The deadly bees in Marathi Fiction Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | तुंबसाळ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

तुंबसाळ

तुंबसाळ


काकबली टाकुन माघारी वळताना डेरेच्या कडेला घुशींनी काढलेला उकीर जरा भळभळल्यासारखा वाटला तेव्हा बिळातून कोणी साप किरडू तर बाहेर येत नाही ना? म्हणून निरखुन पहाणाऱ्या बाईला भुरूभुरू बाहेर पडणाऱ्या तुंबसाळ माशा दिसल्या. हल्ली नजर जरा कमी झालेली म्हणून चार पावले पुढेजाऊन तिने नीट तिरखुन बघितले. शंकाच नव्हती, चांगल्या आंगठ्याएवढ्या टरटरीत तुंबसाळींची विशिष्ट लयीत सुरू झालेली ये - जा बघितल्यावर त्यांनी डेगेतल्या घुशीच्या बिळात ठीव (रहिवास) केलेले असणार याची अटकळ बाईला आली आणि तिच्या काळजाात चर्रर्र झाले. चार मुलींच्या पाठीवर दिवस भरत आलेली सुन ! तिला बाळंतपणासाठी कणकवलीच्या धाकट्या जावयांकडे -पेठ्यांकडे पोचवायला गेलेला आणि घरात फक्त बाई आणि तिच्या चार नाती. ऐन मोक्याच्या वेळी ही अवलक्षणी तुंबसाळ सगळी दुनिया सोडून नेमकी आपल्याच घराजवळ अंगणाच्या कडेला ठीव करायला यावी हा मोठा अपशकुन बाईला वाटला. गेल्या चोवीस वर्षात जे हळेखळे झाले ते पुरले नाहीत म्हणून म्हातारपणी आणखी कसले दुदैव राशीला येते आहे? हा नवीन घोर तिला लागला. या तुंबसाळीचा पायगुण, तिने दिलेला एकेक तडाखा आठवून बाई अंतर्बाह्य हादरून गेली.
अगदी हीच वेळ!वैश्वदेव करून काकबली टाकायला गेलेल्या गुंडुकाकांना देवगड पोस्टातला रनर येताना दिसला. विष्णु भाऊजी आजारी असल्याची तार मुंबईहुन आलेली! ती द्यायला रनर मुद्दाम कालवीपर्यंत आलेला. त्या दिवशी सकाळीच गोठ्यातुन दुध काढून आल्यावर दुधाची चरवी घडवंचीवर ठेवायला गेलेल्या बाईला ताकमेढीवर बसलेल्या तुंबसाळी दिसल्या. तिने घाबरून हाक मारली म्हणून गुंडुकाका धावत आले. बाईने ताकमेढीकडे बोट दाखवल्यावर भरल्या घरात शिरलेली ही विवशी बघून गुंडुकाकासुध्दा चरकले.
रानावनात उंच झाडावर फांदीला मोहोळ बांधुन रहाणारी ही आगीमाशी, विटकरी रंगाची! आग्या माशांची मोहोळे देवराई तल्या बकुळीच्या, गगनावेरी उंच गेलेल्या अष्टाच्या झाडांवर लटकताना त्यांनी बघितलेली. कुळवाडी तर या तुंबसाळीला पिशागतच म्हणायचे. मागे एकदा भांब्या धनगराची बायको दहाबारा वर्षाच्या तिच्या पोराला घेऊन सुरंगीच्या कळ्या काढून आणायला गेलेली असताना पोर चढला त्याच फांदीवर नेमके तुंबसाळीचे मोहोळ होते . ते त्याला दिसले नाही. पोर चढला आणि त्याच्या भाराने फांदीला हेलकावे मिळाल्याबरोबर तुंबसाळी उसळल्या. एक माशी डसल्याबरोबर प्राणांतिक बोंब मारीत पोर घसघसत खाली उतरला. त्याबरोबर घंव घंव करीत घोंगावणाऱ्या माशा बघितल्यावर त्याच्या आयशीने फडक्याने माशा झोडपुन जीव घेऊन पळायला सुरवात केली. फर्लांग दिड फर्लांग अंतरापर्यंत माशांनी त्याचा पाठलाग केला अन् त्या माघारी गेल्या. पोराला तोंडावर,पाठी-पोटावर, मानेवर आठ-दहा ठिकाणी माशांनी डंख मारले. आयशीलाही एक दोन माशा चावल्या, संध्याकाळ पर्यंत काळिज फाटेतो प्राणांतिक बोंबा मारीत तडफडुन तडफडुन पोर मेला.
सकाळच्या रामप्रहरी ही अवदसा घरात शिरली हे काही बऱ्याचे लक्षण नाही असे गुंडुकाकांनाही वाटले. माडाचे चुडत पेटवुन माशांना धगवून, हुसकावून लावायचे म्हणून चुडत आणायला ते न्हाणीघराकडे गेले. एवढ्यात ताकमेढीवरचे तुंबसाळीचे भिरे घंव घंव करीत उठले अन् बाईच्या डोक्यावर एक -दोन गिरक्या मारून भस्सकन चुलीजवळच्या खिडकीतुन बाहेर पडुन गेले. मग पुरी विरडभर बाईला काय सुधरेनासे झालेले आणि दुपारी जेवणवेळेला ती तार आली. केवळ अन्नाचा अव्हेर करायचा नाही म्हणून कसेबसे चार घास ढकलुन गुंडुकाका मुंबईला जायच्या तयारीला लागले. बोटीचे येते - जाते तिकिट, त्यात विष्णु आजारी म्हणजे नाही म्हटले तरी पंचवीस रूपये तरी जवळ हवेतच ! घरात साठवा गाठव करून कशीतरी सात रूपयांची भर झाली. त्यांची आई तेव्हा अर्ध्या घरात वेगळी राहायची. ती चार पैसे बाळगुन असायची. दरमहा विष्णु कडून दहा रूपये मनिऑडर्रने यायचे ते म्हातारी घ्यायची. ती कोणा कोणाला अडीनडीला कर्जाऊ रकमा द्यायची. गुंडुकाकांनी तिच्याकडे उसनवार अठरा रूपये मागितले. पण सगळे समजुन सवरूनही ती चक्क ‘नाही’म्हणाली. “एक दोन रूपये हवेतर महिनाभराच्या बोलीने देईन. पण एवढी रक्कम माझ्याकडे नाय आणि तू काय एक रकमी एवढे पैसे परत करणार ? तुझी तू काय ती वेवस्था कर.” असे ती म्हणाली.
मग अखेरची जीव जीव म्हणून ठेवलेली, सासऱ्यांनी दिवाळ सणाला घातलेली दीड तोळ्यांची मोहोर आईला गहाण म्हणून दिल्यावर तिने अठरा रुपये दिले . ते खिशात टाकून देवगड पर्यंत सोबतीसाठी तातु घाड्याला बरोबर घेऊन ते घराबाहेर पडले. मुंबईला जाऊन पंधरा-वीस दिवस झाले तरी गुंडुकाकांचा पत्ता नाही म्हणून बाई काळजारलेली. म्हातारी सासू मात्र पक्की निगरगट्ट. पोटच्या पोराला "माझ्याकडे एवढी भर नाय म्हणून सांगून त्याने दीड तोळ्याची मोहोर गहाण टाकल्यावर म्हातारीने अठरा रुपये दिलेन. काका मुंबईला गेले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी दामु सडेकराला त्याच्या बायकोचे मंगळसूत्र आणि पाटल्या गहाण ठेवुन तीस रूपये दिले, असली काफर बाई ! अन् कोण कुठचा तातू घाडी. मास्तर कोणत्या परिस्थितीत मुंबईला गेले हे जाणुन सकाळ संध्याकाळ खेपा मारून बाईची विचारपुस करायचा, तिला धीर द्यायचा. बावीसाव्या दिवशी सामानाची बोचकी घेऊन गुंडुकाका आणि मागुन तोंडात पदराचा बोळा धरून रडत येणारी नर्मदा बघितल्यावर बाई काय समजायचे ते समजली. दोघे येऊन घरात टेकली मात्र,आणि सास्वेने एकदम गळा काढून नकाश्रु ढाळायला सुरवात केली.
रडारड ऐकुन आजुबाजूची माणसे चवकशी करायला जमली. तार मिळून गुंडुकाका मुंबईला पोचेपर्यंत विष्णूला अग्नी देऊन त्याची 'सारी' सुध्दा भरून झालेली. किरकोळ ताप आला असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केले ते नडले नी नवज्वराने त्याचा बळी घेतला. मग त्याचे दिवसवार करून सगळी निर्गत लावून झाल्यावर “मला कालवीला घरी न्या. इथे काय माझे मन रमायचे नाही.” असे सांगणाऱ्या भावजयीला घेऊन ते परत आले वैऱ्यावरही येऊ नये असा प्रसंग ! सगळे ऐकून घेतल्यावर म्हातारीने तोडांचा पट्टा सोडलान. “अरे माझ्या कर्मा ! ही नर्मदा पांढऱ्या पायाची अवदसा. ही घरात आली आणि वर्षभरात नंदीनीसारखी माझी गाय वाघान खाल्लीन. लग्न होऊन तीन वरसे झाली तरी हिची कुस काय उजवली नाय. अंगावर ताप काढून नवरा मेला तरी हिचे लक्ष नाय. पोराला खाऊन पांढरे कपाळ दाखवायला ही हडळ परत कालवीत आली.”म्हातारीचे वाक्ताडन ऐकल्यावर गुंडुकाका संतापले. “आई तू म्हणजे अगदी कैकयीच्या वरताण आहेस. प्रसंग कसला आणि बोलत्येस काय ? बापड्या नर्मदेवर बावीसाव्या वर्षी वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. सोन्यासारखा माझा भाऊ काळाने ओढून नेलान यात त्या बिचारीचा काय दोष? विष्णु गेल्यावर तीन दिवस तीने तोंडात पाणीसुध्दा घेतलेन नव्हते. मग मी तिला माझ्या पोराबाळांची शपथ घातली. तेव्हा तिने पेजेचा घोट घेतलान. विष्णूच्या जन्मपत्रिकेत पंचविसाव्या वर्षी वाईट योग आहे तेव्हा त्याचे लग्न उशीरा करा असा भागवत ज्योतिषांनी दिलेला सल्ला तुला आठवतो ना? पण गोगट्यांकडच्या हुंड्याच्या आशेने विष्णूसकट सगळ्यांचा विरोध न जुमानता तू रणकंदन केलेस,जीव द्यायची धमकी दिलीस आणि हट्टाने त्याचे लग्न लावलेस. नकळत का होईना पण तू नर्मदेच्या आयुष्याची माती करून वर आणि तिलाच बोल लावतेस? तुझी जीभ रेटत्ये तरी कशी म्हणतो मी ? निदान प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन जनलज्जेसाठी तरी तुझी टकळी आता बंद कर !”
एक -दोन दिवसांनी रात्री जेवणखाण झाल्यावर म्हातारीने गुंडुकाकाना हाक मारून बोलावले. “विष्णूला कंपनीकडून फंड -बिंड काय तरी मिळेल ना ? नि त्याची मुंबईतली खोली तरी आता ठेवून काय करायची? ती विकून कायतरी रक्कम मिळेल ही व्यवस्था जरा बघ.” अशी पृच्छा तिने केली. विष्णूचे दिवस- वार झाल्यावर विष्णुच्या कंपनीत जाऊन कागदपत्रांवर नर्मदेच्या सह्या झालेल्या होत्या. तिचा एक भाऊ मुंबईला रहायचा. त्याच्यावर पुढची जबाबदारी सोपवलेली असल्याचे काकांनी सांगितले. त्या भावालाच पत्र लिहुन विष्णूची खोली विकून टाकायला सांगतो असे सांगुन काका उठले. नर्मदा आता सास्वेकडे रहायला लागली. दोन महिन्यांनी नर्मदेचा भाऊ आणि वडील वस्तीला आले. तिचा भाऊ तिला कायमची माहेरी घेऊन जातो म्हणाल्यावर तिचा पैसाआडका दागिने द्यावे लागतील या भयाने गळा काढून मानभावीपणे म्हातारी बोलली,"मेली ती सून ना से (आहे) तो माझो बोढ्यो (मुलगा),गुंडुशी पटत नाय म्हणुन मी वेगळी रहात्ये. नर्मदा माझी म्हातारपणाची काठी, ती तुम्ही हिरावून घेऊ नका. " म्हातारी असे बोलल्यावर बापलेकांचा निरूपाय झाला. सकाळी उठून ते मार्गस्थ झाले. त्याच दिवशी तिन्हीसांजेला म्हातारीने गुंडुकाकांशी भांडण केले. त्यांचा धाकटा मुलगा अविनाश, त्याच्या मुंजीत विष्णूने अहेर म्हणून पाऊणशे रूपये दिलेले, नर्मदावरचा प्रसंग ओळखून गुंडुने ती रक्कम परत करावी अशी मागणी म्हातारीने केली. गुंडुकाका पुरते चक्रावून गेले. “एवढी रक्कम कुठून, कशी उभी करायची? असे ते म्हणाले.” त्यावर म्हातारी अर्वाच्य शिव्या द्यायला लागली.
संतप्त झालेले गुंडुकाका म्हणाले, “विष्णूला शिक्षणासाठी राजापुरात ठेवला तेव्हा पोटाला चिमटा घेऊन मीच त्याचा मॅट्रिकपर्यंतचा खर्च केला ना? तो मुंबईला नोकरी शोधायला निघाला तेव्हा हिची कंठी विकून त्याला तीस रूपये मी दिले. नोकरीला लागल्यावर तो महिनेमाल दहा रूपये मनिऑर्डर पाठवायचा. ते माझ्या नावावर मला मदत व्हावी म्हणून हे त्याने तुझ्याच तोंडावर सांगितलेन ना गो? पण तुझी दातकसाळ नको म्हणून मी दरमहा त्याची मनिऑर्डरने येणारी रक्कम तुलाच देत आलो. तू वेगळेचार केलेस तेव्हासुध्दा विष्णूचा नी तुझा हिस्सा घेऊन मला तिसरी वाटणी दिलीस. धरते माड ते तूच पोटाळलेस खंडाचे भात येते ते विकून तू त्याचा पैसा करतेस. अविची मुंज केली तेव्हा विष्णूने अहेर म्हणून पाऊणशे रूपये दिलेन ते तू काढतेस. पण तो आजारी असल्याची तार आली तेव्हा घरातली शेवटची एक वस्तू मला दिवाळसणाला मिळालेली दीड तोळ्याची मोहोर, ती गहाण टाकून मी मुंबई गाठली. विष्णूच्या दिवस कार्यासाठी झालेला खर्च मीच केला. मी शाळा मास्तर, माझी मिळकत ती काय?”
पण म्हातारी काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. भरल्या घरात तिन्हीसांजेला, “विष्णूचे पैसे तुझ्या अंगावर फुटतील, तुझी पोरेबाळे देशोधडीला लागतील.” हे म्हातारीचे शिव्याशाप ऐकल्यावर मात्र बाईला रहावले नाही. लग्न झाल्यापासून आज मितीला बाई सास्वेला एक शब्दही उलटुन बोललेली नव्हती. पुढे वेगळेचार झाले मायलेकांचे भांडण झाले तरी ती तोंड मिटूनच राहीली. पोराबाळांचा उध्दार म्हातारीने केल्यावर मात्र तिला राहवले नाही.“सासुबाई एवढ्या पैशाच्या पाठी लागता ते काय जाताना बरोबर नेणार आहात की काय? पोटच्या पोराला, नातवंडाना तुम्ही का म्हणून शापता? तुम्हाला पाऊणशे रूपयेच हवेत ना? मग आमच्या वाटणीचे पडण आहे ते त्या पैशापोटी घ्या. माझी पोरे मोठी होईपर्यंत जनलज्जेसाठी तुमच्या ओसरीवर टकले टेकायला दिलेत तरी डोंबाऱ्या सारखा संसार करायची हिम्मत माझ्यात आहे. तुमचे काही काहीनको, अगदी तोंडभर आशीर्वादसुध्दा देऊ नका. तुम्हाला मामंजींची शपथ घालते, पण माझ्या पोरा बाळांना शिव्याशाप तरी नका हो देऊ!”
मग तिने चक्क सास्वेच्या पायावर लोटांगण घातले. नर्मदेलाही रहावले नाही. ती म्हणाली,“सासुबाई, हे शोभते का तुमच्या वयाला? आणि त्यांच्या बरोबर सात फेरे घातले त्या मला काहीच अधिकार नाही? माझ्यासाठी तुम्ही पैसे मागत असाल तर मी स्पष्ट सांगते. मला पैसे नकोत. आता मरण येईपर्यंत जीव जगवायचा एवढेच उरले आहे. तुम्ही भाऊजींच्या वाटणीचे पडण घेऊन त्यांच्या पोराबाळांच्या तोंडचा घास नका काढून घेऊ.” नर्मदेने तोंड घातल्यावर म्हातारीचा भडका झाला.“तु कपाळ पुसकी, घुडग्या आपले कुंकु राखता आले नाही की पुढे वंश वाढविता आला नाही. ती तू मला ब्रह्मज्ञान सांगत्येस? मोठी चुळकी आली मला शिकवायला.” मग मात्र काकांनी रूद्रावतार धारण केला “आई आता एक शब्द बोलशील तर मी तुला आई म्हणायचो नाही. पाऊणशे रूपयाच्या बदल्यात ते पडण घे तुला आणि इतःपर माझ्याशी भाषणसुध्दा करू नकोस. ”
खंडाचे भात बंद झाले आणि काकांच्या पगारात बाईचा खुटुरूटु संसार सुरू झाला. रघू चांगल्या मार्कांनी फायनल झाला. त्याला राजापुरात‘वारावर’ ठेवले. काकांच्या बरोबरीचे पिसे गुरूजी, गुर्जर गुरूजी सहाय्याला आले. राजापुरात गुजर आळीत रानड्यांकडे रोजची देवपूजा करायच्या अटीवर रघुची रहायचीसोय झाली. सात दिवस सात कुटुंबांमध्ये आळीपाळीने जेवायला जायचे‘वार’ठरले. तो मॅट्रिक झाला आणि रानड्यांच्या ओळखीने पुढे शिकायला रत्नागिरीला जोगळेकरांकडे राहीला. त्यांच्या घरची पुजा आणि कॉलेज सांभाळून फावल्या वेळेत त्यांच्या हॉटेलात तो कॅशवर बसायचा. त्याच्या मागची सखु पाचवी झाल्यावर शाळा सोडून घरीच राहीली.
अवि फायनल झाला आणि देवगडच्या मावशीने त्याला शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवला. तिथे नवीनच हायस्कुल सुरू झालेले.अन् धाकटी सरू तिसरीत. बाईची पोरेबाळे हाता तोंडाशी यायला लागलेली. नेमकी त्याच वेळी गुंडु काकांची देवगड तालुका स्कुलात बदली झाली. ते सकाळीच जेवणाचा डबा घेऊन जायचे ते रात्री उशीरा परत येत. मधल्या वेळी जेवण झाल्यावर शाळेतच विश्रांती घेत. कधी कधी संध्याकाळी मास्तरांना यायला उशीर झाला तर तातु घाडी न सांगता तिठ्यापर्यंत त्यांना आणायला कंदिल नी दांडा घेवून जायचा. रोजच्या खेपांनी काका हैराण व्हायचे. जाळ वाताने पायाला तडे पडायचे, पाय टेकवत नसे. पण रघू ग्रॅज्युएट होऊन भार उचलील या आशेवर ते आला दिवस ढकलायचे. त्या दिवशी जोगळेकरांचा माणूस रघुला बरे नाही म्हणून काकांना बोलवायला आला नि संध्याकाळी ते बोटीने परभारे रत्नागिरीला गेले.घरची वाट बघतील म्हणून अवि निरोप सांगायला संध्याकाळी कालवीत आला. अकस्मात कसले एवढे आजारपण रघुला आले या चिंतेतच बाई तिन्हीसांजेला देवाजवळ दिवा लावायला गेली. तिने लामणदिवा पेटवला अन् आत जो दृष्य दिसले ते बघून तिचे अवसानच गेल देव्हाऱ्या मागची पुरी भिंत तुंबसाळीनी भरलेली. थोड्या तुंबसाळी देव्हाऱ्यातसुध्दा दिसल्या. दिव्याचा उजेड झाल्यावर त्या भिरीभिरी उडायला लागल्या. बाईने देवखोलीचा दरवाजा आड करून अविला हाक मारली. त्यानेही दार किलेकिले करून आतले दृष्य बघितले. आता माजघरात सुध्दा दिवा लावून उजेड करायची पंचाईत. कसले जेवण नी कसले काय..... तिघांनिही कप कप दुध पिऊन सारी रात्र ओसरीवर घालविली.
मुले झोपली पण धास्तावलेल्या बाईचा काय डोळा लागेना. दिवस उगवल्यावर देव खोलीतल्या माशा गळसरीतुन भुरू भुरू उडत नाहीशा झाल्या बाईचा जाीव थाऱ्यावर नव्हता. तिने अविला देवगडात शाळेलान धाडता घरीच थांबवले. दुसऱ्या दिवशी मात्र अवि रहायला तयार होईना. सरू शाळेतुन आली तेव्हा बाईने दोघींसाठी तांदुळ ओयरले अन् ती स्वयंपाकाला लागली. एवढ्यात काका आणि कोणीतरी येताहेत असे सरू सांगत आली म्हणून बाई पुढील दारी गेली. गुंडुकाकांना गुर्जर मास्तर धरून आणीत होते अन् सोबत पिसे गुरूजी आणि कोणीतरी धोतरकोट घातलेले गृहस्थ येताना दिसले. बेड्यात आल्यावर गुंडुकाकांनी तिथेच बसकण मारली आणि “रघु गेला गो ऽऽमाझ्या हाताने मीच त्याला पांढऱ्या समुद्रावर अग्नी दिला.... माझे हातपाय मोडले गोऽऽ” म्हणत त्यांनी हंबरडा फोडला. त्यांचे बोलणे ऐकताच बाई उभीच्या उभी धाड्कन फिट येऊन कोसळली. प्रसंग ओळखून नर्मदा धावली, कांदा फोडुन बाईच्या नाकाशी धरला. डोक्यावर पाणी थोपटले. गुर्जर आणि पिसे यांनी गुंडुकाकांना उचलून आणले अन् ओसरीवर माच्यावर झोपवले.
सरू,नर्मदा, गुंडुकाका यांची रडारड ऐकुन माणसे गोळा झाली. जो- तो ‘काय झालेऽऽ काय झाले’ म्हणून चौकशी करायला लागला. मग जाणत्या माणसांना बाजूला घेऊन गुर्जर मास्तरांनी सारे काही सांगितले. रघुला कावीळ होऊन ती उलटली. दुखणे विकोपाला जााईपर्यंत त्याने कळु दिले नाही. त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यावर जोगळेकरांनी माणूस पाठवून काकांना बोलावून घेतले. गुंडुकाका पोचले तेव्हा रघु ग्लानीतच होता. सकाळी त्याने कसेबसे डोळे उघडले. पण बाप मुलाचे शब्दानेही बोलणे झाले नाही. काका प्रवास आणि जागरणाने शिणलेले. जोगळेकरांनी त्यांना आंघोळीला घरी पाठविले. त्याचवेळी रघुचे प्राण गेले. मग त्याचे दहन करून रात्रीच्या येत्या बोटीने जोगळेकर त्यांना घेऊन समक्ष आलेले. कोणालाच काय सुचेना.बातमी वाऱ्यासारखी पसरली. गुंडुकाकांकडे किड्यासारखे माणुस जमले. अविला घेऊन बाईची बहिण आली तिने बळेबळेच दोन घोट पेज बाईला प्यायला लावली.
काकांची अवस्था तर बघवत नव्हती. रडुन रडुन त्यांचा घसा फुलला, तोंडातुन शब्द फुटेना. फक्त ओठ तेवढे हलायचे. दुपारनंतर जाोगळेकरांना घेऊन पिसे गुरूजी गेले गुर्जर मात्र वस्तीला थांबले. तातु घाडी आणि त्याची बायको उपाशी पोटीच बसुन राहिली. एवढा गदारोळ झाला पण म्हातारीने शब्दानेही चौकशी केली नाही. उलट नर्मदेला हाक मारून बोलावून घेतले अन् दार बंद करून टाकले. चार दिवस मागे पडले तरी गुंडुकाका सावरले नाहीत. प्रसंग ओळखून मुले मात्र सावरली. कोणी समाचाराला आले तर,“काही विषय काढू नका” असे ती बजावीत. तातु रात्रंदिवस गुंडुकाकांच्या पायाशी बसुन रहायचा, बळे बळे चहा पेज पाजायचा. पाचव्या दिवशी संध्याकाळी सातच्या सुमाराला गोठ्यातली जनावरे अचानक हंबरायला लागली म्हणून तातु बघायला गेला तर संपूर्ण गोठाभर तुंबसाळी भिरभिरत असलेल्या दिसल्या. एखाद दुसरी माशी गुरांनाही चावलेली असावी. तशाही परिस्थितीत तातुने म्हैस ,तिचे वासरू आणि गाभण गाय याना गोठ्याबाहेर बांधले. मग अविला देवापुढे नारळ ठेवायला सांगुन अंगणातुन ग्रामदेवतेच्या दिशेने हात जोडून तातूने 'जाबसाल’ घातली. तो जेवायला गेल्यावर अविने काकांना दुध पाजले आणि सगळ्यानी वाटी-वाटी पेज प्याली. तासाभरातच जेवण उरकुन तातु घाडी आला रोजच्याप्रमाणे मास्तरांच्या पायाला 'भिरंडेल' लावायला घेतल्यावर त्यांचे पाय गार लागले. त्याने 'मास्तरऽऽ' अशी हाक मारली. मग छातीला कान लावून बघितला आणि आणि मोठमोठ्याने हुंदके देत तो रडायला लागला.
घुशीच्या बिळातुन ये-जा करणाऱ्या तुंबसाळी दिसल्यावर हे सगळे रामायण आठवुन अशुभाच्या सावटीमुळे बाई धास्तावली. पण मन घट्ट करून ती घरात गेली. जेवणे होऊन आवराआवर होतेय एवढ्यात ‘सावकारनीऽऽ’ अशी शंकर कातकऱ्याची हाक आली. बाईने त्याला अन्न वाढले. जेऊन उठल्यावर पान-सुपारी दिली आणि म्हटले, “शंकरा ! तुला तुंबसाळीची काय माहिती आहे रे ?” तुंबसाळ हे नाव ऐकुन चमकलेला शंकर म्हणाला, “काय ग्ये? लय वायट् सैतानी माशी ती. आमी एवड्या उलट्या कालजाचे,म्हणशीन त्या गांजील माशीचा जित्ता म्हंव काढणार ! पन तुंबसालीची वार्ता बी नाय करणार. त्येच्यावर चाळा आसतो चाळा!” मग दरडीतले तुंबसाळीचे ‘ठिव’ बाईने त्याला दाखविले. त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करून तो म्हणाला,"सावकारनी ह्या दरडीमंदी मातीचा रांजून सारका खलगा ऱ्हायेल. ही तुंबसाल तीते कोटा बांदतो हाये. दोन-चार रोजाला तेचा कोटा पुरा होऊन बीलाच्या तोंडाजवळ कोट्याचा गोल तांब्या एवडा मुख तुंबसाल बांदील. त्ये मुखाला येक माशी जान्याएवडा ढोबळा ठेवनार आनी कोट्यामंदे ही बया वीन काडनार. त्येच्या कोट्यात मद ऱ्हायेल नाय. खाली पीली ऱ्हायेल. आता हेचा कोटा कसला म्हणशील तर ढोराचा शेन आनी कवा कवा मानसाचा नर्क बी लिपतो हे माशी. तेला रातचा काय दिसत नाय तर राती हे आंदला होतो. तवा हेच कोट्याला मुखाजवळ आग लावली का मंग समदा कोटा जलून जायेल एक बी माशी जीती ऱ्हानार नाय तुमचे घराजवल या शैतानी माशीने कोटा बांदला तर आट रोजाला हेचा कोटा बांदून सुकला की मंग मी हिते येऊन तेला धगवून देईल. ”
त्यांचे हे बोलणे सुरू असताना अवि परत आला. तुंबसाळीचे 'ठिव' त्याने बघितले अन् शंकराला दहा रूपये देऊन आठ दिवसानी खेप करायला बजावले. मुलीना दरडीच्या बाजुला फिरकु नका अशी तंबी दिली. आता सकाळ संध्याकाळ बाई दरडीकडे लक्ष करी. तिसऱ्या दिवशी शंकराने सांगितल्या प्रमाणे कोट्याचे मुख बांधुन एका बारीक छिद्रातून माशंची ये-जा सुरू झालेली दिसली. बाईने पक्का निर्धार केलेला. कोटा वाळण्यासाठी आणखी दोन दिवस जाऊ दिल्यावर तिसऱ्या दिवशी बाईने दरडीजवळ थोड्या शेणी अन् भारीभर लाकडे गुपचुप नेऊन ठेवली. रात्री निजानिज झाल्यावर ती बॅटरी घेऊन बाहेर पडली. तुंबसाळीच्या कोट्याजवळ येऊन बॅटरीचा फोकस टाकल्यावर मुखावरच्या छिद्रात अर्धवट बाहेर येऊन राहिलेली तुंबसाळ जरा आत सरकली. काही वेळाने पुन्हा ती माशी छिद्राच्या तोंडाशी अर्धवट बाहेर आली.
बाईने कोट्याला धक्का न लागेल अशा बेताने छिद्राच्या खालच्या बाजुला शेणी रचल्या. कोट्याचे मुख झाकले जाईल एवढ्या अंतरात डेगेला टेकून लाकडाचे दळदार ढलपे तिरके सचले. सगळी तयारी जय्यत झाल्यावर शेणींवर घासलेट ओतून बाईने देवाचे नाव घेतले अन् काडी पेटवुन लावली. रॉकेल पेटून भक्कन मोठी ज्वाळ उठली. कोट्याच्या मुखा भोवती रॉकेल ओतून बाई बाजूला झाली आणि चोर पावलानी अंगणात येऊन तीने अविला हाक मारली. आईचे धारिष्ट्य बघून अवि चकितच झाला. त्याने आणखी दोन-तीन जडशीळ लाकडाची टोणकी बीळावर टेकून पुन्हा बाटलीभर रॉकेल ओतले. दरडीच्या मुखाशी आग चांगलीच प्रज्वलीत झालेली बघितल्यावर माय लेकरे घरात जाऊन निर्धास्त मनाने झोपली.
सकाळी उठल्यावर दात घाशीत अविने तुंबसाळीच्या ठिवाकडे नजार केली. सगळे ठिव जाळून खाक झालेले.... बीळातून बारीक धुराची रेघ येत राहिलेली. एवढ्यात मोटार सायकलचा आवाज आला म्हणून अवि वळला तो पर्यंत धाकटे जावई पेठे गाडी घेऊनच अंगणात आले. इग्निशन बंद करून गाडी स्टँड करीत ते म्हणाले,“शमाला मुलगा झाला. पहाटे पाच वाजता डिलीव्हरी झाली. बाळ बाळंतीण दोघेही खुशाल आहेत.” पेठ्यांचे हे शब्द कानात पडताच अरिष्ट टळले असे मनात म्हणत बाईने देवाला हात जोडले.
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙