प्रकरण २
सकाळी नऊ वाजता पाणिनी आपल्या ऑफिसात आला तेव्हा सौंम्या आणि गती एकमेकांकडे पाहून हसत होत्या.पाणिनी ला काहीतरी संशय आला म्हणून त्याने गतीकडे चौकशी केली की काय भानगड आहे.गतीने पाणिनीच्या टेबलावर ठेवलेल्या वर्तमान पत्राकडे पाणिनीचं लक्ष वेधलं.यातील छोट्या जाहिराती या सदरात आलेल्या एका जाहिराती भोवती लाल वर्तुळ काढून ठेवलं होतं गती ने.पाणिनीने ते वाचलं.
‘ रोख रकमेच्या बदल्यात मी तडजोड करायला तयार आहे.मला डेल्मन हॉटेल मधे संपर्क करा १२३-३२१ ’
“ ही आपल्याच अशिलाने दिलेली जाहिरात आहे?” पाणिनीने विचारलं.
“ दिसतंय तरी तसच ” सौंम्या म्हणाली.
“ अवघडच आहे.एकंदरित तो माणूस तिला चांगलाच त्रास देणार असं वाटतंय.आणि मग ती पुन्हा आपल्याकडे येईल, आपण तिला त्यातून बाहेर काढावं म्हणून.” पाणिनी म्हणाला
अचानक पाणिनी ने सौंम्याला सांगितलं की कनक ओजस ला फोन लाव.सौंम्या ने तो लावला.आणि पाणिनी ला जोडून दिला.
“ अरे तातडीने इकडे येऊ शकतोस का?”
“ पैसे मिळणार असतील तर कुठेही येऊ शकतो मी.” -कनक
“ नीघ लगेच. ” पाणिनी म्हणाला आणि फोन ठेवला.
“ कनकला हे सांगणं अनैतिक नाही ना?” –सौंम्या
“ कुणालाही काही सांगणं माझ्या साठी नैतिक नाहीच.” पाणिनी म्हणाला “ पण हा कोण पंछी आहे ते शोधून काढणं महत्वाचं आहे.”
“ तुम्हाला काही अंदाज? ”
“ सौंम्या, ही बया आपल्या आफिसात येऊन गेली आणि दुसऱ्याच दिवशी ही जाहिरात पेपरात आली. पेपरात अशा जाहिराती रातोरात छापून येत नाहीत.म्हणजे दोन-तीन दिवस आधी त्यांना मजकूर द्यावा लागतो आणि पैसे भरावे लागतात.याचाच अर्थ आपल्याकडे येण्यापूर्वीच तिने जाहिरात छापून येण्यासाठी दोन –तीन दिवस आधी तशी व्यवस्था केली असावी ,म्हणजे ती या शहरात आजच आलेली नसावी दोन तीन दिवसापूर्वीच येऊन डेल्मन हॉटेल मधे राहिली असावी.आणि त्या हॉटेलात आधी बुकिंग केल्याशिवाय जागा मिळत नाही.”- पाणिनी म्हणाला
“ बर मग?” –सौंम्या.
“ म्हणजे त्या हॉटेलात चौकशी केली तर आगावू बुकिंग करणारी कोण बाई आहे याची चौकशी करता येईल.” पाणिनी म्हणाला तेवढ्यात कनक ओजस आत आला आणि पाणिनी समोरच्या कोचावर अस्ताव्यस्त बसला.कनक पाणिनी एवढाच म्हणजे जवळ जवळ सहा फूट उंच होता.सोफ्यावर बसतांना तो, हात ठेवायला जी जागा असते त्यावर दोन्ही पाय पसरून बसला.
“ अशील कोण आहे?” त्याने पाणिनीला विचारलं.
“ तुझं अशील मी आहे.” - पाणिनी म्हणाला
“ तुझं अशील कोण आहे?” – कनक
“१२३-३२१ ” पाणिनी म्हणाला
“ म्हणजे? ”-कनक
“ मला अशीलाची ओळख म्हणजे हा कोड नंबर आहे. नाव वगैरे काहीच माहित नाहीये.”
“ काय गमतीदार क्लायंट येतात तुझ्याकडे पाणिनी ! आपली छोटी वही बाहेर काढत तो म्हणाला. “ बरं स्त्री आहे की पुरुष? ”
“ ते गोपनीय आहे.”
“ अरे असले घाणेरडे क्लायंट कसे काय घेतोस तू? ”-कनक
“ अरे या माझ्या अशिलाने स्वत:ची ओळख द्यायला नकार दिला पण मी काय करायचं आहे हे सांगितलं पण ते करायला मला मोकळीक दिली नाही,म्हणजे मी तिची केस कधी घ्यायची आणि काम कधी सुरु करायचं हे ती व्यक्ती मला नंतर सांगणार असं ठरलं. ”
“ तुला आगाऊ फी मिळाली असेल आणि तू ती घेऊन बसला असशील अर्धवट माहितीच्या आधारे आणि आता तुला ........”-कनक
“ माझ्या अशिलाला मी घेतलेले पैसे परत देण्यापेक्षा त्याने न दिलेली माहिती गोळा करावी असं मला वाटलं. ” पाणिनी म्हणाला
“ तुझ्या अशीलाची माहिती?” – कनक
“ थेट अशीलाची नाही त्याच्या भोवतालची माहिती.या प्रकरणावर परिणाम करू शकणारी.थेट परिणाम नसेल पण अप्रत्यक्षपणे.” पाणिनी म्हणाला
“ मी नेमकं काय करायला हवंय तुझ्यासाठी?” –कनक
पाणिनीने वर्तमान पत्रातली जाहिरात कनकला दाखवली.
‘ रोख रकमेच्या बदल्यात मी तडजोड करायला तयार आहे.मला डेल्मन हॉटेल मधे संपर्क करा १२३-३२१ ’
कनकने लक्षपूर्वक वाचली.
“ तुझ्या अशिलाने या हॉटेलात दोन रूम्स घेतलेल्या दिसताहेत; १२३ आणि ३२१. ”
“ असू शकते तशी स्थिती.” पाणिनी म्हणाला
“ दोन वेगळ्या मजल्यावरच्या रूम्स दिसताहेत, एक पहिल्या मजल्यावरची, आणि एक तिसऱ्या.” –कनक
“ असू शकते तशी स्थिती.” पाणिनी म्हणाला
“ थांब, मला वाटतंय की संपर्क करायला १२३ नंबरच्या रूम चा उल्लेख असावा आणि स्वत:चं नाव लिहायच्या ऐवजी ३२१ या कोड नंबरचा वापर त्याने केला असावा.”
“ असू शकते तशी स्थिती.” पाणिनी पुन्हा तेच वाक्य बोलला आणि वैतागून कनकने त्याच्याकडे पाहिलं.
“ काय हवंय तुला पाणिनी?”
“ ही जाहिरात कोणी दिली आणि कोणाला उद्देशून दिली आहे हे सर्व शोधून काढ.” पाणिनी म्हणाला
“ म्हंटलं तर खूप कठीण आणि म्हंटलं तर सोपं काम आहे हे.” कनक म्हणाला. “ हे हॉटेल असं आहे की शहरात काही खास कार्यक्रम असेल तर हे हॉटेल फुल असतं.इतर वेळी सधारण सत्तर ते ऐंशी टक्के भरलेलं असतं.मी रूम नंबर १२३ आणि ३२१ दोन्ही मधे कोणी बुकिंग केलं ते शोधून काढू शकेन पण त्यातून निष्पत्ती होणार नाही ” कनक म्हणाला आणि पाणिनीने मान डोलावली.
“ सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून खालील प्रमाणे जाहिरात आपणच द्यायची.
‘ संदेशात स्पष्टता नाहीये.तुम्ही मला ६५२६७२९२ या नंबर वर फोन करा. मी तुमच्या कोणत्याही सापळ्यात अडकू इच्छित नाही.....” कनक ने आपली कल्पना मांडली आणि पाणिनी काही बोलणार तेवढ्यात पुढे म्हणाला, “ अर्थात माझ्या डोक्यात आलेला हा मसुदा आहे.मला जरा त्यात काळजीपूर्वक बदल करावा लागेल, नाहीतर तुझ्या अशिलाला वाटू शकेल की बाहेरचं कोणीतरी जाहिरात बघून उत्तरं देतंय.”
“ कनक ही जाहिरात देणारी व्यकी माझं अशील असू शकते तसेच दुसऱ्या व्यक्तीने माझ्या अशिलाला उद्देशून ही जाहिरात दिलेली असू शकते.”
“ थोडक्यात तुझं अशील तुला कुठे भेटेल, आणि ते डेल्मन हॉटेल मधे असेल की नाही याची तुला खात्री नाहीये.” कनक म्हणाला.
“ मला एकाच खात्री आहे की मी सांगितलेलं काम तू करणार आहेस.” पाणिनी म्हणाला
“ तुला कधी पर्यंत रिपोर्ट हवाय पाणिनी?”
“ जेवढ लवकर सुरु करता येईल तेवढ.तुझ्या दृष्टीने कितीही क्षुल्लक माहीती असो, मला रिपोर्ट कर.”
“ दिवसा आणि रात्री सुद्धा?”-कनक
“ इतकं अर्जंट नाहीये हे, दिवसा आणि संध्याकाळी असं म्हणूया.” पाणिनी म्हणाला
“ किती माणस नेमू शकतो मी? कितीही?” –कनक
“ पाच हजार पर्यंत खर्च करू शकतोस, त्यावर व्हायला लागला तर मला आधी विचार.”
कनक त्याचा निरोप घेऊन बाहेर पडला.तो बाहेर जाताच सौंम्या पाणिनीला म्हणाली, “ याचा हिशोब कसा करायचा सर? तुम्ही तिच्याकडून जेवढे घेतले तेवढे सगळे कनक ला देताय.तुम्हाला आपल्या अशिलाचे नावही माहित नाहीये.”
“ सध्या तू अनामिका नावाने जमा करून ठेव. ही अनामिका विचित्रच आहे. स्वत:ला येणार असलेल्या समस्येचा अंदाजही तिलाच आलाय आणि त्यावरचा उपायही तिनेच शोधलाय.प्रश्न हा आहे की दोन्ही बाबतीत तिचा अंदाज चुकलेला असू शकतो.” पाणिनी म्हणाला
“ ते काहीही असलं तरी आजच्या दिवसाची सुरुवात आर्थिक दृष्ट्या घाट्यातच गेली.” –सौंम्या.
“ फायद्यात झाली नाही असं म्हणणं संयुक्तिक ठरेल.” पाणिनी म्हणाला.
***************
पाणिनीचा दुसरा संपूर्ण दिवस कोर्टातच गेला.पानाच्या दुकानात चोरी करण्याचा आरोप आलेल्या एका चोराची केस न्यायाधीशांनी त्याला दिली. त्या मुलाकडे वकील द्यायला पैसे नव्हते आणि त्याच वेळी पाणिनी दुसऱ्या एका प्रकरणात कोर्टात आला होता तेव्हा ही केस घेशील का असं न्यायाधीशांनी पाणिनीला विचारलं.पाणिनी त्या मुलाशी पंधरा वीस मिनिटं बोलला तेव्हा त्याला तो मुलगा निर्दोष वाटला. पाणिनीने केस घ्यायला होकार दिला.
पानाच्या दुकानातून रोकड रक्कम आणि सिगारेट ची पाकिटे चोरून स्कूटर वरून पळून जाणाऱ्या उंच आणि भरघोस मिशा असलेल्या आणि हातात प्लास्टिकच्या पिशवीत सिगारेट ची पाकिटे नेणाऱ्या मुलाला तीन साक्षीदारांनी पाहिलं होतं.त्याच्या कडे पोलीस झडतीत रोकड मिळाली नाही पण सिगारेटची पाकिटे सापडली.पाणिनीने तिन्ही साक्षीदारांची उलट तपासणी घेऊन त्यांची साक्ष डळमळीत करायचा व्यर्थ प्रयत्न केला. न्यायाधीश त्या मुलाला दोषी ठरवणारच होते पण निवडा द्यायच्या आधी एक पोलीस अधिकारी घाई घाईने कोर्टात आला आणि अगदी आरोपीच्याच वर्णनाचा खरा चोर सापडल्याचे त्याने कोर्टाला सांगितलं. पाणिनीचं अशील सुटलं.
“ आता घरी गेल्या गेल्या इतरांच्या नजरेत भरणाऱ्या तुझ्या मिशा कमी कर आणि इथून पुढे प्लास्टिक पिशवी घेऊन घरबाहेर पडू नकोस.” पाणिनी त्याला हसून म्हणाला.
“ मी घरी जाण्यापूर्वीच सलून मधे जाऊन मिशा पार भादरून टाकतो.” तो मुलगा म्हणाला.
पाणिनीकोर्टातून थेट घरीच जाणार होता पण ऑफिस मधे डोकावून मग घरी जाऊ असा विचार करून तो ऑफिसात आला.सौंम्या ऑफिस बंद करून घरी गेली होती.तिने टेबल वर चिट्ठी ठेवली होती.
वर्तमान पत्रात आलेली जाहिरात तुमच्या टेबलवर ठेवली आहे.वाचा. पाणिनीआपल्या केबिन मधे आला.समोर जाहिरातीचे पान उघडून ठेवलं होतं.
‘ १२३-३२१ कोणत्याच सापळ्यात अडकायचे नाही. आज रात्री ९ वाजता हॉटेलच्या गेट जवळ मी टॅक्सी मधे असेन.तिथे भेटा.एकटेच. कोणीही बरोबर नको.’
पाणिनीने चिट्ठी वाचली आणि कनक ओजसच्या ऑफिसला जायला निघाला.याच्याच मजल्यावर कनकचं ऑफिस होतं.
“ तू आणि तुझं विचित्र अशील ! ” पाणिनीला बघताच कनक ओजस उद्गारला. बोलता बोलता त्याने सौंम्या ने पाणिनीसाठी ठेवलेली जाहिरात दाखवली.
“ काय प्रगती कनक?” पाणिनीने विचारलं.
“ तिने पलीकडच्या व्यक्तीला संपर्क केलाय की नाही आणि तिला पलीकडची माणस माहित आहेत वा नाहीत दोन्ही शक्यता गृहीत धराव्या लागतील असं गृहित धरून मी कामाला लागलो.ही जाहिरात मीच दिली पेपरात आणि हॉटेल बाहेर गाडीत थांबेन असे कळवलं.”
“ तिला शोधायचे तू दुसरे काही प्रयत्न केले असशील असं मला वाटलं होतं.” पाणिनी म्हणाला
“ अर्थातच,मी आधी वर्तमान पत्राच्या जाहिरात विभागात जाऊन पहिली जाहिरात कोणी दिली त्या व्यक्तीचं वर्णन मिळवलं.म्हणजे तुझ्या अशीलाचं. कारण तुझं अशील बाई आहे की पुरुष हे तू मला कुठे सांगितलं होतंस?मग मी डेल्मन हॉटेल ला गेलो पण तिथून माहिती नाही मिळाली काही.म्हणून मी ही जाहिरात दिली आणि टॅक्सी घेऊन हॉटेल गेट बाहेर टॅक्सी मधे थांबलो.सोबत एक माझी स्त्री गुप्त हेर घेतली.”
“ बर, पुढे?” पाणिनीने विचारलं.
“ मी आणि माझ्या स्त्री गुप्त हेराने आमचे चेहेरे सहज दिसणार नाहीत याची खबरदारी घेतली होती आणि टॅक्सी पण अशी लावली होती की सहज सहजी आम्ही दिसणा नाही. आमच्या टॅक्सी जवळून एक तरुण मुलगी गेली पण तसे इतरही बरेच लोक येत जात होते. पण ही एक मुलगी ३-४ वेळा टॅक्सी जवळून गेली.ती हुशार होती,तिने जरासुद्धा आमच्याकडे पाहिलं नाही किंवा तसे संकेत दिले नाहीत.पण मग आम्ही धोका पत्करला नाही आणि टॅक्सी घेऊन निघालो.”
“ अरे, तिच्यावर नजर नाही ठेवली? पाठलाग नाही केला तिचा?” पाणिनीने विचारलं.
“ अर्थातच केला.” कनक म्हणाला. “आमच्या टॅक्सी मागे मी आणखी एक हेर ठेवला होता. आमची टॅक्सी गेल्यावर ती पण हॉटेलात निघून गेली पण माझ्या हेराने तिची माहिती काढली. ती डेल्मन हॉटेलात ७६१ नंबरच्या रूम मधे राहत्ये. प्रचिती खासनीस देवगिरी अशा नावाने तिचे बुकिंग आहे.”
“ मस्तच काम केलंस, कनक.” पाणिनी म्हणाला
“ अजून माझं सगळ बोलण संपलेलं नाहीये पाणिनी. माझ्या हेराने तिथल्या वेटर ला फोन ऑपरेटर ला काही पैसे सरकवले आणि बरीच माहिती मिळवली. या प्रचिती खासनीस चे जे समान आलंय त्यावर इंग्रजीत PK असे स्टँप मारलेत.”
“ असणारच, प्रचिती खासनीस नावाचा शॉर्ट फॉर्म ” पाणिनी म्हणाला
“ पाणिनी, एखादी व्यकी जेव्हा स्वत:ची खरी ओळख दडवते तेव्हा सर्व साधारणपणे नाव तेच ठेवते पण आडनाव दुसरे घेते असा माझा अनुभव आहे.म्हणजे प्रचिती खासनीस मधले नाव प्रचिती बरोबर असेल पण आडनाव खासनीस ऐवजी दुसरे असू शकते. खात्री करण्यासाठी आम्ही ती कोणाला फोन करते यावर नजर ठेवली. हॉटेलच्या रजिस्टर वर तिने तिचा फोन नंबर लिहिलाच होता.आम्ही फोन कंपनी कडून तिने कोणाला फोन केला की हॉटेलात आल्यावर याची माहिती मिळवली. देवगिरीहॉस्पिटल नावाच्या हॉस्पिटल मधे तिने प्रयंक पारसनीस. नावाच्या पेशंटला २-३ वेळा फोन लावल्याची माहिती मिळाली. माझ्या माणसाने त्या हॉस्पिटल मधून या प्रयंक पारसनीस ची माहिती घेतली.तो देवगिरी मधील एकादषम अर्वाचिन कंपनी इथे नोकरी करतो.त्याला वाहन चालवताना अपघात झालाय त्यामुळे त्याला हॉस्पिटल मधे दाखल केलय. आपल्या प्रचिती चं आडनाव पारसनीस असेल असा माझा अंदाज होता आणि तो खरा ठरला.आम्ही प्रचिती पारसनीस या नावाने तिची चौकशी केली.हॉस्पिटल मधून माहिती मिळाली की ती त्याची बहिण आहे आणि भावाच्याच कंपनीत नोकरी करते आहे.”
“एकादषम अर्वाचिन कंपनी इथे? ” पाणिनीने विचारलं.
“ होय. भावाला अपघात झाल्याने ती सध्या रजेवर आहे. तिच्या कुटुंबात आणखी कोणी नाही.”-कनक.
“ फारच सविस्तर माहिती मिळवलीस कनक आणि खूप कमी वेळात.” पाणिनी म्हणाला “ पण कंपनीतल्या कोणाला काही संशय नाही आला? ” पाणिनीने विचारलं.
“आला असेल असं नाही वाटत.त्यांच्याकडे तेवढा वेळच नव्हता, ते ऑडीट मधे व्यग्र आहेत सध्या. आमच्या लोकांनी असं भासवलं की विमा कंपनीकडून हॉस्पिटल चा खर्च रिफंड करण्यासाठी रुटीन चौकशी केली जात आहे ही.”
“प्रयंक ची तब्येत कशी आहे? ” पाणिनीने विचारलं.
“ सुधारत्ये पण अजून दोन आठवडे तरी शुद्धीवर येणार नाही. तो सामान घेऊन आपल्या गाडीने परगावी निघाला होता.पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असतांना लाल सिग्नल तोडून एक गाडी आली आणि त्याला धडक दिली.त्यातच याची शुद्ध हरपली. ”-कनक
“ त्यात प्रयंक ची चूक असल्याची शक्यता किती आहे?” पाणिनीने विचारलं.
“ बिकुल नाही. धडक देणारी गाडी सिग्नल तोडून आली हे बघणारे लोक आहेत शिवाय त्या ड्रायव्हरने दारू प्याली होती हे सिद्ध झालंय.”-कनक
“ आपला भाऊ आजारी असूनही प्रचिती देवनार वरून इथे का आली असेल?आपल्याला भेटून अर्धवट माहिती देऊन का गायब झाली असेल? आणि पेपरात जाहिराती देत असेल? ”
“ तुला हवं तर ते शोधून काढायचं काम करीन मी. पण मला वाटतंय की या कुटुंबाला ब्लॅकमेल करायचा डाव असावा यात.”—कनक
“ तू म्हणालास की तिच्या कुटुंबात आणखी कोणी नाही म्हणून?”
“ दोघं बहिण भाऊच आहेत.दोघांचं लग्न झालेलं नाही पण प्रयंक पारसनीस चं ठरलंय. एका श्रीमंत मुली बरोबर.लौकरच तो साखरपुड्याची बातमी देणार अशी अफवा आहे.”—कनक
“ प्रयंक च वय काय आहे?”
“ पंचवीस-सव्वीस असावा.”
“ प्रचिती पेक्षा लहान?” पाणिनीने विचारलं.
“ दीड वर्षाने.”
“ कनक, तिला कळणार नाही अशा पद्धतीने इच्या मागावर रहा अजून काही दिवस. ती कुणाला भेटते,कुठे जाते ते मला हवंय.तिला कळल तर ती चुकीची कृती करेल आणि मला अडचणीत आणेल.” पाणिनी म्हणाला
“ त्यासाठी मला एकापेक्षा जास्त हेर कामावर ठेवायला लागतील.कारण एकच माणूस सतत तिचा पाठलाग करत राहिला तर इला संशय येऊ शकतो......आणि...”—कनक
“ ते तू ठरव कनक.तिला संशय न येता मला माहिती मिळाली पाहिजे.”
“तुला माझ्याकडून रिपोर्ट कधी हवाय?”-कनक
“ विशेष काही घडेल तेव्हा.” पाणिनी म्हणाला
प्रकरण 2 समाप्त.
(आवडली असेल तर कॉमेंट करा. आपल्या मित्र व नातलग यांना माझ्या कथा वाचण्यास सांगा)