लतावृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर! चकोर, चातक, कोकीळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षिराजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागं होणारं, गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं, दोन प्रहराच्या रणरणत्यावेळी कदंबाच्या गर्द-गर्द गार छायेत निवांतपणे विसावणारं, घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद-मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं, इथं - या चंपानगरीत - माझं ते रम्य बालपण गेलं! हो, अक्षरश: गेलंच. धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे. पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य! त्यातल्या पाण्याच्या बिंदू-बिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाथेंबाची दाट ओळख आहे. याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ-मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत. या इथल्या अवखळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणानं उडवून लावलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणींबरोबरच मी बालपणी पाहिलेली, या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. बालपण म्हणजे तरी काय? कुणालातरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय? अनेक लोक, अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात, पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे. मुक्त आणि आनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा असं. दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठंतरी निळ्याभोर आकाशाला टेकलं आहे काय, हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटालाटांवरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येई. तर कधी-कधी तो रथ - आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदणात बसविलेल्या असतात, की ज्यामुळे त्या निळं छत सोडून पृथ्वीतलावर खळकन निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी - अवकाशात उंच-उंच झेपावून येई. **
कर्ण भाग 3
मी आणि माझा छोटा भाऊ शोण - आमचं ते चिमुकलं जग. शोण! होय शोणच! त्याचं मूळ नाव शत्रुंतप होतं, पण सर्व जण त्याला ‘शोण’च म्हणत. शोण माझा धाकटा भाऊ. तसा वृकरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला, पण तो लहानपणीच मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला होता. शोण आणि मी दोघेच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं. चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्याभाबड्या जिवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते. तिथं खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते की, स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती. ते केवळ दोन भावांचं निर्हेतुक जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते. एक आमची आई - राधा आणि आमचे बाबा - आधिरथ! आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंत:करणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञनेनं भारलेले, काहीसे मायेनं ओथंबलेले असे दोन अश्रुबिंदू माझ्या डोळ्यांत टचकन उभे राहतात, पण हे क्षणभरच. लागलीच मी ते टिपतो, कारण मला माहीत आहे, अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दु:खाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते आणि तरीही हे दोन अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे, असं मला कधीच वाटत नाही, कारण या दोन अश्रुबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही. यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही आस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही. माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भेळ प्रेमच! आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यांत काहीसे कृतज्ञतेनं भरलेले, काहीसे मायेनं ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रुबिंदू उभे राहतात. **