Existance of God in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | देवाची सामक्षा

Featured Books
Categories
Share

देवाची सामक्षा

देवाची सामक्षा


चार मुलींच्या पाठीवर काकुला नवससायासाने मुलगा झाला. सगळे देव पालवुन झाले. शेवटी आमच्या घृष्णेश्वराला अण्णानी जाब घातला नि त्याच्या प्रसादाने मोहनचा जन्म झाला. तेव्हापासून दर वर्षी वामनकाका घृष्णेश्वराच्या उत्सवाला नेमाने यायला लागले. काकु तेवढी चार-दोन वर्षानी यायची. हया खेपेला मात्र काकु तब्बल आठ वर्षानी आलेली. मोहन आता चांगला मोठा झालेला. तसा तो माझ्यापेक्षा दोन वर्षानी लहान. पण लाडाकोडात वाढल्यामुळे दूध तुप नी अक्रोड बदामाचा खुराक खावून तो माझ्यापेक्षा भारी दणकट नि थोराड वाटायचा. खुप वर्षानी भेटलेल्या आम्हां भावडांच्या गप्पा रंगात आल्या. तिन्हीसांज झाली नी आटवल खाऊन आम्ही ओसरीवर झोप्या काढीत गाणी म्हणत राहीलो. रात्री निजानिज झाली तरी आमच्या पोरांच्या खुसपुस गप्पा सुरूच. मी मोहनला काय काय माहीती सांगत ऱ्हायलेला. मध्य रात्री रोजच्याप्रमाणे भैरवाची फेरी सुरू झाली.
ईश्वराच्या देवळा जवळच्या दरडीतल्या गुहेतला भैरव म्हणजे वाडेखोलातला राखणदार. रात्री ईश्वराच्या देवळापासून तो जुगाईच्या देवळापर्यंत त्याची फेरी असायची. तो कुण्णा कुण्णाला दिसत नाय. मात्र त्याच्या व्हाणाची करकर आणि हातातल्या दांड्याचा दण-दण आवाज तेवढा ऐकू येतो. मोहनला भारी नवल वाटले. आम्ही कान पाडून राखणदाराच्या दांड्याचे आवाज ऐकले नि गुडुप्प झोपलो. सकाळी उठल्यावर आमचा पातळभात खाऊन झाला. मग मी मोहनला घेऊन आमच्या घरासमोरच्या डोंगर कपारीतली पांडव लेणी दाखवायला निघालो. वाडीत एका तडीला घाड्यांची घरे, दुसऱ्या तडीला गुरवांची घरे नि मध्ये घडीव चिऱ्यानी बांधलेली पाळंद! आमच्या परसवात पाळंदीला दोन फाटे फुटायचे. एक आम्हा म्हाजनांच्या अंगणाबाहेर दिंडी दरवाजापर्यंत यायचा. दुसरा फाटा मोडण घेऊन व्हाळाकडे जायचा. बारमाही पाण्याचा व्हाळ,त्यावर तीन कमानीचा चिरेबंदी पुल. पुलावरून व्हाळा पलीकडे गेलं की थोडा सपाट भाग आणि सहापुरूष उंच बांधकाम असलेली भली मोठी दरड. बत्तीस पायऱ्यांची अवघड चढण चढूण वर गेलं की घृष्णेश्वराच्या मंदिरासमोरचं विस्तीर्ण आवार नि कडेला हारीने बांधलेल्या सोळा दीपमाळा.
मध्यभागी सगळ्यात उंच एकोणीस छिनेलांची दीपमाळ आम्हा म्हाजनांची. मोहन आणि मी व्हाळातल्या पुलावर जाऊन थांबलो. डाव्या हाताला उंच दरडीच्या टोकाला असलेल्या दगडी गोमुखातून सतत पडणारा पाण्याचा झोत नि त्यामागची कुंडं बघून मोहन हरखून गेला. पुलावरून सात कुंडं नि त्यामागे झरी पर्यंत बांधलेला पाट, त्याकडेच्या केगदी सगळं दिसायचं. झरी म्हणजे पाट शेवटतो तिथे दरडीतला एक पत्थर दुभंगून झालेल्या फटीतून पडणारी पाण्याची संततधार ! तेच पाणी सात कुंडात खेळून शेवटी गोमुखातून झोतानं बाहेर पडायचं. उन्हाळ पावसाळ बारा महिने! पुलाच्या कमानीवर उभं राहून समोर बघितलं की घृष्णेश्वर मंदिराच्या दोन्ही बाजूना असलेले दगडी हत्ती नि त्यांच्यावर बसलेले माहूत दिसायचे. घृष्णेश्वराचं देऊळ एकसंध जांभ्या दगडांत खोदून केलेलं. देवळाच्या सभागृहाचं छत सपाट नि त्याच्या मागचा भाग टप्प्या टप्प्यांनी उंच होत वर आभाळपर्यंत गेलेला. सभागृहाच्या छतामागे गोपूर सुरू व्हायचं. त्या भागात वावभर रूंदीची कमान. कमानीवर पाच पांडव अन् त्यांच्या दोन्ही बाजुना गरूड,मारूती कोरलेले. मध्यभागी जााडजूड तो भीम. त्याच्या उजवीकडे अर्जुन नि त्याच्या बाजुला लांब केसांचा दाढीवाला धर्म. भीमाच्या डावीकडे बारके बारके नकुल-सहदेव, गरूड नि मारूती तेवढे लंगोटे नेसलेले, पण पांडव पाचही नागडे ! दाढीमिशा असलेले,एवढे मोठे बापये झालेले पांडव नागडे राहिलेले बघून आम्हाला हसायलाच यायचं !
खुप म्हणजे अगदी बक्कळ वर्षांपूर्वी कौरव - पांडवांच युध्द झालं. त्यानंतर पाची पांडव झरीवाडीत आले. पाण्याचा पाट, सात कुंडं, घृष्णेश्वराचं देऊळ, त्याच्या बाजूची भैरव,गणपतीची देवळं, धर्मशाळा, झालंच तर आजुबाजुच्या गुहा, देवळा समोरची दरड, नि दीपमाळासुध्दा पांडवांनीच बांधलेल्या. फक्त एका रात्रीत त्यांनी एवढं काम केलं. देवळाभोवतीचा प्रदक्षिणेचा मार्ग बांधून झाल्यावर पांडव दमले. मग ते देवळाजवळच्या वडाखाली झोपले. त्यांचा जरा डोळा लागला एवढ्यात पहाट झाली नि कोंबडा आरवला. कोंबड्याची बांग आयकून पांडव फटाफटा उठले. तसेच देवळावर चढून छतावरच्या कमानीत जाऊन बसले. या गडबडीत ते झोपले होते त्या वडाखालीच त्यांची धोतरं सुटून ऱ्हायली. पांडव कमानीत बसल्यावर धाकट्या सहदेवाने भावांकडे वळून बघितलं तर काय, सगळे भाऊ आपले नागडेच !
सहदेव ही गोष्ट भावांना सांगणार एवढ्यात सूर्याची किरणं आली नि पांडव दगडाचे झाले. अशी नागड्या पांडवांची 'आख्या' आज्जी सांगायची. या आख्येचा पुरावा म्हणजे चार पांडव पुढा करून आहेत. फक्त पाचवा सहदेव तेवढा उजव्या कुशीला वळलेला दिसतो अन् दुसरं म्हणजो वडाखालची त्यांची झोपेत सुटलेली दगडी धोतरं, त्यांच्या निऱ्यासुध्दा स्पष्ट दिसतात. पायऱ्या चढून आम्ही वर आलो. म्हाजनांची उंच दीपमाळ मी त्याला दाखवली. दर वर्षी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच टिपऱ्या पौर्णिमेला कोहाळ्याच्या नायतर पोपयाच्या अर्धुकाच्या टिवळ्यात चिंधींचा भोत खोचून टिपूर पाजळतात. ते टिपूर जो - तो मानकरी देवळाबाहेर आणतो. गावातले तरूण झिलगे ते पेटते टिपूर दीपमाळेवर चढून अगदी उंच शेंड्यावर ठेवतात. आम्हा म्हाजनांचा टिपूर भारी उंच. एकावर एक अशी दीड हाती एकोणीस छिनेलं ठेवलेली. आमच्या दीप माळेवर कुणा लुंग्या सुंग्याला चढायची छाती होत नाय. इतक्या उंचीवर चढून खाली बघितलं की चढणाऱ्यांच्या टीरी कापतात असं अण्णा सांगत.
अख्खया वाडेखोलात फक्त झिलू गुरव किंवा बबन घाडी दोघेच म्हाजनांच्या दीपमाळेवर चढणारे ! ही माहिती ऐकल्यावर मोहन आमच्या दीपमाळेजवळ निघाला. चारी अंगाने फिरून नीट निरखलं.“मी जर या दीपमाळेवर चढून दाखवलं तर काय हरशील? आपली पैज” मोहन ताठ्यातच बोलला. मी आपलं मनात म्हटलं, ह्याच्या फुकटच्या गमज्या आहेत. हा कसला चढतो इतक्या उंच दीपमाळेवर1 भले भले गडी मारे पैजा मारतात. पण अर्ध्यापर्यंत चढले की लागले लटपटायला. ढेंगात शेपुट घालुन झक मारीत हार पत्करतात. मी म्हणालो, “ तू दीपमाळेवर चढलास तर एक आणा देईन. पण अगदी शेवट शेंडयापर्यंत जायचं. " एक बारीकसा दगड उचलुन देत मी पुढे म्हटलं, "दीपमाळेच्या अगदी टिकाळीला हा दगड ठेवायचा. पण जर का तू कच खाऊन अर्ध्यावरून परत आलास तर मात्र तुझा भोवरा तू मला द्यायचास. आहे कबूल?” मोहनचा भोवरा मला भारी आवडलेला, म्हणुन पौर्णिमेला जत्रेसाठी मी जीव जीव म्हणून साठवलेला एक आणा....पण मोहन नक्की हरणार ही खात्री होती म्हणून मी पैज लावली. मोहन कबूल झाला.आम्ही हातावर हात ठेवून पैजा मारली.
देवळाकडे तोंड करून मोहनने घृष्णेश्वराला नमस्कार केला नि तो दीपमाळेवर चढायला लागला. तो अर्ध्यावर गेला की परत येणार हा माझा होरा. मोहन एका एका छिनेलावर पाय देत निघाला. तो बारा टप्पे चढून गेला तरी आपला वरच निघालेला. व्हाळात भांडी घासायला आलेली भागी गुरवीण.तिने दीपमाळेवर चढणाऱ्या मोहनला बघितलं मात्र, झालं “ओ म्हाजनांनू, पावण्याचो झील टिपरार चडताहा, बेगीन् येवा.” तिने बोंबाबोंब केली. माडाचं शिपणं करणारा धाकू, अण्णा, काका, काकू सगळीजणं देवळाकडे धावली. एवढं रामायण घडलं तरी मोहन जिद्द सोडीना. मी त्याला काकुळतीला येऊन सांगितलं, “मोठी माणसं येण्यापूर्वी खाली उतर, मी हरलो म्हणून कबूल करतो..” पण छे ! मोहन राजी झाला नाही.
माणसं व्हाळातल्या पुलावर येईपर्यंत मोहन दीपमाळेच्या शेंड्याला पोहोचला. मला हाकारीत म्हणाला,“नीट बघ... हा दीपमाळेच्या शेंड्यावर पैजेचा खडा ठेवतोहे....नायतर मागाहून नाय म्हणशील.” पैज जिंकून मोहन तिसऱ्या टप्प्यावर येईतो मंडळी येऊन थडकली. काका ओरडणार असं मला वाटलेलं पण उलटच झालं. ते म्हणाले,"शाब्बास रे मोहन ! महाजनांचं नाव राखलंस. न घाबरता सावकाश खाली उतर.” मग काकूकडे वळून ते म्हणाले,“ तू आणि उगाच रडू भेकू नकोस. ईश्वराच्या प्रसादाने झालाय तो. त्याला देवाची राखण आहे. लहान असताना मी नि अण्णा कैक वेळा ह्या टिपरावर चढायचो. आमची पोरं तरी कशी मागे ऱ्हातील?” त्यांच्या बोलण्यामुळे सगळ्यानाच मोकळं वाटलं.
मोहन खाली उतरल्यावर काका म्हणाले,“ हे बघ मोहन! झाडापेडावर, कुठे उंच चढल्यावर एक लक्षात ठेव. आपलं अवसान जातंय असं वाटलं तर खाली जमिनीकडे बघायचं नाही. ईश्वराचं नाव घेऊन तिथेच वेंगाट घालून जरा दम खायचा. मात्र घाबरून उडी बिडी मारायचा आचरटपणा नाही करायचा. जावा खेळा आता.” काका असं बोलल्यावर काय विचारता ! आम्ही हुईऽऽऽक करीत ओरड घातली नी लगेच धाव मारून देवळाच्या कडेला असलेल्या हत्तीवर चढायला लागलो. माझ्या मागून मोहन पण चढायला लागला. हत्तीच्या पाठीवर जाऊन आम्ही माहुताजवळ गेलो. त्याच्या फेट्यावरून, मिशांवरून हात फिरवला. हत्तीच्या पाठीवरून कडेची कमान धरून आम्ही सभागृहाचं छत गाठलं. मग इकडे तिकडे फिरून सरळ गोपुराच्या दिशेने गेलो. आता पांडव केवढे मोठे दिसायला लागले. मोहननं पांडवाच्या चोटलीला हात लावला. खालून हातभर उंच दिसणारे पांडव जवळून बघितल्यावर मोठ्या बापयांएवढे वाटायला लागले. गरूडाची चोच तीन वीत चार आंगळ लांबीची भरली. मग पुढे चालत जाऊन आम्ही पलीकडच्या हत्तीच्या पाठीवर उतरून तिथून खाली उड्या टाकल्या. आम्ही धबाधबा उड्या टाकल्यावर वळचणीला बसलेली वटवाघळं चिर्रर्रऽऽ चिऽऽर्रर्र करीत उडाली. वाघळं उडताना दिसल्यावर कुठूनसा शिंगचोच्या झेपावत आला नि त्यानं दोन उडती वाघूळं चोचीत धरून मटकावून टाकली.
हत्तीच्या पोटाखालून पुढे होत आम्ही मावळतीकडच्या दारातून घृष्णेश्वराच्या सभागृहात गेलो. आत शिरताच वाघळांच्या लेंड्या-मुताचा उग्र-खारट दर्प भस्सकन नाकात शिरला. आमची चाहूल लागताच छताला लटकणारी वाघळं भिरभिरायला लागली. त्यांचा चिरचिराट घुमला. मोहनला भारी अप्रुप वाटलं. शेकड्यांनी, हजारांनी वाघळं. बाप रे! जमिनीवर त्यांच्या लेंड्यांचा इतका खच पडलेला की लेंड्या चुकवून मुळी पायच टाकता यायचा नाय. सभागृहातुन आतल्या भागात जायच्या कमानीत भली मोठी घंटा. जमिनीवरून उड्या मारून काय हात पोहोचेना. मग कमानीखाली भिंतीतल्या कोनाड्यात एक पाय देऊन मी नक्षी कामाची कड धरून त्यावर चढलो. तिथून खाली उडी मारताना ठाऽण्णकन घंटा वाजावली. घंटेच्या ठणाठणा आवाजाने आमच्या कानांचे दडे बसले. तेव्हा घंटा वाजवायचा खेळ थांबवून आम्ही आतल्या भागात शिरलो. आत खुपच काळोख. थोडावेळ डोळे मिटून गप्प राहिल्यावर मग डोळे उघडले तेव्हा दूरवरचा गाभारा, गाभाऱ्यातली घृष्णेश्वराची पिंडी,त्यावरचा पाच फड्यांचा पितळी नाग नि गळती, गाभाऱ्या समोरचा भला मोठा नंदी, सगळं नीट दिसायला लागलं. मोहन नंदीच्या पाठीवर बसला. मी गाभाऱ्या जवळच्या कोनाड्यातला शंख काढला नि वाजवला. मोहनन सुध्दा शंख वाजावायला बघितलाय पण त्याला काय जमेना. नुसतं फुस्स व्हायचं. मी त्याला शंख कसा वाजावायला ते दाखवलं. या भागात आणखी एक मजा असायची. ईश्वराची पालखी आणि नगारा. आम्ही पालखीत बसून बघितलं. हाताच्या मुठी लाल होऊन दुखेपर्यंत नगारा बडवला. दणदणाटामुळे घाबरलेली वटवाघळं सैरावैरा उडायला लागली.
ईश्वराला नमस्कार करून आम्ही बाहेर आलो. मग भैरव, महाकाली, गणपती ही देवळं फिरलो. धर्मशाळा,कपारीत कुठे कुठे खोदलेल्या गुहा सगळीकडे फिरून आम्ही गायमुखा कडे गेलो. तोपर्यंत दुपार झाली. पोटात कावळे ओरडायला लागले. आम्ही गोमुखातून पडणाऱ्या झोताखालीच न्हायला बसलो. व्हाळात कुठे कुठे पडलेले पिवळे-तांबूस ठिसुळ दगड घेऊन त्यांनी अंग घासायचं असतं, दगड झरत जाईल तसतसं अंग उजळतं. आम्ही एकमेकांच्या पाठी खसाखसा चोळल्या नि आंघोळ झाल्यावर ओलेत्यानेच घराकडे धावत सुटलो.
दुपारची जेवणं झाल्यावर मोठ्या माणसांची वामकुक्षी सुरू झाली. आता तर आम्हाला मोकळं रानच मिळालं. आमची जोडगोळी घराबाहेर पडली. या वेळी आम्ही सात कुंडं नि झरीकडे गेलो. दुपारी उन्हाचा कडाका असला तरी कुंडांच्या परिसरात कसं थंडगार,निवांत वाटायचं. चारी बाजुना अष्ट, बकुळी, कळंब, आंबे अन् जांभळीची उंचच उंच झाडं ! फळं खायला कोण कोण पक्षी आलेले. बाळी चिमणी, परटिणी, शेंडेपाखरं, हळदिवे, भोरड्या, भुरल्या चिमण्या, वेडे राघू, साळुंक्या, खरब्या, कोकीळ, भुर्रर्र भुर्रर्र उडत बकुळं जांभळं मटकावायची. आम्ही सात कुंडाजवळ गेलो तेव्हा चार-पाच मुंगसं पाटाच्या कडेला सकेऱ्यात खेळताना दिसली. त्यांच्या पलीकडे पाण्यावर आलेल्या रान कोंबड्याही दिसल्या. आमची चाहूल प्रथम त्यानांच लागली. क्लक् -क्लक् करीत त्यांनी दडी मारली. मग मुंगसंही सुळुसुळु करीत दगडां खालच्या बिळात शिरली.
आम्ही पाखरं बघत झरीपर्यत गेलो. जांभळीवर चढुन फांद्या गदागदा हलवल्यावर जांभळांचा नुसता खच पडला. झरी-पलीकडच्या चिंचेवर पाच - पंचवीस माकडांचानुसता हुदुदु चाललेला. मोहन तिकडे धावला. तो माकडांना दगड मारू लागला. माकडं भुरूभुरू उंच फांद्यांवर चढून वाकूल्या दाखवायला लागली. मोहननं अगदी जीव खाऊन दगड मारले तरी त्याचे दगड माकडांपर्यंत पाहोचेनात. मग बकुळीवर बसलेल्या पाखरांना त्याने दगड मारून हाकलून लावलं. “इथे डेळकीनं पाखरं मारायला मजा येईल. मी सायकलची ट्युब आणलीहे. आपण डेळकी बांधुया चल,” मोहन म्हणाला. आम्ही दडदडत घरी गेलो.
मोहननं आपल्या तोस्तानातून ट्युबचा हातभर तुकडा काढला. आता त्याला डेळकीसाठी लाकडाचं गेचूक हवं होतं. आम्ही कोयता घेऊन व्हाळात गेलो. व्हाळाच्या कडणीला कऱ्याची कितीतरी झाडं. कऱ्याचं लाकूड टिकाऊ नि त्याच्यावर गेचकं असलेल्या फांद्या पण मिळतात याची मला उज्जू माहिती. मी त्याला चार गेचकं तोडून दिली. त्यातलं एक मोहनला पसंत पडलं. मी त्या दुडेळी गेचकाची साल काढून ते मापात तोडून गुळगुळीत करून दिलं. रबर कापायला म्हशी भादरायची कात्री आणून दिली ट्युबच्या आंगळभर रूंदीच्या दोन पट्टया नि बांधायला रबराच्याच बारीक बारीक चिरफोळया मोहननं व्यवस्थित कापल्या. त्याने रबरी पट्टया मापात कापुन घेतल्या. त्या दुडेळ्यावर रबरी चिरफोळीने शिस्तीत बांधल्या. आता त्याला दगड ठेवण्यासाठी चामड्याचा तुकडा हवा होता. मी पडवीच्या माळ्यावर चढुन जुन्या चपलांच्या ढिगातून एक बरासा जडणाचा तुकडा शोधून दिला. जडणाच्या चामड्यांतून चार आंगळ लांब नि तीन आंगळ रूंद तुकडा त्याने कापून घेतला. त्याच्या दोन बाजुना रबरी पट्टया ओवण्यासाठी चीर पाडून घेतली. जवळ जवळ तास दीड तास खपल्यावर एकदाची डेळकी तयार झाली.
आपल्या कसबावर खुष होऊन मोहन शीळ घालीत म्हणाला, “आता पाखरांची कंबक्ती भरली. तु नुसती मजा बघीत ऱ्हा. माझा नेम म्हणज्ये काय! पाखरांचा खच पाडतो की नाय् बघ तू.” अण्णा -काकांनीसुध्दा डेकळी बघून मोहनचं कौतुक केलं. अण्णा म्हणाले, “कसब आहे खरे. भारी हुषार पोर बाबा.” मोहननं डेकळी ताणून फटाफटआवाज काढून दाखवले. तेवढ्यात काकूनं खायला हाक मारली. पोहे नि खोबऱ्याचा तुकडा खिशात कोंबीत आम्ही बाहेर पडलो. वाटेनं चालता चालता पोह्याचे बकाणे भरले.
मोहन व्हाळात उतरला. चांगले गुळगुळीत बेतके दगड शोधून खिशात भरून घेतले. मग आम्ही झरीकडे निघालो. सात कुंडांजवळच्या एका खुंटावर शेंडे पाखरू बसलेलं दिसलं. मला हाताने थांबण्याची खुण करून मोहन दबकत दबकत पुढे निघाला. शेंडे पाखरू बिचारं आपल्या नादात! पाखरू माऱ्याच्या अंतरात येताच मोहननं नेम घेऊन डेळकी ताणली नि फाटकन दगड सोडला. मला हे कसब नव्यानेच बघायला मिळालेलं. त्याचा नेम मात्र अचूक खराच. पाखरू बद्दकन खाली पडलं. मोहननं पंख धरून ते उचललं. त्याची मान लटकली न् चोचीतुन थेंब थेंब रक्त गळत ऱ्हायलं. त्याने रक्ताचा थेंब डेळकीला लावला. डेळकीला रक्त लावलं की नेम अचूक लागतो असं मोहन म्हणाला. डोळा फुटलेलं,रक्त ओघळणारं, लोळागोळा झालेलं ते पाखरू बघून माझ्या अंगावर शहारे आले. पोटात मळमळायला लागलं.
आता सकाळ, दुपार मोहनंचा हा नादच सुरू झाला. दिसेल ते पाखरू टप्प्यात आलं की, ते डेकळीने उडवायचं परसवात, व्हाळात, झरीजवळ, देवळाभोवती मोहन एकसारखा हिंडत ऱ्हायचा. नुसती पाखरंच नव्हे तर सरडे, चोपय, व्हाळातले मोठे मोठे बेडूक... दिसेल ते जीव मारायचा. अगदीच काय नसेल तर ईश्वराच्या, देवीच्या देवळात छताला लटकणारी वाघळं मारायची. ती तर ढिगांनी. मोहननं वाघळांचा नुसता खच पाडला. माझ्या अंगावर रेपा येत. मन खायला लागे. रात्री झोपल्यावर मेलेली पाखरं,वाघळं डोळ्यांसमोर येत. मध्यान्ह रात्र झाली तरी मी जागाच म्हणताना आईनं मला विचारलं. मला रडू यायला लागलं. मोहनचं पाखरं मारणं ऐकून काकूसुध्दा चिडली. दुसऱ्या दिवशी तिने मोहनला चांगला लंबे केला. “ मेल्या, देवाच्या दारात पाखरं मारतोस? कुठे पापं फेडशील? ब्राह्मणाच्या पोटी जन्माला येऊन कसले नष्टचर्य नाद हे तुझे? थांब तुझी डेळकीच चुलीत घालत्ये.” काकूनं डेळकी काढून घेताच मोहन बोंबा मारू लागला. आता काका मध्ये पडले. अण्णा म्हणाले,“अरे मोहन, त्या मुक्या जाीवांना मारून आपल्याला काय मिळणार? आणि देवळातली वाघळं बिचारी, देवासमोर त्यांची हत्या करणे बऱ्याचे लक्षण नव्हे. तू बाकी कसलेही खेळ खेळ पण पाखरं नको मारू बाबा.” काकांनी काही न बोलता काकूच्या हातातली डेळकी काढून घेतली. मोहनला उचलून ते खळ्यात घेऊन गेले. त्याला डेळकी परत देऊन म्हणाले, “हे बघ पाखरं मारशील ती घरी दाखवायला आणू नकोस. देवळात वाघळं मारली तर ती उचलून बाहेर नेऊन टाकीत जा.” मग माझ्याकडे बघून ते म्हणाले, “बाहेर काय झक मारायची ती मारा. इथे घरात आई-काकूंपर्यंत काय पोचवू नका. जावा पळा आता नि दुपारी वेळेवारी घरी या.” काकाच असं बोललल्यावर मोहन शेफारूनच गेला. हुय्यऽऽ हुय्य करीत त्याने व्हाळाकडे धाव घेतली. मोहनबरोबर जायला माझं मन राजी नव्हतं पण नाइलाजाने मी गेलो.
आताशा मी त्याचा नाद सोडला. मला आडबाजूला घेऊन आईनं बजावलं, “हे नाद चांगल्याचे नव्हेत. मोहन लाडाकोडाचा. तो काय करील ते करो बापडा. तू त्याच्याबरोबर एरव्ही काय ते खेळ. पण पाखरं मारायला जात जाऊ नकोस.”मी जाईनासा झालो तरी त्याचं काही अडलं नाय. घाडी-गुरव यांची पोर त्याच्याभोवती जमली. खरबी, लाव्हा असलं खाण्याजोगं पाखरू त्यानं मारलं तर ती पोर सागोतीला घेऊन जात. कुठे -कुठे पाखरांची बसल, ठिवं शोधून ती त्याला घेऊन जात. मोहनच्या रोजच्या फिरतीमुळे झरीवर आता पाखरू नजरेला पडेना. मग तो आडवणात फिरत राहायचा. पाखरांची घरटी शोधायची,त्यातली अंडी फोडायचीय पिल्लं मारायची, घरटी उस्कटून टाकायची असले धंदे चालत. एखादं अर्धमेलं पाखरू मिळालं तर घरातलं मांजर नेऊन त्याला ते द्यायचा. असले खेळही होत.
देवळामागच्या जुनाट तिरफळीच्या झाडावरचं धामण्या पोपटाचं पोखर पोरांच्या नजरेला पडलं. पोपटाची पिलं बाळगायची म्हणून मोहन काकांच्या पाठी लागला. काका तिरफळीवरचं पोखर बघून आले. भिकू गुरवाला पोखरातली पिल्लं काढून द्यायला बोलावलं. तिरफळीच्या अंगाला असंख्य काटे, झाडावर चढणं भारी अवघड. पण झिलु युक्तिबाज. पावसाळी सोनचाफ्याची फुलं काढण्यासाठी ठेवलेलं वेळवाचं कणक लावून तो तिरफळीच्या बेचक्यापर्यंत गेला. मग पाय ठेवण्यापुरत्या खापा मारीत त्याने पोखर गाठलं. पोखराचं तोंड कोयत्याने रूंद करून आतली चारही पिल्लं घेऊन तो अल्लाद खाली उतरला. पिल्लांचे डोळे नुकतेच उघडलेले असावेत. त्यांच्या अंगावरची पिसं अजून पूर्णपणे हिरवी सुध्दा झालेली नव्हती.
एवढे लहान गोळे जगवायचे कसे हा प्रश्नच पडला. काकू तर काकांवर डाफरली, “एवढे लहान गोळे कर्माचे जगणार, पोराच्या नादी लागून त्या अश्राप पिल्लांच्या प्राणावर तुम्ही उठलाहात. अशाने तळभंजन होईल....” अण्णानी एका करंडीत जुनेराचा चौघडी तुकडा टाकून त्यावर पिल्लांना ठेवलं. भाताची शितं दुधात कुस्करून,कधी आंब्याचा रस कधी चिकवाची फोड कुस्करून ते समक्ष पिल्लांना भरवायचे. पाच-सहा दिवसांत ती पिल्लं चांगली टुकटुकीत झाली. ‘च्राँऽऽच्राँ’ करीत करंडीत फिरू लागली. अण्णांचं बघून आता मोहनसुध्दा त्यांना भरवायचा. पिल्लं आणल्यापासून त्याचा दिवस पिल्लांमध्ये जाऊ लागला. डेळकी बंद झाली. अशात सांगलीला जायचा दिवस उजाडला. काकांनी स्वतः पिल्लांची करंडी सांभाळली. सांगलीत गेल्यावर भला मोठा पिंजरा करून घेतला.
चारही पिल्ले मोठी झाली. त्यांना कंठ फुटले. त्यांतला एक पोपट बोलायलाही लागला. काका पत्रातून न चुकता पोपटांची खुशाली कळवायचे. पाखरांमुळे मोहनला वाडेखोलाचा चांगलाच लळा लागला. दिवाळी व मे महिन्याच्या पूर्ण सुट्टया तो वाडे खोलात घालवायचा. सुट्टी मिळाली की एखाद्या बहिणीला सोबत घेऊन तो हुकमी यायचा. तो आल्याची वर्दी मिळाली की घाडी- गुरवांची पोरं आमचं घर गाठायची. वेळ- काळ कसलंही भान न ठेवता तो पाखरं,वाघळं मारीत राही. आई-अण्णांना त्याचा हा नाद आवडत नसे. पण काय करणार? मोहन आला की मागील दारी, पुढील दारी बसलेल्या पाखरांकडे पाहून आई म्हणायची, “बाबांनो,आता इथून नाहीसे व्हा. तुमचा काळ वाडेखोलात आलाहे.” मोहन आपला फिस्सकन हसायचा. पाखरांकडे बघून म्हणायचा, “दाखव अजून नाचून दाखव. डेळकी बांधून झाली की तुझा नाच कसा बाहेर काढतो ते बघ.”
मोहन मोठा झाला तरी पाखरं मारायचा त्याचा नाद काय थांबला नाही. अभ्यासात त्याची प्रगती यथातथाच असली तरी काकांच्या ओळखीमुळे (हो! काका शिक्षण खात्यात दिपोटी! त्यांच्या मुलाला मास्तर कसे नापास करणार?) मॅट्रिकपर्यंत तो वर चढत गेला. मॅट्रिकला मात्र त्याची गाडी अडली. मुळात तो इंग्रजी , गणित सोडून फिजिऑलॉजी हायजीन,नागरिकशास्त्र, चित्रकला असले विषय घेऊन परीक्षेला बसला. (तरीही तो फक्त मराठी आणि चित्रकला या दोनच विषयांत उद्धरला, हा भाग निराळा.) त्यावेळी मॅट्रिकच्या परीक्षा लवकर होत. परीक्षा झाल्यावर नवीन एअरगन घेऊन मोहन वाडेखोलात आला. घरी येताना वाटेतच शेगलाच्या झाडावर बसलेला शिंगचोच्या त्याने मारला.
आता चांगलं हत्यार त्याच्या हातात आलेलं. कवडे, ढोक, पाणकोंबड्या,कुवाकोंबड्या,ल्हावे अशी खाण्याजोगती पाखरं तो टिपायचा. मोठे मोठे बापये सुध्दा त्याच्यापुढे गोंडा घोळीत. दुपारी, तिन्हीसांजा वाटेल तेव्हा, वाटेल तिथे मोहन फिरत राहायचा. त्याच्या कर्तृत्वाला वाडेखोलाचं क्षेत्र पुरेना. पुरळ, मुटाट,बापर्डे,मणचे,कालवी इथल्या आमच्या आते- मावशांकडे तो जायचा चार-चार दिवस शिकारी करीत राहायचा. सगळ्यानाच हे रूचत असे अशातला भाग नाही. पण एक म्हणजे थोरा - मोठ्याचा मुलगा, त्याला कसं बोलायचं हा प्रश्नच! दुसरं म्हणजे त्याचा शिकारीचा नाद सोडला तर मोहन अगदी सरळ नि मनमिळावू. लाडाकोडात वाढलेला, पण खाण्या जेवण्याची चत्राई नाही. बापर्ड्याला माझ्या मावशीकडे अठरा विशें दारिद्र्य. तिच्याकडे दुवक्त आमटी-भात, भाकरी मिळण्याचीही भ्रांत. बरेच वेळा पोटभरतीला आटवल,आंबील, बरके गरे, भोपळ्याची नायतर तोवशाची भाजी असायची. मोहन उलट मावशीला सांगायचा,“माझ्या एकट्यासाठी भाकरी भात करु नकोमावशी. मला भोपळ्याची भाजी,आंबिल, भयंकर आवडते. आमच्या घरी आई करीत नाही.” त्याच्यासाठी दोन भाकऱ्या केलेल्या असल्या तरी तो आंबिलीची पातेली पुढे ओढी. तो पानात पडेल ते पोटभर खाऊन आनंदात राहायचा. गुरं चरवायला न्यायचा. गाई म्हशींच दूध काढायचा. काजु - रतांबे पाडून द्यायचा. त्याच्या ह्या गुणांमुळे त्याच्या शिकारीबद्दल कुणाची तक्रार नसे.
एकदा संध्याकाळी झोपाळ्यावर बसलेले असताना अण्णांनी त्याच्या परीक्षेची- अभ्यासाची चौकशी केली. त्याने इंग्लिश - गणित सोडलेलं ऐकल्यावर अण्णांनी त्याची चंपी केली. परीक्षेत हमखास पास होईन असेही मोहन सांगेना. त्यावरून हा काय दिवे लावणार ते अण्णांनी ओळखलं. त्याला चांगलं बोधामृत पाजलं. मोहन रडला तेव्हा मात्र आई मध्ये पडली. त्या रात्री मोहन रागाने जेवला नाही. सकाळी उठल्यावर मी मुटाटला आत्याकडे जातो असं आईला सांगून तो चालता झाला. तो गेल्यावर आई- अण्णांचं चांगलंच भांडण झालं.“ही गोष्ट भावोजींच्या कानावर गेली तर उगाच वितुष्ट येईल.” आई करवादली. अण्णा मात्र खंबीर.
“ह्या कारणामुळे वामन तुटला तरी बेहेत्तर. एवढ्या मोठ्या हुद्दयावर काम करणारा माणूस! ह्याचा पोर असा वारेभक्..... ही गोष्ट काय भूषणावह नव्हे. मला तो वामन्या शब्दाने तरी विचारूदेच, नाय त्याचा सुखडा साफ केला तर बघ. विद्या हा ब्राह्मणाचा छंद, शिकारी हा नव्हे ! उद्या पोरगा वाह्यात गेला तर कोणाच्या नावाने रडेल हा वामन? मी भीत नाय त्याला! असल्या नादासाठी त्याचा पोर नाय आला वाडेखोलात तरी बेहेत्तर.” चार दिवसांनी मोहन आत्याकडून परत आला. त्याला अण्णा ओरडले वगैरे काही मनात न धरता तो पंधरा दिवस राहिला नि सांगलीला गेला. तो गेल्यावर काकांकडून काही खारट तुरट पत्र येईलसं वाटलं होतय पण तसं काही झालं नाही. पुढे कधी तरी वामनकाका आले तेव्हा अण्णांनीच अशाला असे झाले, हे त्यांच्या कानी घातलं. तेव्हा मोहन याबद्दल अवाक्षरही त्यांना बोलला नव्हता हे समजलं. हल्ली त्याने काकांच्या मागे लागून बंदुकीचं लायसेन्स काढलं. दुनळी काडतुसाची बंदुक त्याने घेतल्याचं कळलं. काकांनी त्याला कापड दुकान काढून दिलं. त्या वेळी आई-अण्णा मुद्दाम सांगलीला जाऊन आले. त्याचा शिकारीचा नाद काही कमी झाला नाही. चांगल्या चांगल्या लोकांशी त्याच्या ओळखी झाल्या. रोज संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर तो सांगलीच्या आसपास शिकारींना जाायचा.
त्या वर्षी बंदुक घेऊन मोहन वाडेखोलात आला. येण्यापूर्वी आमच्या बरोबर सदू गुरवालाही आपण बंदुक घेऊन येणार असल्याचं त्यानं कळवलं. मोहन गाडीतुन उतरला तेव्हा त्याचं मित्रमंडळ जमा झालं. आमच्या मळ्यात डुकरं पुष्कळ. आडवणात ससे, भेकरी, लांडोरीसुध्दा आढळत. या खेपेला मोहन रात्र-रात्र घरात नसायचा. त्याने खुप शिकार केली. तो चोरून मटण खातो ही कुणकुण आई-अण्णांच्या कानांवरही गेली. घाडी-गुरवांची पोरं त्याने मारलेली शिकार न्यायची. मटण रांधून गुपचुप त्याला खाऊ घालायची. मोठी शिकार मिळाली नाही की मोहन झरीवर फिरायचा. पाखरं मारणं,देवळातली वटवाघळं मारणं हेही चालूच. काही ना काही जीव मारण्यासाठी त्याचे हात शवशिवत असावेत हेच खरं.
अलीकडे वामनकाका उत्सवाला येऊन गेले की नंतर आगे मागे मोहनची खेप ठरलेली. वाडेखोलात तो शिकार करायचाच, पण मुटाट-पुरळ इकडे पाहुणे मंडळींकडे जाऊनही तो शिकारीसाठी फिरायचा. तो आला की पंधरा दिवस, पाऊण महिना त्याचा मुक्काम ठरलेला. आमच्या गावातही दोन-तीन बर्कनदार झालेले. तसेच आडवणात नी सड्यावर झाळी-बेटे तोडून हापूस कलम लागवडी सुरू झाल्यामुळे जंगल कमी झालेले. सिलीपाट नि कलम लागवडीमुळे झाडांची बेसुमार तोड झालेली. आडवनात खुटवळ काढून कोळशाच्या भट्टया सुरू झालेल्या. त्यामुळे हळुहळु शिकार कमी होत चालली. त्या वर्षी तर तीन चार दिवस पायपीट करूनही मोहनला शिकार मिळाली नाही. जनावरांचा निवासच ऱ्हायला नाही.अधून मधून केरळ- मद्रास इकडचे लोक यायचे नी सायरन वापरून शिकार करायचे. त्यांनी तर शोधून शोधून जनावरं साफ केली.
मोहन वैतागला.झरीवर पाखरं मारायला गेलेला असताना त्याला सशाच्या, भेकरांच्या लेंड्या दिसल्या. देवराईला अजून कोणाचा हात लागलेला नव्हता. राईतली झाडं तोडायला,शिकार करायला देवाचीच बंदी असायची. अजूनपर्यंत तरी देवाचा हुकुम मोडायचं धारिष्ट्य कोणी केलेलं नव्हतं. झरीवर पारधीला बसायचा मोहनचा बेत त्याने घाडी- गुरवांना सांगितला. ही बातमी अण्णांच्या कानी आली तेव्हा त्यांनी आकांड-तांडव केलं. भलतं सलतं धाडस करू नकोस,असं त्यांनी मोहनला निक्षून बजावलं. घृष्णेश्वराचं देवस्थान भलतचं जागृत . इथे देवाच्या हुकुमाविरूध्द काही गोष्ट केली तर त्याचं प्रत्यतंर आल्याशिवाय राहणार नाही हे त्यानी बजावलं. मोहन शिकारीसाठी नुसता वेडापिसा झालेला! अण्णांच्या नकळत त्याने देवाला कौल लावून विचारणा केली. पण कौल मिळाला नाही.
मोहनची भलतीच पंचाईत झाली. दुपारच्या वेळी झरीवर पाखरं मारायला गेलेला असताना जांभळीवर आलेले वादंर त्याला दिसले. मोहन टाकोटाक घरी जाऊन बंदुक घेऊन आला. जाांभळी वरच्या कळपामधील हुप्प्यावरच त्याने बार टाकला. वर्मीगोळी लागलेला वानर दोन्ही हातांनी फांदी गच्च घरून काही वेळ लोंबकळत राहिला. मग मात्र त्याचा एक हात सुटला. स्वतःभोवती गिरकी मारून वानर झरीत कोसळला. बाराचा आवाजा ऐकून कळपातल्या वांदरीणी सैरावैरा पळाल्या. उगाच बोंबाबोंब नको म्हणून मोहनने झरीतला वांदर उचलला नि ओढीत ओढीत लांब काटवणात फेकून दिला. पाच-सहा दिवसांनी हात साफ करायला मिळाले या आनंदात मोहन सातकुंडाजवळुन वर आला. भैरवाच्या गुंफेसमोर तो आला. त्याने सहज नजर केली तर गुंफेमागच्या अष्टावर दडलेल्या कळपातल्या दोन-तीन वांदरिणी दिसल्या.
ईश्वराच्या देवळाला वळसा घालून पलीकडच्या अंगाने गेलेल्या चढणीवरून मोहन दबकत दबकत निघाला. झाळींच्या आडोशाने दडून बसत - बसत तो अष्टाकडे सरकायला लागला. अष्टाचं झाड टप्प्यात आलं. फांद्यांच्या आडोशाला भयाने एकमेकींना लगटलेल्या दोन वांदरिणी मोहनने टेळल्या. सावधपणे नेम धरून त्याने बंदुकीचे दोन्ही चाप लागोपाठ ओढले. धाड्धाड् दोन बार झाले. वांदरिणी भैरवाच्या देवळावर आदळून देवळा समोरच्या ओवरीत कोसळल्या. मोहनने झरीत पहिला बार टाकला. त्याचा आवाज ऐकून सदु गुरव घराबाहेर पडून देवळा कडे निघालेला. तो व्हाळात पुलावर असतानाच दोन बार होऊन भैरवाच्या देवळावरून कोसळलेल्या वांदरिणी त्याने बाघितल्या. तो धावत पुढे गेला. मेलेल्या वांदरिणी त्याने उचलून लांब नेऊन टाकल्या. देवळातली घागर भरून आणून त्याने ओवरीत सांडलेलं रक्त धुवून टाकलं. “ म्हाजनानूं, ह्यां लय वायट क्येलास. हय पारद करूक द्येवाची बंदी हा.... शिकारीक कऊल दिलान नाय द्येवान ह्यां तुमी बगलासच. द्येवाची सामक्षा मिळाल्याशिवाय ऱ्हवणार नाय्. नाक-त्वांड घासून चुकी मागा.” असा सल्ला त्याने मोहनला दिला. मोहन मनोमन चरकला. पण घृष्णेश्वरा समोर हात जोडून चुक कबूल करणं टाळून वरकरणी हसण्यावारी नेत तो घराकडे निघाला. व्हाळातल्या पुलावरून उतरताना सळ्ऽऽ सळ् करीत एक भला मोठा पिवळा धम्मक नाग सरसरत गेला. मोहनचा त्याच्यावर पायच पडायचा पण नशिबाने तसं झालं नाही. घरी गेल्यावर संध्याकाळपर्यंत मोहन झोपाळ्यावर झोप्या घेत राहीला. मनातून घाबरलेल्या मोहनला रात्री नीज येईना. खुप उशिराने त्याचा जरा डोळा लागला. त्याला वेडीवाकडी स्वप्नं पडली. स्वप्नात तो गायमुखाखाली आंघोळ करीत असताना कडेच्या झाडांवरून धडाधडा उड्या मारीत शे-सव्वाशे वांदर जमले. मोहनकडे किच्च किच्च दात विचकत पाहत ते रडायला लागले. मोहन घाबरून अंथंरूणात उठून बसला. तो घामाने निथळला. त्याच वेळी घड्याळात बाराचे ठोके पडले. ठोके थांबल्यावर भैरवाच्या फेरीची जाग लागली. भैरवाच्या दांड्याचे आवाज जवळ जवळ ऐकायला येऊ लागले. आमच्या महाजनांच्या घरासमोर दोन-तीन वेळा खुप जोराने धाण्-दाण् दांडा वाजला. मोहनला मग झोपच आली नाही.
सकाळी उठून तोंड धुताना आई-अण्णांचं संभाषण त्याच्या कानांवर आलं. अण्णा बोलले,“काल मध्यान् रात्री भैरवाची फेरी झाली ना ती आयकलिस काय गो? आमच्या वाड्यासमोर दोन-तीन वेळा दणादणा दांडा वाजलेला मी आईकला.कशामुळे काय बिनसले कळेना. मोहन्यान शिकारी साठी कौल लावून देवाचा होकार मागितलान होता, अशी वदंता माझ्या कानावर आलीहे त्यामुळे देव कोपला नसेल ना?” हे ऐकल्यावर मात्र मोहन अंतर्बाह्य हादरून गेला. त्याने सामान आवरले अन् जाण्याचा बेत केला. तो चहा घेत असताना आईला तसे म्हणाला. आईने त्यावर म्हटलं, लवकरसा निघालास? चार-आठ रोजा ऱ्हाईना होतास. शिकार मिळत नाय म्हणून तुझे मन लागत नाय की काय? काय बोलावं मोहनला सुचेना. तो उत्तर योजून बोलला,“काकू, तिकडे दुकान नोकरांवर पातून आलोय् . हल्ली दुकान होबेस चालते. आपण स्वतःनाही तर फुकट आहे.” आईलाही हे पटलं. मोहन सांगलीला निघून गेला. सांगलीत गेल्यावरही त्याला नीज पडेना. रोज वेडीवाकडी स्वप्नं पडायची. काळाकभिन्न कोचाऱ्या शिंगाचा बैल शिंगं रोखीत मारायला यायचा... कधी वाघळं चिर्रर्र चिर्रर्र करीत डसायला यायची.... कधी दात विचकत वांदर अंगावर यायचे. त्याला झोप म्हणून लागेना. आठ-पंधरा दिवस तो सैरभैर झाला. धड काही बोलेना. जेवी खाई ना! एक दिवस सकाळीच तोंड धुतल्यावर तो घराबाहेर पडला. बरेच दिवस घरातच घोंगशी घालून पडलेला मोहन आपण होऊन घराबाहेर पडला,या गोष्टीचा काकूला आनंदच झाला. जरा बाहेरची हवा लागली, मित्रमंडळात गप्पाष्टकं झाली की पोर थाऱ्यावर येईल असा आपला तिचा अंदाज ! दुपारी दुकान बंद करून नोकर चावी देऊन गेला. तेव्हा मोहन दुकानाकडे फिरकलेला नाही हे कळलं, घरात काही न सांगता कुठे - कुठे भटकणं हे काही मोहनच्या बाबतीत नवीन नव्हतं. संध्याकाळी मोहन आला नाही तेव्हा मात्र काकूचा जाीव थाऱ्यावर ऱ्हाईना. आख्ख्या सांगलीत मोहनच्या परिचयातल्या माणसांकडे चौकशी झाली, पण कुठेच काय मागमुस लागला नाही. मोहन बेपत्ता झाल्याला चार दिवस लोटले. कसलाही धागादोरा लागू न देता त्याचं बेपत्ता होणं आता आमच्या दृष्टीनं एक गुढच आहे!
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙