anxious in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | अत्रंग

Featured Books
Categories
Share

अत्रंग

अत्रंग

तेरवणचा दत्तू मिराशी म्हणजे अत्रंग माणूस. लांबलचक गाठ मारलेली शेंडी, भरभक्कम अंगकाठी, काळाकुळीत - ब्राह्मणाला न शोभणारा वर्ण, तिरकी बकध्यान मुद्रा, दोन भुवयांमध्ये शेंदुराची टिकली, पायघोळ धोतर आणि वर बाहीछाट मुंडे घालून कमरेला कायम पंचाचा वेढा देऊन हातात डोईभर उंचीचा सोटा घेऊन फिरणाऱ्या दत्तूला पोरेसोरे ‘राकस (राक्षस) इलो’ असे म्हणून घाबरून पळायची. पोरांची गोष्ट सोडा. . . . ..पण कर्रर्र ऽ कर्रर्र चपला वाजावीत आलेले दत्तूचे ध्यान बघून एकटी दुकटी बाईल घाबरून ओरडली तरी कोणाला नवल वाटले नसते. तेरवणात बरीचशी कुळवाड्यांची वस्ती.एकदोन भंडाऱ्यांची घरे, कुंभाराची वाडी, महारांची वाडी , धनगर वस्ती आणि मिराशांचे एकच एक घर. दत्तू ब्राह्मण फक्त जातीचा! संध्येतली चोवीस नावे काय पाठ नसतील की सही पुरती सुद्धा अक्षरांची ओळख नव्हती. वास्तविक गावांत भिक्षुक नाही म्हणून दत्तूच्या आजोबाला गाववाल्यांनी ठिकाण वतन देऊन गावात ठेवला. पुढे भिक्षुकी आणि सावकारी या दोन्ही वृत्ती सांभाळून दत्तूचा आजा भिकंभट याने मळयात ७/८ खंडी भातापुरती जामिन, गुरे चरवायला आडवणात ५एकर सडावळीची जमिन संपादन केली.
दत्तूचा बाप हरीभाऊ हा गायवर्णी मनुष्य. सदैव भिकंभटाला घाबरण्यात बापड्याचा जान्म गेला. बापाची सावकारी त्याला सांभाळता आली नाही. उलट बापाच्या पश्चात् देणेकऱ्यांनी काखा वर केल्या. निर्वाहा पुरती शेती आणि भिक्षुकी यावर हरीभाऊंचा खुटरूटु संसार चालला. त्याचे चार मुलगे उपजताच गेले. त्यांच्या पाठीवर एक मुलगी गंगी आणि तिच्या नंतर झालेला दत्तू! तो सुद्धा जगला म्हणून जगला. जान्मतः वारेचा फेरा त्याच्या मानेभोवती होता. जन्मल्यावर तासभर झाला तरी पोर रडला नाही. सगळ्यांनी आशाच सोडली. हरीभाऊने देवातला गणपती पाण्यात बुडवून साकडे घातले.दत्तू जगला! पण दत्तूच्यावेळी झालेल्या त्रासाने त्याची आई मात्र अंथरूणाला खिळली ती खिळली. कशी बशी ५/६वर्षे काढल्यावर ती मुक्त झाली. पुढे गंगी सुद्धा लग्न होऊन मणच्याला सप्रे कुटुंबात गेली. हरीभाऊ आणि दत्तू दोघेच घरात राहिले. या प्रपंचाच्या कटकटीत दत्तूला वळण कसे ते लागलेच नाही. भंडारी, धनगर, कुळवाडी, वाणी यांच्या पोरात वाढून तो त्यांचीच बोली शिकला. शाळेचे तर त्याने तोंडच बघितलेले नव्हते.
रीतीरिवाजा प्रमाणे सोळा वर्षाचा झाल्यावर दत्तूच्या लग्नाची खटपट सुरू झाली पण या अडाण्याला मुलगी देणार कोण? हरीभाऊंनी जाावयाच्या पाठी लकडा लावला. जावई सप्रे यानी शेजावलीतल्या अन्नान्न दशा असलेल्या भागवतांची काळी ठेंगणी, रांबुक मुलगी बुगी दत्तूला ठरवली. अठरा वर्षाचा घोडनवरा दत्तू चतुर्भुज झाला. बुगी भागिरथी नावाने मिराशांच्या घरात आली. पोरगी रांबुक असली तरी संसारी निपजली. हरीभाऊने सुटकेचा श्वास सोडला म्हणजे अक्षरशः श्वासच सोडला. दत्तूचे लग्न झाल्यावर चार महिन्यातच हरीभाऊ किरकोळ तापाच्या निमित्तानेच खपला. बापाच्या मृत्युमुळे दत्तू मात्र सुधारला. प्रपंचाची जाणीव त्याला व्हायला लागली. बापाच्या जीवावर दोनवेळा गिळून उंडगेपणा करणारा दत्तू कामाला लागला. तेरवण जवळच्याच सौंदाळे गावात ब्राह्मणांची पंधरा घरे. गोडसे, पुराणीक, बर्वे, गोखले अशी सगळी सधन, नामांकित मंडळी. दत्तूने त्यांच्याशी सलोखा केला. तेरवणसारख्या आडवळणी गावात दत्तूचे एकटेच घर, सौंदाळ्यातली ब्राह्मण मंडळी त्याला मदत करायची.
त्याचवेळी कुळकायद्याचे वारे वहायला लागले आणि सावध झालेल्या दत्तूने स्वतः शेती करायला सुरूवात केली. फुकटात आणलेल्या रेड्यांचे जोत केले. दत्तू आणि भागीरथी स्वतः मरेमरे पर्यंत शेतीत राबायला लागले. तरीही एकदोन भंडारी आणि वाणी यांचा त्रास होताच. पण दत्तूचे मनगट धरणारा गडी उभ्या गावात सोडाच पण पंचक्रोशीतही सापडला नसता. मग आडवळणाने त्रास देणे सुरू झाले. दत्तू कडे गडी कामाला येईनासे झाले. पण दत्तूने दम सोडला नाही. पहिल्या कोंबड्याला उठून तिन्हीसांजेपर्यत तो राबायला लागला. गोखल्यांच्या सल्ल्याप्रमाणे आगराला गडगा घालून माड, पोफळी लावायचा बेत दत्तूने केला. एकट्याने धोंडे फोडून ठिकाणाच्या माथावळीचा आणि उभ्या बाजूचा दोनेकशे हात गडगा त्याने पुरा केला. त्याची हिंमत बघून गावसुद्धा चकित झाला. हळूहळू धनगरानी दत्तू कडे उठा बसायला सुरूवात केली. “काकानु आमाला गडगा घालाया द्या. लय थोडे पैसे मागे ठेवलास तरी चालेल.” शिद्या धनगर बोलता झाला. आगराच्या पायथ्याला बारमाही व्हाळाच्या कडेने गडगा घालायचे काम मोठ्या जिकिरीचे ! पावसाळ्यात व्हाळाला तुडूंब पाणी असायचे. लेचा पेचा गडगा पाण्याने वाहून गेला असता. या कामाला दांडगी जमातच पाहिजो असा विचार करून दत्तूने धनगरांना गडग्याचे काम दिले.
सराई सुरू झाली. भात कापून झाल्यावर दत्तूने कुळीथ, वरणे असे कडधान्य मळ्यात पेरले. त्यातून मोकळे झाल्यावर गडग्याचे काम सुरू झाले. दत्तूकडे कुशाभाऊ गोखले आले तेव्हा व्हाळाच्या कडेने गडग्याची पहिली रांग लावायला सुरूवात झाली. कुशाभाऊ अनुभवी,दर्दी ! काम बघून ते म्हणाले,“दत्तू, तुझ्या या गडग्याचा काय्येक उपयोग होणार नाय. हे आंब्या एवढे दगड उद्या पावसाळ्यात वाहून जातील आणि गडग्याचा निकाल लागेल” या बाजूला दोन माणसांच्या ओझ्याएवढा एक एक दगड लावायला हवा. दत्तूने धनगराना धारेवर धरले. बाचाबाची झाली. कुशाभाऊ ढीग सांगेल, एवढे मोठे दगड फोडून ते जागेपर्यत न्यायचे कसे? एकतर जाग्यावर दगड पोच करून दे नाहीतर दर वाढवून दे असा पेच धनगरांनी टाकला.
दत्तू चा स्वतःच्या ताकतीवर दांडगा भरवसा. त्यात तो जात्याच अत्रंग! धनगराना म्हणाला, “तुम्ही माझ्या डोक्यावर दगड चढवा.मी स्वत: खेपा घालून दगड जाग्यावर पोचवून देतो.” धनगरानी मान्य केले त्याना वाटले या भटाचा काय नेट असणार? चार खेपात आडवा होईल ! काम सुरू झाले. दत्तूने सांगितले तेवढ्या आकाराची जाडशीळ दगडी वळीवे धनगरानी फोडायला सुरूवात केली. दोन गड्यांनी दत्तू च्या डोक्यावर भला दांडगा दगड चढवायचा आणि दत्तूने तो जागेवर न्हेवून टाकायचा.,असे काम सुरू झाले. दत्तू आणि धनगर यांची चुरस लागली. धनगर दत्तूला कुथवण्यासाठी दीड-दोन हात औरस चौरस दोन गड्याना भोयसांड होणार नाहीत एवढे मोठे दगड निवडित. पण दत्तू काय जेरिला आला नाही. गावातले लोक मजा बघायला येऊ लागले. पण काम संपेतो दत्तू मागे हटला नाही. जवळ जवळ दीडशे हात गडगा पुरा व्हायला पाऊण महिना लागला. सगळे दगड दत्तूने स्वतः वाहून नेले. गावातले लोक सोडाच आजुबाजुच्या गावातली जाणती माणसेही दत्तू मिराश्याचे भिमकृत्य बघायला येऊ लागली.
दत्तू भटाचे माड नी पोफळी लावून झाल्या. त्याच्या सड्यावरच्या ठिकाणालगतच गुरचराई. तिथे कुंभार त्यांची गुरे चरवायचे. ते दत्तूचा दुस्वास तकरीत. चोरून मारून गडगा कोसळून दत्तूच्या पडणात गुरे आत घालायचे. दत्तूला कळल्यावर तो गुरांना हाकलून कोसळलेला गडगा डाळायचा. कुंभारांचा त्रास कमी होईना. तेव्हा संध्याकाळची वेळ धरून दत्तू कुंभार वाड्यात गेला. बोलचाली झाली. पुन्हा गुरे गडग्यात दिसली तर मी त्यांना जिवंत ठेवणार नाही. असा दम देऊन दत्तू घरी आला. त्यांनंतर आठवडाभर बरा गेला. एकदा दुपारच्या वेळी दत्तू ठिकाणाकडे चक्कर टाकायला गेला तेव्हा लख्या कुंभाराचा एक दांडगा रेडा गडग्यात चरताना दिसला. दत्तू रागाने बेभान झाला. दत्तूने गडग्याच्या कडेला असलेल्या काजऱ्याचा तीन हात लांबीचा मनगटा एवढा जाड खुंट तोडून घेतला अन् तो गडग्यात शिरला. रेडा जातीवंत मारकुटा.दत्तूला बघताच तो माती उकरायला लागला.
   दत्तू तोंडाने ‘हाड् हाड् ’करीत रेड्याकडे जाायला लागला. रेड्याने दत्तू जवळ येताना दिसताच शेपटी दुमती केली आणि चौखूर उधळत दत्तूच्या दिशेने मुसंडी मारली. रेडा दरडीवरून खाली येण्यापूर्वीच दत्तू उडी मारून दरडीवर चढला आणि धावत येणाऱ्या रेड्याच्या मस्तकावर दोन्ही हाताने काजऱ्याच्या खुटाने नेटाचा फटका मारला. फटका वर्मी बसून रेडा जरा दबकला तेवढ्यात पूर्वीच्याच नेटाने तीन चार फटके दत्तूने पुन्हा पुन्हा त्याच्या मस्तकात मारले.‘ब्वाँऽब्वाँऽऽब्वाँऽऽऽ’ करून रेडा जामिनीवर कोसळला. त्याच्या नाकातून रक्ताचा लोंढा आला. आता दत्तू भानावर आला. आपण काय करून बसलो हे त्याला उमगले. रेडा मेल्याचे कळले तर कुंभार नुकसान भरपाई मागणार. त्याने जरा विचार केला. त्याचा बेरकी स्वभाव जागृत झाला. एवढ्या दांडग्या रेड्याचे पाय धरून ओढीत त्याने रेड्याला डगरीवरून खाली ढकलून दिला आणि त्याच पावली माघारी फिरला.

घरी येताना वाटेत माणसांची जाग लागल्यावर दत्तूने धोतराच्या निऱ्या सोडून ते अस्ताव्यस्त गुंडाळले आणि मातीतच बसकण मारली. अंगाला, तोंडाला माती फासली आणि “धावाऽ रे धावाऽऽ” असा हंबरडा फोडला. माणसे धावतच आली. त्यांना बघताच “लख्या कुंभाराच्या रेड्यान माका मारलान्. आता मी मरतय” असा आरडा ओरड आणि कण्हणे, विव्हळणे सुरू केले. माणसांनी त्याला उचलून घरी पोचवले. बायकोने गरम पाण्याने त्याचे अंग धुवून पंचा पालटायला देऊन त्याला घोंगडीवर झोपवला. दत्तूची बोंबाबोंब सुरूच होती. उजवा पाय त्याने ताठ करून धरलेला तो काय जवळ येईना. भटाला रेड्याने मारले ही बोंब गावभर झाली. जायबंदी झाल्याचे सोंग मात्र दत्तूने बेमालूम वठविले. संध्याकाळी कुशाभाऊ गोखले, बंडोपंत सोहोनी यानाही निरोप पाठवून बोलवून घेतले. रेड्याने आपल्याला कसे घोसळले? मग आपण त्याच्या शिंगाला मिठी कशी मारली? रेडा आपल्या सकट डगरीवरून कसा कोसळला? आपण जिवाच्या कराराने मोडका पाय घेऊन पलिकडे कसे आलो याचे सुरस वर्णन ऐकून मंडळीच्या काळजाचा थरकाप उडाला. संध्याकाळी डगरीखाली पडून रेडा मेला अशी आवई आली. दत्तू मिराशी पाऊण महिना अंथरूणावर लोळत राहिला. त्याच्या पायाला लेप लावून , सापळी बांधून झाली. त्याचे हगणे मुतणेही जाग्यावर व्हायचे. मग हळूहळू तो हिंडा फिरायला लागला. तरीही त्याच्या पायात कसर राहिली, असे गाववालेच सांगत.
दत्तूच्या घरायवळ माड पोफळीची बाग नजरेत भरायला लागली.आता बऱ्याच लोकांना त्याचा दुस्वास वाटायला लागला. घराखाली घरभाटाच्या कडेलाच त्याने भाताचा सरला बंडब्या डाळून ठेवला.शिमगा झाल्यावर मळणी घालून भातयाण गवत गोठ्याच्या माळ्यावर भरून ठेवायचे असा त्याचा शिरस्ता. पण शिमगा संपण्यापूर्वीच त्याच्या गवताच्या बंडब्यांना आग लागली. आता पावसाळ्यात गुरांचे हाल होणार. दीड दोनशे ओझी गवत जळून गेले. बंडब्यांच्या जवळ असलेले चार माडसुद्धा धग लागून मेले. दत्तूवर मोठेच अरिष्ट आले. दत्तू वरकरणी शांत राहिला. त्याने येशा धनगराला कोंबडा खायला घालून गवताला आग लावणाराचे नाव शोधून काढले. येशाने पक्की बातमी काढली. सदा आणि भिक्या या वाणीवाडीतल्यांचे ते काम असून त्यांना इतर वाण्यांचीही साथ असल्याचे निष्पन्न झाले. त्याना कसा धडा शिकवायचा याचा बेत त्याने आखला. तो संधीची वाट पहात राहिला. दुसऱ्या मोसमातला पाऊस संपला भाताची कापणी झाली. भात झोडून झाल्यावर गवताच्या बंडब्या रचून झाल्या. वाण्यांचे गवत ते मळ्यात खळ्यावरच डाळून ठेवायचे.
दत्तू अधूनमधून तालुक्याच्या गावी राजापूरला जायचा. राजापूरच्या विचारे वकिलांशी त्याची चांगली घसण. एकदा अशाच कामाचे निमित्त करून तो राजापूरला गेला. संध्याकाळ झाली म्हणून विचारे वकिलांकडेच तो वस्तीला राहिला. विचारे वकिलांच्या घराला मोकळी ओसरी पडवी. तिथे वेळे गरजेला त्यांचे पक्षकार पथाऱ्या टाकायचे त्याप्रमाणे दत्तू तिथेच टेकला. रात्री निजानिजा झाली. सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री झाल्यावर दत्तू टाकोटाक तेरवणला निघाला. राजापूर ते तेरवण चार कोसांचा पल्ला! तेरवणात येऊन सदा नी भिक्या वाण्यांच्या गवताच्या बंडब्या पेटवून दत्तू रातोरात राजापूरला परत गेला आणि विचारे वकिलांच्या पडवीत झोपला. तो सकाळी उठून तेरवणला आला. तेरवणात बोंबाबोंब उठलेली. वाण्यांचे गवत जळले. दत्तू वर वहिम घेण्यात आला. पण रात्री आपण विचारे वकिलांच्या पडवीत झोपलेलो होतो असे दत्तूने सांगितले वाण्यांनी विचारे वकिलांना भेटून ह्या गोष्टीची खातरजमा केलेनी. खुदद् वकिल साहेबांचाच पुरावा असल्यामुळे दत्तूचे कारस्थान उघडकीला आले नाही.
दत्तू चार दोन महिन्यानी बहिणीकडे मणच्याला खेप करायचा. तरी पलिकडे गुरवाच्या कौलांच्या वखारीजवळची उजवीकडे जाणारी पाळंद गंगीच्या घराकडे जायची. दत्तू मफतलालच्या होडीतून मणच्यात बंदरात पोचला. तो वखारी जवळ आला तेंव्हा वासू गुरव नी त्याचे भाऊ हमरीतुमरीकर येवून बोलत होते. दत्तूने चौकशी केली त्यावर वासू म्हणाला,“ह्यो कौलावालो इलो हा, उद्या उजवाडापावत कौलाचो पडाव खाली करूचो हा. फाटपटी सुकतीच्या ताणावर तो विजेदुर्गाक जानार, पन आज गडी पारध करूक गेले हत ते सांजवान कदी येती तवां येती नी इले तरी आज काय कौलां उतरूक येवच्ये नाय. मोटी पंच्याईत झाली हा. आमी पाचजान भाव नी घरत आट बायल् मानसं हत पन कौलाचो अख्खो पडाव उतरूक आट धा गडयांची तरी जमात व्हयी. आमची जमात पुरी पडणार नाय.” जरा विचार करून दत्तू म्हणाला, “माका चढवू उतरूक मदत क्येलास तर मी खेपेन चाळीस कौला हाणीन. आज मढ्यान् रातीपावत पडाव खाली करून द्येयन. मी पैजेर सांगतय. माका किती रुपाये देशाल?” वासू म्हणाला, “न्हेमीच्या गड्यांक वीस रुपाये देताव तुमका पाच जादा द्येव. चडवू उतरूक आमी भाभाव नीआमची बायल मानसां मदत करू. तुमच्या वांगडान आमी दुकु कौला न्हेवूक मदत करू. कायतरी करून राती सुकती लागण्याच्या टायमापूर्वी कौलां उतरून झाल्याशी कारन.”
   “मी रुपये पन्नास आनी जेवान रांदून खावक चार शेर तांदूळ नी सा मुटी डाळ घ्येयन /बगा जमता काय. दत्तू बोलला. हो नाही करता करता चाळीस रुपयांवर तोड झाली.दत्तूने मुंडं नी पडशी खुटीला अडकवली. गुरवाच्या पडवीत तीन धोंड्यांची चूल मांडून तीन शेराचा भात नी आमटीला ओली चवळी शिजत लावली. भाताला कडयेई पर्यंत त्याने कौलाच्या दहाबारा खेपा आणल्या. दोन हात लांब फळकूट घेवून त्यावर बारा बारा कौलांच्या चार थड्या रचून तो खेपेला अठ्ठेचाळीस कौलं आणी. भात नी चवळ्या शिजल्यावर आमटी ढवळली नी अर्धा भात उसपून घेवून त्यावर कालवणओतून चटपट जेवण उरकले. सुपारीचं अख्खं खांड चघळीत पुन्हा खेपा घालायला सुरुवात केली .चार पाच तासानी पाच मिनिटं दम घेवून दुपारी झाकून ठेवलेला भात नी आमटी खाल्ली नी सुपारीचं खांड चघळीत पुन्हा काम सुरु केलं. काळवं पडल्यावर चार फाणस लावून त्या उजेडात काम सुरु राहिलं.
  मदत करणाऱ्या माणसांच्या जोड्या तीन चार वेळा बदलल्या. पण दत्तूने कामात खळव न पाडता एकटाकी काम सुरु ठेवलं . दरम्याने ही वार्ता गंगीच्या घरी कळल्यावर तिचा नवरा नी दीर येवून भेटून गेले. त्याना आपण काम पूर्ण करून रात्री उशीरा टकलं टेकायला येवू असं सांगून दत्तूने वाटेला लावले रात्री अकरा वाजता काम पूर्ण झालं.दत्तूने पुन्हा दीड शेराचा भात शिजत लावला.विहीरीवर जावून थंड पाण्याने आंघोळ केली. भात आमटी रांधून झाल्यावर शांत जेवण उरकलं मुंडं चढवून गुरवाने दिलेले चाळीस रुपये पडशीत टाकले नी गंगीकडे गेला. “आता मी निसूर झोपणारआहे.उद्या सकाळी मला आपण होवून जाग येई पावत उठवू नका.” अशी वर्दी देवून त्याने जी ताणून दिली ती दुसरे दिवशीअकरा वाजे पर्यंत!
   भागिरथी रांबुक असली तरी तिन्ही मुले मात्र नक्षत्रासारखी. थोरली सखु आणि धाकटा मुलगा अनंत रूप आणि गुण दोन्ही बाबतीत आईवडिलांपेक्षा वेगळी निपजली. मुलींना तेव्हा जास्त शिकवण्याची प्रथा नव्हती. सखुच्या चार यत्ता झाल्यावर तिचे शिक्षण थांबले. अनंता मात्र चौथी, त्यानंतर सातवी करून तालुक्याच्या गावी इंग्रजी शाळेत जायला लागला. सखुला पदर आला. आता पोरीच्या लग्नाचे मनावर घ्या अषी भुणभुण भागीरथीने दत्तूच्या पाठी लावली. कुशाभाऊंच्या मनात ही मुलगी भरलेली. कधीतरी चेष्टेत, “तुला सून करून घेईन” असे ते म्हणायचे. एके दिवशी धूर्त दत्तू सखुसाठी शब्द टाकायला गोखल्यांकडे गेला. रात्री जेवणखाण झाल्यावर कुशाभाऊ त्यांचे भाऊ अप्पा, गोविंदा, बाबु गप्पा मारायला बसले आणि दत्तूने खडा टाकला. अप्पा गोखले पटकन म्हणाला, "कुशाच्या दिप्यासाठी पोरगी काय वाईट नाही पण मिराशी.आमचा बडेजाव तुम्हाला झेपेल का? हुंडा काय देनार?” दत्तूने याची योजना पक्की ठरवलेली ! गोखल्यांकडे बारमास पाटाचे पाणी असायचे.
त्यांच्या घरापासुन कुत्र्याच्या भुंकेएवढ्या अंतरावर धरण अन तिथून पाण्याचा पाट काढलेला. दत्तू म्हणाला,“हुंडा म्हणून रोख रक्कम द्यायची काय माझी उपत नाय. पण तुमचा पाण्याचा पाट मी स्वत: माझ्या खर्चाने आणि आंग मेहनतीने चिरेबंदी करून देईन.” विषय तसा चेष्टेवारी नेण्याइतपत या उद्देशाने अप्पा गोखले म्हणाले, “दत्तूकाका ! बघा हो !! तुम्ही स्वतः आमचा पाट चिरेबंदी बांधून द्यायचा. पाट बांधून झाला की लग्नाचा बार उडवू.” त्यावर दत्तू बोलला, “बघा हां, मी मागे येणार नाय.मुलगी तुमच्या घरात पडणार असेल तर मी माझा शब्द पुरा करीन.” दत्तूने खुंटी बळकट केली. दोन दिवसांनी ढोकण,छिनी,घण,पहार ही हत्यारे घेऊन दत्तू पाट बांधण्यासाठी गोखल्यांच्या घरी आला. त्याने आपला शिधा पण सोबत आणलेला. सामान पडवीत टाकून त्याने अप्पांना हाक मारली. “अप्पा पाट बांधायला आलो आहे.”
दत्तू बहाद्दर गडी निघाला. जवळजवळ पाऊण महिना राबून त्याने चिऱ्याची वळीवे काढली. आपल्या खर्चाने दोन तासपी मदतीला घेवून सगळ्या वळीवाना सहा आंगळे खोल नी रुंद पन्हळी खोदून घेतली. या मुदतीत दोन वेळा आपले जेवण तो स्वतः रांधून खाई. गोखल्यांनी आग्रह केला तर तो सांगे , “आता एकदम लग्नाच्या पंगतीत व्याह्यांच्या मांडीला मांडी लावून बसेन तेंव्हाच तुमच्याकडे जेवणार.” दत्तूची वळीवे काढून होईपर्यत गोखले मजा बघत राहिले. वळीवांचा ढीग पडल्यावरमात्र त्यांची खात्रीच पटली. अप्पा गोखले एकदा रात्री गप्पांच्यावेळी दत्तूला म्हणाले, “मिराशी आता आम्हाला आणखी लाजवू नका. मी तुम्हाला शब्द दिला. कुशाच्या दिपकला तुमची सखू करून घेणार म्हणजे घेणार! उद्यापासून चिरे तासायला मी गडी सांगितले आहेत तुम्ही फक्त देखरेख करुन पाटाचे बांधकाम करुन घ्या, तुम्ही शब्द खरा केलात असे हवे तर मी स्टँप पेपरवर लिहुन देतो, पण आता तुम्ही राबू नका,आम्हाला काही कमी नाही,लक्ष्मी पाणी भरायला आमच्या घरी चालून येतेय हे आमचे भाग्य . आता यात काय ते समजा.” गोखले खरोखरच दिलदार , पोरीचे सोने झाले ! या विचाराने दत्तूचे ऊर भरुन आले .
पाटाचे बांधकाम आता वेगाने सुरु झालेण् गोखले नको म्हणाले तरीही काम संपेपर्यंत दत्तूने दगड वहाणे,चर खणणे,छिनेलांची पन्हळी बसवणे ही कामे केलीच. पंधरा दिवसात पाट बांधून पूर्ण झाला आणि चिरेबंदी पाटातून घोंघावत पाटाचे पाणी गोखल्यांच्या दारात पूर्वीपेक्षा अधिकच वेगाने पडायला लागलं. मग जनरीत म्हणून बैठक झाली. ‘मुहूर्त’ ठरला देण्याघेण्याचा प्रश्नच गोखल्यांनी ठेवला नाही. त्यांच्याच दारात त्यांच्याच खर्चाने सखूचे शुभमंगल झाले . दृष्ट लागावी अशा थाटामाटात गोखल्यांनी कार्य केले.सखूच्या अंगावर वीस तोळे सोने घातले आणि लक्ष्मी होऊन ती गोखल्यांच्या घरात नांदायला लागली . पंचक्रोशीतली माणस दत्तूच्या धाडसाचे मुक्त कंठाने कौतुक करायला लागली. “दत्तू मिराशी अत्रंग खरा पण त्याची जिगर कोणाला यायची नाही !”
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙