावर त्या म्हणाल्या....

" अरे बरे झाले, उद्या माझ्याबरोबर चल दत्तवाडीला! माझ्या भावाला तुमच्या गावाकडच्या कुणाची तरी माहीती पाहीजे आहे! त्याला मी तुझे तेच गाव आहे हे सांगितले तर त्याने रविवारी तुला घेऊन यायलाच सांगितले!"

खरे तर मावशींच्या त्या भावाला ना मी कधी बघितले होते, ना त्याने मला! पण असेल काही काम, असा विचार करून रविवारी तिकडे जायला मी होकार दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या मावशी व त्यांचा मुलगा रिक्षा घेवून माझ्याकडे आले, मी काय सडाफटींग माणूस! बसलो रिक्षात आणि निघालो! अर्ध्या पाऊण तासातच आम्ही दत्तवाडीला मावशींच्या त्या भावाकडे पोहोचलो. त्या घरी बहूतेक आम्ही येणार असल्याचे आधीच माहीत असावे. दरवाजातच नमस्कार करून मावशींच्या भावाने आमचे स्वागत केले. मला कळेना की, हा बाबा, त्याच्यापेक्षा एकदम लहान, तब्बेतीने एकदम बारकुंड्या माझ्यासारख्या पोराला एवढा हात जोडून नमस्कार का घालतोय?

दोन खोल्याच्या चाळवजा घराच्या बाहेरील खोलीत असलेल्या कॉटवर आम्ही बसलो.मावशींच्या भावजयीने पाणी दिले. उन्हाळा असल्यामुळे तहान लागलेलीच होती!

मी घटाघटा पाणी पिवून घेतले.

मग मावशींचे बंधूराज समोर बसून मला- माझी नोकरी,काय काय काम करावे लागते, पगार किती, सुट्ट्या कधी व किती असतात,घरी कोण कोण असते, इथे एकटाच कसा राहतोस वगैरे वगैरे माहीती गप्पा मारता मारता विचारू लागले. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत राहीलो. त्यांच्या ऑफिसात माझ्या गावचे कोणी जाधव म्हणून काम करत होते त्यांचाबद्दलही मला विचारले , अर्थात मी त्या जाधवाना ओळखत नव्हतो.

इत्तरही काही काही गप्पा चालत राहिल्या.

थोड्याच वेळात आतल्या घरातून एक मुलगी पोह्याच्या डीश घेवून बाहेर आली! आत्तापर्यंत आतल्या खोलीत अजुनही कोणी असेल असे वाटत नव्हते. त्या मुलीने प्रथम माझ्या समोरच ट्रे धरला, नाईलाजास्तव मी एक प्लेट उचलली नकळत तिच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले. फार तर नववी दहावीत शिकत असेल!

ती मुलगी चक्क साडी नेसून,अवघडत सर्वाना पोहे देत होती!

मागच्या अनुभवाने माझी एकदम ट्युब पेटली!

" ही मुलगी दाखवायला तर मला आणले नसेल ना?" मी पुन्हा एकदा तिच्याकडे पाहीले.

थरथरत ती तेथेच उभी होती, वय असेल फार तर पंधरा सोळा! बापरे, या लोकांना वेड लागलय की काय? या वयात तिला लग्नासाठी दाखवताहेत? मनात विचार आला, कदाचित तसे काही नसावे,माझ्याच मनाचा खेळ असेल! मी गप्प राहून पुढचा अंदाज घेवू लागलो.

" अहो विचारा, काय विचारायच असल तर तिला!" - मुलीचे पिताश्री.

" मी ? मी कशाला काय विचारू तिला!" मी एकदम गडबडून गेलो होतो.

" अरे, नीट बघून घे, विचारायचे असले तर विचार काही, आयुष्याभराचा प्रश्न असतो!" - मावशी.

" म्हणजे ? मी समजलो नाही!"

" अरे समजायचय काय, पसंत आहे का सांग, लग्नासाठी दाखवलीय तुला ती! "

मला काही सुचेनाच काय बोलावे ते! मी सरळ उठून खोलीबाहेर आलो. मागचा पुढचा विचार न करता पळतच मुख्य रोडवर आलो. थोडक्यात तेथून चक्क पळालो!

ही मावशी आपली भाची, जी अजून लग्नायोग्य वयाचीही नव्हती ,अजून तिचे हसण्याबागडण्याचे शिकायचे वय संपले नव्हते, अशा कोवळ्या कळीला माझ्याबरोबर बोहोल्यावर चढवायला निघाले होते! तेही मला कोणतीही कल्पना न देता! मला त्या खोटारड्या मावशींचा व मित्राचा प्रचंड राग आला होता,चांगला जाब विचारावा असे वाटत होते, पण तो राग मी गिळला! अजुन मी खूप छोटा होतो! दुसऱ्याला बदलवण्याएवढा मोठा तर नक्कीच झालो नव्हतो! आयुष्यात खूप काही करायच होत, त्यामुळे नको तेथे आपली एनर्जी खर्च होवू नये याची अक्कल देवदयेने त्या वयातही होती, त्यामुळे ही घटना मी फारशी मनाला लावून घेतली नाही! काही घडलेच नाही असा विचार केला आणि माझ्या कामाला लागलो.

मात्र, पुढचे पंधराएक दिवस त्या मावशीला चुकवत राहीलो!

पुढे तीनेही या बाबतीत माझा नाद सोडला!

.......... प्रल्हाद दुधाळ (9423012020)