कोरोनाची तिसरी लाट in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | कोरोनाची तिसरी लाट

Featured Books
  • उजाले की ओर –संस्मरण

    मनुष्य का स्वभाव है कि वह सोचता बहुत है। सोचना गलत नहीं है ल...

  • You Are My Choice - 40

    आकाश श्रेया के बेड के पास एक डेस्क पे बैठा। "यू शुड रेस्ट। ह...

  • True Love

    Hello everyone this is a short story so, please give me rati...

  • मुक्त - भाग 3

    --------मुक्त -----(3)        खुशक हवा का चलना शुरू था... आज...

  • Krick और Nakchadi - 1

    ये एक ऐसी प्रेम कहानी है जो साथ, समर्पण और त्याग की मसाल काय...

Categories
Share

कोरोनाची तिसरी लाट

कोरोनाची तिसरी लाट

म्हणता म्हणता कोरोना देशभर पसरला. कणकवली परिसरात कोरोना पसरला. पंधरा दिवसात कोरोनाने वीस बळी घेतले. मग हळू हळू आजुबाजूच्या गावॎनी कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले . कणकवलीत पिसुरे , आब्दे डॉक्टरांचे मोठे दवाखाने. त्यांच्या कडे सग़ळ्या तपासण्या करणाऱ्या सुसज्ज लॅबोरेटरी आणि तीस चाळिस बेडच्या टोलेजंग इमारती ! एरवी गर्भ श्रीमंत रुग्ण, श्रीमंत कुटुंबातल्या मुली सुना किंवा मध्यम वर्गीय घरातल्या अडलेल्या बाळंतिणी अॅडमिट व्हायच्या. पेशंट तसे बेताचेच असायचे. कारण त्यांची बीलं सामान्यांना परवडणारी नसायची. पण कमवून बसलेल्या डॉक्टरांना कसलीच चिंता नव्हती. एकदा तावडीत सापडलेल्या रुग्णाला पुरा धुतल्या शिवाय पंजातून न सोडण्याची त्यांची ट्रेड पॉलीसी अमेरिका नी चायना ट्रेड पॉलीसीलाही मान खाली घालायला लावील इतकी सुप्रिम ठरणारी !
कोरोना आला आणि पिसुरे , आब्दे डॉक्टरांची चलती सुरु झाली. त्यानी कोरोनाचे रुग्ण अॅडमिट करून घ्यायला सुरुवात केली. डॉक्टर आब्दे , नी त्यांचा मुलगा- सून असे तीन डॉक्टर पण कोरोनाच्या दहशतीमुळे तिघंही कायम मास्क लावून केबिन मध्येच थांबायचे. अगदि स्टाफ नर्स , वॉर्ड बॉय ना सुद्धा त्यांच्या केबिनच्या दारात थांबून डॉक्टरांशी बोलाव लागे , त्यापुढे जायची मुभा त्याना नव्हती. सिरियस रुग्ण आयसीयूत असत तिथे राऊण्डला गेल्यावर खिडकीतून डोकावत रुग्णाच्या प्रोग्रेस चार्टवर जुजबी नजर टाकल्याचं नाटक करून तिघंही मॎघारी फ़िरत. कोरोना विभाग सुरु झाल्या दिवशीच त्यानी मिरज सांगली भागातून एम.बी.बी.एस. झालेले तीन मुलगे आणि एक मुलगी अल्प वेतनावर नेमून घेतलेली.
कोरोना रुग्ण अॅडमिट करणं , त्याना तपासणं सगळे सोपस्कार नवशिके डॉक्टर करायचे. मोठे डॉक्टर फ़क्त कोण पेशंट आला, काय कंडिशन आहे, एवढं इंटरकॉमवरून विचारायचे. एवढी चौकशी केल्यावर रागरंग बघून बिलाचा अंदाजे मोघम आकडा सांगायचे. प्रत्यक्ष काय ट्रिटमेंट द्यायची, रुग्ण किती दिवस राहणॎर सगळा हिशोब डिस्चार्ज देताना मिळेल असं निक्षून बजावायचे आणि तत्काळ भरायची रक्कम सांगायचे. कोरोना दिवसेदिवस वाढू लागला आणि रोजची लाखो रुपयांची आवक सुरु झाली. हॉस्पिटल मधिल काही खोल्यांमध्ये नव्याने आयसियू कक्ष थाटण्यात आले.
आब्दे डॉक्टरांकडिल परिवर्तनाची बित्तं बातमी मिळताच पिसुरे पतिपत्नीनेहि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत तीन उमेदवार डॉक्टर नेमले. खरं तर आब्दे- पिसुरे दोन्ही डॉक्टर एकमेकांचे प्रतिस्पर्धक , पण कोरोना आला आणि दोघांनिही एकमेकांशी असलेले संबंध सुधारले. त्यांच्या नित्य गाठीभेटी , फोनाफोनी सुरु झाली. काही मालदार केसेसच्या बाबतीत आब्दे पिसुऱ्याना आणि पिसुरे अब्द्यांना कन्सल्टिंग साठी राजरोस बोलवायला लागले. प्रसंग परत्वे पेशंटची देवाण घेवाणही होऊ लागली. इमर्जन्सी ऑक्सिजन सिलेण्डर , रेमडेसीवीर सोडाच अगदी नर्सेस , उमेदवार डॉक्टर सुध्दा एकमेकांकडे मदतीसाठी ये जा होऊ लागली.
कोरोनावर हुकुमी उपचार नाहीत. आलेला रुग्ण त्याची आयुष्य रेषा किती बळकट आहे त्यानुसार बचावायचा किंवा आठ दहा दिवस तग धरून डॉक्टरांना भरपूर कमाई ची संधि देऊन राम म्हणायचा. बचावणारे तसे नगण्यच ……. मरणारेच बहूसंख्येने असायचे. हळू हळू ही बाब लोकांच्या निर्दशनाला येऊ लागली. मिडीयावरही कोरोना त्याच्या वरचे उपचार यांवर उलट सुलट मत मतांतरं प्रसिद्ध व्हायला लागली. ज्यांची हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याची कुवत नव्हती ते गोरगरीब लोक घरगुती पारंपारिक काढे , कोण कोण काय काय पाळं मुळं सांगतील तसे उपचार घेऊन जीव जगवण्याची शिकस्त करू लागले. असे घरगुती उपचार घेतलेल्यापैकी बहुसंख्य माणसं कोरोना पचवून खडखडीत बरी व्ह्यायला लागली.कणकवली जवळचा फोंडा बाजार पूर्वापार जडीबुटी नी आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध !
फ़ोंड्याच्या आजूबाजूला कातकरी वैदू यांचा बहुसंख्येने रहिवास. ते लोक रोज वेगवेगळी ताजी पाळं मुळं , कुडेपाक, गरूड वेलीचा काढा हे कोरोनावरचा रामबाण उपाय असं छातीठोक सांगून विकू लागले. फ़ोंड्याकडे जाताना रस्त्यालगत वैदू ,कातकरी कुटुंबाच्या पालांवर भट्ट्यांवर मातीच्या मडक्यांतून काढ्या ओढ्यांची मिश्रणं रटरटू लागली, नी रस्त्यावरुन जाताना त्यांचे दर्प नाकात जाऊ लागले . माफ़क , गोरगरीबाला परवडणारी किंमत आणि त्याहीपेक्षा उपयोग नसला तरी जीवावर बेतण्याचा धोका नाही, म्हणून सर्व सामान्य लोक ही औषधं निर्धास्तपणे घेऊ लागली . यातही नित्य कुडेपाक आणि गरुडवेलीचा काढा हे कोरोनावरचे रामबाण उपाय मानले जाऊ लागले.
हॉस्पिटल मध्ये दाखल झालेले रुग्ण आयसीयूतून जनरल वॉर्डात हलवले की घरची माणसं सुटकेचा सुस्कारा सोडायची. पण हा आनंद अल्प काळच टिकायचा. एकतर रुग्ण एकदिड दिवसात आटोपायचा. क्वचित एखादा घरापर्यंतचा पल्ला गाठून दोन तीन दिवसात गावचं स्मशान जवळ करायचा. वर्ष दीड वर्षात एक गोष्ट लोकांना पुरेपूर उमगली की , हॉस्पिटल मध्ये भरती होणं, आयसीयुत ठेवणं , रेमडेसीवीर, प्लाझ्मा हे उपचार म्हणजे हॉस्पिटलांची चार पाच लाख बीलं भरून माणूस गमावायचा नी आपल्या माणसासाठी पाण्यासारखा पैसा ओतला हे समाधान मिळवण्या इतपतच कामाचे …… हे कोरोनातून बचावण्याचे शाश्वत उपाय नव्हेत.
आरंभ काळी कोरोना पॉझिटीव रुग़्ण शिलकीतला पैसा काढून, दागदागिने मोडून, कलमांच्या बागा गहाण टाकून, जमिनी विकून, प्रसंगी पै पाव्हण्यांकडे उधारी उसनवॎरी करून जीव बचावेल या आशेने आब्दे - पिसुरे डॉक्टर गाठीत. पण पैशापरी पैसा घालवून कुटूंबाला कंगाल करून लाख मोलाचा जीव वाचेल याची शाश्वती नव्हतीच. दीड दोन वर्षानंतर मात्र कुवत नसलेल्या मध्यम वर्गीय माणसांचा दवाखान्यांकडे जायचा ओघ हळू हळू कमी होत गेला. बहूसंख्य समजूतदार माणसं आजार अंगावर काढून घरच्याघरी काढे ओढे घेत , जीव जगला तर जगला ….. लाखो रुपये मातीत घालून डॉक्टरांची भर करण्यापेक्षा देवावर भार ठेवून समाधान मानू लागली. ज्यांच्याकडे पैशाचं पाठबळ होतं ते लोकही निरूपाय म्हणून अॅडमिट होत तेही डॉक्टरांची नजर चुकवून काढे , चाटणं असे आयुर्वेदिक उपायही करीत. रुग्णाला भेटायला येणारे नातेवाईक खाण्याच्या डब्यांतून, आंघोळीच्या कपड्यांतून चोरुन घरगुती औषधं गुपचूप पोच करीत. असा दुहेरी उपचार घेणारी बहूसंख्य माणसं मात्र कोरोनच्या कचाट्यातून बचावायलाही लागली.
आरंभ काळी अॅडमिट होणारी बहुसंख्य माणसं लाखो रुपयांची बीलं भरून मरताना बघून दवाखान्यात काम करणारी माणसंही अंतर्मूख व्हायची. येणाऱ्या रुग्णाना डॉक्टर लोक कसे लुटताहेत हे उघड्या डोळ्यानी बघून डॉक्टरांच्या नावाने बोटं मोडीत बसायची. डॉक्टरी उपायातला फ़ोलपणा आपोआपच लोकाना उमगून येऊ लागला तसतशी रुग्णांची संख्या घटत चालली. आणखीहि दोन गोष्ट याला कारणीभूत झाल्या .एक म्हणजे सततच्या लॉकडाऊन आणि वाहतूक निर्बधांमुळे व्यापार रोजंदरी ठप्प झाली. आंबा वाहतूक बेभरवशी झाल्यामुळे हुकमी मिळकतीचा मार्ग रोडावला. दोन वर्ष होवूनही कोरोना आटोक्यात येत नाही… कशाचीच शाश्वती नाही हे वास्तव ओळखलेली माणसं आता सावध पवित्रा घ्यायला लागली. त्यात जडी बुटी -काढे ओढे यांचे दृष्य परिणाम शाश्वत वाटायला लागले.
अॅडमिट होणाऱ्यॎ परिचिताना डॉक्टरांकडे काम करणारी नर्स, वॉर्डबॉय हेच सावध करू लागले. “आता आमी हंय काय चल्ला हां तां बगतव गेला वरीस भर… आमी सांगणा चूक… पण तुमी आमचे बऱ्याचे म्हनान सांगतो, हय पेशंटाक आक्सिजन देतत तेवडो खरो … बाकी औशदां विन्जिक्शना देतत तेच्यात काय दम नाय… हंय धा बारा दिवस काडून चार पाच लाखाची डाक्तरांची भर करून पेशंट वरची तिकिट काडतत. काय काय पेशंटांक पै पावणे फोंडा बाजारात्सून काढे नी भुकटी गपचीप हानून देतत … तेचो मातर गुण पडता… ” हा कान मंत्र ऐकून परिचित मंडळी तसे उपाय करीत नी रुग्ण कोरोनातून बचावतही. वर्ष भरानंतर डॉक्टरांच्याही निदर्शनाला आलं की, पूर्वी जे उपचार करूनही रुग्ण बचावत नसत त्याच उपायानी वाचणारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे, पण अॅडमिट होणारांची संख्या मात्र बरीच घटत चालली. आब्दे पिसुरे डॉक्टरांनी या गोष्टीवर बराच खल केला. त्यांच्या चर्चेत काढे , पाळा मुळांची भुकटी हे सर्व सामान्यांमध्ये प्रसृत झालेले हुकमी उपाय हे सर्वाना पटलं. अॅडमिट होणाऱ्यॎ पेशंटाना त्यांचे नातलग डॉक्टरांना फ़सवून चोरून मारून ही औषधं पोचवीत असणार म्हणून रुग्ण बरे होण्याच प्रमाण वाढलं यावर सगळ्यांचंच एकमत झालं.
आता सावध झालेल्या डॉक्टरांनी पेशंटना भेटायला येणारानी आणलेल्या सामानाची काऊंटरवर तपासणी सुरु केली. चोरुन आणलेल्या भुकटीच्या पुड्या , काढ्याच्या बाटल्या जप्त व्हायला लागल्या . अर्थातच कोरोना मुक्तांची संख्या पुन्हा घटायला लागली. डॉक्टर इतकच करून थांबले नाहीत. फोंडा बाजारात राजरोस विकल्या जाणाऱ्यॎ जडीबुटी विरुद्ध आरोग्य मंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्या नी पोलिसानी रेड टाकून औषध भट्ट्यांची तोडफ़ोड करीत पंचवीस तीस कातकरी -वैदूंची औषधं जप्त करुन त्याना तुरुंगात डांबून त्यांच्यावर अवैध औषध विक्री विरोधात केसेस भरल्या गेल्या. संपूर्ण राज्यात या पोलिस कारवाई चा बराच गाजावाजा झाला. माध्यमांमधून उलट सुलट चर्चा झाल्या. नी हे प्रकरण थंडावलं.
वर्ष दीडवर्ष उलटलं नी हळू हळू लोकं कोरोनाला सरावली. दरम्याने अतिवृष्टीमुळे महापूर, दरडी कोसळणं या नव्या आपत्तींमुळे कोरोना प्रकरणातला दमही संपत आला. आता आब्दे पिसूरे डॉक्टर चौकडी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची प्रतिक्षा करीत आहेत.