Must stop juvenile delinquency? in Marathi Crime Stories by Ankush Shingade books and stories PDF | बालगुन्हेगारी थांबवावीच लागेल?

Featured Books
Categories
Share

बालगुन्हेगारी थांबवावीच लागेल?

बालगुन्हेगारी थांबवावीच लागेल?

*विद्यार्थ्यांना सुधारण्याचा काळ म्हणजे बालपण त्या बालपणातच विद्यार्थ्यांवर सुसंस्कार फुलत असतात आणि याच बालपणातच मुलांवर कुसंस्कारही होत असतात. बालपणातच मुलांवर सुसंस्कार फुलतात. जर आईवडील शाबूत असतील तर....... कधीकधी अपवादात्मक परिस्थितीत एखादा मुलगा सुसंस्कारी निघू शकतो.*
लहानपणी एखाद्याची आई किंवा वडील किंवा कधीकधी दोघेही मरण पावल्यानंतर मुलांवर कुसंस्कार होवू शकतात. कारण त्यांना ही गोष्ट चुकीची, ती गोष्ट चुकीची. ती चूक सुधरत, ही चूक सुधरव. असं म्हणणारं कोणीच नसतं. कधीकधी आई किंवा वडील यापैकी एखादा घटक मरण पावल्यानंतर त्यापैकी जो वाचतो. तो आपला दुसरा विवाह करुन मोकळा होतो. वाटतं की बाळाचा नीट सांभाळ करता येईल. परंतु तो पुनर्विवाह बाळाच्या नीट सांभाळासाठी नसतोच. तो विवाह त्या त्या व्यक्तीचा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच असतो. फक्त नाव असतं की अमूक अमूक व्यक्तीनं आपला विवाह बाळाचा सांभाळ करण्यासाठी केला. असा विवाह झाल्यानंतर ज्याला सांभाळ करण्यासाठी घरी आणलेलं असतं. तो घटक, ज्याने सांभाळ करायला आणलं. त्या घटकाचे क्षणभर का होईना ओझल होताच, त्या सांभाळ करायच्या घटकाला सांभाळून न घेता, त्याचेवर अनन्वीत अत्याचार करतो की ज्याचं तपशीलवार वर्णन करताच येत नाही आणि केलंच तर त्याची परियंती ही त्याच्यावरील अत्याचारात वाढ होण्यात होते. अशी मुलं पुढील काळात गुन्हेगारी जगताकडेच वळतात.
चांगल्या सवयी ह्या अगदी लहानपणापासून लावता येतात आणि त्या लावायला हव्यात. नाहीतर वेळ निघून गेल्यावर त्या सवयी लावता येत नाहीत. अलिकडील काळ हा महागाईचा आहे व या काळात मुलांचे आईवडील हे सकाळी आठ वाजल्यापासून कामाला जात असतात. ते सायंकाळीच सातआठला घरी येतात ते जेव्हा घरी येतात. तेव्हा मुलं जरी ताजीतवानी असली तरी त्यांचे मायबाप थकलेले असतात. त्यांना लवकर जेवन करुन दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी आरामाची गरज असते व ते आराम करतातही. यादरम्यान त्यांनी आपल्या मुलांना, त्यांनी दिवसभर काय काय केलं? हे विचारण्याची गरज असते. परंतु ते एवढे थकलेले असतात की ते मुलांनी दिवसभर काय काय केलं? हा प्रश्न साधा विचारु शकत नाहीत. ते कधी शाळेत जावून आपल्या मुलांबाबतची विचारणा शिक्षकांना करीत नाहीत. ती शाळेत गेली की नाही गेली? त्यांनी अभ्यास केला की नाही केला? अशी साधी विचारणा होत नाही. अशा लोकांची ही मुलं आईवडील त्यांची विचारणा करीत नसल्यानं आईवडिलांना विचारात न घेता दिवसभर शाळेत न जाता उन्हातान्हात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फिरत असतात. कशासाठी? तर दोनचार रुपयाचं प्लाॅस्टिक गोळा करण्यासाठी. काही खिळ्याचे तुकडे गोळा करण्यासाठी. त्यांनी गोळा केलेले हे तुकडे वा प्लाॅस्टिक ते लोहा लोखंडवाल्यांना विकतात व त्यातून येणाऱ्या पैशानं ते खाऊ विकत घेऊन खात असतात. मग ही सवय लागते या मुलांना. त्यातूनच त्या सवयी पुर्ण करण्यासाठी हळूहळू चोऱ्याही करु लागतात ही मुलं. याच मुलांना या काळात अडवलं गेलं नाही तर हीच मुलं पुढील काळात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरुन प्लाॅस्टिक वेचून ते विकून त्यातून जे पैसे मिळवतात. त्या पैशानं खाऊ घेत नाहीत तर चक्कं नशेच्या वस्तू घेवून नशा करु लागतात. शिवाय अशा नशा पुर्ण करण्यासाठी हीच मुलं पुढील काळात चोऱ्या व प्रसंगी चाकूहल्लेही करीत असतात. येथूनच सुरु होते गुन्हेगारी. ही मुलं लहान जरी असली तरी त्यांचं कृत्य महान असतं.
ही मुलं का गुन्हेगारीकडे वळतात? असा जर विचार केल्यास त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. ते उत्तर म्हणजे पालकांचं त्या मुलांवर होत चाललेलं दुर्लक्ष. अलिकडे पालकवर्ग एवढा आपल्या कामात गुरफटला आहे की त्याला आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही. त्यातच बऱ्याचशा पतीपत्नींचं एकमेकांशी पटत नसल्यानं ते एकमेकांपासून विभक्त होण्याकडे जास्त लक्ष देतात. अशावेळेस त्यांचे आपल्या बाळांकडे दुर्लक्ष होते. बरेचसे असे पतीपत्नी आहेत की ते विवाहानंतरही विवाहबाह्य संबंध ठेवतात व प्रसंगी ते संबंध जास्त दृढ होताच पळून जातात. त्यावेळेस ते आपल्या मुलांचाही विचार करीत नाहीत. अशांची मुलं ही बिघडणार नाहीत तर काय? शिवाय महागाईच्या काळात पुरेसे लक्ष ठेवायलाही बऱ्याचशा पालकांजवळ वेळ नसतोच. त्यातच बरेचसे आईवडील आजच्या काळात पुरेसा वेळ जरी मिळत असला तरी ते त्या फावल्या वेळात मोबाईलवर खेळ खेळत वा व्हिडिओ पाहात असतात किंवा एखाद्याशी चॅटींग करीत असतात. अशावेळेसही दुर्लक्ष होतं मुलांवर. मग मुलं आईवडील आपल्याला विचारणा करीत नाहीत असा अंदाज बांधून ते गुन्हेगारीकडे वळू लागतात.
अलिकडील काळात बालगुन्हेगारीचे प्रमाण काढले तर बरेच आहे. बालगुन्हेगारीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर मध्य प्रदेश ( ५६८४ गुन्हे), तर तिसऱ्या स्थानावर राजस्थानचा (२७५७ गुन्हे) क्रमांक लागतो. सध्या महाराष्ट्र राज्यात ४ हजार ५५४ बालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढी महाराष्ट्र राज्यात बालगुन्हेगारी आहे. याचाच अर्थ असा की महाराष्ट्र राज्यात पती पत्नीतील फारकतीही बऱ्याच असू शकतील. महाराष्ट्रात घटस्फोटाचे प्रमाण १८.७ टक्के आहे. हे एकुण लोकसंख्येतील आकडेवारी झाली. याचाच अर्थ असा की प्रत्येक शंभर कुटूंबामध्ये एक घटस्फोट. मग खरंच यातूनच कालचे पतीपत्नी असलेले मुलंमुली आज विभक्त होवून भांडत असतांना ते दुसरीकडे दुसराच जोडीदार शोधून त्यांच्यासोबत राहात असतात. हे वास्तविक चित्र प्रत्येकच शंभर कुटूंबातील एका घरात दिसतं. अशी मंडळी मुलांकडे दुर्लक्षच करतात. काही तर असेही महाभाग असतात की जे आपली स्वतःचीच मुलं सोडून नवीन जोडीदार पकडून पळून गेलेले असतात. त्यानंतर बिचारी अनाथ झालेली मुलं ही भीक मागत मागत जगत असतात.
विशेष सांगायचं झाल्यास जे पतीपत्नी किंवा त्यामधील एक मरण पावतात. अशांची मुले जर बालगुन्हेगार बनत असतील तर गोष्ट वेगळी आहे. त्याला कारणही तसंच असतं. त्यांना स्वतःच्या आईवडीलांसारखी वागणूक न मिळाल्यानं त्यांची अवस्था अशी होते. परंतु ज्यांना आईवडील दोन्ही घटक असतील व ते एकमेकांशी भांडत असतील. फारकत घेत असतील वा मुलांना सोडून विवाहनंतर दुसऱ्याच मुलासोबत पळून जात असतील तर या पळण्याला काय म्हणावे? कशाला त्यांनी मुलं जन्मास घालावी? बालगुन्हेगारीत भर घालण्यासाठी? कशाला करावेत असे विवाह की त्या विवाहातून त्यांच्याच स्वतःच्या मुलांना सोडून जाण्याची पाळी येते? यात अशाही महिला असतात की ज्या त्यांचा पती दारु पितो म्हणून त्याला सोडतात व दुसऱ्याशी विवाहबद्ध होतात. परंतु त्यांचेवर वेळ अशीही येते की ज्या व्यक्तीशी त्या विवाह करतात. तो व्यक्ती जास्त दारु पिणारा निघतो. तरीही पटत असतं. ही वास्तविकता आहे. परंतु यातूनच त्यांची मुलं बालगुन्हेगारीकडे वळून त्या बालगुन्हेगारीचं प्रमाण वाढवतात त्याचं काय?
महत्वपुर्ण बाब ही की पती पत्नी यापैकी एक जर मरण पावला असेल तर ठीक आहे. परंतु तसं जर झालं नसेल आणि पती पत्नी सलामत असतील तर ते एकमेकांशी कितीही भांडणं तरी चालेल. परंतु स्वतःच्या इवल्याशा स्वार्थासाठी त्यांनी एकमेकांपासून विलग होवू नये व मुलांमध्ये कुसंस्काराचे बीजारोपण होवू देवू नये म्हणजे झालं. तसेच बालगुन्हेगारीचेही प्रमाण वाढवू नये. कारण अलिकडील काळात बालगुन्हेगारीचे आकडे हे तुमच्याच पतीपत्नीच्या विनाकारणच्या फारकतीच्या वादानं वाढत असतात यात शंका नाही. व्यतिरीक्त ज्या आईवडिलांना महागाईची झळ पोहोचली आहे व त्यावर विजय मिळविण्यासाठी दोघंही कामाला जात असतात. त्यांनीही घरी आल्यानंतर पुरेसा मुलांशी संवाद साधावा. जेणेकरुन त्यातील कोणी बालगुन्हेगार बनणार नाही. कधीकधी मधामधात शाळेला भेटी देवून आपल्या मुलांबाबत थोडीशी विचारणाही करावी. ही विचारणा तुमचीच मुलं घडविण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. तसेच जी पालकमंडळी जास्त मोबाईलमध्ये शिरून असतात त्यांनी कदाचित आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुरेशी चॅटींग करणं बंद करावं. जेणेकरुन त्यांचं भविष्य बनेल. बालगुन्हेगारीवर विजय मिळेल नव्हे तर तुमच्यामुळं त्या मुलात होण्याऱ्या सुसंस्कारातून पुढं देशाचंही भवितव्य बदलवता येवू शकेल. देशाला विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेता येवू शकेल काय जागतिक महासत्ताही बनवता येवू शकेल हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०