प्रेमात कधी कधी....
कथेचे सर्व हक्क लेखकाकडे
रेल्वे अगदी हळुवारपणे बडनेरा स्टेशनला थांबली.
" तुम बिन जिया जाए कैसे... कैसे जिया जाए तुम बिन " स्नेहाने मोबाईल मध्ये सुरु असलेलं गीत अचानकपणे बंद केलं आणि कानातले हेडफोन बाहेर काढले. नेत्राच्या कडा अश्रूंनी पाणावल्या होत्या. काही अश्रुधारा कशालाही न जुमानता तिच्या गोबऱ्या गालावर येऊन साचल्या.
" 16 जून.... आजही तीच तारीख.... तेच बडनेरा स्टेशन" नकळतपणे तिच्या ओठातून एवढेच शब्द बाहेर पडले. रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं वातावरण अगदी ढगाळ झालं होत. कुठल्याही क्षणी वरुण राजांचे आगमन होण्याची चिन्हे सर्वत्र दिसत होती. स्टेशनवर गरम चाय.... गरम चाय च्या स्वरांनी स्नेहाच्या कानठळ्या बसायला लागल्या होत्या. वाऱ्याच्या थंडगार झुळुकामुळे मोकळे सोडलेले तिचे केस तिच्या गोऱ्या चेहऱ्याभोवती पिंगा घालत होते. स्टेशनच्या बाजूला उभ्या असलेल्या गुलमोहराच्या झाडांचा सडा सर्वत्र पसरला होता. गुलमोराचे फुल स्नेहाच्या अगदी मर्मस्थानी होत. त्यातलीही पांढऱ्या ठिपक्यांची पाकळी तिच्या मनाला कायमच भुरळ घालीत असे. त्यातलं एक गुलमोहरच फुल वाऱ्याच्या झुळुकाबरोबर उडून येत अलवारपणे खिडकीतून डोकावून स्नेहाच्या मांडीवर येऊन बसलं . स्नेहाने आपल्या हातात घेऊन त्या फुलाला एक क्षण न्याहाळलं "कोमेजून गेला आहेस रे तू......आता तर माझं आयुष्यही तुझ्यासारखंच कोमेजून गेल आहे " स्नेहा स्वतःशीच पुटपुटत होती. अश्रुंचे दोन टपोरे थेंब त्या सुकलेल्या पुष्पावर पडले. भूतकाळातली सोनपावल तिला परत त्याच वाटेवर घेऊन आले होते. ती परत 1 वर्षआधी आठवणींच्या रम्य दुनियेत हरवून गेली होती.
स्नेहा ने नुकतेच आपले M. B. A पूर्ण केले होते. मुंबईच्या धाकधुकीच्या जीवनात मनशांती म्हणजे नक्की काय असते हे ती विसरुनच गेली होती. म्हणून काही काळ शांततेत घालवण्यासाठी स्नेहा तिच्या मैत्रिणीकडे नागपुरला जायला निघाली. स्नेहा हि दिसायला साधारणतः गोरी पण चेहऱ्यावर एक लख्ख झळाळणारी कांती, पाणीदार डोळे, रेखीव नाक आणि लांबसडक रेशमी केस असं तीच सुंदर व्यक्तिमत्व होत.
रेल्वे भरघाव वेगाने बडनेरा स्टेशनला पोहचली. बाहेरच्या कर्कश्य आवाजाने स्नेहाची निद्रा भंग पावली. आळसल्या नेत्रांनी ती स्टेशनच्या बाहेरच्या परिसरावर एक नजर फिरवीत होती. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचे बाण तिच्या नेत्राला खट्याळपणे स्पर्श करीत होते म्हणून ते कोवळे सूर्यकिरण तिला अधिकच त्रासदायी वाटू लागले. पाण्याचा एक घोट घेऊन आपले अस्तव्यस्त झालेले रेशमी केस तिने बांधले. आपला मोबाईल सुरु करत whatss app चे msg ती चेक करत असतांना अचानकपणे फेसबुक मेसेंजर वर मिस्टेरीयस बॉय चा Hiii हा msg इनबॉक्स मध्ये खणाणला. स्नेहाच्या चेहऱ्यावर कुतुहलाच्या छटा क्षणार्धांतच उमटल्या. खरंतर कुठल्याही अनोळखी मुलाचा msg इनबॉक्स मध्ये खणानन ही काही तिच्यासाठी फार आश्चर्यजनक गोष्ट नव्हतीच पण हे account तिला जरा वेगळं भासत होतं. मागील काही दिवसात फेसबुकच्या friend request न पाहताच तिने स्वीकारल्या होत्या. सहज कुतूहल म्हणून तिने त्याचे प्रोफाईल चेक केले. त्याने केलेल्या काही पोस्ट खरंच जगावेगळ्या होत्या. प्रत्येक पोस्ट मध्ये काही ना काहीतरी मिस्ट्री होतीच. पोस्ट वाचल्यावर जगाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतांनी कितीतरी प्रश्न अगदी सहजपणे तिच्या मनात उभे ठाकले होते. स्नेहाला आता त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. आपल्या केसांशी खेळत ती त्याला रिप्लाय द्यावा कि नाही याच विचारकक्षेत गुंतली होती. शेवटी न राहवून तिने त्याला Hiii हा रिप्लाय दिला. तिकडूनही लगेचच रिप्लाय आला. रेल्वेनेही आता वेग पकडला होता. स्नेहा आता त्या मिस्टेरीयस बॉय बरोबर अगदी मोकळेपणाने बोलत होती. एक निरागस हास्य तिच्या चेहऱ्यावर उमलू लागलं होत.
" तुझं खरं नाव काय आहे रे? " स्नेहाने मिस्टेरीयस बॉय ला प्रश्न केला होता.
" ती एक मिस्ट्री आहे स्नेहाजी " तिकडून त्याचा रिप्लाय आला होता.
" हो पण तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला " स्नेहाने मोकळेपणाने लिहलं होत. मिस्टेरीयस बॉय ने तिला अजूनपर्यंत कुठलीच माहिती दिली नव्हती. फक्त एवढंच म्हटलं कि आज रात्री नऊ वाजता ऑनलाईन भेटली तरच तिला त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळेल.
" काय मुलगा आहे हा " खूपच खट्याळ आहे. स्नेहा स्वतःशीच हितगुज करीत होती. कितीतरी दिवसानंतर तिचे गोबरे गाल गुलाब पाकळ्या सारखे गुलाबी झाले होते..
रेल्वे आपल्या शेवटच्या स्टेशनवर अर्थातच नागपूरला पोहचली होती. अनघा तिची मैत्रीण तिला घ्यायला स्टेशनवर आली होती.
" काय मॅडम.. तुमच्या गालावरची लाली फार चकाकतेय... काही विशेष कारण आहे का? " स्नेहाच्या पोटाला एक चिमटा काढत अनघा म्हणाली.
" नाही गं तस तर काही नाही.. " आपल्या चेहऱ्यावर असलेल्या सुप्त आनंदलहरी लपवत स्नेहाने एक कटाक्ष तिच्यावर टाकला.
" असू दे बाबा नको सांगुस " अनघा लटका राग दाखवत म्हणाली आणि दोघींनीही हसून ऐकमेकिंची गळाभेट घेतली.
अनघाच्या घरी गेल्यावर स्नेहाला फार ताजतवानं आणि टवटवीत वाटायला लागलं होत. मोर ज्याप्रमाणे पावसाची डोळे लावून प्रतीक्षा करतो त्याचप्रमाणे स्नेहाहि आता 9 वाजण्याची मोरप्रतीक्षा करीत होती.
" काय झालंय मॅडम कुणाचीतरी वाट पाहत आहात का? "खोडी काढत अनघा म्हणाली.
" गप गं.... तुझं आपलं काहीतरीच "स्नेहा तिची गोष्ट हटकत म्हणाली.
शेवटी एकदाचे 9 वाजले. तिच्या मेससेंजरच्या इनबॉक्स मध्ये मिस्टेरीयस बॉय चा Hiiii हा msg होता. स्नेहाच्या मनातून आनंद ओसंडून वाहत होता. एका अनोळखी व्यक्तीसोबत कितीतरी वेळ ती निखळ मनाने बोलत होती. बोलता बोलता त्या मिस्टेरीयस बॉय ने त्याची सर्व माहिती तिला सांगितली. त्याच नाव अधिराज देशपांडे होत., वय 26 वर्ष, अभियांत्रिकी शाखेतली त्याने पदवी घेतली होती आणि सध्या घरचा वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत होता. दोघेही जण आता ओळखी असल्यासारखे बोलत होते. काही वेळातच त्यांनी whatss app नंबर ची अदलाबदली केली. स्नेहा रात्रभर फक्त नि फक्त अधिराजचाच विचार करत होती. तिच्या डोळ्यासमोर फोटोतील त्याच्याच चेहरा येत होता. आता तासन..... तास ते फोनवर बोलत होते. अधिराजने मुंबईला आल्यावर तिला भेटण्याचे कबूल केले होते. खरंतर दोघांच्याही मनात प्रेमपुष्पे लहडले होते. स्नेहा तर त्याच्या सुमधुर स्वप्नात हरपून गेली होती. एकही दिवस जर तीच अधिराजशी बोलणं नाही झालं तर तीच मन फार उदास होऊन जायचं. खूप वेळानंतर जेव्हा त्याचा msg पाहायची तेव्हा तप्त झालेली धरणी बरसलेल्या मृगसरींनी जशी तृप्त होते तशीच ती पण त्याचा msg पाहून मनातून तृप्त व्हायची.
असेच ऐकमेकांशी प्रेम लपंडाव खेळण्यात दिवसेंमागून दिवस जात होते. एके दिवशी अधिराजने Businesses च्या कामानिमित्त मुंबईला येत असल्याचे सांगितले. स्नेहाच्या तर आनंदाला उधाणच आलं होत. प्रेमगीताच्या सप्तसुरांचे तुषारस्वर तिच्या कानात घुमत होते. शेवटी तो दिवस उजाळला. मुंबईच्या फॉरणो कॅफेत दोघांनीही भेटण्याचे ठरविले होते.
हलकासा मेकअप स्नेहाचे सौंदर्य खुलावयाला पुरेसा होता. फॉरणो कॅफेमध्ये ती अधिराजच्या आधीच येऊन पोहचली होती. दूरवरून दिसणाऱ्या अधिराजच्या आकृतीने तिचे नेत्र सुखावले होते. 6 फूट उंचीचा, देखणा, रुबाबदार, प्रमाणबद्ध असलेली त्याची दाढी, जेल लावून उभे केलेली केशरचना, अंगात पांढरा शर्ट आणि काळा पॅन्ट असं भारदस्त त्याच व्यक्तिमत्व होत. तिच्यासाठी अधिराजने फुलांचा एक गुच्छा आणला होता. कितीतरी वेळ ते दोघेही जण ऐकमेकांकडे पाहतच होते. जणू त्याच्यामध्ये असलेली शांतता त्यांच्यात उमलून आलेल्या प्रेमरूपी भावनेची साक्ष देत होती. जाता जाता अधिराजने आपल्या मनातील प्रेमभावना शब्दरूपी स्वरूपात स्नेहा जवळ व्यक्त केल्या. स्नेहा ज्या गोष्टीची मनोमन प्रार्थना करीत होती ती आता सत्य झाली होती. असंख्य फुलपाखरे अगदी थव्याने पोटात उडतायेत अशीच तिची काहीशी अवस्था झाली होती. क्षणातच तिनेही त्याला होकार दिला. कधी अधिराज मुंबईला स्नेहा बरोबर वेळ घालावीत असे तर स्नेहाहि आवर्जून त्याच्या भेटीसाठी औरंगाबादला जात असे. भावी आयुष्याचे कितीतरी स्वप्न तिने रंगवून ठेवले होते. फोन कॉल्स, व्हिडिओ कॉल्स सर्व काही अगदी नित्यनियमाने चालत असे.
कालचक्र फिरायला काही जास्त वेळ नाही लागत त्याचप्रमाणे कालचक्र आता फिरलं होत. अधिराज आता स्नेहाचे कॉल्स जास्त उचलत नव्हता. मेसेजचा रिप्लाय पण कधी कधीच देत असे. त्याच्या अश्या वागणुकीमुळे स्नेहाची पार ससेहोलपट होत असे. शेवटी कंटाळून तिने अधिराजला जाब विचारला.
" Long distance relationship टिकवणं खरंच आता खूप कठीण होत चाललंय.मला इथे औरंगाबादला कुणीतरी दुसरी मुलगी आवडली आहे. तू मला विसरून जा आणि जीवनातला क्लोज्ड chapter समजून तू तुझ्या आयुष्यात पुढची वाटचाल कर " ह्या अधिराजच्या तीक्ष्ण शब्दांनी तीच काळीज घायाळ झालं होत. भावी आयुष्यातील गोड स्वप्नांची गुलाब कळी उमलतांना एका क्षणात ती बेचिराख झाली होती.
रेल्वे स्टेशनच्या announcement नि स्नेहा भानावर आली.
" कितीतरी प्रेम रंग उधळले त्यानी माझ्यावर पण शेवटचा उधळलेला विरह रंग अजूनही मनाच्या गाभाऱ्यात गडद होऊन बसला आहे " स्नेहा स्वतःशीच म्हणाली.
" का केलं असेल त्याने असं..... माझ्या भावना का नाही समजून घेतल्या त्याने " स्नेहा पाणावल्या डोळ्यांनी मोबाईल काढून मेसेंजरच्या इनबॉक्स मध्ये त्याच्या मेसेज ची वाट पाहत होती. हलक्या हलक्या मृगसरी आकाशातून कोसळत होत्या. खिडकीतून तिला हळूच भिजवत होत्या.
अधिराजही त्याच्या घरातुन दूर पिंजून ठेवलेल्या ढगांकडे पाहत होता. त्याच शरीर पार बदलून गेल होत. डोक्यावरील केस पूर्ण गळून टक्कल पडलं होत, शरीरावरचे हाडे अगदी स्पष्ट दिसत होते. "माझ्या भावना त्याने का समजून नाही घेतल्या? " हा प्रश्न तिला बऱ्याचदा पडला असेल. याच उत्तर एकच आहे
" माझ्याकडे अगदी कमी असेलेला वेळ. कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला मी आहे हे कळल्यावर मला सर्वाधिक काळजी लागली होती स्नेहाची. मी जर तिला खरं सांगितलं असतं तर ती शेवटपर्यंत माझ्यातच गुरफटून राहिली असती आणि आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकली नसती हे मला कळून चुकलं होत म्हणून मला हे सर्व नाईलाजाने कराव लागलं. आता तर काही दिवसच शिल्लक आहे माझ्याकडे... "
आठवणींचे मेघ त्याच्या मनात दाटून आले आहे...
भूतकाळातल्या पाऊलखुणांची वीज तिच्याही मनात लखलखली आहे...
भिजत ती पण आहे आणि भिजत तो पण आहे. फरक फक्त एवढाच..
ती हलक्या हलक्या वर्षासरींनी भिजत आहे आणि तो नेत्रातल्या तराळलेल्या अश्रुधारांनी..
खिन्न मनाने त्याने मेसेंजर मधला तो मेसेज पहिला. डोळे पाणावले होते. एवढ्यात घरातून टी. व्ही . वर सुरु असलेलं गीत त्याच्या कानी पडतं होत.
" बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळभरी पण सांग तू येशील का... येशील का.. सखी मंद झाल्या तारका "
प्रेमात कधी कधी असंही होत. ज्यावेळी वाटत सर्व काही ठीक होईल... प्रेम आता पूर्णत्वास जाईल असं वाटत तेव्हा काळ आपली चतुरंग खेळी खेळत असतो.
समाप्त
--- निखिल देवरे