महिला कमजोर? होवूच शकत नाही?
एक महिला. एका महिलेत एवढी शक्ती असते की ती राजाला रंग करु शकते आणि तीच रंकाला राजाही. अलिकडे महिला कमजोर कमजोर म्हणत महिला सक्षमीकरणाचे वारे सुरु आहेत. कधी गॅसचं कनेक्शन घ्यायचं असल्यास महिलांच्या नावानं, कधी राशन कार्ड बनवायचं असल्यास महिलांच्या नावानं आणि आता मुख्यमंत्री लाडली बहिण योजना. महिलांना समर्पीत. यावरुन महिलांना शासन कमजोर समजत असल्याचं चित्र दिसतं.
खरंच महिला कमजोर आहे का की तिला कमजोर समजून हिनवलं जातं? तिला कमजोर म्हणत तिच्या अब्रुचे धिंडवडे काढले जातात? या प्रश्नाचं उत्तर एक प्रकारचे संभ्रम निर्माण करणारा आहे.
महिला तसं पाहिल्यास कमजोर नाहीच आणि तसं कोणीही समजू नये. त्याचं कारण आहे तिची कामगीरी. महिलांनी भुतकाळात अशी अशी कामगीरी केलीय की ती वाखाणण्याजोगीच आहे. जशी महाराणी ताराबाई. तिनं औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रुला शह दिला. परंतु शरणागती पत्करली नाही. जिजाबाईनं आपल्या मुलाला शिवरायाला घडवून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईनं वीरमरण पत्करलं. परंतु आपली झाशी इंग्रजांना दिली नाही. एवढंच नाही तर त्रेतायुगात सीतेनं तेवढ्या बलाढ्य असलेल्या रावणाच्या नजरकैदेत आपला प्रदिर्घ काळ शोषला. परंतु रावणाच्या पाया पडून शरणागत झाली नाही. त्यातच द्वापारयुगात द्रोपदीनं तिचा भर दरबारात अपमान करणाऱ्याचा बदलाच घेतल नाही तर त्यांना यमसदनीही पोहोचवले नव्हे तर वर्तमानात महिला अंतराळातही गेली आणि महिला राष्ट्रपतीही बनली.
महिलांमध्ये असंख्य देव्याही वसलेल्या असतात. नवरात्रात तर नऊ देव्यांच्या रुपात महिलांना पुजलं जातं. तसं माणसांना पुजलं जात नाही. शिवाय ज्या घरात महिलाराज आहे किंवा महिलांचा सन्मान केला जातो. त्या घरात सुखशांती आणि समृद्धी चिरकाल नांदत असते. तसं पाहिल्यास एक महिला अशी असते की जी आपलं घराणं घेवून चालून त्या घराला बनवते आणि एक महिला अशीही असते की त्या घराला उध्वस्त करते. यावरुनच महिला सक्षमीकरण ओळखू येते.
आज महिला कुठे कुठे नाहीत. सगळीकडेच महिलांचा राज आहे. तरीही महिला कमजोर. ही शोकांतिकाच आहे. त्याला कारणही तसंच आहे. ते कारण म्हणजे पुरुषांचं महिलाप्रती वागणं. पुरुष महिलांना कमजोर समजण्याची चूक करतो की जी कमजोर नाही आणि ज्यांना ती कमजोर दिसत असेल, तो पुर्ण पुरुष होवूच शकत नाही. त्या पुरुषांना तसा विचार करतांना फक्त वासनाच दिसते. त्यांचा झालेला जन्म दिसत नाही आणि त्याचं तिनं केलेलं पोषण दिसत नाही. त्याला हेही कळत नाही की ती होती. म्हणूनच तो या जगात आला. हे जेव्हा त्याला समजेल. तेव्हाच तो पुर्ण माणूस बनेल. यात शंका नाही. आज महिला कमजोर नाही. त्याचं एक उदाहरण देवू इच्छितो.
सध्या महागाईचा काळ आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. या महागाईवर मात करण्यासाठी पती पत्नी दोघंही कामाला जात असतात हेही सर्वांना माहीत आहे. शिवाय दोघंही काम करुन घरी येतात. परंतु घरी आल्यानंतर पुरुष किती काम करतो व महिला किती काम करते. याची गोळाबेरीज केल्यास महिला ही घराबाहेरही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तेवढेच काम करते, जेवढा पुरुष करतो आणि ती घरी आल्यावरही पुरुषांपेक्षा जास्तच काम करते. ती घरी येतांना रस्त्यावर कोणतीही नशापाणी करीत नाही. तशीच कोणाशी हुल्लडबाजी करीत बसत नाही. सरळसरळ घरी येते व स्वयंपाकाला लागते. कारण तिला चिंता असते, माझी मुलं कशी असतील याची. मात्र पुरुषांचं तसं नाही.
महिला सक्षमीकरणाबाबत सांगतांना एक गोष्ट आणखी जाणवते की काही महिलामंडळी पुरुष मरण पावल्यानंतर छातीला माती लावून पुरुषांसारखंच काबाडकष्ट करतात. परंतु शक्यतोवर दुसरा विवाह करीत नाहीत. कारण त्यांना पती निधनानंतर आपल्या मुलांना मोठं करायचं असतं. परंतु त्यातील एक पुरुष चक्कं दुसरा विवाह करुन मोकळे होतात. यात काही अपवाद असतातही. परंतु ते अपवाद जर सोडले तर बऱ्याचशा स्रिया आपल्या मुलांसाठी त्याग करायला मागंपुढं पाहात नाहीत.
स्री ही संसारातील महत्वपुर्ण घटक आहे. जर ती घर सावरणारी असेल तर घराची चांदी चांदी असते. ती जेव्हा घरात येते. त्यानंतरच पुरुषांचं घर होतं. पैसाही वाढत असतो आणि ती जेव्हा घरात नसते. तेव्हा मात्र आपण कितीही कमवीत असलो तरी एकही घर बांधू शकत नाही.
एकंदरीत सांगायचं झाल्यास स्री ही कमजोर कडी नाही. ती संसार साखळीतील मजबूत कडी आहे. ती सहजासहजी कोणत्याही पुरुषांकडून पराजीत होवू शकत नाही आणि तसं तिनं समजूही नये. तसं पुरुषानंही समजू नये. ती स्वतः पुरुषांच्या आज्ञेत वागत असल्याने स्वतःला कमजोर समजते वा ती इतरांना कमजोर वाटते. परंतु तो आपला भ्रम असतो. तशीच ती एखाद्या कठीण प्रसंगातही मार्ग काढून संसार नौका किनार्यावर लावू शकते. शिवाय एक प्रकारचं उत्तम मार्गदर्शनही ती करु शकते यात शंका नाही. म्हणूनच तिला कोणीही कमजोर समजण्याची भूल कोणीही करु नये. ती होती म्हणून आपण आलो, ती होती म्हणूनच आपण जगलो आणि आज जे आहोत, ती होती म्हणून. हे कोणीही विसरु नये. तिचा आदर करावा. तिला सन्मान द्यावा आणि त्यातल्या त्यात एखाद्यावेळेस कठीण समयी तिचं मार्गदर्शनही घ्यावं. जेणेकरुन आपल्याला लाभ होईल हे तेवढंच खरं. कारण ती कमजोर नाही तर तेवढीच उत्तम मार्गदाताही असते यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०