Fall fall mangoes in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | पड पड आंब्या

Featured Books
Categories
Share

पड पड आंब्या

पड पड आंब्या
पड पड आंब्या गोडांब्या
गोडांब्याची कोय कोय
मदल्या पोराच्या डोय डोय
डोयेक् झाला खाण्डुक
खा रे बोडया शेण्डुक

बर्व्याच्या आगरात पडीचे आंबे पुंजावायला वाणी वाडी, गिरमे वाडी नी बर्व्यांचे शीव शेजारी दामले नी काळे यांच्या घरातली अशी मिळून जवळ जवळ पंचवीस पोरा पोरींची फटावळ जमलेली. आणखी तासा दोन तासात प्रत्येकाच्या झोळी झारंग्यात चार सहा आंबे नक्कीच जमणार होते. आमचे पणजोबा लहान होते त्या वेळी लखू बर्वा मिरजेच्या पटवर्धन सरकारांच्या चाकरीत कारकून म्हणून रुजू झाला नी वर्षभरात आपला कुटुंब कबिला घेऊन शिडमातून निघून गेला तो गेला. पुढे त्याच्या एका मुलाने मोती पोवळी विकायचा धंदा सुरु केला. पुढे त्याने इंदूरला सोन्या- चांदीची पेढी सुरु केली. कधि काळीही बर्वे कुटुंबीयांपैकी कोणीही शिडमाकडे फिरकलेही नाही. काळाच्या ओघात बर्व्यांचा वाडा पडून गेला . त्या घरवंदावर नी पु-या घरभाटात साताठ रायवळ आंब्याची झाडं वाढलेली. आठ दिवसा पूर्वीपासून आंबे पिकून पडायला सुरुवात झालेली. आता पंधरा वीस दिवस त्या विस्तीर्ण वाढलेल्या झाडांखाली आंब्यांची पखळण पडणार होती. रात्री दिवसा सतत शेकड्यावारी पिके आंबे पडायचे नी ते पुंजावायला आजूबाजूच्या घरातली पोरं दिवसभर ठाण मांडून रहायची बर्व्याचा घरवंद , मागील दारचं तुळशी वृंदावन यापासून तो डेगे खालचा महापुरुष नी व्हाळाच्या कडेला असलेली समाधी असा दीडेक एकराचा भाग वगळून आजुबाजूची भूमी भग्या वाणी, बरम्या वाणी, बाबा गिरमे विष्णु धुवाळी यानी बळकावलेली. तिथे वाण्यानी पानाची बियं केलेली , गिरम्या उन्हाळी मिरच्या, वांगी, मुळे नी चवळी, लाल भजी करी .धुवाळ्याचा ऊस असायचा. तो आजूबाजुच्या जत्रां मध्ये रगाडा टाकून रस विकी नी राहिलेल्या उसाचा मिरगापूर्वी गूळ पाडी . मात्र घरवंदापासून तो समाधी पर्यंतच्या भागावर भग्या नी विष्णु दोघेही आपला हक्क असल्याचं सांगायचे पण तो भाग बाधिक होता म्हणून पड टाकलेला. उगवतच्या बाजूला धुवाळ्याचं पडण.
आजोबा लहान होते तेंव्हाची गोष्ट. धुवाळ्याच्या चुलत्याने - भिवाने समाधी पासून अर्ध्या आगरात आंब्यांच्या विस्ताराखालची ओथिवळ्याची जागा , तिथे पावसात ओघळणा-या पाण्याच्या माराखाली रोपं कुजून मरून गेली असती म्हणून तेवढा भाग सोडून चार मोठे दळे पाडून नांगरट घातली. एका दळ्यात नाचणा पेरला. आवूट वीतभर वाढल्यावर (नाचण्याची रोपं) आवूट काढायला भिवा , त्याची बायल जनी, नी गंगू, वच्छी ही चेडवं आलेली. ती आल्या आल्या वच्छीच्या पायात कसला तरी ढंबूस भरला. शेतीला दळे पाडले तेंव्हा जमिनीवर वाढलेली झुडपं तोडून त्यांचा खुटवळ खणून काढलेला. पण नजर चुकीने आंगठ्याएवढा ढंबूस खणतीत शिल्लक राहिला. तिरका तोडलेला तो टोकदार ढंबूस अवघाती पाय टाकल्यावर असा घुसला की बोंब मारीत वच्छी खाली बसली. तिचं ओरडणं ऐकून जवळच्या आबा दामल्यांची बायको बाहेर आली.
“ ग्येऽऽ भटणीऽऽ , वच्च्याच्या पायात ढंबूस भरलो नी लय रगात येताहा ” जनी म्हणाली. मग दामलीण पान्याचा गडवा नी केळीच्या फाळक्यावर दोन चिमट्या हळद घेऊन गेली. दामले नी बर्वे यांच्या दरम्याने हद्दीवर एरंडाच्या नी अंबाड्याच्या जितारू खुंटाची वई असायची. त्या वईवरूनच भिवाकडे गडवा नी हळदीचा फाळका देऊन दामलीण खबर बात घ्यायला तिथेच थांबली. “तेका वांयच् पानी पाज नी जकम धोवन् फडक्यान पूस नी हळद चेपून धर” तिने जनीला सांगितले. हळद झोंबली नी वच्छी ओरडली “ आये ग्ये .... लय झोंबता ” तशी जनी रागाने म्हणाली , “गप -हव गो रांडवा, वयच सन कर .... बायल मानसान सोशिक पान धरूक व्हया. ” धडप्याची धांद जखमेवर बांधून. जनीने गडवा भटणीकडे नेऊन दिला नी आवूट काढायला लागली. भिवाने जोत बांधलं ने उखळ धरली. चार पाच मुठी आवूट साठल्यावर जनी पेंढी बांधायला धमणीचे बंद आणायला उठली. व्हाळाच्या कडेला गचवटीत मनकटाएवढा धामणीचा ख़ूट दिसला . जनीने गचवटीत सावधपणे पाय ठेवून खूट वाकवून दोन भिरड्या तोडल्या. एवढ्यात दवणशीरेजवळ टोकदार काटा टोचल्यासारखी भावना झाली म्हणून भिरड्या बाजुला टाकून ती खाली वाकली मात्र..... फुस्स करीत जनावर बाजुच्या बिळात रिगू लागले. ‘‘ बेगून येवा हो ऽऽऽ माका थोरलो डसलो हा ..... ह्यो बगा माका डसोन थय बिळात रिगताहा ’’ जनीने प्राणांतिक बोंब मारली. जोत टाकून भिवा नी त्याच्यामागून गंगू नी वच्छी आगराच्या कडेला धावली.
जनीला दवणशीर धरून जनावराने दंश केला होता. भिवाला जनावर शिरलं होतं ते बीळ दाखवून तिने त्याच्या डोईचा टॉवेल ओढून घेतला . पोटरीला दोन तीन घट्ट फेरे घेवून वच्छीला घट्ट गाठ मारायला सांगितली नी तिघानी मदतीसाठी हाकारे मारायला सुरुवात केली. त्यांची आरडा ओरड ऐकून दामले नी काळे यांच्या घरातली मंडळी धावली . प्रसंगाच गांभिर्य ओळखून हद्दी वरची वई पेचून बेळं करून माणसं पुढे गेली. एकजण पाणी आणायला गेला . दोघेजण वाडीत वर्दी द्यायला गेले. पाच मिनिटातच माणसांची जम झाली. बीळ खणून जनावर शोधून ते मारलं. जनीला उचलून दामल्यांच्या ओसरीवर नेऊन ठेवलं . ज्याला जे उपाय सुचले ते सुरु केले. वरच्या वाडीत खेमाजी वारीक वैदगिरी करी. त्याला बोलावयला माणसं रवाना केली. त्यावेळी आसमंतात कोणी डॉक्टर नव्हताच. जनी भितीने अर्धमेली झालेली . तिला मिरच्या चावायला देऊन दंश झाल्याची खातरजमा केल्यावर उपाय सुरु झाले. दंश झालेल्या जागी वस्त‌-याने चीरा पाडून रक्त वाहून जाण्यासाठी उपाय सुरु झाला. तासाभराने वैद्य आला. त्याने जनावर पाहिले. जनावर दीड प्रहराचे होते. त्याने आणलेली पाळे उगाळून त्यांचा थलक पाजला. संपूर्ण पावलावर औषधाचा लेप काढला. वाडीतून कोंबडी आणून लावली. दोन तीन मिनिटात कोंबडी तडफडायला लागली. मग दुसरी कोंबडी लावली. तीही तडफडयला लागली नी त्याचवेळी जनीही आचके देवू लागली नी दामल्यांच्या ओटीवरच तिने प्राण सोडला. आमचे भाऊ सहा वर्षाचे असताना बाबा गिरम्याच्या चुलत्याने अर्ध्या आगरावर कब्जा करण्यासाठी महापुरुषाच्या वरच्या अंगाने वई घालायला सुरुवात केली. भिक्या गिरमा भलताच हुमदांडगा होता वाण्यानी विरोधा केला तरी न जुमानता रशी ताणून हद्द आखून अर्ध्या भागा पर्यंत नेमं काढून तो दुपारी जेवायला घरी गेला. तो जेवून कलंडला नी घटका भरात त्याला असं काही हींव भरून आलं की दोन दोन घोंगड्या घालूनही थंडी काठेना...... बघता बघता त्याला सणसणून ताप भरला. तो काहीतरी असंबद्ध बोलू लागला . त्यांच्या घरवडीतल्या पूर्वजाना हाका मारू लागला. तो दिवस गेला . दुस-या दिवशीही ताप उतरेना म्हणताना घरातले लोक उमजले. वडचीकडे कौल प्रसाद घेतल्यावर बर्व्याच्या महापुरुषाकडची नड आहे हा उलगडा झाला . मग त्याच्या भावाने बर्व्याच्या महापुरुषाजवळ नारळ ठेवून चुक कबूल केली. काढलेली नेमं हुरून टाकली. दोन दिवसानी ताप उतरला नी भिक्या आजारातून उठला पण त्याचे वेडेचार मात्र कमी झाले नाहीत. आसमंतातली थळं शोधून उतारे करून झाले पणत्याचं डोकं फिरलं ते फिरलंच. असे दोन ठोकताळे मिळाल्यावर मात्र घरवंद , महापुरुषाचं नी स्वामीचं पडण यात कोणी वहिवाट करू धजावलं नाही. तिथे मोठाले आम्रवृक्ष . सुरमाड, सारिवले , बावे नी घुरवड बळावले. अधूनमधून जत्रेच्या वेळी नाहीतर शाळेत सरस्वती पूजनाच्या वेळी सजावट करायला सुरमाडाच्या सावळ्या तोडून नेत. वर्ष दोन वर्षाने गाव होळीला ऊंच वाढलेले सारीवले किंवा घुरवड तोडून नेत. पन त्याचा मात्र बाधिकार कधो कोणाला झाला नाही.
आम्रवृक्ष तर कायतरीच बळावलेले, एकेका झाडाचा विस्तार नी आवाका असा डेरेदार की ब‌-याचशा आंब्यांवर रुखाडी चढणारेच शेंड्यां पर्यंत जाऊ शकले असते. आंबटी बिटकी सोडली तर उरलेली सगळी झाडं नामांकित या सदरात मोडणारी. त्याना वाटुळका, साखरी बिटकी, तुळशी जवळचा तो तुळसा, अनसांबा . चोच्यांबा (याला टोकदार कोच असायची), आंबटी बिटकी, काळांबा नी गिधडांबा (हा इतका ऊंच की त्याच्यावर कायम गिधाडांची बसल असायची) अशी नावं असायची. वरच्या पेडात असलेल्या वाटुळक्याचा घेर सुमारे तीन वाव . मुळापासून पाच सहा पुरुष सरळसोट बुंधा नी पुढे चार फाटे फुटलेले. त्यातले डेळे दोन जमिनी समांतर नी दोन डेळे उभे वर अस्मानात गेलेले. त्यच्या डाव्या अंगाला आड्याच्या बाजूला अनसांबा. त्याचाही घेर दोनेक वाव नी मुळापासून पुरुषभर उंचीवर दुडेळका . वाटुळक्याच्या उजव्या अंगाला घरवंदाच्या मागिल बाजूला पुरुषभर उंचीचं घडिव चि-यानी बांधलेलं सुंदर तुळशीवृंदावन, त्याच्या जवळ असलेला तो तुळसा आंबा. ह्याला मुळाजवळच दोन डेळे फुटूनतेउंच गेलेले. एकेका डेळ्याचा घेर अजमासे दोन वाव. एक डेळा किंचीत तिरपा वाढून डेगे कडे झुकलेला.
वरचं पडण डेगेजवळ संपे नी डेगेखाल पासून तो महापुरुषा पर्यंतच्या भागाला मधलं पडणम्हणत. यात बावीच्या बाजुला चोच्यांबा. हा घट्ट रसाचा म्हणून कापा या सदरात मोडणारा . याची साल अशी मऊ की आम्ही पोरं हा आंबा सालीसकटच डासळवीत असू. याच्या उजव्या अंगाला दामल्यांच्या आगराच्या कडेला साखरी बिटकी. ऐन बहराच्या हंगामात बाळमुठी एवढ्या पिवळ्या जर्द बिटक्यानी नुसता लगडून जायचा. चव तर अशी सुमधूर की खेपेन पंधरा वीस बिटक्या सहज फस्त होत . ह्याचा एक फाटा दामल्याच्या आगराकडे झुकलेला त्यात पुन्हा हद्दीवर कुंपण असल्यामुळे दामल्यांची चांगलीच सोय झालेली ! याच्या डाव्या अंगाला अगदी कडेला सरळसोट आकाशात वाधत गेलेला गिधडांबा. याच्यावर कायम दहा बारा गिधाडं बसलेली असायची नी त्यांच्या पांढ-या विष्टेने खालच्या भागातल्या डहाळ्या दोन माखून गेलेल्या असायच्या. जमिनीवर पडलेल्या वाळल्या पानांवरही पुंजक्या पुंजक्यानी गिधाडांची शीट जमलेली दिसे. ह्याला फार कमी धर होता. नी पडलेला प्रत्येक आंब्यावर शीटीने माखलेला असायचा. याचे आंबे कधिच कोणी चाखून बघितलेले नव्हते. मधलं पडणही डेगेजळ संपे, पण ही डेग कमरभरच ऊंच होती नी ती घडघड्या दगडानी बांधलेली होती.
खालच्या पडणात उजवी कडे बर्व्यांच्या वकलातल्या कोणीतरी पुरुषाने सन्यास घेतला होता त्याची समाधी बांधलेली होती. तिला स्वामीची समाधी म्हणत. त्या जवळच उंचच उंच वाढलेला तो स्वामीआंबा. त्याचे आंबे बचक्या एवढे नी रस हापूस आंब्यासारखा लालसर नी घण ! झाड एवढं उंचकी पडलेला प्रत्येक आंबा एकतर जरासा तरी फुटलेला किंवा मार खावून मऊ झालेला असायचा. पडणात डावीकडे भग्याच्या पान वेलींच्या भांग्या जवळ चा तो काळांबा. याचे आंबे काळपट हिरवे नी आत काथ्या असे पण चवीला एकदम अप्रतीम! याच्या कोया चोखायला मजा वाटायची. आम्ही पोरं कोय चोखून चोखून पांढरी होईपर्यंत टाकीत नसू. याचाही निम्मे विस्तार दामल्यांच्या आगरात पसरलेला होता. सुधा आत्ते नी दामल्यांची कांती यांची घनिष्ट मैत्री .... म्हणून आम्हाला दामल्यांच्या आगरात जावून राजरोसपणे आंबे पुंजावूनआणायची मुभा होती. कांती आत्ते तर सकाळीच उठून सुधा आत्तेसाठी साखरी बिटक्या गोळा करून ठेवायची. या पडणात खाली व्हाळाकडेला होती आंबटी बिटकी. ही लांबुटक्या बिटक्यानी नुसती लगडूनजायची. झाडही फार उंच नव्हतं नी मुळापासून फाटे असल्यामुळे चढायलातसं सोपं पण आंबा नुसता आंबट ढाण! रिकामपणी वेळ कसा घालवणार? काय खेळ काढायचा तर मध्ये वा-याची बारीकशी झुळूक आली तरी फटाफट पाचदहा पिके आंबे पडत नी ते उचलायला धाव मारावी लागे. म्हणून गाण्याच्या , गावांच्या नावाच्या भेंड्या आम्ही लावायचो . म्हणजे मध्येच आंबे उचलायला पळ मारता येई. आंबा पडावा नी तो आपल्याला मिळावा म्हणून कोण कोण पोर “पड पड आंब्या ” अशी झाडाला साद घालीत, त्यातही दुस-याला आंबा मिळाला नाही की त्याला हिणवण्या साठी “ खा रे बोडया (म्हणजे पोरा ) किंवा चेडवा (म्हणजे पोरी) शेण्डुक ” अशी खोच असायची. मिळालेले आंबे साठवायला लुगड्याच्या हात दीड हात औरस चौरस धडप्याची दोन दोन टोकं गाट मारून जुळवून ती झोळी केली जायची. कुठे तरी जाता येता वाट वाकडी करून आलेली पोरं काष्टीच्या मोकळ्या शेवात, तर कोणी पोरी परकराच्या ओच्यात नाहीतर पदराच्या शेवात आंबे बांधून घेत. आगरातल्या चार पाच झाडांना तरी पाड सुरू असे नी आंब्यांची एवढी लयलूट की आलेला कोणीही रिक्त हस्ताने जात नसे.
आंबे जमवायला येणा-या पोरांमध्ये भाग्या वाण्याचा नातू ‘गोळा ’ म्हणजे अजब रसायन होतं. अंगापिंडाने आडमाप , मठ्ठ बुद्धिचा नी बोलताना कमालिचा लागायचा. तो पाच सहा वर्षाचा होईपर्यंत नुस्ता उताणा रावण लोळत -हायचा म्हणून आजा त्याला गोळा म्हणे. सहा सात वर्षाच्या भरीला तो हळू हळू उभा राहू लागला नी त्या नंतर चालायला लागला. पण त्याचा जन्म झाला नी त्याचा बापूस मुंबई पोलिसात नोकरीला लागला . कुटूंबाला चांगलाच उर्जित काळ आला . म्हणून आजा आजी त्याला जीव की प्राण करीत. तो आगरात आला की पोरं , ‘‘ पिको आंबो ऽऽ माका दिसलोऽऽ तो आदी मी बगलंय , म्हनान तो माजो हा ” असं म्हणून दाखवीत नी गोळा हसत हसत म्हणे, ‘‘मग्ये , ह्यां आगार माज्या आज्याचा हा....... ” आंबा पडला की गोळा इकडे तिकडे बघी. आंबा त्याच्या नदरे पडला की उठून तोल सावरीत आंब्याच्या दिशेने चालू लागे, मग कोणाची बिशाद होती धावत जाऊन आंबा उचलायची....... नी कोणी तशी आगळिक केलीच तर गोळा जमिनीवर लोळणमारून जोर जोरात बोंबा मारायला लागे नी त्याचं घर जवळच असल्यामुळे त्याची गंगाय धाव मारीत यायची . ती जवळ आली की ज्याने तो आंबा उचलला असेल त्याच्याकडे बोट दाखवून , “आज्ज्ये .... ह्येनां माजो आंबो घितलो ” अशी तक्रार करीत गोळा अधिकच जोराने आळप घाली. आपण त्याच्या आधी धावत जा ऊन आंबा उचलला..... गोळ्याला पडलेला आंबा दिसलाम्हणजे काय तो त्याचा झाला? मी काय त्याच्या हातातून नाही काढून घेतलेला असे कोणतेही स्पष्टीकरण ऐकून न घेता गंगाय गाळींचा असा काय पट्टा सोडी की आपली चूक नसूनही ऐकणारं पोरं हादरून जायचं .
इतर वाडीतून आलेल्या पोरांचं सोडाच पण खुद्द गोळ्याच्या वाणी वाडीतून आलेली पोरं सुद्धा गंगायच्या तोंडाळपणा गप रहायची. गोळा सांगेल तेच गंगाय खरं मानायची . आपल्याला आंबा दिसला म्हणजे तो आपला झाला असा गोळ्याचा सरळ साधा न्याय होता. दुसरं म्हणजे आंब्यासारख्या क्षुल्लक विषयासाठी भांडण करायला मोठी माणसं मोकळी नव्हती नी त्यांच्यापर्यंत कळ गेलीच तरी आपल्या पोराची कड घेऊन भांडायचा तो काळच नव्हता. ऊलट गंगायच्या शिव्या नी गोळ्याचं रडणं भेकणं ऐकून आपल्या पोरालाच चार तडाखे देऊन त्या खुळ्याची कळच कशाला काढलिस असा न्याय झाला असता. आणखी एक वेगळं कारण असं होतं की गंगायच्या जीभेवर काळ्या रंगाचा ढबू पैशाएवढा डाग होता ... ती बोलू लागली की तो दिसायचा....जीभेवर असं लासं असलेल्या माणसाची वाचा बाधते असा एक समज त्याकाळी असायचा.... तिने काही वस्तू मागितली तरी लोकं तीची आशा नको उगाच ती काहीतरी बोलली तर नसता फटका यायचा म्हणून तिचा शब्द मोडायला भ्यायची. अर्थात आंब्याचा पाड कमी असेल अशावेळी मग बिलंदर पोरं वेगळ्या मार्गाने त्याला सतावीत. कोणी तरी गुपचूप पणे चानखादरा किंवा हिरवा आंबा गोळ्याच्या समोर पडेल असा उडवीत , आंबा पडलेला दिसला की गोळा पुढे जाऊन तो उचली नी खट्टू होई. या साध्या युक्तीलाही गोळा दरवेळी फसायचा. काही वेळा एखाद्या बेरकी पोरालाही गोळ्यासाठी आंबा सोडावा लागे . मग त्याला खालच्या पडणात म्वॉप आंबं पडलं हत असं सांगून पिटाळीत नी तो खालच्या पडणात गेल्यावर त्याच्या झोळीतले दोन चार बरेसे आंबे काढून घेवून दगड भरून ठेवीत. अर्थात अशी आगळिक करणारालाही सवंगडी गंगायची भिती घालित.
रात्री निजानीज झाल्यावर तर कधी उत्तर रात्री, तर कधी भिणभिणताना मंदा आत्ते, सुधा आत्ते , अयलू आत्ते , कुशी आक्का, आक्का , सुमाताई , मधू काका , बबन काका , लंगड्या काका कोणी तरी कंदिल घेऊन आंबे पुंजावायला बोलावायचं. असं अवेळी जाचचं म्हणजे कोणीतरी सोबतीला असावं नी त्याही पेक्षा इतके महामूर आंबे मिळायचे की पुंजावायला नाहीतर ओझी वहायला कोणीतरी लागायचंच .मग आम्ही पोरं जाण्यापूर्वी गोष्ट सांगण्याची किंवा लॅडिस खेळण्याची अट कबूल करून घेत असू. जांभया येवून डोळे जडावू लागलेले असतानाही डोळ्यांवर सपासप पाणी मारून तरतरी आल्यावर बाहेर पडत असू. बहुतेक वेळा नेलेला टोपूल पिशवी भरून आंबे उरत असत. मग बेड्याजवळ टोपूल रिकामा करून सगळे आंबे घरी ओसरीवर ओतून पुन्हा बेड्यापर्यंत खेप करावी लागत असे. दुसरे दिवशी पोळीशी आमरसाचा बेत व्हायचा. पडीचे आंबे बाधू नयेत म्हणून रसात मिरपूड घालित.
त्यावर्षी पानवाल्या भिक्याच्या धालवलीत दिलेल्या पोरीचा घोव मेला. तिच्याघरचे सगळे बापये दारूडे नी कफल्लक, नव‌-यापाठी पोरीचे हाल नकोत म्हणून पानवाल्याने तिला तिच्या मुलासह माहेरी रहायला आणले. त्या पोराला सगळे त्याच्या नर ह्या आडनावाने हाक मारीत. पोर महा व्रात्य ..... आमच्या भाषेत म्हणजे गावावरून ओवाळून टाकलेला होता. अघोचरी तर असा की शेपटी धरून सरड्याना गर गर जमिनीवर आपटायचा. आंबे खायला आलेल्या म्हसरांना बचक्या एवढे धोंडे मार मारूनत्यांचा तानपट्टा काढायचा. आगरात पानवेलींच्या कुंपणावरून पळणा-या चान्या दगडाने अचूक टिपायचा नी ती अर्धमेली होवून पडलेली मिळाली कि तिचे हाल हाल करायचा. लहान वासरांच्या कानाच्या पाळीत करवंदीचे काटे खुपसायचा. आंबे जमवायलाआलेल्या लहान पोरांच्या कळी काढून त्याना मारायचा. आंब्याच्या झाडांच्या बाजूला वाढलेल्या सागवान, भुरवड , सुरमाड यांच्यावरून धरत्या आंब्याच्या फांद्यांवर चढायचा . जमिनी समांतर आडव्या गेलेल्या फाट्यांवर जाणं हे खूप कठिण समजतात पण नराचा पोर जमिनीवर चालतात तसा हात सोडून टोका पर्यंत चालत जायचा.मध्येच थांबून नाच काढून दाखवायचा.कधि पाय घसरून पडल्याचं नाटक करायचा. नर आंब्याचे फांदे गदागदा हालवून आंब्याची नुसती सापड घालायचा. पडलेल्या आंब्यात थोडसे पिके मिळत पण ढिगावारी हिरव्या आंब्यांची नासाडी व्हायची. चार पाच धरत्या आंब्यांवर पल्ला पोचेल तिथपर्यंत चढून नराच्या पोराने ढिगावारी आंब्यांची नासाडी केली. बर्व्याचे नी दामल्यांचे आगर या दरम्याने हद्दीवर वई होती . तिथे मोठ्या खुबीने ढोबळे पाडून तो आत जावून आंबे पळवायचा. त्याने गोळ्यालासुद्धा जरब बसेल अशी अद्दल घडवली.
हद्दीवरच्या वईत अडुळश्याच्या झाडावर मोठी हुंबल्याची पोळी असत. नराच्या पोराने हुंबल्याचा मोठा पोळा असलेली एक फांदी अच्चळ मोडली नी गोळ्याने ठेवलेल्या झोळीत खोचली. दरम्याने हालवाहालवीमुळे उंबले उसळले नी बघता बघता अख्खी झोळी हुंबल्यानी भरली. कोणीतरी गोळ्याला ढोशीत म्हटल, “ग्ये बाय...... मेल्या गोळ्या ..... आता हुंबलं तुजं आंबं दुकु खावन टाकती ....... ” ग़ोळा बापडा भोळा..... त्याला ते खरच वाटलं. मागचा पुढचा विचार न करता त्याने झोळीला हात घातला नी हुंबल्याचा पोळा असलेली खांदी त्याच्या डोक्यावर पडली. पोळा फुटला , आतली अंडी नी हुंबल्यांचे गठ्ठे च्या गठ्ठे गोळ्याच्या आंगभर पसरले..... पाठी पोटावर सगळीकडे हुंबले डसले नी गोळा प्राणांतिक बोंबा मारू लागला. आंब्याखाली जमलेल्या पोरा पोरीं पैकी कोणीच त्याच्या मदतीला पुढे झालं नाही. त्याचा ओरडा ऐकून गंगाय आली पण उसळलेल्या हुंबल्यात हात घालायची हिम्मत तिलाही झाली नाही. तिने पदराने हुंबील झटकीत बापयाना हाका मारल्या.
गोळ्याच्या घरातून पाच सहा बायका बापये जमल्यावर त्यानी टॉवेल, जास्वंदीचे नी कसले बसले टाळे मोडून आणून हुंबले झडकावून गोळ्याला बाजूला घेतला. हुंबले तूटून गेले तरी त्यांची मुंडकी चावा धरून च राहिलेली... ती शोधून शोधून खेचून काढीतो गोळा अर्धमेला झालेला. प्रसंगाचे गांभिर्य ओळखून पोरानी सूंबाल्या केला. गोळ्याच्या अंगभर हुंबल्याच्या गांधी उठल्या, त्याचा एक डोळाही कायमचा गेला. गंगाय चार दिवस आगळिक करणाराच्या नावाने खडे फोडित राहिली. घरच्यानी या कारस्थानाचा कर्ता करविता कोण आहे याची कसून चौकशी केली. पण नराच्या पोराचं नाव मात्र कोणीच फोडलं नाही. या प्रकाराची घरच्यानी अशी दडस घेतली की, त्या नंतर कधिही गोळा आंबे पुंजवायला आला नाही. आंब्याखाली पोरांचा काण्हेर सुरु झाला की गंगाय गिधाडांब्या जवळ येवून गोळ्याची कळ काढणारांच्या नावाने शिव्याशाप देत रहायची.
नराचा पोर पानाच्या बियात शिरून चुमडे भर भरून पानं चोरून काढायचा.पानवेलींच्या मध्ये केळी असायच्या . नर सकाळ संध्याकाळ दोन दोन फणे काढून न्यायचा. हे प्रकार अति व्हायला लागल्यावर मात्र बोंब झाली. गिरम्याच्या देवस्कीला घाबरून वाडीतल्या पोरानीही त्याचं नाव फोडलं. मग मालक सावध झाला नी त्याच्या मुलानी राखण धरून नराला पकडला. एकदा पोर म्हणून धाक दाखवून सोडून दिला. पण पोर भलताच बेरका. त्याला भय भीती कसले ती माहितच नव्हती. घरच्या माणसांची त्याला फुसच असे. त्याची आईस चोरीची भाजी तिकडे लांबउपाध्ये वठारात नायतर दांडेकर वाडीत न्हेऊन विकी. गिरम्याचं घर लांब. चोरी अती झाल्यावर त्याच्या पोरी दिवसा राखण धरीत . नरही बिलिंदर... दिवसा टेहेळणी करी नी भिणभिणत्या तिन्ही सांजेला काळोखाचा फायदा घेवून चो-या करी. प्रमाण फारच वाढल्यावर मात्र . गिरम्याचे पोर संध्याकाळी लौकर भाकरी तुकडा खावुन पाळत धरून बसायला लागले नी दोनच दिवसात चोर सापडला. ते तयारीनेच आलेले होते. त्यानी पकडल्यावर त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून त्याचे हात नी पाय बांधले . नी त्याची तशीच गठळी उचलून भग्या वाण्याच्या गोठ्या मागे ठेवलेनी .... नी मग कोंजूळभर कुवल्याची कुसं त्याच्या आंगभर माखून म्हणाले, “आज जितो सोडतांव.... पन पुना गावलंस तर मळ्यात डबरो खणून जित्तो गाडू .”
पाचेक मिनिटात अंगाचा नुस्ता आग़डोंब झाला पण हात पाय करकचून बांधल्यामूळे हालताही येईना नी तोंडात बोळा कोंबल्यामुळे ऊं ऊं करण्यापलिकडे आवाज काढता येईना. हैराण होऊन त्याने जागच्या जागी मळण घातले. त्याची चाहूल लागून गोठ्यातली गुरे उठून धडबडली, हंबरली . पण घर लांब असल्यामूळे गुरांचे हंबरणे कुणी ऐकले नाही. भाग्याने मोठ्या हौसेने खिलारी बैलाची जोडी बाळग़लेली होती म्हणूनच उशिर रात्री झोपण्यापूर्वी बैलाना गवत घालायला तो गोठ्यात आला. बैल नी बाकीच्या गुरानी हगून मूतून शेण तुडवून राडा केलेला होता. कंदिलाचा उजेड दिसल्यावर नराने जोर जोरा आवाज काढायला सुरवात केली. भग्या दारू खावून लास झालेला होता. त्याच्या पोराचा आवाज पडला नाही .पण गुरं सैरभैर झालेली दिसल्यावर त्याला वाघटाचा संशय आला म्हणून त्याने भावाच्या पोराला हाक मारली, “ रे तुक्या ढोरानी निस्ती कांदाल घतलानी हा .... माका वाघूट इल्याचो शक करताहा .... लोट्यार कपाटात बेटरी हा नी थयच मसालू काडून ठेवलेलो हा .... तीव घेवन ये.....” पोलिसवाल्या झिलाने मुंबईहून विंचेस्टर ची चार सेलची बॅटरी आणून दिलेली होती. पण तिला किमतीवान मसाला (सेल) घालावा लागे म्हणून तिचा वापर गरजेलाच होत असे . तुक्या बॅटरी घेऊन आल्यावर दोघेही गोठ्याच्या सभोवार पाहू लागले तेव्हा नराच्या पोराचा मोटळा दिसला. जवळ गेल्या वर गुवामुताची दुर्गंधी आली. ह्या प्रकारानंतर महिना भराने पानवाल्याने नातवाला नोकरी धंद्यासाठी मुंबईला रवाना केले.
आंबटी बिटकी धरायची पण उशिरा. अर्धा मे महिना सरत आल्यावर कुठे चुकार माकार बिटक्या ओवाळायला म्हंजे पिकायला लागत. मिरग सुरु झाला की बिटक्या पिकून नुसती बदा बदा कोसळ लागायची ती आषाढ सुरू होई पर्यंत बिटक्या पडत असत. झाडाखाली आंब्यांच्या नुसत्या राशी साठायच्या. चुकार माकार आलेली म्हसरं मात्र पडलेल्या बिटक्या हापशीत नी रस साली गिळून कोया गालफडात साठवून ठेवीत. त्यांचे पण दात आंबायचे नी मग त्या म्हशी गवताची काडीही उचलीत नसत . पुढे पंधरा वीस दिवस रवंथ करताना पांढ-या गताडीत टाकीत असत. लावणी सुरुझाल्यावर मात्र अगदी कोसभर लांब असलेल्या शेवडी वाडी पासूनचे कोण कोण कुळवाडी नायतर कुळवाडणी टोपल्या घेवून येत नी सारासाठी आंबट्या बिटक्या पुंजावून नेत. आमच्या पदू काकाचं लग्न झालं. त्याची बायको वेंगुर्ल्याकडची. तेंव्हा आमचे वेगळेचार झालेले नव्हते.आमची पाच जोतं असायची. वक्तशीरपणा हा अगदी काळ्यांचा बाणा. मृग लागल्यावर दोन तीन दिवसात काळ्यांचे पेरे आटोपत नी आषाढ्या पूर्णिमे पावत लावण्या पूर्ण होत. क्वचित कधी पाऊस लांबला तरीही मळ्यात विहिरीवर पाय रहाट घालून गड्यापै-यांकडून शिंपून दाढ (भाताची रोपं) तगवली जायची नी लावणी चा ‘ समा’ साधला जायचा.
लावणीच्या टायमाला हायस्कूलात जाणा-या मंदा, सुधा आत्ते, आक्का, सुमीताई नी आम्ही मराठी शाळेत जाणारी सख्खी चुलत मिळून सात भावंडही लावणी आटोपेपर्यंत चार पाच दिवस शाळा बुडवून घरीच रहात असू. पदू काकाच लग्न झालं त्या वर्षी लावणी सुरू झाल्या दिवशी नवी राधा काकू नी मंदा आत्ते दोन टोपूलभर आंबट्या बिटक्या घेऊन आल्या. तेंव्हा रांधपाचं काम दोन आज्ज्या नी मधली काकू नी आमची आई मिळून करीत. राधा काकूने त्याना “फक्त भात नी भाजी करा आमटीची व्यवस्था मी नी मंदावन्सं मिळून करतो ” म्हणून सांगितलं . राधा काकूच्या माहेरी माडा पोफळीची मोठी बाग नी मालवण वेंगुर्ला सावंतवाडी भागातल्या बायकांचा नारळावर जरा जास्तच हात असं काकू आज्जी कधितरी कौतुकाने आमच्या आईकडे बघून म्हणायची. ही उक्ती सार्थ ठरवीत काकूने धबाधब बारा नारळ फोडले नी तिने नी मंदा आत्तेने मिळून सुपातच खोवले. सहा घागरीच्या मोठ्या अलिमेनच्या पातेल्यात सगळ्या बिटक्या पिळल्या नी फक्त साली निपटून घेऊन पूण पातेलं भरेल एवढं पाणी ओतून पातेलं चुलीवर चढवलं. मग धने नी सुक्या मिरचीचं वाटप , खोब‌‌-याचा आपरस नी सुपभर गूळ चिरून सगळा सरंजाम घालून कढईत मोहरीची फोडणी करून ती वरून घातली. दुपारी आम्ही मंडळी लावणी करून आलो नी पाय धूवून जेवायला बसलो.
पानं वाढताना आई म्हणाली, “ आज नव्या सुनेनी भाताशी आंबट्या बिटकीचं सार केलेलं आहे हो.” बाबू काकाना आम्लपित्ताचा त्रास होता म्हणून त्यांच्या पुरतं पिठलं केलेलं होतं. सगळ्यानी चव घेऊन बघितली नी पहिला शेरा आबा काकानी दिला. “व्वा अगदी ओढाणं पळेल असं फक्कड जमलं आहे हो सार. ” त्यांचा शेरा म्हणजे ब्रह्मदेवाचा शब्द.... बाबू काकानी जवळ बसलेल्या भाऊंच्या ताटाजवळची वाटी उचलून थोडसं सार हाताच्या कुळच्यातओतून चाखून बघितलं नी पिठल्याची वाटी बाजूला सारून, “मला पण वाढा सार.... पथ्य केलं तरी त्रास व्हायचा तो होणारच.....” अशी वर्दी दिली. कोया राखून केलेल म्हणून त्याला ‘कोयाडं’ म्हणतात नी त्यासाठी सूनबाईने घेतलेलं खोबरं नी गूळाचा ढीग बघून सासू बाईना (म्हंजे थोरल्या आज्जीला) कांदे लावायची वेळ कशी आली ही माहिती पुरवली नी सगळी मंडळी हात खळवून हसली. सगळे मनमुराद जेवले. परत दोन दिवसानी असाच बेत होऊ द्या..... उकळी काढलेली आहे तेंव्हा हे कायसंस सार अगदी रोज खाल्लं तरी बाधणार नाही ... आबानी उपोद् घात केला. त्या दिवशी बायकांच्या पंक्तिला कोयाडं पूरवूनच खावं लागलं.
पावसात कधि कधि जोरदार वा-याच्या कावट्या सुटल्या की अलम वाढलेले फांदे मोडून पडायचे. आमच्या आठवणीत साखरी बिटकी, काळांबा नी वाटुळका यांच वैभव नष्ट झालं. बासष्ट सालच्या वादळात मात्र कडाड कडाडआवाज करीत भयाण वाढलेली बहुसंख्य आंब्याची झाडं , ऊंच वाढलेले कळंब नी घुरवड उन्मळून पडले . काही झाडांचे बुंधे शाबूत राहिले पण एकूण एक फांदे मोडून पडले. त्याच वर्षी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं त्याच्या इमारतीचं काम वादळा नंतर महिनाभराने सुरू झाल. निम्मा खर्च सरकारचा नी निम्मी लोकवर्गणी उभी करायची होती. मुंबईवाल्या चाकरमान्यानी अडीच हजार रुपये जमवले होते पण ते पुरेसे नव्हते. कंत्राटदार तर भलतेच पैसे सांगू लागला. म्हणून गावाने मिळून श्रमदानाने ते काम करायचं ठरवलं . सार्वजनिक सभेत कोणाला तरी सुचलं की हे सार्वजनिक काम आहे , या कामाला बर्व्याच्या आगरातली लाकडं वापरायला हरकत नाही. गाव देवाचा कौल मिळाला नी कामगारानी निर्धास्त तोड काम सुरु केलं . मुख्य इमारत. त्याला जोडून ऑपरेशन थिएटर नी पेशंट अ‍ॅडमिट करायला खोल्या , स्टाफ साठी चौदा क्वार्टर्स इतकं मोठं काम होतं. पण या सगळ्या कामाला पुरणारं लाकूड बर्व्यांच्या पडणात मिळाल. गरज भागून उरलेली बारं , स-या नी कडेचे लफ्फे , जळावू लाकूड असं उरलेलं लाकूड सामान गाव देवाच्या देवळाच्या आवारात डाळून ठेवलं. कामाच्या दरम्यान काहीही खाटखुट झालं नाही की कोणाला कसला बाधिकार झाला नाही. वादळामुळे सगळ्या आम्रवैभवाची इतिश्री झाली पण आरोग्यकेंद्राच्या रुपाने आणि ते दिवस अनुभवलेल्या बर्व्याच्या पडणाशेजारी लहाअ‍ॅनाचे मोठे झालेल्या आमच्या मनात जुन्या आठवणी तेवढ्या उरल्या. आता तर सड्या माळावरही सगळा झाडझाडोरा नाहिसा करून घे मार हापूस लागवड केल्यामुळे रायवळ आंबाचा नामोनिशाणा शिडमातूनच नव्हे तर पु-या सिंधुदुर्गातूनच नष्ट झालाय........