Blackmail - 3 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | ब्लॅकमेल - प्रकरण 3

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

ब्लॅकमेल - प्रकरण 3

प्रकरण 3
पाणिनी डेल्मन हॉटेलच्या रिसेप्शन मधे गेला आणि विचारलं, “ प्रचिती खासनीस नावाने तुमच्याकडे बुकिंग आहे?”
“ आहे ७६७ नंबरची रूम आहे.” आपलं रजिस्टर चाळत रिसेप्शनिस्ट ने उत्तरं दिलं.
“ मी आल्याचं तिला कळवालं का प्लीज?” पाणिनीने विचारलं.
“ नाव काय आहे तुमचं?”
“ ती मला नावाने ओळखत नाही.तिला सांगा, सामाजिक सुरक्षिततेच्या संबंधात काम आहे. १२३-३२१ या नंबरशी संबंधित काम आहे.”
रिसेप्शनिस्ट ने संशयित नजरेने पाणिनीकडे पाहिलं आणि रूम ७६७ ला फोन लावला.
“ मॅडम, तुम्हाला भेटायला एक गृहस्थ आलेत. सुरक्षिततेच्या संबंधात काम आहे त्याचं.” दोघांचं फोन वर हलक्या आवाजात बोलणं झालं ते ऐकून रिसेप्शनिस्ट पाणिनीला म्हणाला,
“मॅडम म्हणाल्या की त्यांना सुरक्षेबद्दल काहीही सेवा नकोय.त्यामुळे तुम्ही एक तर तुमचं नाव सांगा.... ”
“ तुम्ही त्यांना १२३-३२१ हा नंबर सांगितला नाही.” पाणिनी म्हणाला
तेवढ्यात फोन मधून विचित्र आवाज आला म्हणून रिसेप्शनिस्ट ने पुन्हा कानाला फोन लावला.
“ तुम्ही जा, भेट त्यांना.तुम्ही मला सांगितलेला नंबर त्यांनी फोन वरून ऐकला आणि तुमची ओळख पटली त्यांना.” रिसेप्शनिस्ट म्हणाला.
पाणिनी तिसऱ्या मिनिटाला रूम नंबर ७६७ समोर उभा होता.बेल दाबताच प्रचिती ने दार उघडलं.त्याच्या ऑफिसात आलेली तीच ती तरुणी होती.
“ तुम्ही ! ” ती आश्चर्याने ओरडली.
“ का? एवढं ओरडायला काय झालं?” पाणिनीने विचारलं.
“ मी इथे असल्याचं तुम्हाला कसं समजलं? मी कोण आहे हे तुम्हाला कसं कळलं?”
पाणिनी तिच्याकडे लक्ष न देता आत शिरला आणि सोफ्यावर आरामात बसला.
“ जरा बदल म्हणून खरं बोल आता.” तो म्हणाला. “ तुझं नाव प्रचिती आहे?”
“ अर्थात.”
“ प्रचिती काय?”
“ काय म्हणजे?”
“ आडनाव काय?”
“ खासनीस” –प्रचिती म्हणाली.
“ मी खरं नाव विचारतोय.”
“ तेच आहे.माझं रजिस्ट्रेशन याचं नावाने झालंय या हॉटेलात, तुम्ही वर येताना याचं नावाची चौकशी करून आलात ना?”
“ प्रचिती खासनीस पेक्षा प्रचिती पारसनीस म्हणायला कसं वाटत? बरं वाटतं ना?” पाणिनीने विचारलं.
क्षणभर तिचा चेहेरा सुन्न झाला. “ हे बघा मी तुम्हाला पैसे मोजून माझा वकील म्हणून नेमलाय. माझ्याशी प्रतारणा करून तुम्ही दुसऱ्याच कोणाशीतरी सहकार्य करताय.” ती ओरडली.
“ पोलिसांशी?” पाणिनीने विचारलं.
“ नाही,पोलिसांशी नाही.मी कुठला नियम किंवा कायदा मोडलेला नाही ज्यामुळे पोलीस माझ्या मागे लागतील.”
“ नक्की?” पाणिनीने विचारलं.
“ नक्कीच.”
यावर पाणिनीने तिला स्पष्ट कल्पना दिली की तिने स्वत:विषयी पूर्ण माहिती त्याला न दिल्यामुळे त्याला त्याच्या पद्धतीने ती काढून घ्यावी लागली आणि यापुढे तिला मदत घ्यायची असेल तर तिने सगळ सत्य सांगितलं पाहिजे.
“ मी कुठल्याच संकटात नाहीये.मी माझ्या मित्राला संरक्षण द्यायचा प्रयत्न करते आहे.” प्रचिती म्हणाली.
“एकादषम कंपनीला माहिती आहे तू कुठे आहेस ते?” पाणिनीने विचारलं.
त्याचा प्रश्न ऐकून ती क्षणभर चमकली.
“ त्यांना माहिती आहे की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी बाहेर आले आहे. ”
पाणिनीने अचानक तिच्या मांडीवर ठेवलेली काळी हँडबॅग पकडली. “ पैशाने भरल्ये ना?” त्याने विचारलं.
“ सोडा तीss..” ती किंचाळली. माझ्या कामासाठी मी तुम्हाला नेमलाय आणि तुम्ही मात्र पोलिसांपेक्षा वाईट निघालात.
“ कुठून आणलेस एवढे पैसे?” पाणिनीने विचारलं.
“ तुमचा काही संबंध नाही त्याच्याशी.” ती भडकून म्हणाली.
“ तुझ्या कंपनीत अपहार करून तर ही रक्कम नाही ना आणलीस?”
“ मुळीच नाही.”-प्रचिती
“ खात्री आहे तुझी?”
“ अर्थात.”
“ तुझ्या कंपनीने या पैशांचा हिशोब लावण्यासाठी ऑडीटर ची नेमणूक केल्ये हे माहित्ये तुला?”
तिचा चेहेरा बदलला.
“ नाही. असं कसं झालं?” ती पुटपुटली.
“ तू कंपनीत काय म्हणून आहेस? म्हणजे पद काय आहे?”
“ कॅशीयर आणि अकौंटट”
“ आपण मुळाशी जाऊ याच्या.तू माझ्या ऑफिसात आलीस तेव्हा तुझ्याकडे ही बॅग होती.नोटांनी पूर्ण भरलेली.” पाणिनी म्हणाला
“ तुम्हाला कसं समजलं ते?”
“ माझ्या रिसेप्शनिस्टला बघायची संधी मिळाली.”
“ अरे देवा !” ती उद्गारली.
“ या सर्वाचा अर्थ बघ. तू इथे देवनार वरून आलीस.खोट्या नावाने हॉटेलात उतरलीस,पेपरात जाहिरात दिलीस. तुझ्याबरोबर येताना मोठी रोख रक्कम आणलीस. ब्लॅकमेलरला पैसे द्यायची तयारी दर्शवलीस. तिकडे मोठ्या रकमेची तूट आल्याने कंपनीने ऑडीटर नेमलेत.”
प्रचिती एकदम शांत झाली.
“ हे बघ तू मला गोल गरगर फिरवत बसण्यापेक्षा सत्य सांगितलंस तर तुला मदत करता येईल.तू खरोखर अपहार केला आहेस?” पाणिनीने विचारलं.
“ खात्रीने सांगते की नाही.”
“ या बॅग मधे किती रक्कम आहे?” पाणिनीने विचारलं.
“ पाच लाख.”
“ कुठून मिळवलीस रक्कम? लवकर सांग खर तर आधीच उशीर झालाय.”
“ माझ्या भावाला अपघात झाल्यावर हॉस्पिटल मधे दाखल करण्यात आलं.मी त्याला हॉस्पिटल मधे लागणाऱ्या वस्तू देण्यासाठी त्याच्या खोलीत गेले तेव्हा मला दिसलं की त्याची बॅग भरलेली होती आणि एक पत्र, टाइप केलेलं, टेबलवर होतं.त्यात धमकी होती की मंगळवारी रात्री पर्यंत पाच लाख मिळाले नाहीत तर पुढची कारवाई केली जाईल.खाली सही च्या जागी १२३-३२१ असा नंबर होता. ”
“ पुढे काय केलंस तू?” पाणिनीने विचारलं.
“ पटवर्धन, माझा भाऊ मरणासन्न अवस्थेत हॉस्पिटल मधे होता.त्याला काही कळून द्यायचं नव्हतं मला.मी पेपरात जाहिरात दिली आणि सरळ इथे आले निघून. ”
“ पैशांचं काय?”
“ भावाच्या खोलीत पैशांनी भरलेली बॅग तयार होती.शिवाय एक कपड्याची बॅग.तो बाहेरगावी जायच्या तयारीतच होता,गाडीत सामान भरण्यापूर्वी पेट्रोल भरायला गेला तिथेच त्याला एका गाडीने ठोकला आणि त्याच्या कवटीला इजा झाली.” प्रचिती म्हणाली.
“ त्याने कंपनीत अपहार करून ही रक्कम पळवली नसेल ना?”
“ शक्यच नाही,पटवर्धन. एक तर तो असा गुन्हेगारी वृत्तीचा नाही.दुसरं म्हणजे तिजोरीच्या किल्ल्या त्याच्याकडे नसतातच.फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असतात.”
“ तू सुद्धा त्याच कंपनीत काम करतेस, तू कॅशियर आहेस.तुझा तिजोरीशी संबंध येतो?”
“ रोज नाही.महिन्यातून दोन वेळा.माझ्या कडच्या नोंदी नुसार प्रत्यक्ष रोख रक्कम तिजोरीत आहे का हे तपासण्यासाठी.”-प्रचिती म्हणाली.
“ तुमच्या दोघांपैकी प्रथम नोकरीला कोण लागलं?”
“ मी.”
“ही कंपनी केवढी मोठी आहे?”
“ फार नाही.प्रोप्रायटरी म्हणतात तसं.”एकाच माणसावर अवलंबून असलेली.
“ मुख्य कोण आहे?” पाणिनीने विचारलं.
“शाल्व धारवाडकर. नावाचा माणूस आहे."
“ किती स्टाफ आहे एकूण?”
“ दहा ते पंधरा. म्हणजे ऑफिसात पूर्ण वेळ काम करणारे पाच आणि ऑडीटर, टॅक्स चे काम करणारा.”
“ म्हणजे हे सात जण सोडले तर बाकीचे बाहेरची कामे करणारे आहेत?” पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“शाल्व धारवाडकर चं वय काय आहे?” पाणिनीने विचारलं.
“ चाळीस ते पंचेचाळीस ”
“ तोच सर्व बघतो? व्यवसायाचं?”
“ हो तोच प्रमुख आहे.”
“ त्याच्या खालोखाल कोण आहे?”
“ शुक्लेंदू धारवाडकर त्याचा पुतण्या.”
“ तुझ्या नंतर तुझा भाऊ किती दिवसांनी त्या कंपनीत लागला?” पाणिनीने विचारलं.
“ सहा महिन्यांनी.”
“ या सहा महिन्यात तुझा भाऊ काय करायचा?”
“ काहीच नाही.”
“ तूच मदत केलीस त्याला त्याच्या बेकारीच्या काळात आणि तुझ्या कंपनीत नोकरी पण तूच लावलीस?” पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“ नोकरी नेमकी कोणी लावली? शुक्लेंदू की शाल्व?”
“शाल्व ”
“ शुक्लेंदू शी काहीच नाही बोललीस या बद्दल?” पाणिनीने विचारलं.
“ नाही फक्त शाल्व शी ”
“ ऑफिसात बोललीस की.....”
“ नाही, एक दिवस माझं काम उशिरापर्यंत चालल होतं.जेवायची वेल झाली तेव्हा शाल्व म्हणाला की कंपनी तर्फे जेवण मागवूया.....”
“ म्हणजे ती संधी साधून तू त्याला विचारलंस की तुझ्या भावाला नोकरी मिळू शकेल का तिथे?” पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“ त्यावर शुक्लेंदू ची प्रतिक्रिया काय होती?”
“ त्याला विचारलच नाही मी.”
“ तू त्याला विचारलंस की नाही हा माझा प्रश्न नव्हता प्रचिती.शुक्लेंदू ची प्रतिक्रिया काय हा माझा प्रश्न होता.” पाणिनी म्हणाला
“ त्याचं म्हणणं होतं की प्रयंकला अत्ता घ्यायची गरज नाहीये.”
“ प्रयंकच्या कामाचे स्वरूप काय आहे?”
“ तो समन्वयक म्हणजे लायझनिंग ऑफिसर आहे. ”
“ त्याला पाच लाख रोख कुठून मिळाले?” पाणिनीने विचारलं.
“ मला नाही माहिती.”
“ तू नाही ना दिलेस?”
“ नाही सर.”
“ तुझ्या कडे आहेत ५ लाख?”
“ आहेत.”
“ त्याहून जास्त पण असतील?”
“ थोडे जास्त आहेत. पण बँक खात्यात.”
पाणिनी ने सर्व परिस्थितीचा आढावा घेतला.शांतपणे डोळे मिटले. मग अचानक तिला विचारलं, “ हा शुक्लेंदू तुझ्याशी कसा वागतो?”
“ मित्रत्वाच्या नात्याने.”
“ लग्न झालंय?”
“ हो.” प्रचिती म्हणाली.
“ बायकोला भेटली आहेस त्याच्या? कशी आहे?”
“ दोन तीन वेळा ऑफिसात आली होती.ओळख अशी नाही झाली.”
“ कशी आहे?” पाणिनीने विचारलं.
“ स्मार्ट आहे.खमकी वाटते.मी असं ऐकलंय, त्याचं वैवाहिक जीवन फारसे सुखी नाहीये.”
“ शुक्लेंदू ऑफिसातल्या इतर मुलींशी कसा वागतो? ऑफिसच्या वेळेनंतर तो त्यांना मुद्दाम थांबवतो? ”
“ असेल, पण मी ऐकल नाही नक्की नाही सांगता येणार.”—प्रचिती
“ तुला थांबवलं आहे त्याने कधी?” पाणिनीने विचारलं.ती अडखळली.पाणिनीने तोच प्रश्न पुन्हा विचारला.
“ हो.”
“ नंतर तुला रात्री जेवायला घेऊन गेला?”
“ हो.दोनदा.”
“ जेवताना त्याचं वागण कसं होतं? म्हणजे मुद्दामून जवळिक करणं वगैरे?” पाणिनीने विचारलं.
“ सगळेच पुरुष संधीचा फायदा घेतात पटवर्धन.”
“ तू तो अनुभव घेतलास? शुक्लेंदू कडून?”
ती गप्प राहिली.
“शुक्लेंदू आणि तुझ्या वयात किती अंतर आहे?” पाणिनीने विचारलं.
“माझ्याहून २ वर्षांनी मोठा आहे.”
“शाल्व आणि तुझ्यात किती अंतर आहे?”
“दहा- बारा वर्षांचे आहे.”
“ त्याला तू आवडतेस?”
“ हो.”
“ त्याचं लग्न झालंय?”
“ विधूर आहे तो.”
“ त्याचं वर्तन कसं आहे तुझ्याशी? वडीलकी सारखं?”
“ वडलांसारखं नाही म्हणता येणार, मित्रा सारखं. ऑफिसातल्या इतर मुलींशी सुद्धा तो तसच वागतो ”—प्रचिती
“ तुझ्या शिवाय किती जणी आहेत? ” पाणिनीने विचारलं.
“ तीन जणी. हिरण्या अलूरकर, टायपिस्ट, युक्ता बेहेल, शुक्लेंदू ची सेक्रेटरी, इला
इंगूळकर, टपाल आणि आवक जावक,फायलिंग वगैरे हाताळणारी मुलगी.”
“ एखाद्याला अफरातफर करायची असेल तर सोप आहे?” पाणिनीने विचारलं.
“ ज्याच्याकडे तिजोरी उघडायचे नंबर्स आहेत त्याला सहज शक्य आहे. आमची कंपनी मोठ्या प्रमाणात आयात निर्यात करते आणि टॅक्स वाचवण्यासाठी बरेच व्यवहार रोखीत करते.”
“ दोन नंबरचे व्यवहार.” पाणिनी म्हणाला “ पण याची जी व्हाउचर्स बनवली जातात त्याला माल पाठवल्याची किंवा आणल्याची चलने नसतात?”
“ मी ते बघणे अपेक्षित नाहीये. मालकाची सही आहे की नाही एवढंच मी बघायचं असं मला सांगितलं गेलंय.”-प्रचिती
“ त्यामुळे मग तुझ्या भावाला पाच लाख चोरणे सहज शक्य होतं.”
“ नाही पटवर्धन. माझा भाऊ तसा नाही.आणि तसा असता तरी त्याला ते शक्य नव्हतं, तिजोरीचे कोड नंबर माहिती असल्याशिवाय.”
“ कोड नंबर माहित असणारे कोण कोण आहेत?” पाणिनीने विचारलं.
“ शाल्व,शुक्लेंदू, मी, टॅक्स चे काम पाहणारा श्रेयस गोवंडे.”—प्रचिती
“ तुला त्याच्या घरात पाच लाख मिळाले, त्याने अपहार केला नाही, त्याच्या पगारातून तो एवढी बचत करू शकत नाही,मग त्याला कोणी दिले असतील पैसे?”
“ त्याच्या मित्रांनी केली असेल याला मदत.तो सर्वांचा खूप लाडका आहे.”
“ तू यात चांगलीच लटकली आहेस. तू आता एकाच गोष्ट करू शकतेस.सरळ देवनार ला जा.ऑफिसला रुजू हो.ऑडीटर जर पाच लाखाचा विषय विचारला तर हसून सांग की ती रक्कम कमी आहे पण बेहिशोबी नाहीये.तुझा भाऊ प्रयंक कंपनीच्या वतीने एक मोठे डील हाताळत होता त्यात कंपनीला मोठा फायदा होणार होता.त्यासाठी त्याला पाच लाख लागणार होते म्हणून मी दिले.पण शाल्व शी बोले पर्यंत ही रक्कम कुठे नावे टाकायची हे ठरवता येणार नसल्याने सध्या कोणतीही नोंद हिशोब पुस्तकात करू नको असं त्याने तुला सांगितलं. ”
प्रचिती ने समजले अशा अर्थी मान डोलावली.
“ आता पुढे ऐक,तुला भावाच्या घरी जी पैशांची बॅग मिळाली,ती रक्कम तुझ्या बँकेत भर आणि तुझ्या नावाने ड्राफ्ट खरेदी कर.तुझा भाऊ शुद्धीवर येईल तेव्हा सर्वात प्रथम तू त्याला भेटणे महत्वाचं आहे. ” पाणिनी म्हणाला
“ पण पटवर्धन, भावाला आलेलं पत्र! ते फार धमकी देणारं पत्र आहे.”
“ काय केलसं त्या पत्राचं?”
“ ते जाळून टाकलं मी.” प्रचिती म्हणाली.
“ तुझ्यासाठी पेपरात जाहिरात आली होती.हॉटेलच्या खाली टॅक्सीत बसलेल्या व्यक्तीला भेट अशा अर्थाची.” पाणिनी म्हणाला
“ तुम्हाला कसं कळलं?”
“ माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून अशा जाहिराती रोज वाचतो मी.पण तू त्या माणसाला भेटलीस?” पाणिनीने विचारलं.
“ नाही, मला त्या टॅक्सीत माणूस दिसला होता पण तो एकटा नव्हता,मला तो सापळा वाटला. ”
पाणिनी जरा विचारत पडला.अचानक त्याने कनक ओजस ला फोन लावला.
“ मला एक तातडीने स्त्री गुप्तहेर हव्ये.बावीस ते चव्वीस वयाची आकर्षक अशी.तिला डेल्मन हॉटेल मधे रूम नंबर ७६७ मधे जायला सांग.”
“ माझ्या कडे कारखाना आहे का रे पाणिनी? तू सांगशील त्या वर्णनाची बाई...... ” कनक ने वाद घालायचा प्रयत्न केला.
“ ती तिच्या हातात हँडबॅग शिवाय काहीही आणणार नाही.ती जवळच्या मॉल मधे खरेदी करेल आणि त्या वस्तू डेल्मन हॉटेलच्या रूम ७६७ मधे पाठवायला सांगेल.ती रूम प्रचिती खासनीस नावाने आहे, मॉल मधे तेच नाव ती सांगेल.” पाणिनी आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला.
“ ती प्रचिती खासनीस असल्याचेच भासवेल सर्वांना, म्हणजे वेटर्स, हॉटेल चे क्लार्क,म्हणजे त्यांच्याशी मुद्दाम गप्पा मारेल,काही न काही विषय काढून.आणि आपण प्रचिती खासनीस असल्याची छाप सर्वांवर टाकून खऱ्या प्रचिती ला सोडून जाईल.”
“ समिधा द्रविड नावाची एक मुलगी माझ्याकडे आहे, तुला हव्ये तशी, पण ती वयाने जरा मोठी आहे.” कनक म्हणाला.
“ पण ती वेळ मारून नेईल व्यवस्थित?” पाणिनीने विचारलं.
“ नक्कीच.”-कनक म्हणाला.
“ पाठव तिला ” पाणिनी म्हणाला आणि फोन बंद केला.
“ मग माझं काय?” प्रचिती ने विचारलं.
“ तुला सांगितल्या नुसार तू बँकेकडून ड्राफ्ट खरेदी कर आणि देवनार ला जा.”
“ पण माझ्या बॅगेचं काय? सामान घेऊन बाहेर पडताना हॉटेलचे लोक अडवणार नाहीत मला?”
“ मी याच मजल्यावर एक खोली घेऊन तिथे तुझं सामान ठेवेन. नंतर काही काळाने मी तुझी बॅग घेऊन खाली जाईन रूम चे बिल देईन आणि हॉटेल सोडेन.त्यांना कळणारही नाही की जातांना माझ्या बरोबर असलेली बॅग तुझी होती.” पाणिनी म्हणाला
“ आणि माझ्या जागी तुम्ही जी मुलगी आणणार आहात इथे तिचं काय?”
“ ती ब्लॅक मेलरला हाताळेल बरोबर.”
“ त्या रकमेच्या बदल्यात मी बँकेकडून ड्राफ्ट खरेदी केला तर मग ब्लॅक मेलरला काय द्यायचं आपण?” प्रचिती म्हणाली.
“ आपण काहीच नाही द्यायचं त्याला.कारण ब्लॅक मेलरला पैसे देणे हे कंपनीच्या धोरणात बसणारी गोष्ट नाही.”
“ पण तुम्ही टाळणार कसे ब्लॅक मेलरचे पैसे? ”
“ मला नाही माहित.वेळ पाहून ठरवेन मी. तू तुझी बॅग भर. मी आता खाली जाऊन दुकानातून नवीन बॅग आणतो. इथेच सातव्या मजल्यावर खोली घेतो.तू इथेच थांब मी येई पर्यंत.वचन दे मला तसं.”
“ वचन देते.”
“ आणि कुठलाही फोन घेऊ नको.” पाणिनीने बजावलं.
“ नाही घेणार.” तिच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. “ मी पहिल्यांदा तुमच्या ऑफिसात आले तेव्हाच मी सगळ सांगून टाकायला हवं होतं तुम्हाला,असं आता मला वाटायला लागलय.”
“ बरेच क्लायंट असंच करतात.स्वत:ला हुशार समजतात आणि वकीलाला काय माहिती द्यायची,काय नाही हे ते स्वत: ठरवतात. तू प्रथम भेटीत मला कल्पना दिली असतीस तर आपण त्या ऑडीटरच्या पुढची हालचाल केली असती..आता समजा तुझा भाऊ गेला आणि तू बँकेत जाऊन ड्राफ्ट आणण्यापूर्वी पोलिसांनी तुला अटक केली तर, तुझी स्थिती बिकट होईल. ” पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडला.
( प्रकरण ३ समाप्त.)

गोष्ट आवडल्यास कॉमेंट जरूर करा आणि आपल्या परिचित आणखीन दोन वाचकांना कथेबद्दल कळवा.