Story of a marriage in Marathi Moral Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | एका लग्नाची गोष्ट

Featured Books
Categories
Share

एका लग्नाची गोष्ट

एका लग्नाची गोष्ट


साने डॉक्टरांची चिठ्ठी घेवून बाबजी घाडी जनू कुडवाच्याघरी आला. साने डॉक्टरांचा गडी म्हणून मोठ्ठा गुळाचा खडा आणि पाण्याचा गडवा घेवून मथी सावकारीण समक्ष ओटीवर आली. गुळाचा ढेपसा कराकरा खाल्ल्यावर अर्धाअधिक गडवा खाली करून अऽऽऽव् ऽऽऽव् करून ढेकर दिल्यावर बाबजीने मुंड्याच्या खिशातली चिठ्ठी अलगद काढून सावकारणी पुढे टाकली. “हे बागेत माडाच्यो तळयो करूक गेलेहत . सांजावल्यार इले की देतय् ” सावकारणीच्या बोलण्यावर नकारार्थी मुंदी हालवीत बाबजी म्हणाला, “नाय नाय् नाय् ...तसां नाय् . डाक्तरानी चितयेचा उत्तर काय तां इच्यारून येवक् सांगलानी हा.” त्यावर सावकारणीने धाकट्या मुलाला बागेत निरोप सांगायला पिटाळला. ओसरीवरच्या माच्याखालची टोपली पुढे ओढुन ओंजळभर ओल्या सुपाऱ्या बाबजीला देत सावकारीण म्हणाली,“असोच सामनी जा कावणाच्या मागे डुऱ्या लागी फणसावर मगयचो येल हा लावलेलो, तेची धा पाना घी काडून. पान खावन जरा आराम कर. ह्येंका येवक् जरा टायम लागात.” सावकारणीने केलेल्या सरबराईमुळे बाबजी भलताच सुखावला. पण ही सरबराई डॉक्टरांच्या तालेवारीमुळे आहे . एरव्ही सवाई- दिढीने व्याजबट्टा करणाऱ्या जनु कुडवाच्या बायकोने दारात आलेल्या माणसाला पायरहाटावर बसवून त्याच्याकडून वळसाभर पाणी लाटून घेतल्याशिवाय प्यायला पाणीही दिले नसते हे बाबजी पुरते ओळखून होता.
घटकाभरात जनु आला. डॉक्टरांची चिठी वाचल्यावर अंदाज घेण्यासाठी जनु कुडव म्हणाला,“काया रे बाबज्या, डॉक्टरांचा येवडा कसला काम हा ? तुकाकाय अंदाज हा कायरे? ” नकारार्थी मुंडी हालवीत बाबजी म्हणाला, “छ्या... काय गम लागयना नाय.हं येक मातर खरा, डाक्दरानी वावळ्येतले गोडशे मास्तर, टेंबवल्येचे इष्णु खोत , गडारचे बंदुनाना येलनकार नी खाक्शीतलो बापूभट ह्येंकाव आयतवारी बोलावलेले हत म्ह्यंज्ये तसाच कायतरी मोटा काम आसनार...” बाबज्याने वदलेली नामावळ म्हणजे देवगड तालुक्यातल्या गर्भ श्रीमंत असामी. एरव्ही रस्त्याने जाताना सुमार माणसाने ‘पेशंट तपासायचा आहे’ यावेगळे काही विचारले तर गुरकावून,“मला रस्त्यात थांबवून नसत्या चांभारचौकश्या करणारा तू कोण मोठा गब्रू लागून गेलास रे सोकाजीरावा? जे काय सांगायचे असेल ते सकाळी सात पूर्वी नायतर संध्याकाळी सहानंतर मझ्या घरी ये नी मग सांग. आत्ता तू जे काय बोललास ना ते मी आईकलेले नाय ,कळले?” असे ठणकावणारा महा खट सान्या. मागे बयोच्या बाळंतप्णाच्या वेळी दोन वेळची औषधे नी व्हिजिट फी चे कचकचीत पंचवीस रुपये बील करणारा द्रव्यलोभी साने (त्याकाळी गड्याला दिवसभराची चार आणे मजुरी देत) अर्थात डॉक्टरानी खास चिठी देवून वसतीला जेवायालाच या म्हणून बोलावलेले, त्यात आणखी तालुक्यातल्या नामजद माणसांच्या बरोबरीने पाचारण केलेले म्हणताना नाही म्हटले तरी जनु मनात सुखावलेला. “आयतवारी सांजवापावत येतय म्हणून सांग डॉक्तरांक. आतामुद्दाम चिटी घेवन गडी पाटवलानी म्हटल्यार् काम टाकून झालातरी जावक् व्हया , कसा?” आनंदाने होकारार्थी मान हालवीत बाबजी उठला.
ठरल्याप्रमाणे रविवारी काळवे पडताना गोडसे मास्तर, विष्णु खोत, बंडुनाना वेलणकर, बापंभटजी आणि जनु कुडव एक एक करीत सानेडॉक्टरांच्या घरी जमले.सगळ्यांच्या सरबराईसाठी साने डॉक्टर जातीनिशी हजर होते. चाहा पाणी झाले. जगा दुनियेच्या कुचाळक्या करून झाल्या. बैठकीत डॉक्टरही थांबलेले असल्यामूळे डॉक्टरानीकशासाठी बोलावलेले असेल याबद्दल एकमेकांशी बोटचेपी चर्चाही करता येईनाआणि डॉक्टरानी आपणहोवून विषय काढणेही प्रस्तुत नव्हते . म्हणून मंडळीला पोटातली उत्कंठा अगदी दाबून धरावी लागली. पेट्रोमॅक्सच्या उजेडात वेळेवारी जेवणावळ झडली. पोट तटी लागेपर्यंत बासुंदीपुरी चापून मंडळी बिछायतीवर लोडाला टेकून पान जमवायला लागली. तेवढ्यात कोणतरी दम्याचा पेशंट घेवून आल्या मुळे डॉक्टर अजुन बाहेर आलेले नव्हते.
गोडसे मास्तर डॉक्टरांचे सख्खे मामेभाऊ. त्याना आतल्या गोटातली आतली माहिती असणार या अंदाजानेबापं भटजीनी गुळणी फोडली.“काय हो मास्तर, तुमचा काय अंदाज? आजच्याबैठकीचे नेमके काय बरे प्रयोजन असेल? ” बापं भटजीनी नेमका खडा टाकला हे पाहून मंडळी खळखळाऊन हसली. मांडी परतीत गोडसे मास्तर म्हणाले, “ सांगतो...सांगतो. म्हणजे आमचा भाचा (डॉक्टरांचा मोठा मुलगा) मधू ,त्याचे लग्न ठरतेयना तो विषय तुमच्या कानावर घालायचा आहे. ” मंडळीचा जीव भांड्यात पडला. महिनाभरापूर्वी जानशीच्या पतवर्धनबुवाची मुलगी मधुला सांगून आली होती. तो विषय बंडुनानाना माहिती होता. “ म्हणजे पटवर्धन बुवाची सखु पसंत पडली म्हणा मधु डॉक्टराला. बाकी पोरगी म्हणजे लाखात एक. पाच तोळे सोनें, अडीच हजार रुपये रोख वरदक्षिणा देवून गजाबारात लग्न करून देईन असे बुवा बोलले होते मला. ” बंडुनाना म्हणाले. विष्णु खोत ख्यॅक् ख्यॅक् करीत कुचेष्टेच्या सुरात म्हणाला, “आता कीर्तनकार म्हंजे तशी यथातथाच कमाई. पुऱ्या उत्सवालाही काय कोण पंचवीस रुपये बिदागी देत नाय की थळीत रुपया दोन रुपयाच्यावर खुर्दा जमत नाय. बुवाला तीन मुली आहेत. त्या मानाने बरीच मोठ्ठी उडी मारलीन म्हणायची.”
तंबाकूची चिमूट तोंडात टाकीत बापं भटजी म्हणाले,“ विष्णोबा,तशी बुवाची आमदनी काय कमी नाय हां. दोनशे रोपट कलमांची बाग आहे त्याचे जानशीत. नी ते पिढिजात सावकारी घराणे! रोख अडीज हजार मोजून द्यायचे म्हणजे काय खायचे काम नव्हे. आणि बुवा तसा पक्का जहांबाज आहे. पटवर्धन बुवाचा तराणा एकदा सुरु झाला कि मी मी म्हणणाऱ्या तबलजीची कशी भंबेरी उडते ते म्हायती आहे ना तुम्हाला? एकदा मधुसारखा डॉक्टर नी कुबेराच्या पोटी जलमलेला जावई गळाला लागला की बुवाची लग्गी सुरुऽऽ. त्यात सखु म्हणजे शिंपल्यातला मोती....एकदा तिचा मंत्र पडला जावयावर की कोठाराची चावी गेली बुवाच्या हातात.” आता जनु कुडव पुढे सरसावला.“ म्हंजे अशी मख्खी आहे होय? मी आपले चोख सांगतो ,पुढचा धोकाओळखून वेळीच सावध व्हायला हवे. किंवा लग्न झाले की सुनेच्या माहेरच्याना चार हात लांबच ठेवायला हवे कायम.” तेवढ्यात साने डॉक्टर बैठकीत आले नी तो विषय तिथेच बंद झाला.
डॉक्टरानी आल्या आल्या थेट मुद्द्यालाच हात घातला.“तुमच्यासारख्या धोरणी मुत्सद्याना मी काय सुखासुखी बोलावलेले नाय्येत. आता तुमचे बोलणे चालले होते ते पडले माझ्या कानात. तुमचा होरा बाकी शंभर टक्के बरोबर आहे. बुवाची मुलगी मधुच्याच नव्हे तर त्याच्या आयशीच्या पन मनात भरली होती ना. त्यात बुवाची उडी पण काय अगदीच बेताची म्हणण्यासारखी नाही. पण बापं नी जी शंका काढली ती माझ्या नी मास्तरांच्या पण मनात येवून गेली. नी नेमेक्या त्याच वेळी माझी मुंबईतली बहीण आहे ना जानी तिच्या मार्फतीन पण एक बडे स्थळ सांगून आले मधू डॉक्टराला. सखूला बघायचा कार्यक्रम झाला त्याच दिवशी जानीच्या नवऱ्याचे पत्र आले. मुंबईच्या पेठे बिस्कीट वाल्यांच्या मुलीचे स्थळ सांगून आले. ” हे बोलणे ऐकल्यावर मंडळी अवाक् झाली.
बिस्कीटवाले पेठे म्हणजे केवढी मोठी असामी. आलेल्या सगळ्या मंडळीना त्यांचे नाव माहिती असणे स्वाभाविक होते कारण पुऱ्या देवगडात सगळ्या दुकानांवर साठे बिस्कीटाचे पुडे विकायला टेवलेले असायचे. प्ण आलेल्या सग़ळ्या मंडळीनी त्यांची पार्ल्यातली बिस्कीटाची फॅक्टरीही बघितलेली होती. त्यामुळे डॉक्टर मस्करी तर करीत नाहीत नाआपली अशी शंका सगळ्यांच्या मनात येवून गेली. मधु काळा सावळा, उंची तशी बेताची, उमेदीच्या वयात केस विरळ होत चाललेले म्हणजे पाच सहा वर्षात त्याच्या डोक्याचा बापसासारखाच घुडघुडा होणार हे सांगायला रानदे ज्योतिषाना पत्रिका दाखवायची गरज नव्हती. अर्थात डॉक्टर बापाचा एकुलता एक डॉक्टर झालेला मुलगा, गडगंच पैसा, टोलेजंग घर, स्वत:ची टुरिंग कार (त्या काळी देवगड तालुक्यात स्वत:ची गाडी बाळगलेले लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतकेही नव्हते) ह्या मधुच्या भक्कम जमेच्या बाजु होत्या.
मंडळीना जास्त वेळ कोड्यात न ठेवता मास्तर म्हणाले, “एवढ्या धनदांडगा नी मुंबईत रहाणारा असामी इकडे गावात मुलगी द्यायला कसा काय तयार झाला? ती मंडळी जनी बरोबर या पूर्वी दोन वेळा कुणकेश्वराच्या दर्शनाला येवून आमच्याकडे राहून गेलेली आहेत. जनीची नणंद पेठ्यांची बायको. मधु डॉक्टरकी शिकायला पाच वरषे जानीकडेच ऱ्हायलेला होता. मुलीला नी तिच्या आईलाही मधु आवडलेला..... तुमच्याकडे बोलायला काय हरकत नाय, आणखी महिनाभरान कणकवलीत मधुचा दवाखाना सुरु व्हायचा आहे. शेवटी ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत.लग्नाच्या गाठी स्वर्गात ब्रह्मदेवाने मारालेल्या असतात हेच खरे. तर सांगायची गोष्ट म्हणजे ह्या कारणामुळे बुवाच्या मुलीला नकार दिला. ”
डॉक्टर पुढे सांगायला लागले,“ मुलीच्या आईने ही गोष्ट नवऱ्याच्या कानावर घातल्यावर पेठे लगेच टिपण घेवून मेव्हण्याना भेटले. टिपण जुळले . आम्हाला पत्र मिळाल्यावर प्रथा म्हणून नावापुरता मुलगी दाखवायचा कार्यक्रम झाला. दोन्ही घरच्या मंडळीनी त्याच बैठकीत विषय पक्का ठरवला . साठे लगेचच ठराव उरकून टाकायचा म्हणत होते पण मी धोरणानेच तो बेत खोडून काढला. आता मी अधिक काय लांबड न लावता मुद्द्याचे बोलतो. पुढच्या शुक्रवारी बैठक आहे. प्रथेप्रमाणे देण्या-घेण्याचे बोलणे होणार....” डॉक्टर आवंढा घोटीत दीर्घ उसासा टाकीत बोलले,“ आता त्यानी आमच्या अपेक्षा काय असे जर विचारलेनी तर आकडा काय फोडायचा? ते काय मला अजून टरवता आलेले नाही. झालेच देण्याघेण्याच्या इतर बाबीत्यासुद्धा नेमक्या योजून ठेवायला हव्या. पेठ्यांशी धोरणाने बोलणे करून त्यांची कितपत उडी आहे (यावेळी डॉक्टरानी आंगठ्यावर तर्जनी घाशीत नोटामोजल्याची खूण करून दाखवली.) हे पण युक्ती प्रयुक्तीने काढून घ्यायला हवे. म्हनजे बैटःअकीत आपला आकडा लावून धरता येईल. मुद्याची गोष्ट म्हणजे पेठ्यांची कुवत असताना आपली मागणी कमी पडली तर तोंडफोडी विद्या व्हायची. बैटःअक हा व्यवहार आहे. यात मुलीच्या बापाकडून जो जास्तीतजास्त माया काढील तो शहाणा ठरतो. ”
डॉक्टर पुढे बोलू लागले. “तशी जानी आणि तिच्या नवऱ्याकडून रापा काढायची मी शिकस्त केली.पण आमची जानी तशीअम्याकच नी तिचा नवरापण दीडशहणा. तो मला म्हणाला,“हे म्हणजे ऐरावत मिळणारा असताना बैल नायतर रेडा घेवून समाधान मानण्यासारखे आहे. पेठे आपण होवून जे काय पुढे करतील ते घ्यायचे एवढेच काम तुम्ही करा. आता तुम्हीच जरा विचार करा. मुलीचा बाप काय आपण होवून खिसा मोकळा करील काय? तो पडीच करणार. कोण असा माईचा लाल आपण होवून हात ढिलासोडणार आहे? मग मस्तर नी मी ठरवले की तुमच्यासारख्या अनुभवीक शहाण्यासुरत्या माणसांचा सल्ला घेऊन एक मजबूत आकडा ठरवायचा नी हर प्रयत्न करून तेवढा मगज मुलीच्या बापाकढून काढायचा म्हणजे काढाचाच.” डॉक्टरानी मुद्दाम गडी करून चिठ्ठ्या पाठवून आपल्याला कां बोलावले त्याचा पुरता उलगडा मंडळीना आत्ता झाला.
जनू कुडव हिरीरीने पुढे सरसावून म्हणाला, “तुम्ही लगेच बैठक घायची घिसाडघाई नाय केलीत तें मात्र ब्येश झालें. अहो सक्षात कुबेराशीच गाठ म्हणायची ही. पंचवीसा पावत आऽऽ करायला काय्येक हरकत नाय.... त्याबाहेर सग़ळ्यांचे यथास्थित मानपान नी मुंबईस लग्न करून देणार असले तर ईथून मुंबई पावत पन्नास माणसाचा जातायेताचा भाडे खर्च ठोकून घ्यायचा... ” जनू कुडवाच्या वक्तव्यावर बापं भटजीनी डोळे वटारून त्याच्याकडे बघितल्यावर जनू ला आपले कायचुकले कळेना. तो सावरून घेत म्हणाला,“पंचवीस म्हणजे पंचवीसशे नव्हत हो ..... पंचवीस हजार म्हणयाचेहे मला.” बापं भटजी हसत हसत म्हणाले,“शाबास तुझी.... जनु रे अगदी सहजपणी पंचवीस हजाराचा आकडा फोडलास तू ...कारण तू कुडवभर चांदीचे रुपये मोजून दखवणारा गबरगंड सावकार.... ”आणि मंडळी खो खो हसत सुटली. तो एक मोठा सुरस किस्साच घडलेला.
जनूची भातशेती चाळीस खंडीची. पायलीने खंडाचे भात मापून देता घेताना गडी नी तो दोघेही हैराण व्हायचे. एकदा एक खंडकरी बोलला, “सावकारानुं, माजा आयकश्या तर आसा पयली पायली करन्या परास कोठारातल्या दातारांकडेसून कुडवाचो फरो हाडा नी ठुलक्या सुताराकडेसून तसो कुडवाचो फरो बनवून घ्येवा” त्याचे बोलणे जनूला पटले . एक कुडव म्हणजे चार पायल्या ... मोजमापाचे काम लौकर फावले असते. त्याने दुसरे दिवशी कोठार गाठले. दातारांच्या ओसरीवर बसून गुळ पाणी घेतल्यावर जनु म्हणाला,“तुमच्याकडे कुडवाचा फरा आहे तसला एक बनवून घ्यायचा माझा विचार आहे. मी तुमचा फरा जसा न्हेईन तसा जातीनिशी आणून पोच करीन. मला तुमच्याकडचा फरा न्ह्यायला द्या. हवातर बयाणा घेतलात तरी चालेल.” भिक्याआप्पा दातार म्हणजे जाती कुसका नी तोंडाळ. जनूची ऐपत काय आहे याची फारशी कल्पना नसल्यामुळे तो फटकळपणे बोलून गेला. “ अरे जनू , कुडवाचो फरो करनी घेव्वे असां किती भात पिकचे रे तुज्या मळेत? आयलो मोठो कुडवाचो फरो करनी घेणारो गब्रू..... ”
आप्पा दाताराचे कुजकट बोलणे जनूला झोंबले....ताड्कन उठून तो म्हणाला,“असाल तुम्ही मोठे सावकार..... तुमच्या घराखाली मळा आहे ना तो बघितला मी.... पण मी सुद्धा फाटका नाय्ये....खंडाच्या अर्धलीचे वीस खंडी भात घेतो मी. तुम्ही मला काय समजलेत? कुडवाच्या फऱ्यान भातच काय , चिनय चांदीचे रुपये ह्या तुमच्या ओटीवर मापून दाखवले तर दहा रुपये बयाणा ठेवून तरी मला तुमचा फरा न्यायला द्याल ना? ” हे ऐकल्यावर विसूभाऊ दातार हात जोडीत म्हणाले, “ जनू भाऊ रागावू नका....आमच्या अप्पाला फटकन लागट बोच मारायची घाणेरडी खोड आहे.... मी देतो तुम्हाला फरा.” पण जनू म्हणाला ,“ मी एकदा बोललो ते बोललो.... कुडवान रुपये मोजून दाखवीन तेव्हाच फरा न्हेईन. आता शेंडी तुटो की पारंबी तुटो....” नी तो झटक्यासरशी बाहेर पडला.
जनू दातारांकदून बाहेर पडला नी चार दिवसा नंतरची गोष्ट! दादा काळे, नरु फडके, रामभाऊ करंदीकर नी बाबुकाका फटक असे त्या भाग़ातले चार पंच, घोंगडीच्या दोन ग़ठळ्यात व्हांदीचे रुपये बांधून तीडोक्याव्र घेतलेले दोन गडी असा बारदाना घेवून जनु दातारांच्या घरी पोचला. त्यांच्या ओसरीवर कुडवाच्या फऱ्यात चांदीचे रुपये शिगोशीग भरून जनुने आपली पत सिद्ध केली. तोंडाळ आप्पा दातार चांगलाच शरमला. त्याने कुडवाचा फरा जनुच्या हातात देत म्हटले, “हो फरो तुला अगत घेवनी जा.... ” तेंव्हापासून जनु बर्वा हा ‘जनु कुडव’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
जनूचा पंचवीस हजाराचा आकडा सगळ्यानीच मान्य केला. स्त्रीधन म्हणून गोठ ‌-पाटल्या, टिक्का , बिलवर नी अग्रफुल, मुलाकडच्या दहा बापयांना मान म्हणून धोतर उपरणे नी सदऱ्याचे कापड , दहा बायकाना इरकली लुगडी नी खण, नवरदेवाला पोशाख़, गोफ नी दीड तोळ्याचे वळें, शंभर माणासांचा येता-जाता उतार, दोन्ही मांडवांचा पौरोहित्यासकट सगळा खर्च नी पंचवीस हजार रुपये हुंडा मागायचा. तडजोडीची वेळ आलीच तर पंचवीस माणसांचा उतार, पाच मान नी स्त्री धनातले दोन डाग कमी करायचे नी अगदी बैठक मोडेपर्यंत पाळी आली तरच हुंडा कमी करायचा असे ठरले. मुलीकडची मंडळी आल्यावर आमच्याकडे बंठकी पुर्वी कच्चे बोलणे करायची प्रथा आहे असे सांगून मुलीचा बाप नी त्यांच्याकडचा कोण मुखत्यारी असेल त्याना जरा रंजवून वरपित्याच्या अपेक्षा आडून आडून कानावर घालायच्या. एवढे ठरल्यावर डॉक्टर बिनघोर झाले.
ठरल्या दिवशी मंडळी डॉक्टरांच्याघरी जमली. दुपारी जेवून वामकुक्षी झाल्यावर सगळेजण वधूपक्षाच्या मंडळींची वाट पहात बसले. बरोबर साडेतीन वाजता. तीन टुरिंगा नी एक जीप आंगणा बाहेर येवून थांबली. गडी माणसे लगबगीने पुढे धावली. जानु आक्का तिचे यजमान नी मुलगा ‌-मुलगी, आणि मुलीकडची आई वडिल, नवरी मुलगी, फॅक्टरीचे मॅनेजर कुमठेकर नी अकौंटंट दात्ये अशी माणसे आलेली. नवरी मुलगी अगदीच सुमार.... ठेंगणी नी दात पुढे ...नाही म्हणायला कातडी मात्र उजळ,पण लख्ख गोरी नव्हे. तालेवार गबरगंड बाप असल्यावर रुप काय मध घालून चाटायचे आहे थोडेच? आणखी किती देखणी असली तरी वर्षे लोटतील तशी उतारदिसत जाणार....रंग रूप काय जल्माला पुरले आहे थोडेच? उंबरा ओलांडून येताना डबोले किती घेवून येत्ये त्याला महत्व असे सगळ्यांचेच मत. मुलगी रुपान जरा डावी आहे म्हटल्यावर बाप हाता सोडून खर्च करील असा अंदाज डॉक्टरांच्या स्नेही मंडळीनी बांधला.
पाय धुवून गुळ पाणी घेतल्यावर पेठ्यानी चहाचे फर्मान सोडले नी मुंबईतून खास आणलेल्या चहापत्तीचा नी बिस्किटांचा डबा जीप मधून आणायला सांगितला. स्वयंपाक घरात चहाला उकळी फुटल्याबरोबर उंची चहापत्त्तीचा घमघमाट बाहेर सोप्यापर्यंत दरवळला. चहा-बिस्किटे झाल्यावर माणसे आंघोळीला गेली. एकेकजण आवरून बैठकीच्या खोलीत खुर्च्यांवर नी बिछायतींवर टेकले. व्याही प्रवसाने थकलेले.त्याना जरा विश्रांती घेण्यासाठी डॉक्टर माडीवर घेवून गेले. बापं भटजी, ग़ोडसे मास्तर, विष्णु खोत, बंडुनाना नी जनु कुडव यानी मॅनेजर कुमठेकर नी अकौंटंट दात्ये यांचा ताबा घेतला. मुंबईची हालहवाल झाल्यावर ग़ोडसे मास्तरानी ठरावाची कच्ची बोलणी करायचा विषय चाळवला.कोकणात तशी प्रथा असून त्या हेतूनेच डॉक्टरांची स्नेही मंडळी इथे अगोदर जमले आहेत हेही गोडसे मास्तर म्हणाले. मॅनेजर म्हणाले,“ तशी साहेबांशी आमची अगदी जुजबी चर्चा झालीहे म्हणा.पन नेमका तपशील काय ते नाही ठरले अजून. ते झोपून उठले की मी आणि दात्ये साहेब त्यांच्याशी चर्चा करून जरा अंदाज घेऊ. शेवटी किती झाले तरी आम्ही नोकर माणसे. त्यानी विचारलेनी तरच आम्ही सल्ला देणार. त्यांची नेमकी किती नी काय तयारी आहे याचा अद्याप आम्हालाही अंदाज नाही.”
हे ऐकल्यावर मंडळी हिरमुसली. तरीही चिकाटी न सोडता यत्न प्रयत्ने डॉक्टरांच्या अपेक्षा तरी त्यांच्या कानावर घालायच्याच असा चंग बांधून त्यानी बोलणे नेमक्या वळणावर नेले. गोडसे म्हणाले की प्रत्यबंडुनाना म्हणाले, “ ते असूंदे पण व्यव्हाराला बसण्या आधी कायतरी रूपरेषा, ढोबळ अंदाज असला म्हणजे अती घासाघीस करावी लाह्गत नाय.” तेवढ्यात बापं भटजीनी फुसकुली सोडली, “आता मधु आमचा एवढा शिखला.अहो इकडच्या तालेवार वधूपित्यांच्या रांगा लागल्याहेत. एवढा खर्च करू, एवढे सोने घालू असे सांगून टिपण पुढे करतात लोक.” विष्णु खोत बापंच्या सुरात सूर मिसळीत म्हणाला,“ काय सांगणार तुम्हाला.... बारातोळे सोने घालून दवाखाना बांधायला पंधरावीस हजाराचा आकडा फोडणारे महाभागही भेटले...” मग पलकट मारून जनु कुडव म्हणाला, “ पण आमचे डॉक्टर कोणाला बधले नाय. ते जानु आक्काच्या शब्दा बाहेर जायचे नाय. आता जानु आक्काला खात्री आहे म्हणूंच ती मध्यस्ती करत्येहेना... पण ठरावात देण्याघेण्याचे वेव्हार एकमेकांशी जुळायला हवे.”
मंडळींच्या बोलण्याचा नूर ओळखून अकौंटंट भावे भावे म्हणाले, “तशी चिंता आम्हाला बिलकूल वाटत नाही. साहेबांची काय पत आहे तेबईठक बसल्यावर कळेलच तुम्हाला. पण मी एकच सांगतो की देण्या घेण्यावरून काहीही बिनसणार नाही. एक वेळ मागणारा कमी पडेल पण पेठे साहेब द्यायला मागे हटण्यातले नाहीत. ” त्यावर गोडसे मास्तरानी वज्रटोला दिला, “ आता चिता तशी आम्हाला पण नाहिये... नी बिनसलेच तर पुन्हा वधूपिते घिरट्या घालायला टपून बसलेले आहेतच.”मास्तरांच्या बोलण्यावर जनु नी बापं ही चांगलेच चपापले. मॅनेजर कुमठेकर फॅक्टरीतली कामगार मंडळी, माल घेणारे व्यापारी, वेगवेगळे परवाने देणारा सरकारी नोकरवर्ग अठरा पगड माणसात वहिवाटलेले......! तरीही गप्पा मरणारी माणसे म्हणजे चावून चिकट नी ओढून बळकट म्हटतात तशीपुरी पोचलेली आहेत हे ओळखून त्यांना चांगले वर्म धरून हिंगाष्टक देत ते म्हणाले, “हे बघा मंडळी, शेवटी वरपक्षाने सुद्धा किती ताणून धरायचे त्यालाही मर्यादा हवी. साहेबांचा खाक्या म्हणजे देलेनी तर नेसण सोडून देतील..... पायतले पायतण तुटले त्याला चार टाके मारायच्या दोन पैशाच्या कामापोटी चांभाराला न मागता आठ आणे काढून देतील पण तो जर मिळतात म्हणून रुपया मागायला लागला त्तर नाराज झालेले साहेब पाच रुपयाचा चढाव केकून देतील पण चांभाराला रुपया नाही द्यायचे.”
मंडळीना एवढे हिंगाष्टक पुरले नी त्यानी तो विषय तिथेच बंद केला. तेवढ्यात डॉक्टर माडीवरून खाली आले. सांकेतिक करपल्लवी करून ते मागिल दारी जावून थांबले. चलाख माणसे एकेकजण ऊठून निघाले. डॉक्टर घोगऱ्या आवाजात म्हणाले, “काय मागाडी लागली मा काय? ” नाराजीच्या सूरात बंडुनाना बोलले, “छ्या.... पेठ्यांचे म्यानेजर नी फ्यानेजर कोणसेसे ते पक्के बिलंदर सोदे....आम्ही एवढी शिकस्त केली पण त्यानी अगदी शष्प सुद्धा गम लागायला दिलेनी नाय.” बापं म्हणाले,“गोडसे मास्तरानी भीम टोला मारलेनी तरी त्यानी एका शब्दान पण गम लागायला दिलेनी नाय.” बोटात बोटं गुंतवून ती कडाकडा मोडीत जनु कुडव उद्ग़ारला,“ पण माझा आपला होरा आहे की, पेठे अगदीच कन्नी कटवणार नाय..... आम्ही काय योवजले आहे त्याच्या आगेमागे बोलवा फुटेल.” गोडसे मास्तर सचिंत मुद्रेने म्हणाले, “ तुमचा व्याही मत्र पक्का मुरब्बी दिसतोहे, पण तो तेवढाच शीरफिरा आहे असे त्याचा म्यानेजरच म्हणाला. आपण ही अति हाव न धरता फुकूनफुकून खावे हे बरे.... ” आपला बार आगदीच फुसका ठरला हे उमजून डॉक्टर भलतेच नाउमेद झाले.
सातच्या दरम्याने पेठ्याना जाग आली. ते खाली येवून चूळ भरायला मागिलदारी गेले. खाकरून खोकरून तोंदावर सपासप पाण्याचे हबके मारून ते वळताच भाव्यानी लगबगीने पंचा पुढे केला. त्यांचे तोंड पुसून होताच भाव्यानी मुद्द्याची चार वाक्ये त्यांच्या कानावर घातली.त्यावर गडगडाटी हास्य करीत ते म्हणाले, “ठीक आहे ” दोघेही बैठकीच्या खोलीत आले. पेठे झोपाळ्यावर टेकले. भाव्यानी कुमठेकरांकडे पहात भुवई उडवली. तसे पुढे होत कुमठ्एकर म्हणाले, “साहेबऽऽ डॉक्टरांच्या स्नेही मंडळींचा आग्रह आहे की , ठरावाला बसण्यापूर्वी देण्याघेण्याची कच्ची बोलणी करुया. इकडे तशी प्रथा आहे म्हणे. ” भांड्यात पाणी ओतता ओतता पेठे म्हणाले,“ आता विषय असा आहे की, फॅक्टरीचा विषय मी हल्ली चिरंजीवांवरच सोपवलेला आहे. म्हणून तर तो आज बैठकीलाही आलेला नाही. फॅक्टरीच्या रीनोव्हेशनचे काम सुरु आहे, नाही म्हटले तरी लाख दीड लाख खर्चाचा मामला आहे. म्हणून लग्नाचा बेत जरा बजेटमध्ये धरायचा असे आम्ही ठरवले आहे. तेंव्हा व्याह्यानी फार बडेजावाची अपेक्षा धरू नये.” नी त्यानी पाण्याचे भांडे तोंडाला लावल्रे.
पेठ्यांचे हे बोलणे ऐकताच डॉक्टरांचा चेहेरा काळा ठिक्कर पडला. जानी आक्काचा नवराम्हणाला,“ तुम्ही काहीही काळजी करू नका भावोजी. मेव्हणे आमचे समंजस आहेत. देण्या घेण्याची बाबत ही दुय्यम , तुमच्याकडून काय मिळेल त्याची अपेक्षा करायला त्यांचे वैभव काय कमी आहे ?” पाणी पिऊन भांडे बाजुला ठेवीत पेठे म्हणाले, “तुम्ही दोघानीही तशी खात्री दिलीत म्हणून तर मी बिनघोर आहे. पण रीत भात पाळायलाच हवी. आम्ही मुलीला पंचवीस तोळे सोने घालू. जावयाना पोषाख, आमच्या प्रथेप्रमाणे सर्पोळी , सलकडे नी आंगठी घालु. वरदक्षिणा फुल ना फुलाची पाकळी पंचवीस हजार देऊ नी वरमाई लाडक्या डॉक्टर जावयाना दवाखाना बांधायला वीस पंचवीस हजार काय खर्च येईल तो देणारेत. आता ठरावात मानपान , लग्नखर्च काय काय इकडच्या प्रथे प्रमाणे तुमचे स्नेही काय काय सांगतील त्या किरकोळ बाबी असतील त्या ठरवून टाकू. आता जरा अर्धा कप चहा आणा बघू.”
डॉक्टरांसकट सगळ्याच मंडळींची दातखिळी बसायचीच बाकी राहिली. रात्री बैठक बसल्यावर तर एक जण तोंड उघडील तर हराम. कुमठेकर नी भावे ह्यानीच देण्याघेण्याचा एकेक मुद्दा मांडला नी पेठे मान्य करीत गेले. सासूबाईनी लेकीला हांड्याभांड्यासह संसार थाटून देणार म्हणून सांगितले. ठरल्या गोष्टींची सही‌-सूद लेखी यादी करायचे पण कोणाला सुधरले नाही.