प्रकृतेः क्रियमाणानि
कोर्टाचा बेलिफ आणि कोतवाल ह्याना घेऊन दाजी प्रभु भिकू घाड्याच्या घरासमोर थांबला. भार्गव शास्त्रींच्या घरावर जप्ती आलेली आहे हे कळताच भिकू पुरता हडबडला. गावचा पोलिस पाटील म्हणून सरकारी कामात मदत करणे त्याला भागच होते. सगळा लवाजामा भार्गवशास्त्री सोहोनींच्या वाड्यावर जाईपर्यंत जप्तीची बातमी खाजणतडीत वणव्यासारखी पसरली. असे काही विपरीत घडेल याची गंधवार्ताही नसल्यामुळे गावावर शोककळा पसरली. हातातले काम टाकून जो-तो भार्गवशास्त्र्यांच्या घराकडे निघाला. सरकारी मंडळी अंगणात आली तेव्हा पूजा उरकून निर्माल्य टाकण्यासाठी शास्त्रीबुवा बाहेर आलेले होते. चापून चोपून नेसलेला पितांबर, खांद्यावर धाबळीचे उत्तरीय, चकचकीत श्मश्रू केलेल्या डोईवरील गोपद्माकार घेऱ्यातून बाहेर पडून मानेपर्यत रूळणारी भक्कम शेंडी, मस्तक, बाहू, छाती यावर ओढलेले तिबोटी भस्म पट्टे आणि शांत संयमी मुद्रा असलेले शास्त्रीबुवा. त्यांच्या दर्शनानेच बेलिफाच्या मनात त्यांच्याविषयी अपार आदरभाव जागृत होऊन 'नमस्कार' असे म्हणत त्यांच्या समोर वाकून त्याने भूमीला हस्तस्पर्श केला. किंचित हसतच शास्त्रीबुवानी 'स्वागतम' असे शब्द उच्चारताच त्याना पुढे बोलू न देता दाजी प्रभू म्हणाला, “तुमचे स्वागत स्वीकारायला आम्ही आलेली नाही भटजीकाका. आत्ताच्या आत्ता नेसत्या वस्त्रानिशी वाड्याबाहेर पडा.तसा जप्तीचा हुकूम आहे आमच्याकडे." त्यावर जारबेच्या स्वरात बेलिफ म्हणाला,“एवढा अघोरीचरीपणा बरा नव्हे रे बामणा. एका सज्जन ब्राह्मणाचे मुलाबाळांचे घर आहे हे. शास्त्रीबुवांची नुक्ती कुठे पूजा होत्येय. शास्त्रीबुवा, तुम्ही सोवळे बदलून सावकाश पणे या.तोवर आम्ही ओसरीवरच टेकतो. गडबड धांदल करण्याची काही गरज नाही आणि हे बघ बामणा तू पावळीतच उभा रहा. अजून तुला घराचा ताबा दिलेला नाही.”
जप्तीची वार्ता ऐकून सगळा गाव हळु हळू शास्त्रीबुवांच्या घरासमोर जमा व्हायला लागला. असे कसे झाले ? दाजी बामणाची बुध्दी अशी कशी फिरली ? जो तो खालच्या आवाजात कुजबूजू लागला.दोन महिन्यापूर्वी मामलेदाराची नोटीस आली तेव्हा शंकरेश्वराच्या देवळात जमून सगळ्या गाववाल्यानी आणाभाकाही घेतलेलेल्या.त्यावेळी दाजी बामण हजर होता. मग गावासमोर गप्प राहून आयत्यावेळी शेण खायची दुर्बुध्दी त्याला कषी काय सुचली ? हे-हे सगळे थांबवायला हवे. कायदा झाला म्हणून काय झाले? शेवटी बामणाला गावातच रहायचे आहे ना ? घर खाली केल्यावर शास्त्रीबुवांच्या माणसांनी जायचे कुठे ? त्यांनी काय कुणाचे चार चव्वल बुडवले आहेत थोडेच ? हा निर्णय काय एकट्या शास्त्रीबुवांचा नाही,खार जमिनीचा सारा भरायचा नाही हे सगळ्या गावानेच ठरवलेले होते.ज्याला जे सुचेल ते जो तो दबल्या आवाजात कुजबुजू लागला. झाली गोष्ट फारच विपरीत होती पण हे अरिष्ट टाळायचे कसे ? हे काही त्या जानपद माणसाना उमगत नव्हते. महापाताळयंत्री बामण , त्याने अवघाती मोका बघून वर्मी घाव घातलेला.
देवघरात सोवळे बदलीतअसता शास्त्रीबुवांच्या मनात विचारांचे काहूर उठले.सोहोन्यांच्या सात पिढ्या खाजण तडीतल्या या वाड्यात नांदल्या. भार्गवशास्त्र्यांचे वडिल कृष्णशास्त्री अन चुलते रामशास्त्री तर वाईला वेद विद्या शिकून झाल्यावर काशीच्या कालभैरव देवस्थानचे पुजारी हरिभक्त पारायण श्रीपादबुवांकडे कीर्तनविद्या शिकण्यासाठी राहिलेले. कृष्णशास्त्रींना कौटुंबिक जाबाबदारीमुळे कीर्तन विद्या अर्धवट सोडून खाजणतडीत यावे लागले. पण रामशास्त्री मात्र गुरूचा वारसा सांभाळीत काशीलाच स्थायिक झालेले. दोन तीन वर्षानी एकदा त्यांची खाजणतडीत फेरी व्हायची. भार्गवच्या मुंजीतही ते सहकुटुंब आलेलेले. भार्गव चुणचुणीत, एकपाठी आहे. मधुर गळ्याची दैवी देणगी सुध्दा त्याला लाभलेली आहे. हे ओळखून विद्याभ्यासासाठी म्हणून त्यानी भार्गवला आपल्या सोबत काशीला नेले. घनपाठी झालेला भार्गव विद्याध्ययन पूर्ण करून खाजणतडीत आला तेव्हा दहाक्रोशीत त्याच्या बद्दल चर्चा झालेली. वेदविद्या आणि कीर्तन यामध्ये पारंगत असलेल्या या स्थळासाठी थोरा मोठ्यांच्या मुली सांगून आल्या. मात्र त्यांचे वडील कृष्णाशास्त्री यानी जन्म टिपण उत्तम जुळणारी वाड्यातल्या चिंतामणशास्त्रींची यमुना निवडली अन ती गंगा या नावाने सोहोन्यांच्या वाड्यात नांदायला लागली.
अत्यंत सात्विक, सदाचरणी भार्गव शास्त्रींना गावातच नव्हे तर दशक्रोशीमध्ये मान मिळायचा. कीर्तनासाठी तर त्यांना रत्नागिरी, गुहागर, गोवा, करवीर, नृसिंहवाडी अशी दूरदूरची निमंत्रणे यायची. शास्त्रीबुवा एकदा कीर्तनासाठी उभे राहिले की उत्तर रात्र उलटली तरी भान हरपलेला श्रोतृवृंद तन्मय होऊन खिळून रहायचा. जनलोकात उत्तम लौकिक अन् सन्मान असला तरी शास्त्रीबुवांची गृहस्थिती जेमतेम. केवळ चरितार्थाला पुरेल इतपतच ! घराखाली मळ्यात दहा खंडी भाताचे उत्पन्न देणारी भूमी असली तरी मळेशेती अशाश्वत असायची. शास्त्रीबुवांची वाटणी खाजणाच्या पार कडेला खाडीच्या ऐन नस्तात!मुसळधार वृष्टी होऊन मळ्यातले पाणी फारच तुंबले की खारे पाणी अडविण्यासाठी घातलेल्या चिखलाच्या बांधाला खांडी पडायच्या. सुरूवातीला हातभर असलेले खिंडार जोरगतीच्या भरतीमुळे फसाफसा वाढत जायचे. सुकती लागली की वेगाने निचरणारे मळ्यातले पाणी खांडीचा आय आणखी वाढवायचे अन मग दुसऱ्या भरतीच्या वेळी खाडीचे खारे पाणी मळयात शिरून भातशेतीचा तुळांकार करीत असे. बांधाला पडलेल्या या खांडी वेळेवर बुजवल्या तर ठीक नाहीतर संपूर्ण मोसभर मळा खारटाणी खाली पड रहायचा. मग कसली शेतीनी कसले काय! निम्मे मळ्यात चिमटीभर सुध्दा भात पिकत नसे. त्यातल्या त्यात गाव कुसाकडे ज्यांच्या जमिनीच्या वाटण्या होत्या ते शेतकरी मात्र कधी बुडत नसत.
शास्त्रीबुवांच्या पणजोबांच्या कारकीर्दीत तर म्हणे निम्म्या मळ्यात खाजणाचेच सम्राज्य पसरलेले. पण पणजोबा दूर दष्ष्टीचे. त्यानी सरकार दरबारी खेटे मारून सारा माफीचे फर्मान मिळवले. मग गावकऱ्याना हाताशी घेऊन स्वतःच्या देखरेखी खाली खारे पाणी अडविण्यासाठी बांध घातला. शिलकीतले सोने नाणे खर्चून बांध घातला. वास्तविक निम्मे मळा सोहोन्यांच्या मालकीचा. कारण खाजणतडीतले ते मोठे वतनदार. पण काही कुणबी घराणी हाताशी धरून स्वतःकडे चरितार्थापुरती चार आणे हिश्श्याची वाटणी ठेऊन उरलेली चार आणे हिस्से रशीची जमिन माळगवे, हेमले, कानडे, घाडी, राघव या लोकांना बक्षिस पत्राने ताब्यात दिल्या. चिखलाचा पक्का बांध घातल्यावर मळ्यातले पावसाचे पाणी जाण्यासाठी वरच्या कडेला आठ हात लांबीचे फाडे ठेऊन तिथे उंडलीच्या लाकडाची तीन झडपे असलेला दरवाजा बसविला. ही झडपे समुद्राच्या दिशेने उघडत अस्त. त्यामुळे सुकतीच्या वेळी मळ्यात साठलेले पावसाचे पाणी खाडीत वाहून जायचे नी पाणी तुंबण्याचा धोका रहात नसे. भरतीच्या वेळी दरवाजे बंद होवून खाडीतले खारे पाणी मळ्यात येत नसे.मात्र पंधरा वीस वर्षानी एकदा दरवाजाची चौकट आणि झडपे बदलावी लागत. कारण सतत पाण्यात राहिल्यामुळे सुरळया पडून, कुजून ती कोरम होत. तसेच पावसाळ्यातसुध्दा मुसळधार पाऊस पडे. तेव्हा आणि उधानाची भरती येई तेंव्हा रात्रंदिवस बांधावर राखण धरावी लागे. कुठे बारीक खांड पडताना दिसली तर लगेच वाडीतले झिलगे बोलावून ती बुजवून घ्यावी लागे. काहीवेळा मळ्यातल्या पाण्याला अती फुग पडतेशी वाटली तर पहारीने दरवाजाच्या झडपाना बिजागरा सारख्या लावलेल्या लोखंडी पट्टया उचकटून झडपे काढून टाकावी लागत. काहीवेळा सगळे उपाय थकत आणि बांध फुटून मळ्यात खारे पाणी शिरून मळा मोसमभर पड रहायचा. खाजणातली शेती ही अशी बिनभरवशी, रक्ताचे पाणी करणारी असली तरी जेव्हा कधी पिक पदरात पडे तेव्हा केलेल्या कष्टाची भरभरून परतफेडही खाजणशेती करायची.
जवळ जवळ पन्नास साठ वर्षेअशी बिनबोभाट गेली. त्यानंतर कोणी कशी काय कळ फिरवली नकळे.पण ब्रिटिश अंमलदाराचा सारा माफी रद्द केल्याचा हुकूम आला आणि खाजाणतडीतच नव्हे तर खारेपाटण पासून विजयदुर्गपर्यंत खाडी किनाऱ्यालगत खारजामिनी असलेल्या गावांमध्ये एकच बोंबाबोंब झाली. काही गावानी जमिनी पडच टाकल्या, काही ठिकाणी एकजूट करून जमिनी कसायच्या पण सारा भरायचा नाही. कदाचित कोर्टाने जमिनी लिलावात काढल्या तर गावातल्या कोणीही लिलावात बोली लावायला न जाता लिलाव मोडीत काढायचे असे ठरवले. काही गावानी ज्याना धोका कमी होता, पिकांची शाश्वती होती त्यानी बिनबोभाट सारा भरला. काही गावानी रदबदली करून मामलेदार - अंमलदाराना 'चरू- हवीष्य' अर्पण करून गुपचुप सारा माफी करून घेतली. आपत्ती सगळ्यांवर असली तरी एकसंघटित प्रयत्न नव्हते. काहीजणांनी मुळी येईल त्या किमतीला जमिनी विकून आपल्यापुरता ‘मनस्ताप‘ काढून टाकला. ज्याला जे सुचेल ते त्याने केले. सारा भरण्याचे फर्मान काढणारा अंमलदार बदलून गेल्यावर तर सगळाच गोंधळ झाला. कधीतरी कुठल्यातरी तहसिलात मागची प्रकरणे उकरून नोटिशी काढल्या जात. घाबरलेले जमिनदार मामलेदार नी त्यांचे फर्जीज्यादी यांच्या स्वाहा करण्यासाठी उघडलेल्या टाळ्याात काहीतरी ‘हवी’ टाकीत नी मग उकरलेली प्रकरणे गुलदस्त्यालगत रहायची. भार्गवशास्ह्त्र्यांचे लग्र झाले त्यावर्षी अशीच नोटिस लागली होती. शंकरेश्वराच्या देवळात मून मग गावाने मळा पड टाकायचा निर्णय घेतला. पावसाळ्यात कोणीतरी अव्वल कारकून मळा पड असलेला बघून गेल्यावर सारा माफी झाली नी दुसऱ्या मोसमात खाजणतडकरानी पुन्हा शेती करायची सुरूवात केली.
दिवाकराचा जन्म झाला आणि बऱ्याच वर्षानी सोहोन्यांचे घर बाललीलानी भरून गेले. कृष्णशास्त्रींना तर नातवाच्या कौतुकापुढे दिवस पुरत नसे. नित्यकर्मे अन् देवपूजा एवढीच सांसारिक गुतवणूक पार पाडून बाकी सगळा वेळ ते नातवावर संस्कार करण्यात घालवित. पाच वर्षे वयाच्या दिवाकराने महिम्न, पवमान मुखोदगत केले, त्याची वाणी एवढी शुध्द, आवाज असा मधुर की जटापाठी, घनपाठी शास्त्र्याने सुध्दा त्याच्या मुखातून महिम्न ऐकल्यावर कौतुकाने मान डोलवावी. आता त्यांच्या मुंजीचे वेध आजीला लागले. भार्गवच्या पाठीवरची त्यांची मुलगी कृष्णी तिचे लग्र झाल्यापासून घरात मंगलकार्य झालेलेच नव्हते.नातवाची तमुंजा गजाबारात करायची. भार्गव शास्त्रींचा लोकसंग्रह तर केवढा मोठा.त्यांचा लौकिक किती थोर.मुंजीच्या निमित्ताने दशक्रोशीतला ब्रह्मवृंद जमला तर अनायासे सहस्त्र भोजनही घडेल असे बेत आजी - आजोबा योजू लागले. मुंजीचे सूप वाजल्यावर हळुहळू फावल्या वेळात सामान - सुमान, निमंत्रणे यांच्या याद्या ते करायला लागले. यंदा मळाही चांगला पिकलेला. खंडाचे पंचवीस खंडी भात कोठारात भरलेले आहे. भार्गवच्या आणि स्वतःच्या प्राप्तीतूनही शिलकीत टाकलेली माया मुंजीचा थाट उडवायला पुरेशी आहे या विचाराने कृष्णशास्त्री अगदी निर्धास्त मनाने येऊ घातलेल्या मंगल कार्याची जोडणी करण्यात मग्र झाले.
मुंज दोन महिन्यांवर आली.आता शंकरेश्वराला मानाचे निमंत्रण करून बाहेरगावच्या काशी, नृसिंह क्षेत्र, गोव्या पासूनच्या आप्तेष्टाना आमंत्रणे पाठवायची सुरूवात करायला हवी असा बेत बापलेकानी आखला त्याच दिवशी ‘सारा‘ भरणा करण्यासंबंधीची मामलेदाराची नोटिस आली. फारशी गांभीर्याची बाब नव्हती पण अगदीच दुर्लक्ष करूनही भागणारे नव्हते. मग भार्गवशास्त्री तालुक्याच्या गावी मामलेदारांच्या भेटीला तिथले एक प्रतिष्ठीत वकिल रघुनाथपंत गोरे याना घेऊन गेले. अधिकारी ‘मुलकी’ निघाला. परिस्थितीची त्याला पूर्ण कल्पना पण कुणीतरी प्रांताकडे चुगल्या केल्यामुळे वरून हे प्रकरण आल्याची माहिती त्याने दिली. त्याने सांगितले की, आम्ही आणखी दोन नोटिसा देऊन लिलावाची ऑर्डर काढू. सगळ्या जमिनदारानी एकजूट करून ‘लिलाव‘ निकाली काढा आणि नंतर सारा माफीसाठी अर्जा करा. मी तुमच्या अर्जावर शिफारस देऊन कायमची सारामाफी मिळवून देईन. तुम्ही निश्चिंत रहा. पण लोकाना याची कल्पना देऊन एकजूट मोडू नका. एखाद्याची नियत फिरली तर मात्र मला काहीच करता येणार नाही. तेंव्हा तुम्ही फक्त एवढीच सावधगिरी घ्या. निर्धास्त होऊन घरी आलेले शास्त्रीबुवा हौशीने मुंजीच्या तयारीला लागले.
शास्त्रीबुवानी शंकरेश्वराच्या देवळात सगळ्या गावकऱ्यांची बैठक भरविली. मंडळी जमल्यावर मामलेदाराशी झालेले बोलणेही त्यांनी सांगितले. उलट सुलट विचार विनीमय चाललेले असताना दाजी बामणाने मात्र शंका उपस्थित केली. ‘म्हंजे ह्यो नोटिशी वरना इलेल्या आसत.फुडे काय व्हयत ता मामलेदाराक पण सांगाक येवचा नाय. काय व्हयत जायत ता बगू.ही कायमची झंझटा करीत ऱ्हवन्या पेक्शा ते पेक्षा कम जास्त किंमतीक आपल्या हिशाची जमिन इकान टाकलेली काय वायट. मी आपलो तुमका सावद करूचा म्हनान सांगतय.” अर्थात त्याचा हा सल्ला ऐकून फुका पासरी किमतीला जमिनी फुकून टाकायला लोकांचे शहाणपण काही चुलीत गेलेले नव्हते. प्राप्त परिस्थितीत सर्वानी गप्प रहायचे. लिलावाच्या नोटिशीना कोणीच दाद द्यायची नाही अन् लिलाव घ्यायलाही कोणी पुढे व्हायचे नाही. अशा शंकरेश्वराच्या साक्षीने आणाभाका झाल्या.
सोहोन्यांच्या घरातली माणसे मुंजीची तयारी करण्यात मग्र झाली. मुहुर्त निश्चित झाल्यावर दिवस वार बघून ढोल ताशाच्या गजरात ग्रामदेवाला मानाचे निमंत्रण देऊन झाले अन् यादीप्रमाणे दूरच्या आप्त स्नेही याना पाठवावयाच्या निमंत्रणाचे मसुदे ठरले. हळद पिंजरीचे बोट लावून बाहेर गावची आमंत्रणे रवाना झाली. पापड, फेण्या, सांडगे, कुरडया यांचे जिन्नस येऊन पडले. निवड टिपण सुकवले - वाळवणे या उस्तवारीने सास्वा सुना अगदी टेकीला आल्या. आता कापड चोपड आणि चांदीचे ताम्हन,पळी पंचापात्री,सोवळी अशी महत्वाची खरेदी करण्यासाठी भार्गवाने मुंबई - पुणे गाठावे असा लकडा त्याच्या आई - वडिलांनी त्याच्या मागे लावला. मग खरेदीसाठी जाण्याचा दिवस नक्की झाला. पैशांची जुळणी झालेली असल्यामुळे फक्त भार्गवशास्त्रीनी घराबाहेर पडणे एवढेच बाकी राहिलेले.
भार्गवशास्त्री सामान खरेदीसाठी गावातल्या दोन माणसाना सोबत घेऊन मुंबईला रवाना झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मामलेदाराची नोटीस आली. अर्थात या नोटिशीचा फारसा विचार कोणीच केला नाही. शास्त्रीबुवांनी नोटिस आपल्या कपाटात टाकली. भार्गवशास्त्री कापड चोपड आणि सामान घेऊन दहा दिवसानी परत आले. रात्री नवीन खरेदी करून आणलेली किटसन गॅसबत्ती पेटवून त्या उजेडात घरच्या मंडळीनी सोवळी - शालू, पितांबर, देण्याघेण्याची नी रोजा वापराची लुगडी मोठया हौसेने बघितली. पुढचे तीनचार दिवस मग खास माणसाना सामान दाखवण्यात कसे गेले ते कळलेच नाही. मुंजीला महिनाभर अवधी उरला. कामाच्या झपाट्यामुळे फक्त महत्त्वाचे जिन्नस म्हणजो लाडू, भिक्षावळ्यात घालायचे पाच पदार्थ एवढेच करणे शिल्लक राहिलेले होते. मागील दारी पुढील दारी अंगण करण्यासाठी गडी आले. अंगणसुकल्या वर चार दिवसानी मांडव घालायची जुळणी सुरु असताना लिलावाचा दिवस उजााडला.
त्या दिवशी शास्त्रीबुवा गडी घेऊन मांडवासाठी मेढी तोडायला आडवणात गेले. गड्यांच्या फैलात दोन वाटेकरी ही आलेले, त्यांच्या पैकी कोणीतरी लिलावाची डिक्री आल्याचा विषय काढला नी सगळ्यानी खो खो हसत सरकारची टर उडवली. मात्र त्याच वेळी दाजी बामणाने रक्कम घेऊन तालुका गाठला आहे हे कुणालाच माहिती नव्हते. दुपारी उशीराच मामलेदारानी सूचना दिली अन् पट्टेवाल्याने लिलावाची पुकारणी केली. ही केवळ कायद्याची अंमलबजावणी केल्याचे नाटकच आहे हे सर्वानाच माहिती होते. पण लिलाव पुकारल्यावर दाजी बामण उठला. त्याच्या सोबत पंच म्हणून त्याने तालुक्यातलेच दोन प्रतिष्ठित स्नेही घेतलेले. पंचा समक्ष आपण भार्गवशास्त्री सोहोन्यांच्या हिस्सेरशीच्या दंडाची रक्कम भरून लिलाव घेंणार आहोत असे तो म्हणाला. लिलावाची बोली वाढवायला दुसरा कोणी पक्षकारच नव्हता. त्यामुळे फक्त सरकारी वसुली एवढी सव्वाशे रूपये रक्कम भरून शास्त्रीबुवांच्या मळे जमिनीसह त्यांचे घर घरभाटाचे लिलाव घेऊन मिळकतीचा ताबा मिळण्यासंबंधात मामलेदारची ऑर्डर घेतली. त्या दिवशी तो तालुक्यातच राहिला. गावात कदाचित गडबड होईल असा धूर्त विचार करून त्याने कोर्टामार्फत लिलावातील मालमत्तेचा पोलिस संरक्षणाखाली ताबा मिळण्यासाठी अर्ज केला.
कोणाची नियत फिरून आपण अडचणीत येऊ याचा विचारही भार्गवशास्त्रींच्या मनाला शिवलेला नव्हता. आजतर लवकर आंघोळ वगैरे उरकून बाहेर गावची निमंत्रणे करण्यासाठी ते बाहेर पडायचे होते अन् अकस्मात जप्तीचे ववॉरंट घेऊन दाजी बामण मिळककतीचा ताबा घ्यायला आला म्हणताच त्यांचे डोके सुन्न झाले. सोवळ्याचा पिळा गाठ मारून मांडवी वर टाकल्यावर घाईघाईत धोतर पालटून निऱ्या काढीत ते ओसरीवर आले. “हं आता बोला काय ते .आता आम्ही काय करायला हवे ?” या सत्पवित्र ब्राह्मणाला घर खाली करून सर्व माणसानी ताबडतोब बाहेर पडा असे सांगायला सरकारी हुकूमाची तामिली करायला बांधलेले बेलिफ आणि कोतवाल यांचीही जिभ रेटेना. पण बामण गुर्मीत म्हणाला, “न्हेसल्या वस्त्रासकट सगळ्यानी भायर पडान् घर घरभाटाचो ताबो माका देवचो. तुमच्या दंडाची रक्कम भरून मी लिलाव घितलय्. सगळा सयसामान जयच्या थय ठेवन् लगच्या लगेच सगळ्यांका भायर काडा.”
दाजी बामणाचे हे शब्द ऐकल्यावर मात्र बेलिफ अवाक् झाला. बामणाचा बेमुर्वतखोरपणा बघून बेलिफाला राहवले नाही,“दाजी आता मात्र तू इथे सुध्दा थांबू नको. अंगणाबाहेर जाऊन पाळंदीत थांब. आम्ही घराचा ताबा घेऊन या डिक्रीवर शास्त्रीबुवांची सही झाली की तुला ताबा देऊ. मात्र तोपर्यंत मध्ये एक अक्षरही बोलशील तर ताबा देण्याचे काम मी रद्द करीनच पण सरकारी कामात अडथळा आणलास म्हणून तुला आधी पोलिस कस्टडीत टाकीन.” बामण खेटरासारखे तोंड करून बाहेर गेला. हा विषय स्वयंपाक घरात बायकांपर्यत गेलाच होता. कृष्णशास्त्री परसदारी विहीरीवर आंघोळीला गेलेले.त्याना बोलवायला शास्त्री बुवानी दिवाकरला पाठविले.
जप्ती आल्याचे समजताच म्हाताऱ्या कृष्णशास्त्रींचे अवसानच गेले. अति दुःखामुळे त्यांना रडूही येईना. भकास आवाजात ते म्हणाले, ‘परमेश्वरा. सात पिढ्या ह्या वाड्यात नांदल्या. मोठ्या हौसेने नातवाच्या मुंजीचा घाट घातलेला असताना हा कसला अभद्र प्रसंग आला रे आमच्यावर ?” भार्गव शास्त्री आता मात्र सावरले, वडिलांना शांत करीत त्यांच्या खांद्यावर थोपटल्या सारखे करून ते म्हणाले, “बापू, तुम्हीच असा धीर सोडू नका. तुमच्या नातवाची मुंजा कालभैरवाच्या साक्षीने काशी विश्वेश्वराच्या दारात लागावी अशीच विधी योजना आहे त्याला आपण काय करावे/” मग भगवदगीतेतल्या तिसऱ्या अध्यायातील श्लोक त्यानी खणखणीत आवाजात म्हटला, “प्रकृ्तेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः। अहंकार विमूढात्मा कर्तामिति मन्यते.” आता शांत विमनस्क झालेले कृष्णशास्त्री उठले. त्यानी पत्नी - सुनेला सांगितले,“आत्ताच्या आत्ता सोवळी बदलून नेसूची पातळे पालटा. आपल्याला हे घर सोडून कायमचे काशीला जायचे आहे.” खाली मान घालून सून म्हणाली, “मामंजी, हे जायचे म्हणून भात शिजत ठेवला आहे. शिजते अन्न टाकून जाऊ नये म्हणतात. तेवढा शिजला की उतरून ठेऊन वैश्वदेव उरकून बाहेर पडले तर नाही चालणार?”
कृष्णशास्त्री धारदार आवाजात म्हणाले,“नाही, अहो राजाज्ञा झालीय,त्यापुढे तुमचा वैश्वदेव कुठला ? तो भात तसाच राहू दे चुलीवर. आज आमच्याा हातचा वैश्वदेव काकबली नको आहे कोणाला. तुम्ही फक्त सोवळे बदला आणि बाहेर पडा.” सून - म्हातारी टाकोटाक नेसूची पातळे नेसून ओटीवर आल्या. सर्वांनी उंबऱ्यासमोर उभे राहून हात जोडले. मग भार्गवशास्त्रींनी दिवाकरला उचलून खांद्यावर घेतले अन् हसतमुखाने मंडळी घराबाहेर पडली. ओसरीवरून अंगणात उतरता उतरता भार्गव शास्त्री बेलिफ -कोतवाल यांच्याकडे वळून म्हणाले,“सरकारी आज्ञेप्रमाणे आम्ही घर घरभाटासह लिलावातल्या मिळकतीचा ताबा सोडून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडलो आहोत. आता दाजीप्रभूला ताबा द्या . बिचारा रंजीस येऊन तुम्ही बोलावण्याची वाट पहातेय.”
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙