शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक
*अलिकडील काळात शिवाजी महाराजांना हिंदूंचे राजे म्हणून गौरविण्यात येते. तसंच त्यांचा हिंदूंचा राजा म्हणून गौरव करण्यात येतो आणि हिंदू मुस्लीम वा मराठा मुस्लीम अशी समाजात तेढ निर्माण केली जाते. शिवाय ज्या महाराष्ट्रात स्वातंत्र्यापुर्वी एकोप्यानं राहात होता. शिवाय ज्या मुस्लीमांनी स्वातंत्र्य संग्रामात मदत केली. त्याच मुस्लीमांचा द्वेष करुन राजकीय पोळी शेकणारे राजकारणी पाहिल्यास विचार येतो की जो देश मुस्लीमांचा द्वेष करतो. त्या देशात मुस्लीमांनी राहावे की राहू नये हा विचार, विचार करण्यालायक आहे. तसेच मुस्लीमांनी शिवरायांनाही आपला शत्रूच समजावं असाच आहे. महत्वपुर्ण गोष्ट ही की शिवराय हे धर्मनिरपेक्षता पाहणारे होते व ते धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक होते. ते जसे हिंदूंचे होते, तसेच ते मुस्लीमांचेही होते. हे विसरुन चालणार नाही. त्यामुळंच मुस्लीम समुदायांनीही शिवरायांना आराध्य मानल्यास त्यात काही गैर ठरु नये एवढंच त्यांच्या राज्याभिषेका प्रसंगी सांगावेसे वाटते.*
दिनांक ०६/०६/२०२४ हा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस. या दिवशी म्हणजेच सन ०६/०६/१६७४ ला रायगडावर राज्याभिषेक सोहळा शिवरायांनी साजरा केला होता. त्याचं कारण होतं की शिवरायांनी अतिशय बलिदानाने व प्रयत्नाने निर्माण केलेल्या स्वराज्याला राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी. तसं पाहिल्यास स्वराज्य हे कितीतरी लोकांच्या बलिदानातून निर्माण झालेलं होतं. ज्यात केवळ हिंदूच नाही तर कित्येक मुसलमान देखील होते. केवळ मराठेच नाही तर कित्येक अस्पृश्यही होते. काही आदिवासी आणि काही ब्राह्मण पंडीतही होते. त्यात काही मंडळी अशीही होती की जी स्वतःला हुशार समजत होती. जी शिवरायांपुढं टिकली नाहीत. परंतु शिवाजी मरण पावल्यानंतर त्यांनी जणू आपली डाळ शिजवली व पुढं त्यांनी डाव खेळून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास पन्नास वर्षानं आपला एकछंत्री अंमल सुरु केला होता व भोसले घराण्यांचं नाही तर मराठ्यांचं स्वराज्य संपवून टाकलं होतं. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
शिवाजी महाराज जेव्हा बाल्यावस्थेत होते, तेव्हा त्यांच्या मनात प्रेरणा निर्माण केली ती त्या लहान लहान बालकलाकारांनी की ज्यात आदिवाशी आणि अस्पृश्यच होते. ते पुण्याच्या लालमहालात राहात असतांना पुण्याची वस्ती काही आजच्या पुण्याएवढी नव्हती. त्या पुण्याच्या आजुबाजूला डोंगर, पर्वत व जंगलाचा भाग होता. ज्या जंगलात वाघ, सिंह, अस्वल व लांडगे यांचा सुळसुळाट होता. ते हिंस्र श्वापद कुणाला ऐकेनात. त्यावेळेस शिवरायांची आई जिजाबाई त्यांना त्या हिंस्र श्वापदाची भीती न दाखवता त्यांना त्यांच्या लहानपणीच घोड्यावर बसून जंगलाची रपेट मारायला लावायच्या. ज्यातून त्यांनी निरीक्षण केलं होतं. ते निरीक्षण होतं, 'लहान लहान जंगलातील आदिवासी व वेशीबाहेरच्या वस्तीत राहणारे अस्पृश्यच मुलं हे जंगली श्वापदांना न घाबरता त्यांची शिकार करणं.' हे निरीक्षण शिवरायांनी जेव्हा आपली आई जिजाबाई ह्यांना सांगीतलं. तेव्हा त्यांना त्यात कल्पकता दिसून आली. कल्पकता होती की जी मुलं हिंस्र श्वापदांना घाबरत नाहीत. ती मुलं उद्या चालून आपल्यावर अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटीलाही नेस्तनाबूत करु शकतील. फक्त त्यांच्यात हिंमत भरावी लागेल. बस, कामात यशस्विता. असा विचार करताच तिनं विचार केला की या कामी कामात कोण येवू शकतो.
तो विचार......... तो जिजाबाईचा विचार राष्ट्रहितासाठी होता व राष्ट्रहितासाठी विचार करतांना जिजाबाईंनी ठरवलं की जो समाज शेकडो वर्षांपासून प्रामाणिक असतो आपल्या मायबापासाठी. त्याला अंतर देत नाही. त्याच समाजातील मुलांना आपण त्यांच्या अगदी लहानपणापासून आपलंसं केलं तर...... तर त्याच समाजातील मुलं आपल्या शिवाच्या जिवाला जीव देवू शकतील. तसं पाहिल्यास त्यांना आपल्या धर्मातील लोकांचा अभ्यास होताच. आपल्या धर्मातील लोकं कसे फितूरी करतात. हे त्यांना माहीत होतं. मग त्यांनी ठरवलं की आपण परधर्मातीलच मुलांवर प्रेम करायला शिवाजींना शिकवावं. जेणेकरुन त्या धर्मातील मुलं आपल्या शिवाला जीवनभर विसरणार नाहीत. मरायला पुढं जातील. परंतु दगाबाजी करणार नाहीत.
तो त्यांचा विचार. तो विचार रास्त होता. कारण त्यानंतर जिजाबाईनं शिवरायांना हिंदूंसारखंच मुस्लीम धर्मावरही प्रेम करायला शिकवलं व तशीच मैत्रीही करायला शिकवली. ज्यातून हिरोजी फर्जद, इब्राहीम खान, दौलतखान, शिवा काशिद, मदारी मेहतर, मौलाना हैदर अली, काजी हैदर, नूरखान बेग इत्यादी मुस्लीम मंडळी पुढं आली. त्यांनी शिवरायांच्या जिवासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली व डगमगले नाहीत.
शिवरायांच्या स्वराज्याचा पहिला सरनौबत नूरखान बेग होता. घोडदळातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवाह होते. पन्हाळा वेढ्यातून शिवरायांची सुटका करण्यासाठी हे नेताजी पालकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. शिवाय याच पन्हाळ्यातून शिवाजी राजे निसटून जाण्याचा बेत करीत असतांना त्यांनी गडावर त्यांच्याच सारख्या दिसणाऱ्या एका शिवाय काशिद नावाच्या व्यक्तीवर जबाबदारी देवून त्याला म्हटलं की शिवा तू तर यातून शत्रूच्या हातात सापडताच मारला जाणार. त्यावर शिवा काशिद म्हणाला की राजे, मी शिवाजी म्हणून मारला जाणार राचा अभिमान आहे मला. त्यानंतर त्याची पालखी त्याचं पन्हाळ्याच्या कडेलाच असलेल्या गावाकडून निघाली. अशी पालखी पन्हाळ्यावर सभोवताल वेढा घातलेल्या सिद्धीच्या सैन्याने अडवली. ज्यात शिवा काशिद सापडला व त्याची सिद्धीच्या सैन्याने अतिशय निर्घूनपणे हत्या केली. त्यावेळेस ना सिद्धीनं विचार केला की शिवा काशिद हा मुस्लीम आपल्याच धर्माचा आहे. मारायचा कशाला आणि शिवा काशिदनंही विचार केला नाही की शिवाजी आपल्या धर्माचा नाही. मग मरायचे कशाला? फक्त विश्वास व त्याच विश्वासाने हुरळून जाणारा तो समाज. त्या समाजानं फक्त कर्तव्यदक्षता पाळली. धर्म पाळला नाही. उलट आपल्याच धर्मातील काही उच्च जातीतील माणसं की ज्यांनी आपला जीव जाईल या भीतीनं आपला धर्मबदल केला होता. एक संभाजी आणि त्यांच्या सोबत असलेला कवी कलश असेच दोन वीर होवून गेले की ज्यांनी मरणयातना स्विकारल्या. परंतु धर्मबदल केला नाही. मात्र आज त्यांना आपल्या धर्मातील माणसं विसरली आहेत.
शिवाजीराजांचे अंगरक्षकदल अत्यंत सक्षम होते. त्यांच्या अंगरक्षकदलात एकूण एकतीस अंगरक्षक होते. सिद्दी इब्राहिम हे शिवाजीराजांचे अंगरक्षक होते. शमाखान हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते. मदारी मेहतर हे फरास असणारे स्वराज्यनिष्ठ होते. छत्रपती शिवरायांच्या सोबत ते आग्राभेटीप्रसंगीदेखील होते. अनेक संकटप्रसंगी शिवरायांसोबत ते निष्ठेने राहिले. शिवरायांचे आरमार हे इंग्रज, सिद्दी आणि पोर्तुगीजांनादेखील धडकी भरविणारे होते. सामुद्रिक तटबंदी सुरक्षित ठेवण्यासाठी आरमारदलाची कामगिरी महत्त्वाची होती. अशा आरमारदलाच्या प्रमुखपदी शिवरायांनी दौलतखानाची नेमणूक केली. दौलतखान यांनी स्वराज्याची इमानेइतबारे सेवा केली. शिवरायांकडे अत्याधुनिक तोफखाना होता. इब्राहिमखान हे शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. शिवरायांच्या स्वराज्यात सातशे निष्ठावान पठाणांची फौज होती. हे सर्व मुस्लीम होते व ते शिवरायांशी निष्ठेप्रती अतिशय इमानदार होते. म्हणूनच स्वराज्य बनवता आलं. शिवरायांच्या सोबत असणारे कित्येक मुसलमान, कित्येक आदिवासी, कित्येक अस्पृश्य, कित्येक रामोशी, कित्येक धनगर व कित्येक मराठे यांच्यामुळेच स्वराज्य बनवता आलं. ते हिंदवी स्वराज्य जरी असलं तरी त्या स्वराज्याला घडवितांना मुस्लीमांनाही विसरुन चालणार नाही. गतकाळातील शिवरायांसाठी मरणाला मीठी मारणारा शिवा काशिदनं मरण स्विकारलंच नसतं तर शिवाजी जीवंत राहू शकला नसता व त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करताच आलं नसतं. आग्र्याच्या कैदेत असतांना शिवरायांनी मदारी मेहतरनं मदतच केली नसती तर शिवाजी आग्र्याच्या कैदेतून निसटू शकले नसते व राज्याभिषेक करु शकले नसते. शिवरायांच्या सगळ्या पराक्रमांना मुस्लीम, अस्पृश्य, आदिवासी व रामोशी या सर्वांनीच मदत केली. म्हणूनच स्वराज्य घडवता आलं. शिवाय शिवरायांनी या सर्वच लोकांना हाताशीच घेतलं नाही तर विश्वासात घेतलं. म्हणूनच त्यांना स्वराज्य साकारता आलं.
महत्वपुर्ण बाब ही की आज मात्र शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक मानतात नमस्कार ते हिंदूंचेच राजे असल्याचा युक्तिवाद करतात आणि त्यांची धर्मामध्ये वाटणीही करतात. त्यामुळंच प्रश्न पडतात की खरंच शिवाजी महाराज हे हिंदूंचेच राजे होते का? खरंच ते मुस्लीम वा अस्पृश्यांचे वा आदिवासींचे रिजे नव्हते का? खरंच जो कोणता मुस्लीम व्यक्ती शिवरायांना मानत असेल, त्यांनी मानू नये काय?
विशेष सांगायचं म्हणजे शिवाजी महाराज हे जसू हिंदूंचे राजे होते. तसेच ते मुस्लीमांचेही राजे होते यात शंका नाही. ते खरं तर धर्मनिरपेक्षता मानणारे राजे होते. त्यांनी कधीच हिंदू मुस्लीम हा भेद केला नाही. कधीच आदिवासी व अस्पृश्य असा वाद केला नाही आणि महत्वाचं सांगायचं झाल्यास त्यांनी कधीच जातीभेदही पाळला नाही, हे तेवढंच महत्वाचं. ते धर्मनिरपेक्षता पाळणारे होते व धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक होते एवढंच या राज्यभिषेकाच्या प्रसंगी मांडावेसे वाटते.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०