गुन्ह्यांना ब्रेक लावा ; षडरिपूच आवाक्यात ठेवा
*माणसाचे सहा शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. या सहा शत्रूंनी गुन्हे घडत असतात. यात कोणताही व्यक्ती कितीही स्वतःला कन्ट्रोल करीत असला तरी गुन्हा घडतोच. अशावेळेस गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला वेळीच समुपदेशनाची गरज असते. ज्याप्रमाणे एखाद्या आजारादरम्यान वेळीच डॉक्टर उपलब्ध झाला, तर तो आजार बळावत नाही. तशीच परिस्थिती गुन्ह्यातही असते.*
गुन्हेगारी..... गुन्हेगारीचा दररोजचा आकडा पाहता तो वाढतच चालला असल्याचे व फुगीर होत असल्याचे निदर्शनास येते. तसं पाहिल्यास पोलीस प्रशासन सक्रिय असलं तरी गुन्हेगारी घडतेच. त्याचं कारण म्हणजे गुन्ह्याबाबतची असलेली अनुकूल परिस्थिती.
साधारणतः गुन्हे हे राग, ज्याला आपण क्रोध म्हणतो. द्वेष, ज्याला आपण मत्सर म्हणतो. लोभ, ज्याला आपण आवड म्हणतो. काम, ज्याला आपण वासना म्हणतो. मद, ज्याला आपण अहंकार म्हणतो आणि मोह, ज्याला आपण इच्छा वा आसक्ती म्हणतो. गुन्हे हे या पाच कारणांनी घडत असतात.
सर्वात महत्वाचं कारण म्हणजे राग. राग आला की तो एवढा विकोपाला जातो की त्यानंतरची परिस्थिती गुन्ह्यातच परावर्तीत होते. गुन्हा घडतो व त्यानंतर तो घडला व काही काळ निघून गेला की राग निवळतो. मग पश्चाताप होतो. कारण पश्चातापाशिवाय शेवटी मार्गच उरलेला नसतो. परंतु जेव्हा गुन्हा घडतो. तेव्हा हा विचार येत नाही की याचे परिणाम काय होणार? त्यावेळेस विचार आलाही. तरीही पाहून घेवू अशी आपली मानसिकता तयार असते. परंतु गुन्हा घडल्यानंतर जेव्हा जीवाचे हालहाल होतात. तेव्हा मात्र हीच मानसिकता गळून पडते.
गुन्ह्याबाबतचं दुसरं कारण म्हणजे लोभ. अलिकडेच नागपूरात या लोभाअंतर्गत एक गुन्हा घडला. तो म्हणजे एका प्राध्यापिका महिलेनं आपल्या ब्यांशी वर्षीय सासऱ्याचा खुन केला. सदर घटनेत तिचा पतीही वकील असल्याचं दिसलं. हे सर्व कशासाठी? तर त्या सासऱ्याजवळ असलेली मालमत्ता हडपण्यासाठी. बहुतेक तिला वाटलं असेल की आपण त्या म्हाताऱ्या सासऱ्याला संपवू. गुन्हा उघडकीस येणार नाही व मालमत्ता आपलीच होईल. परंतु गुन्हाच तो. तो गुन्हा कसा लपणार! तो उघडकीस आला. हे सर्व लोभापायी घडलं. तसेच असे बरेचसे गुन्हे हे लोभापायी घडत असतात.
तिसरी गुन्हा घडण्याची महत्वपुर्ण गोष्ट म्हणजे द्वेष. कारण द्वेषातूनही गुन्हेगारी वाढीस लागत असते. आजच्या काळात जगात तीन प्रकारचे लोकं राहतात. कनिष्ठ, मध्यम आणि उच्च. यातील जे कनिष्ठ वर्गाचे असतात. ते मध्यम वर्गाचा द्वेष करीत असतात. त्यांनी पुढं जावू नये हाच उद्देश असतो प्रत्येकांच्या मनात. तसेच मध्यमवर्गीय हे उच्च वर्गाचा द्वेष करीत असतात. हा द्वेष कधी संप्पतीवरुन तर कधी हुशारकीवरुन केला जातो आणि तो द्वेष क्षण क्षण वाढतच जात असतो. मग एकवेळ अशी येते की त्यातूनच पुढे गुन्हे घडत जातात.
अहंकार अर्थात मद. अहंकार ही देखील गुन्ह्याची एक पायरीच आहे. रावणाला कोणी कितीही सांगत असलं की सीतेला परत कर. अनर्थ होईल. परंतु रावण काही ती गोष्ट कोणाकडूनच ऐकला नाही. त्यातूनच पुढे रावणाचा अंत झाला. याचाच अर्थ असा की अहंकारातून गुन्हाच घडला. अशी बरेचशी गुन्ह्यांची प्रकरणं ही अहंकारातून घडत असतात.
पाचवी गुन्हा घडण्याची पायरी म्हणून काम अर्थात वासना. ही वासना केव्हा कोणात कशी निर्माण होईल, ते काही सांगता येणं कठीण आहे. वासना ही एखादी सुंदर मुलगी दिसली की बस. गुन्हा घडण्याची प्रक्रिया सुरु होते. ही वासना प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात असते. कोणात तीव्र असते तर कोणात अतितीव्र. कोणात कमी असते तर कोणात अतिकमी. मात्र ही वासना प्रत्येक व्यक्तीत असते. ज्या लोकांत वासना ही अतिशय तीव्र असते. त्यांच्या हातून गुन्हे घडण्याची दाट शक्यता असते. असे बरेच गुन्हे घडत असतात.
सहावी गुन्ह्याची पायरी म्हणून मोहाकडे पाहिलं जातं. मोह याचा अर्थ आसक्ती असा होतो. एखाद्या वस्तूत वा जीवात आसक्ती निर्माण झाल्यास गुन्हा घडत असतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास प्रत्येकाने आपल्या षडरिपूवर विजय मिळवावा. आपले षडरिपू आपल्या आवाक्यात ठेवावे. ते जर आपल्या आवाक्यात असतील तर गुन्हे घडत नाहीत. हे निर्वीवाद सत्य आहे. कारण आपले षडरिपूच आपल्या हातून गुन्हा घडविण्यास कारणीभूत असतात. यात शंका नाही. म्हणूनच माणसाने षडरिपूच आवाक्यात ठेवावेत, म्हणजे गुन्हे घडणार नाहीत. तशीच गुन्ह्यांची संख्याही कमी होईल यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०