" कर्म ". गीता रहस्य.
गीतारहस्या मधील कर्म या विषयावरील विचार सांगणे हा उद्देश आहे.
हे अर्जुना, कर्मे न सोडताही तू कर्मबंध सोडशील अशी ही कर्मयोगातील बुद्धि म्हणजे ज्ञान तुला सांगतो.
ज्ञानप्राप्ती नंतर निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हाच पुरुषार्थ. कर्मयोग मार्गात एका जन्मात सिद्धि मिळाली नाही तरी ते कर्म पुढील जन्मात उपयोगी पडते व अखेर सद्गती मिळते.
बुद्धि हा शब्द ज्ञान, समजूत, हेतू, वासना या अर्थाने वापरला गेला आहे. तसाचं व्यवसाय म्हणजेच कार्याचा निश्चय करणारे बुद्धिंद्रिय असाही अर्थ होतो.
बुद्धि स्थिर नसल्याने निरनिराळ्या वासनांनी मन व्यापले जाऊन, स्वर्गप्राप्तीसाठी अमुक कर्म, पुत्र प्राप्ती साठी अमुक कर्म असे मनुष्य करू लागतो.
परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करून न घेता कर्म करणाऱ्यास, कर्माचे फल मिळाले तरी मोक्ष मिळत नाही.
मोक्ष मिळवण्यासाठी बुद्धिंद्रिय स्थिर असले पाहिजे.
गीतेमध्ये कर्माचा नव्हे तर काम्य बुद्धिचा दोष दाखवला आहे.
काम्यबुद्धि सोडून यज्ञ तसेच इतर कर्मे करावी.
कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, फल मिळणे तुझ्या अधिकारात नाही.
वेदांचा उपयोग ज्ञानी पुरुषास त्याच्या ज्ञानाने होतो. कर्माचे फल ज्ञानी पुरुषास नको असले तरी, फलाशेने नसले तरी यज्ञयागादिक कर्मे शास्रविहीत असल्याने त्याला करावीच लागतात.
कर्म कर असे सांगताना फलाशा कर असे सांगितले नाही आणि फलाशा सोड
म्हणजे कर्म सोड असा होत नाही.
फलाशा सोडून कर्तव्य कर्म केलेच पाहिजे.
कर्मे करताना बुद्धि स्थिर, पवित्र, सम,
व शुद्ध ठेवणे हीच युक्ती असून यालाच योग म्हणतात. कर्मयोग्याची बुद्धि स्थिर झाली की तो स्थितप्रज्ञ मानला जातो. स्थितप्रज्ञाला जी शांती लाभते ती कर्मत्यागाने नसून फलाच्या त्यागाने मिळते.
कितीही कर्मे करावयाची असली तरी मनाची शांती न गमावता केल्याने सिद्ध पुरुषास सुख- दुःख वाटत नाही. कोणत्याही मनुष्यांस कर्म करावेच लागते. प्रकृतीचे गुण कर्म करावयास लावतातचं. मनुष्य कर्मशुन्य होऊ शकत नाही. कर्म सोडणे हा सिद्धि मिळवण्याचा उपाय नाही. ज्ञानाने आसक्तीचा क्षय करून कर्म करीत राहणे यालाच कर्मयोग म्हणतात. कर्म हे वाईट कधीच असू नये. निष्काम कर्म म्हणजेच कर्मयोग. कर्म केले नाही तर शरीरनिर्वाह पण चालणार नाही. फलाशा सोडून कर्म केल्यास मोक्षप्राप्ती होते.
कर्म करावेच लागते पण ते निस्वार्थ व निष्काम बुद्धीने करावे. जनकादि राजांना पण कर्मानेच सिद्धि मिळाली.
कर्म हे सर्व जगाला सन्मार्गावर आणून, सर्वांचे पालनपोषण करणे व संरक्षण करण्यासाठी करावयाचे आहे.
लोकांना शहाणे व सदाचारी करण्यासाठी ज्ञानी पुरुषाने कर्म करावे.
श्रीकृष्ण सांगतात, माझ्या ठायी अध्यात्मबुद्धिने व सर्व कर्माचा संन्यास म्हणजे मला अर्पण करून आणि फलाशा सोडून तू युद्ध कर. आपण जो कोणता व्यवसाय स्विकारला आहे तो सोडू नये.
सर्व व्यवसायात काहीनाकाही दोष असतात पण दोष न शोधता आपले कर्म करावे. कर्मयोग हा साम्यबुद्धिने कर्म करण्याचा, आयुष्यक्रमणाचा एक मार्ग आहे.
ज्ञानी पुरुषांनी लोकांना ज्ञान देऊन शहाणे करावे. ज्ञानी पुरुषाचे आपण स्वतः संसारात राहून लोकांना निष्काम कर्माचा म्हणजे सदाचरणाचा धडा घालून देऊन त्याप्रमाणे त्यांच्याकडून आचरण करुन घेणे हे या जीवनातील महत्वाचे काम आहे असा गीतेचा उपदेश आहे.
इंद्रिये ताब्यात ठेवून त्यांच्या स्वभावसिद्ध वृत्तींचा लोकांसाठी उपयोग करावा. निःस्पृहतने स्वकार्य करीत राहण्यानेच परम सिद्धि मिळते. यदा यदा ही धर्मस्य या श्लोकाचे तात्पर्य असे आहे की,
आपण निर्माण केलेल्या जगाची सुस्थिति कायम राहून त्याचे कल्याण व्हावे म्हणूनच अवतार घेऊन भगवान समाजाची विस्कटलेली घडी नीट बसवून देत असतात.
भगवंताच्या अवताराचा व कृत्याचा विचार करून त्यातील तत्व ओळखून वागणे हेच भगवंत प्राप्तीचे साधन आहे.
विपरित कर्म समजून घेउन वागणे.
मनुष्य जोपर्यंत सृष्टीत आहे तोपर्यंत त्याला कर्म चुकत नाही.
कर्माच्या फलाचे बंधन न लागण्यासाठी ते फलाशा सोडून निष्काम बुद्धीने करावे हेच सांगणे आहे.
रागद्वेषापासून मुक्त, साम्य बुद्धीने कर्म करणे, ममत्वबुद्धी सोडून ब्रह्मार्पणपुर्वक व्यवहार करणे हाही एक यज्ञ असून त्याने परमेश्वर प्राप्ती होत असते.