Hang only the ascetic except the thief in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | चोर सोडून संन्यासालाच फाशी

Featured Books
Categories
Share

चोर सोडून संन्यासालाच फाशी

चोर सोडून संन्याशाला फाशी?

*आज वाहतूक नियम आहेत व ते असल्यानं कोणताही व्यक्ती सैरावैरा गाडी चालवत नाहीत. ते नियमातच गाडी चालवतात. तसेच वाहतूक नियम पाळत असतांना काही कागदपत्राचीही आवश्यकता असते. त्यातही त्या कागदपत्राअंतर्गत भेदभाव दिसून येतो कधीकधी. कधीकधी हेच पोलीसवाले सामान्य व्यक्ती असतील आणि त्याच्याकडे कागदपत्र नसतील तर जबरन दंड करतात आणि जर तोच व्यक्ती विशेष असेल, श्रीमंत असेल, त्याची ओळखपारख असेल, तर त्याला सोडून देतात. त्यातच आताच्या काळात कधीकधी वाहतूक शाखा ही श्रीमंतांच्या घरची कळसुत्री बाहूलीच झाल्यासारखे वाटते व ती शाखा कधीकधी चोरांना सोडून देवून संन्यासालाच फाशी देत सुटते.*
आजकाल पोलिसांनाही मारहाण झाल्याच्या बऱ्याचशा घटना वर्तमानपत्रातून छापून येतात. तसे पोलीस कर्तव्यदक्ष असल्यानं त्यांच्यावर बऱ्याच जणांचा राग असतोच. मग बदल्याच्या भावनेतून लोकं कधीकधी पोलिसांनाही मारहाण करतात. परंतु ते ही गोष्ट समजत नाहीत की पोलीस आपले शत्रू नाहीत तर ते मित्र असतात. ते आपल्यावर कारवाई करतात. त्याचं कारण असतं त्यांचं कर्तव्य. ते कर्तव्य त्यांना कोणीतरी उच्चपदस्थ व्यक्तीनं सोपवलेलं असतं. बरेचसे पोलीस आपले इमानीइतबारे कार्य करीत असतात. परंतु त्यात काही अपवादही असतातच. याबाबत उदाहरण आहे. एकदा रस्त्यावर गाडी चालवत असतांना एक चौक आला. सिग्नल लागला होता. म्हणून चौकात गाडी उभी होती. तसे बरेचजण चौकातच उभे होते. जसजसा सिग्नल सुरु होत होता. तसतशी बिचारी कामावर जाणारी मंडळी कामावर जायला गाडी सुरु करुन चौकातून निघून जात होती. त्याच दरम्यान एक पोलीस मॅडम विनाकारण जाणाऱ्या गाडीचे पाठीमागून फोटो काढत होती. तसं एकानं विचारलं,
"मॅडम, आपण असे फोटो का काढत आहात?"
तो त्याचा सौम्यपणे माहिती करुन घेण्यासाठी विचारलेला प्रश्न. त्यावर उत्तर देत ती महिला पोलीस म्हणाली,
"तुम्हाला काय करायचंय. अन् जास्त कराल तर तुमचाही फोटो काढेल."
ते त्या महिला पोलिस मॅडमचं उद्धट बोलणं. तसा त्याला त्या मॅडमचा भयंकर राग आला. परंतु संयम राखत त्याला कामावर जायची घाई असल्यानं तो लगबगीनं समोर गेला. तसा पाठीमागून त्याच पोलीस मॅडमनं त्याचाही फोटो काढला. हे त्याच्याही लक्षात आलंच. जेव्हा त्यानं गाडीच्या आरशाच्या काचातून पाहिलं. परंतु त्यानं त्यावर दुर्लक्ष करुन आपली गाडी पुढे नेली. अशातच एक महिना उलटला व एका महिन्यानं त्याच्या घरी पोष्टानं एक लखोटा आला. ज्यात त्याला चॅलन दिलं होतं आणि त्या कागदावर एक फोटोही होता. तो फोटो अस्पष्ट होता. तसं पाहिल्यास त्याला तो फोटो पाहताच चटकन लक्षात आलं. लक्षात आलं की हा फोटो कुठला असेल.
तो व्यक्ती. त्या व्यक्तीचे सर्व कागदपत्र बरोबर होते. हेल्मेट वैगेरे सारं बरोबर. तरीही चॅलन. तसा त्याला त्या घटनेचा तीव्र राग आला होता. परंतु उपाय नव्हता. शिवाय उपाय नसल्यानं विनाकारणचा ताप करीत त्यानं चॅलन भरलं होतं.
पोलिसांना मारहाण अशाच काही अपवादात्मक घटनेवरुन होत असेल यात शंका नाही. कारण बरेचसे लोकं हे मजूर वर्गातील असतात. ते लांब लांब सायकलनं मजुरीसाठी जात असतात. त्यातच लांबचा प्रवास तोही सायकलनं करतांना त्रेधातिरपीट उडते. मग ते पाच दहा हजार रुपये टाकून इन्टॉलमेंटवर गाडी उचलतात आणि प्रवास करीत असतात. तेही सर्व कागदपत्र बरोबर ठेवून. कधीकधी एखाद्यावेळेस कागद नसतोच. परंतु तसे कागदपत्र नसले तरी ते वाहतूकीचे नियम पाळूनच गाड्या चालवत असतात. अशावेळेस त्यांच्याजवळ कागदपत्रे आहेत की नाही हे पाहण्याची गरज नसतेच. शिवाय कागदपत्र न तपासता जर असे चॅलन त्या व्यक्तीचा पाठीमागून फोटो काढून पोष्टानं येत गेले तर त्या व्यक्तीनं आपल्या तुटपुंज्या कमाईतील पैशातून गाड्यांचं इन्टॉलमेंट भरावं की घरी पोटाला खावं की चॅलन भरावं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यातच काही ठिकाणी तोतया लोकं पोलीस बनून, तसे ते लपून राहून अशाच गाड्या पकडत असतात आणि एक ना एक वाहतूक नियमांची चुकी काढून सामान्य माणसांकडून पैसे लुटत असतात. तसं पाहता त्यांना काही विचारताही येत नाही. त्याचं कारण म्हणजे मुजोरी केली म्हणून आणखी दंड. असा दंड भरता भरता कधीकधी सामान्य लोकांच्या नाकीनव येतं व कधीकधी वाटतं की गाड्याच चालवू नयेत. परंतु मग विचार येतो. जर गाड्याच चालवल्या नाही तर पोट कसं भरायचं? शेवटी चॅलन भरणं असलं तरी मुकाट्यानं रस्त्यावरुन गाड्या चालवाव्याच लागतात कारण पोटाचा प्रश्न पुढे आ वासून उभा असतो.
गाडी चॅलन करावीच जर तो व्यक्ती वाहतूक नियमात चुकला तर........ जसे, त्याला एकपदरी रस्ता माहीत असूनही तो त्यातून शिरला. जर सिग्नल बंद असतांना त्यानं गाडी काढली. जर त्यानं हेल्मेट घातलाच नसेल. जर तो दारु पिवून असेल तर चॅलन नक्कीच करावं. परंतु जर एखाद्या चौकात एखादा व्यक्ती उभा आहे तर त्याचा वेळ महत्वाचा असूनही त्याला जबरन अडवून विनाकारण त्याच्या कागदपत्राची छानणी करणे व एखादा कागद नसेल तर त्या कागदपत्राअंतर्गत त्या व्यक्तीला दंड लावून प्रताडीत करणे ही गोष्ट बरी नाही. यात काहीतरी प्रमाणात शिथीलता असावी नव्हे तर सामान्य माणसांना दिलासा. परंतु काही काही पोलीस सामान्य माणसांचे शत्रू असल्यागत वागत असतात. ते श्रीमंत असलेल्या वा सुशिक्षीत वाटणाऱ्या वा ज्यांची ओळख पारख आहे. अशा व्यक्तींना सोडून देवून सामान्य माणसांनाच वेठीस धरीत असतात नव्हे तर त्याचे कंबरडेच मोडत असतात दंड लावून.
महत्वाचं सांगायचं झाल्यास पोलीसांनी सामान्य माणसांबरोबर शत्रूत्वानं वागू नये. मित्रत्वानं वागावे. ते काही शत्रू नसतात पोलीसांचे. तसंच सामान्य माणसांनीही पोलीसांप्रती आपली भुमिका सौहार्दपूर्ण ठेवावी. कारण ते आपले मित्र आहेत. ते जर नसते तर आज अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली असती आणि देशात अंदाधुंदपणा निश्चीतच माजला असता यात शंका नाही. विशेष म्हणजे आपल्यालाही त्रास होवू नये म्हणून सर्व कागदपत्र व्यवस्थीत ठेवावे. तसंच पोलीसांनीही एखादे कागदपत्रं नसेल तर त्यावरुन उगाच वाद करुन कोणालाही धारेवर धरु नये. कारण त्यातूनच लोकांच्या मनात पोलिसांबद्दलचा राग निर्माण होवून त्याची परियंती बदल्यात वा एखाद्यावेळेस वचपा काढण्यात होते. ज्यातून विनाकारण इतर निष्पाप, निष्कलंक बिचाऱ्या पोलिसांचा जीव जातो. ज्याचा कोणताच गुन्हा नसतो. हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०