आधी गेली अक्कल in Marathi Crime Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | आधी गेली अक्कल

Featured Books
Categories
Share

आधी गेली अक्कल

आधी गेली अक्कल …..
पडवण्यातले पापा करंगुटकर पंचक्रोशीत मालदार असामी म्हणून प्रसिध्द! चार साडेचारशे कलमाच्या दोन बागा, मच्छिमारीच्या सहा पाती (मोठ्या होड्या) चार ट्रक नी कायम मजूरी वरचे पन्नास गडी एवढा मोठा बारदाना . ते चारही भाऊ एकत्र रहायचे , पण मोठं कुटुंबनी दहाबारा गडी कायम जेवायला असायचे म्हणून त्यांची दोन घरं होती, एका घरात कुटूंबातली माणसं रहायची नी दुसऱ्या गडी माणसं आला गेला यांचा वावरअसायचा. तशी देवगडला त्यांची वखार होती तिथून बाहेर गावानी मासळी पाठवली जायची. आलटून पालटून एकेक भाऊ तिथे असायचा. तसंच तळेबाजारातही पेठेत मोठं घर होतं . रस्त्याच्या दर्शनी भागात किराणा दुकान नी आतल्या भागात निवासाची सोय होती. तिथे पापांची दुसरी बायको राधा मयेकरीण रहायची. पापा आठवड्यातून दोनतीन दिवस गावात नी बाकीच्या वेळी तळेबाजारात मुक्कामाला असायचे. पडवणं एका बाजूला असल्यामुळे पापांचा गोवा दारूचा चोरटा धंदा नी स्मगलिंगही चालायचं. गोव्याहून मुंबईला पॅसेंजर घेवून जाणाऱ्या बोटीतून दारू यायची. विजयदूर्ग बंदरालगत दर्या खोल नसल्यामूळे बंदरा पासून अर्धामैल लांब खोल पाण्यात बोट नांगर टाकून थांबे नी मोठा भोंगा होई . मग बंदरातून पॅसेंजर भरून पडाव सुटत . पापांच्या मच्छिमारी करणाऱ्या होड्या त्या भागातच थांबलेल्या असायच्या .पॅसेंजर येईपर्यंतच्या मधल्या वेळात माल उतरवून घेवून होड्या पडवण्या कडे रवाना व्हायच्या.
पडवण्यात जायला जवळची वाट म्हणजे तरी पलिकडे आबू जोशाच्या घरामागची घाटी चढून जावं लागे. घाटी म्हणजे नुस्ता उभा शूळ पहिलं मोडण गाठी पर्यंत पोटऱ्यांमधे गोळे यायचे नी कानशिलं गरम व्हायची. कितीही ताकदवान गडी असला तरी तो एवढा गळाठून जायचा कि, कडेला असलेल्या धोंडींवर बूड टेकून दम खाल्ल्याशिवाय रहात नसे. ह्या मोडणापासून सडा सुरु व्हायचा नी पुढच्या मोडणावर घाटी संपेपर्यंत सतत वाऱ्याच्या झुळुका येत राहिल्यामुळे जादा हैराणी होत नसे. पण हा टप्पा संपता संपत नसे.नव्याने घाटी चढणारा जाम कंटाळून जायचा नी एकसारखं अजून किती मकाण राहिलं? कधि संपणार ही घाटी? विचारून विचारून सोबत्याला हैराण करीत असे जस जसं मोडण संपत येईल तसतसा वाऱ्याचा वेगही जरा वाढायला लाग़ायचा. घाटी संपून सड्याचा सवथळ भाग सुरु झाला कि डाव्या मावळतच्या दिशेला पडवण्याची वेळा दिसू लागे. पाढरी शुभ्र वाळू नी त्यापुढे पार क्षितिजापर्यंत गेलेला निळाशार दर्या हे दृष्य एवढं विलोभनीय असे कि घाटी चढून आलेली हैराणी कुठच्याकुठे पळून जात असे.
उजव्या उगवतच्या बाजूला अडिजेक मैलाच्या अंतरावरचं गोवळातल्या ईश्वराच्या देवळाचं त्रिकोनी शिखर दिसत असे. त्याच्या बाजुला सडेवाड्करांची दहावीस घरं नी विजयदुर्गातून येणारा कच्चा रस्ता गेलेला दिसायचा. मागच्या अंगाला खूप सखलवटीत गाबतडीच पाजं नी तरीवरचं हनुमंताचं वीतभर उंचीचं देवूळ बघितल्यावर आपण किती उंचावर चढून आलोय ह्याचा नेमका अंदाज यायचा. ह्या सड्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथेबारा महिने बत्तीस काळ सतत वारा असायचा. मध्यरात्रीच्या दरम्याने मतलय बंद होवून दर्या वरचा खारा वारा सुटायचा तेंव्हा तर वाऱ्याला जास्तच वेग असे. पाऊसकाळात तर दिशा काळवंडून मुसळधार पाऊस सुरु झाल्यावर वाऱ्याच्या अशा काय कावट्या सुटायच्या कि , पाऊल पुढे टाकणं दुस्तर व्हायचं नी माणसं सर ओसरेपर्यंत झाळीच्याआडोशाला बसून रहायची. वीसेक मैल औरसचौरस पसरलेला सडा म्हणजे सगळं फोंडं जांभं कातळ. पण गोवळाची हद्द संपून पडवण्याची शीव सुरु झाली जसजसं पुढे जावं तसतशा चार पाच एअराच्या खरी सुरु झालेल्या दिसत. खरी म्हणजे कातळाच्या सखलवटीत मळीसाठून बनलेली जमिन. काही खऱ्यां मध्ये तर कमरभर ... गळाभर उंच माती नी कडेनी वाव दोन वाव भागात उडदा एवढी नी मोहरी एवढी रेव साठलेली असे. दरवर्षी पावसात व्हावटीच्या पाण्याने त्यात भरच पडायची. सड्यावरच्या गाबतांच्या खरीत तर पांढुरक्या रंगाची वस्रगाळ माती मिळे ती आजूबाजूच्या गावातले मूर्तिकार गणपती बनवायला न्यायचे. सड्याचा उतार पडवण्याच्या देशेने तीव्र होत गेलेला होता नी त्या भागात मोठ मोठ्या हांजी मिळायच्या.ह्या हांजी व्हावटीतुनआलेल्या सुपिक मातीने भरलेल्या असायच्या. अधूनमधून हांजी धरून गच्च झाळी वाढलेल्या असायच्या. त्याला आळे म्हणत. काय काय आळ्यांचा घेरा दोनतीन एकराहून जादा भरला असता तर नी खैर, करंदी नी वाकेरीचं असं काटेरी गचवण वाढलेलं होतं की आत शिरणंही मुश्किल. अशा काही आळ्यांमध्ये डुकरांची हुकुमी बसल असायची. पडवण्याच्या पावणाईची जत्रा भरे त्यापूर्वी आठवडाभर गाव पारध व्हायची. देवीचा कौल झाल्यावर गावकरी सड्यावरचे असे अळे धरून रान काढीत तेव्हा दोन तीन डुकर, पाचसहा ससे नी भेकरी हुकुमी मिळायची. मात्र एरवी वर्षभर गावातल्याना पारध करायची बंदी होती.
सड्यावर दोनतीन ठिकाणी कतळावर असलेल्या खोलगट तळपांमध्ये बारमास पाणी मिळे. गावदरी जवळ उताराला नी टापूवर म्हाजन, केळकर, पडवळ,करंगुटकर, तावडे , नरसुले, लिंगायत नी गाबीत , तेली यांच्या हापूस कलम बागा होत्या. ते लोक कातळात रांजणाच्या आकाराचे खड्डे खोदीत. त्यांच मुख माणूस जेमतेम वाटावेल एवढं दोन वीतीचं गोलाकार असे नी आतला भाग मात्र चांगला ऐसपैस नी उंची पुरुषभर असे. पावसाळी व्हावटीच्या पाण्याने रांजण भरले कि मुखाकर आंजणी कुंभ्याचे टाळे टाकून त्यावर पातळ पसरट दगड ठेवून झाकून ठेवीत. कार्तिका पासून तो मृगाची शितडी पडेपर्यंत एक दिवस आड कलमं शिपावी लागत. असं दोन सिझन शिंपणं केलं की मग पाण्याची गरज नसे. जामसंड्याला मोरोपंत गोगट्यानी कलम लागवड सुरु केली तेंव्हा पडवण्यातल्या बापूराव केळकरानीही गावदरीकडून सड्याकडे जाणाऱ्या घसरडीच्या भागात कलमं लावायची सुरुवात केली.त्यांच्या ठिकाणात कातळात एक पुरातन रांजण होता.त्यात पावसाळी पाणी साठलेलं असे. त्यापासून प्रेरणा घेवून त्यानी पाणी साठवणासाठी रांजण खणून घेतले. ते पाणी पुरवेल एवढ्या बेताने दर दोन वर्षाआड दहा पंधरा कलमं लावीत लावीत मोठ्या बागा उठवल्या. त्यांचं बघून मग गावात इतरानीही रांजण खोदून बागा उठवल्या. कातळवट उताराची जमिन, खारावारा नी दिवसभर मोकळं उन्ह असं हापूस कलमाना मानवणारं हवामान असल्यामूळे इथल्या कलम बागा अख्ख्या देवगडात आगप माल येणाऱ्या म्हणून प्रसिध्द होत्या. इथल्या मालाला रंगही चांगला नी सतत वाऱ्यामुळे मालही निर्मळ असायचा.
इथला दर्यातर अत्यंत धोकेदायक .... किनाऱ्यापासून पंचवीसेक फूटापासून एकदम खोल गर्ता होत्या. नवखा माणूस मजेत लाटा घेत घेत कमरभर पाणी होईतो पुढे पुढे जात राही त्यापुढे उताराची खोल भाग सुरु झाला कि अकस्मात पाण्याला कमालीची ओढ असे . काय होतं हे कळण्यापूर्वी माणूस आत खेचला जायचा. कायम कमरभर तर अधे मधे पुरुषभर उंचीच्याही लाटा घोंगावत यायच्या नी त्यांचा आवाजही घुमायचा. वैशाखा अखेर पडवण्याच्या वेळेची म्हणजे दर्याची गाज आजूबाजूच्या तीन चार गावांपर्यंत ऐकायला जायची की,“ पावस् जवळ ईलो” असं लोक समजायचे. किनाऱ्याच्या उजव्या दिशेला चार मैल अंतरावर देवगड आणि विजयदूर्ग बंदर सातेक मैलावर. गावातल्या बहुसंख्य भंडाऱ्यांचा नी गाबतांचा मासेमारीचा व्यवसाय असल्यामुळे किनाऱ्यावर दहाबारा ठिकाणी कायम होड्या, पडाव बांधायचं काम बारमास सुरु असे. कलमा बागा नी मच्छिमारी मुळे गावात सगळ्या घरवडी सधन नी चार पैसे बाळगून असायच्या. गाव चौदा वाड्यांचा , नी बहुसंख्य घरं चिरेबंदी नी माडीची. औरस चौरस पंधरा हात मापाचा मधला चौक उंच उठवून माडी काढलेली असे नी त्यावर स्वतंत्र छप्पर असायचं. चौकाच्या चारही अंगानी बसक्या छपराच्या पडव्या काढलेल्या असत. बारमास कायम जोराचा वारा असल्यामुळे छपरं जमिनीला टेकतील इतकी , बसकी ठेवायला लागत. बहुसंख्य लोकांची घरं ऐसपैस नी एकाच धाटणीची.सगळ्या घरांमध्ये उंच बांधणीची पापा भंडाऱ्याची दोन्ही घरं मात्र लांबूनही नजरेत भरायची.
हापूस कलमांचं ठोक उत्पन्न आणि मच्छिमारीचा बिनभांडवली पण चलतीचा धंदा यामुळे पडवण्याला सुखवस्तू लोकांचा गाव समजत. सणासुदीच्या दिवसात तर पडवण्यातलं वैभव दृष्ट लागण्यासारखं असायचं. गणेश चतुर्थीत मोठे मोठे गणपती नी देखावे यांची चढाओढ असायची. गाबीत , भंडारी यांच्या घरात सहासात फुटी भव्य मूर्ती असायच्या. शिवाय गणपतीच्या शेजारी पुराण कथांच्या संदर्भावर आधारित गरूड, मारुती, समुद्रमंथन, दशावतार , जटायु रावण युध्द असे मूर्तींचे सीन असत.एकट्या गणपतीक काय शोभा नाय,अगदी काय नाय तर निदान भावली तरी( गौरी च्या रुपात स्त्री मुर्ती ) व्हयीच असं लोक म्हणत . त्यातही पापांचा गणपती अख्ख्या गावात सगळ्यात मोठा नी सोबत दोनतीन तरी अन्यमूर्ती असत. त्यांचा गणपती विजयदुर्गच्या प्रख्यात तारकर पेंटरांकडून आणीत. पडवण्यातले सगळे गणपती अनंत चतुर्थीपर्यंत असत. मोठे गणपती नी सीन असायचे म्हणून आजुबाजूच्या गावातल्या बायाबापड्या नी पोरं मुद्दाम गणपती बघायला पडवण्यात यायची. चतुर्थीच्या दहा दिवसात दर्शनाला येणाऱ्याना मूठभरून साखर फुटाणे,बत्तासे. पेढे, मोसंबी सफरचंदाच्या फोडींची खिरापत घरोघरी वाटीत असत. पापांकडेतर दुपारी अकरा वाजल्या पासून ते अडीच वाजेपर्यंत जे कोण दर्शनाला येतील त्याना आग्रह करकरून महाप्रसाद वाढला जाई. नोकर‌-चाकर ,कामगार ह्याना पापा हात सोडून मजूरी देत. गावातही अडल्या नडल्याला मदत मिळायची. पंचक्रोशीतल्या सार्वजनिक नी देवस्थानांच्या कार्यात,जत्रा‌- सप्ते यात तर ते भरभरून पैसा पुरवीत. म्हणून पंचक्रोशीतले लोक पापाना मोठा मान द्यायचे . त्यामुळे त्यांच्या अवैध धंद्यांविरूध्द खबर देणं दूरच , उलट लोक त्याना सहाय्यच करीत .
विजयदूर्गात कस्टमवाले असायचे. त्यांना गस्तीसाठी बंदरातल्या मच्छिमारांच्या होड्याच घ्याव्या लागत. त्या होडीवाल्यांचे नी पापांचे लागेबांधे असायचे. तसेच पापांचे खबरेही बंदरात पेरून ठेवेलेले असायचे. कस्टमवाले गस्त घालायला सुटले की होडीवाले निशाणाच्या काठीला पांढरा फडका बांधित, काही वेळा कस्टमवाले सुटण्यापूर्वीच खबरीवाल्यांच्या होड्या पुढे रवाना होत. त्यामुळे पापांची माणसं किंवा माल कस्टमच्या कचाट्यात कधिही गावत नसत. गावातल्या घरात तर ते चुकूनही माल ठेवीत नसत. सड्यावरच्या बाग़ांमध्ये पाणी साठवणाच्या रांजणातून आणि गच्च झाडकळ वाढलेल्या आळ्यांमध्ये माल दडवलेला असे. ती ठीवंही स्वत: पापा नी त्यांचे भाऊ यानाच ठाऊक असायची. पापांचा पोलिस स्टेशनला नियमित हप्ते देण्याचा प्रघात नव्हता. अधूनमधून स्मगलिंगचा माल उतरल्यावर पोलिसाना खबर मिळायची नी पोलिसांची रेड पडायची. घरादाराची झडती व्हायची पण एकही आक्षेपार्ह वस्तू पोलिसाना सापडत नसे. देवगडला वखारीजवळ मासळी ट्रकात चढवीत तेव्हा मच्छीच्या फाटीतून माल रवाना व्हायचा. मच्छिमारीत टाकावू मासे सुकवून त्याची कुटी खत म्हणून विकली जाई .त्या कुटीच्या पोत्यांच्या आडोशाला मालाचा स्टॉक असायचा पण कुटीचा असा जीवघेणा परमळ सुटलेला असे की कुटीची पोती चढवणारे हमालसुध्दा दारु प्याल्याशिवाय अर्धा तास तासभर थांबून काम करू धजावत नसत.
पोलिस नी त्यांचे खबऱ्ये पापांच्या पाळतीवरअसायचे पण मालाची देवघेव त्यांच्या विश्वासू माणसांकरवी व्हायची. एकदा दुबईहून सोन्याचा मोठा स्टॉक घेवून अरब जयगडलाआलेला होता. तिथल्या एजंट ला एक रकमी एवढा व्यवहार झेपणारा नव्हता म्हणून त्याने पापांना भेटायला हस्तक पाठवला. निरोप मिळाल्यावर तिन्ही सांजेला पापा रक्कम घेवून बाहेर पडले. अरब देवगड बंदरात वेळेबाहेर (मोठ्या बोटी किनाऱ्या पासून ठराविक अंतरावरून खोल पाण्यातून जातात त्या भागाला वेळा म्हणतात ...) थांबलेला होता. एजंटच्या हस्तका बरोबर होडीत बसून पापा निघाले. ते संशयास्पद रित्या निघाल्याची वार्ता खबऱ्यांकरवी कळल्यावर पोलिसही त्यांच्या मागावर निघाले. अरबाच्या लाँचजवळ होडी उभी करून पैशाची बॅग घेवून पापा लाँचवर चढले नी दहा मिनिटात पोलिसांची होडी आली. देवग़डचे ठाणेदार दरेकर नी त्यांचे दोन सहकारी सोबत होते. होडीजवळ आल्यावर पापा रिव्हॅाल्वर रोखीत स्वत: समोर आले, “तू फक्त आकडो बोल....उद्या दोपारसर रक्कम पोच होयत्” त्यानी समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची ऑफर धुडाकावून लावीत तो पोलिसी खाक्यात गुरकावून म्हणाला , “ मी लाँच जप्त करून पंचनामा करणार .... लाँच बंदराकडे घ्या. ” हा ऐकणार नाही हे ओळखून पापानी त्याच्या छातीवर दणका मारून त्याला दर्यात लोटून टाकले . सोबतच्या पोलिसाना, “जीव हवो आसलो तर आमच्या पाटना येव नुको ....... आदी सायब बुडताहा त्येका होडयेत घ्येवा नी बंदर गाटा.” असा दम भरून त्यानी सोबत्याना इशारा केला . त्यासरशी त्यानी धडाधड होडीत उड्या टाकल्याबरोबर लाँचही सुरु झाली नी पापांची होडीही सुटली.
पापा बंदरावर पोचले नी माल घेवून रातोरात पडवण्याला रवाना झाले. माल निर्गतीला लावून सकाळी विजयदूर्ग डेपोच्या गाडीने ते रत्नागिरीला गेले. दहा वाजता देवगड, तळेबाजार इथे शोध घेवून पोलिसांची जीप पडवण्यात गेली. त्यांच्या तीनही भावाना अटक झाली. देवग़डच्या वखारीतले नोकर, तळेबाजारच्या दुकानातला नोकर नी पापांची दुसरी घरवाली अशी बऱ्याच लोकाना लॉकअपमध्ये टाकले. माणसाना मारझोडही झाली पण पापांचा नी मालाचा ठावठिकाणा कोणालाच सांगता आला नाही. दोन दिवसानंतर पापा सकाळच्या विजयदुर्ग गाडीने रत्नागिरीला गेल्याचा माग लागला. तिसऱ्या दिवशी काळबादेवीतल्या मयेकरांकडे त्यांची चुलत आत्ते बहिण दिलेली होती तिच्या घरी जावून पोलिसानी त्याना ताब्यात घेतले. रत्नागिरीतल्या प्रसिद्ध करमरकर वकिलानी त्यांच वकिलपत्र घेतलं नी चारच दिवसात सगळे जामिनावर सुटले. त्यादरम्याने दरेकरांची वर्ध्याला बदली झाली. दहा वर्षं तारखांवर तारखा पडत राहिल्या नी नंतर पापांसह सग़ळेच निर्दोष सुटले.
तळेबाजारात गावाबाहेर कालवीत जाणाऱ्या वाटेवरच्या एक दोन घरांमध्ये पापांचा दारूचा स्टॉक ठेवलेला असायचा . गावातले दोन गडी अर्ध्या कापलेल्या गोणपाटात दहाबारा बाटल्या भरून तळेबाजारात दुकाना शेजारी बसून रहात. गिऱ्हाईकाने दुकानात पैसे दिले की सांकेतिक खूण केली जाई नी बाहेर बसलेला गडी गुपचूप बाटली काढून देई. तळेबाजारात दुकानावरही अधे मधे पोलिस छापा मारीत पण तिथेही पोलिसाना हात हालवीत परत जावे लागे. आजुबाजूच्या गावानी दारवेची फायटं पोचवायचं काम अर्ध्या वयाच्या गाबतिणी किंवा कुळवाडणी करीत.टोपलीत तळी माल नी वर मासे ठेवून राजरोसपणे नी बीनबोभाट माल पोच केला जायचा. ह्या बायकाना बघून कधिच कोणालाही संशय येणंही शक्य नव्हतं. आजूबाजूच्या गावानी पोचवायचा इतर ऐवजही पाटीवाल्या बायांमार्फत पोच केली जात असे. डोकीवर मच्छिच्या पाट्या घेवून जाताना गावदरीबाहेर माल त्याना दिला जाई. रकमेची वसूलीही त्याच बायका करून आणित असत.
तळेबाजारात पोलिस आऊट पोस्ट सुरु झाले तेंव्हा वेंगुर्ल्याकडचा पाटकर कोतवाल आणि दोन अन्य हवालदार ठाण्यात हजर झाले. पाटकराचा सासरा तेंव्हा जिल्हाबोर्डाचा मेंबर असल्याने तो भलताच गुर्मीत रहायचा. त्याला बाहेरचा नाद होता.बुधवारी आठवडाबाजार भरायचा त्याला कालवीतल्या गाबतिणी मासे विकायला यायच्या. त्यांच्या जथ्यात एक दांडगी दुंडगी, उजळ वर्णाची बाई असायची. बाजारात फिरताना पाटकराची तिच्यावर नजर गेली. त्याने हवालदाराला पाठवून तिला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिस ठाण्याची इमारत बाजारापासूनजरा लांब एकवशी होती. तिला लांबून इमारत दाखवून हवालदार निघून गेला. बाई इमारती जवळ गेली नी बाहेरूनच सायेब सायेब करून हाका मारल्या. पाट्कराने तिला आत यायची खूण केली. बाई आत जायला तयार होईना. “तुमका माशे होये तर भायर् येवन् घ्येवा..... मी भूतू येन्या सारक्या नाय.” पाटकर प्यालेला होता,बाहेर येवून “ लय नकरे करू नुको...हय कोन बगूक नाय हा....तुका धा रुपाये द्येन....” असं सांगून तो तिला हात धरून ओढायला लागल्यावर त्याचा हात झिंजाडून पाटी तिथेच टाकून ती पळाली. ती पळाली नी रडत रडत पापांच्या दुकानात गेली. पापांच्या पाया पडून तिने कोतवालाची आगळिक सांगितली. पापानी त्याला बोलवायला गडी पाठवला.
पाटकर कोतवालाला पापांचा निरोप सांगून पाटीवालीची पाटी घेवून गडी माघारी आला. पाच मिनिटात कोतवाल येताना दिसल्यावर पापा बाईला घेवून दुकाना बाहेर गेले . कोतवाल जवळ आल्यावर, “आमच्यो बायाबापड्यो रस्त्यार पडलेलो म्हाल समाजलंस कायरे कोतवाला.....” असं म्हणत काडकन त्याच्या अशी कानफटात मारली की गडी भेकांडला. “ पुन्ना रूपी खैच्या बायल मानसा कडे डोळो वर करून बगलस ना तर तुज्ये डोळे फोडीन ” बाजारात हमरस्त्यात हा प्रकार घडला. आजूबाजूचे व्यापारी जमले . रागरंग बघून “तुका लॉकप मदी टाकतय” अशी पोकळ धमकी देत कोतवालाने काढता पाय घेतला. त्या संध्याकाळीच पाटकर कोतवाल निघून गेला नी दोन दिवसानी नवा कोतवाल तळेबाजारात हजर झाला.
दहा बारा वर्षात पापा भलतेच गबरगंड पैसेवाले झाले. दोन जीप आल्या , पाच मोटार लाँची नी तीन मर्सिडीज ट्रक आले. चार बाजूनी वहाती गंगा सुरु झाली. त्यांची स्वत:ची ट्रकभर मासळी रोज कोल्हापुरला जायला लागली.बोटी बंद झाल्या नी गोवा दारू बंदझाली.त्याऐवजी त्यानी उन्हाळी सिझनला आंबा ट्रान्सपोर्ट सर्विस सुरु केली आता सोन्या‌-चांदी व्यतिरिक्त इतर स्मगलिंगही त्यानी बंद केले. सोन्याची ही चढाओढीने खरेदी ते टाळीतच. पण माल घावूक असेल तेव्हा एक रकमी एवढी मोठी रक्कम देणारा मिळाला नाही की एजंट लोक त्या पार्टीला पापांकडे पाठवीत. पापा समक्ष व्यवहार करीत नसत. त्यांचे दोन विश्वासू हस्तक आबा बेळणेकरआणि बाबू तेली खरेदी नी विक्री दोन्ही व्यवहार सांभाळीत नी भरपूर कमिशन काढीत. कदाचित पोलिस केस वगैरे झालीच तर पापा भक्कमपणे त्यांच्या पाठीशी रहात. आबा नी बाबू अँबेसेडार मधून फिरायचे. एरव्ही उन्हाळी आंबा ट्रान्ससपोर्ट आणि मच्छीमारी या व्यवहारावर त्यांची नजर असायची .
सांगली, कोल्हापूरचे मोठे पेढीवाले सोन्या चांदीची ठोक खरेदी पापांकडे करीत. बेळणेकर नी तेली या व्यवहारात मधल्यामधे कमिशन काढतात हे पेढीवाल्यांच्या लक्षात आल्यावर काही पेढीवाले गाड्या काढून समक्ष देवगडला येवून पापांची भेट घेवून सौदा करू लागले नी दोघांचे कमिशन बंद झाले . अर्थात माल पोच करायची व्यवस्था त्यानाच जावे लागे. सलग चार पाचवेळा विक्रीचे व्यवहार असे परस्पर झाल्यावर त्यानी आपापसात संगतमत करून नामी युक्ती शोधून काढली. सांगलीतल्या पेढीवाल्याला चाळीस किलो चांदी नी दहा किलो सोनं एवढा घावूक माल पोच करायचा होता . नेहेमीप्रमाणे मासळीच्या लाकडी बॉक्सांमध्ये भरून माल रवाना झाला. ऐवज पाठवायचा असेल असे अशा वेळी बाबा किंवा बाबू दोघांपैकी एकजण मागून पुढून सुटत असे. गाडी मार्केटला पोचण्यापूर्वी वाटेत निर्मनुष्य भागात माल उतरून घेतला जात असे नी भाड्याची कार ठरवून माल पार्टीला पोच केला जातअसे. रात्री अकरावाजता बावडा घाटात पोलिसानी ट्रक अडवला. ताडपत्री बाजूला करून हौद्याच्या डावी कडच्या तीन रांगा चाळवून ऐवजाच्या चार पेट्या उतरून घेतल्या नी ट्रकवाल्याला जायला सांगितलं. आपल्या गाडीत असा काही ऐवज आहे ही गोष्ट ट्रकवाल्यालाही माहिती नसे. तिथून सुटल्यावर चंबुखडीच्या अलिकडे बाबू तेल्याने ट्रक थांबवला . पोलिसानी घाटात गाडी उभी करून मासळीचे चार बॉक्स घेतले ही बाब ड्रायव्हर क्लिनरने त्याना सांगितल्यावर त्याने पार्टीला समक्ष भेटून घाटात रेड टाकून पोलिसानी माल जप्त केल्याचे सांगितले नी तो टाकोटाक देवगडला आला.
पापाना भेटून घाटात पोलिसानी रेड टाकून माल जप्त केल्याची बातमी त्याने सांगितली. पंचनामा वगैरे काही न करता पोलिसानी माल हडप केला ही आश्चर्याची गोष्ट......पण कोर्ट केस ही झंझटं मागे लागण्यापेक्षा जे झालं ते ठीक ..... “सरसलामत तो पगडी पचास ” असं बोलून पापानी झाल्या प्रकरणावर पडदा टाकला. दोन दिवसानी ट्रक ड्रायव्हर नी क्लिनरला बोलावून पोलिसानी रेड कशी टाकली.... काय काय झालं त्याची नीट चौकशी केली. गाडीत मच्छीचे ऐंशी बॉक्स भरलेले होते, केवळ अर्ध्या तासात त्यातले मालाचे बॉक्स अचूक शोधून ते पोलिसानी जप्त केले याचा अर्थ उघड होता..... धंद्यातल्या माहितगार माणसाने पोलिसाना टीप दिलेली असणार ..... ! हा विषय कानी पडल्यावर पापांची दुसरी बायको म्हणाली, “ मी तुमका सांगतय ...... पोलिस बिलिस सगळी बंडलबाजी आसा.... किती वर्सा ह्यो धंदो सुरु हा, पोलिसानी कितीव पिचाटलानी तरी टरकातले सगळे पेटये खोल्ल्याशिवाय म्हाल तेंच्या हातीत गवासणां शक्य नाय.... ह्या पोलिसांचा काम नाय ..... घरभेद्यानी बनाव करून तुमच्या टकल्यारसून हात फिरवल्यानी हा . चोर तुमच्या बगलेत ऱ्हवणारे.... त्या बेळणेकरान् ही वाणी मोड दाकवल्यान नी नी तो चामटो तेली तोदुकु सामिल हा. लय तेंका टकल्येर चडौन ठेवलाहास तेचे ह्ये परिणाम ...... सगळ्या येवारात त्ये मलय खातत तरी समाधानी नाय.... ”
“तुजो अंदाज हजार हिश्यान बरोबर हा...... माज्या टकल्यार हात फिरवणारो आजून जलामलेलो नाय. माका ..... ह्या बाराबंदरचा पानी खालेल्या भंडाऱ्याक वाणी मोड दाकवनार ? माजो भंडारी दणको बगलानी काय पाटलोनीत नाय मुतले भडये तर माका दोन बापसाचो समज तू राधे..... माका जां काय सांगलस ना तांमातर खयपण वकू नको , नायतर भडये सावद व्हती.म्हाल जसो ग्येलो तसो परत येयत की नाय बग तू ” पापानी ग्वाही दिली नी कसा काय सापळा रचायचा तो बेत आखला. चार दिवसानी काहीतरी निमित्त करून बाबू तेली नी आबा बेळणेकर दोघानाही लाँच मधून विजयदूर्गला जायला सांगितलं. लाँच नजरेच्याटप्प्या बाहेर पोचली नी काय होतय हे कळण्यापूर्वीच तांडेलानी दोघानाही पकडून त्यांचे हातपाय बांधले नी लाँच बंदकरून नांगर टाकला. “ ह्या तुमी काय येवजलास? ” आबाने विचारल्यावर जग्या तांडेल म्हणाला, “वांयच दम धरा, मोटो डोस देवचो हा... पापा येतलेच धा मिंटात.” त्याप्रमाणे दहा मिनिटानी पापा आले. “ रे जग्या , ह्येंका जरा खारा पानी खावंदे ,म्हंजे घाटातखालेलो म्हाल वकॉन पडात... ” त्यांच्या रडण्या भेकण्याकडे लक्षन देता तांडेलानी त्याना दर्यात टाकलेनी. दोनतीन मिनिटं पोटभर खारं पाणी खायला लावून त्याना वर ओढून घेतल्यावर दोघानाही भडाभड ओकाऱ्या झाल्या. जरा सावध झाल्यावर तेली म्हणाला,“ पापा , वाणयाच्या नादाक लागॉन तुमचा श्यान खाला मी ..... ” मग मात्र बेळणेकरानेही तोंड उघडलं नी नकली पोलिस पाठवून आपणच माल कसा हडप केला ते खडाखड सांगून टाकलं .
“म्यानेजरगिरी करीत लय मलय खालास तरी तुमची समादानी नाय झाली....... खालेल्या ताटात हगलास भडव्यानो तुमी.... पन खावचा कसा ह्येच्या पक्षी खालेला पचवायचा कसा? ह्या येवजूक अक्काल लागता ती कमी पडली तुमची... तुमी शाप भयाक्री , म्हणान आदी गेली अक्कल नी मग्ये झाली नक्कल म्हंतत तशी तुमची गत झाली . पोलिसानी टरक अडवल्यावर लगेच हौद्यातल्यो म्हालाच्यो पेटयो उज्जू सोदून काडलानी ह्यां माकां कळलां ना तवाच तुमचां बिंग फुटला येडझयानो! तुमका अशे सोडणार नाय मी.... माल खय दडवलाहास तेचो ठिकाणो सांगा.... माजे तांडेल थंय जावन म्हाल घ्येवन इले की तुमका सोडीन ” पापानी पुरता डाव टाकलेलाआहे हे दोघेही समजून चुकले . माल घरी दडवलेला होता. आलेल्या माणसांकडे माल द्यायला बायकाना चिठ्ठ्या लिहून दिल्यावर पापांचे तांडेल निघाले. संध्याकाळी काळवं पडताना माणसं माल घेवून परत आली . माजी युक्ती आता फुटली ......म्हाल पाटवूक आता येगळी यवजना करूक झाली..... ह्येंका माज्या सगळ्या येवारांची आतली म्हायती हा.... ह्येंची बोलती बंद करूनच ह्येंका सोडूक व्हये नायतर ह्ये सापासारको डूक धरती. दोघानाही भरपूर दारू पाजून पापानी त्यांच्या जीभा छाटून टाकल्या नी त्याना विजयदुर्ग बंदरात उतरून टाकायचं फर्मान सोडलं.

※※※※※※※※