VIshachi Pariksha - 1 in Marathi Fiction Stories by Neel Mukadam books and stories PDF | विषाची परीक्षा - भाग 1

Featured Books
Categories
Share

विषाची परीक्षा - भाग 1

देवराज इंद्र अमरावतीला भेट द्यायच्या विचारात होता. खरेतर इंद्राने वरूणदेव व अग्नीदेव यांना अमरावतीच्या रक्षणासाठी नेमले होते. तरीपण असुरांच्या सततच्या हल्ल्यांनी तो त्रासला होता. त्याने विचार केला की, अमरावतीला स्वत: हजर राहूनच सुरक्षित ठेवता येईल. इंद्राला माहिती होती की असुरांचे डावपेच फारच धूर्त होते आणि त्यांच्याशी लढणे सोपे नव्हते.

 

सन २०४३, पृथ्वीवर भारतातील मुंबई येथे शतग्रीव अरोरा आणि मरिच हे दोघे पहिल्यांदाच आले होते. देवांच्या हातून मारल्या गेलेल्या नरगुप्त असूराचे ते दोघे सख्खे भाऊ होते. पृथ्वीलोकांत हे दोघे माणसाचे रूप घेऊन आले होते. शतग्रीवने मरिचला म्हटले, “भ्राताश्री, चिंता सोडून हे सौंदर्य पहा. आकाशात सूर्यदेव तेजाने उजळतायत व वसुंधरेवर ही माणसे आपल्या कर्मामध्ये मग्न आहेत.” मरिचने त्याला गप्प बसवले व ते दोघे एका दुकानात शिरले. तिथे त्यांनी काही अत्याधुनिक शस्त्रांची खरेदी केली, कारण त्यांना देवांवर हल्ला करण्यासाठी आवश्यक साधनांची गरज होती.

 

 

अमरावती, देवलोक

 वरूणदेव अमरावतीच्या सौंदर्याकडे पाहत होता. सुंदर फुलांनी सजलेल्या बागा, सोनेरी मंदिरे, आणि मनमोहक संगीताच्या आवाजांनी संपूर्ण देवलोक न्हालला होता. तेवढ्यात एक गंधर्व तिथे धावत-धावत आला आणि म्हणाला, “वरूणदेव, असूरांचा राजा कलीपुरुष अमरावतीवर हल्ला करणार आहे. त्याच्याकडे 15 लक्षांची सेना आहे. वरूणदेव ही बातमी ऐकून घाबरला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. “आपण तातडीने तयारी करायला हवी,” असे म्हणत त्याने त्या गंधर्वाला अग्नीदेवाला बोलवायला सांगितले. गंधर्व खरे तर कलीपुरुषाचा सैनिक होता. त्याने बेसावध वरुणदेवावर हल्ला केला व त्याला बेशुद्ध करून ईश्वरसुदनाच्या दिशेने निघाला.

 

ईश्वरसुदन, असुर साम्राज्य

 राजा कलीपुरुष आपल्या होणाऱ्या बायकोसोबत बसला होता. तो एक विशाल सिंहासनावर आरुढ होता, त्याच्या सभोवती उंच व भव्य दगडी मूर्ती होत्या. त्याच्या चेहऱ्यावर असलेला क्रूर हसरा भाव आणि डोळ्यांत असलेला निर्धार स्पष्ट दिसत होता. मनमोही, त्याची प्रिया, त्याच्या शेजारी बसली होती. तेवढ्यात कलीपुरुषाचा खास माणूस दशग्रीव तेथे आला आणि म्हणाला, “आपण देवावर हल्ला करायला किती लक्ष दल न्यायचे आहे? कलीपुरुषाची प्रिया, मनमोही म्हणाली, “सगळे सैनिक नेले तर……..? दशग्रीव जरा कठोर अशा आवाजात म्हणाला, “महाराजांना बोलू द्यावे”. कलीपुरुषाने मनमोहीला बाहेर जायला सांगितले व दशग्रीव सोबत बोलायला लागला. “आपण सर्व सैन्य घेऊन देवांवर हल्ला करू,” कलीपुरुषाने ठामपणे सांगितले. दशग्रीवाने मान डोलवली आणि योजना आखायला सुरुवात केली.

 

 

पृथ्वीलोक, मुंबई

मुंबईच्या गजबजलेल्या शहरात, लोकांची हालचाल सतत चालू होतीयेथे छोट्या कार्यकर्त्यापासून सगळे गुन्हेगार, गरिबांचा पैसा लुटून बांधली घरं असे गाणे चालू असलेल्या एका ठिकाणी मरिच व शतग्रीव शिरले. त्या ठिकाणचा व्यवस्थापक अशुतोष नाईक त्यांना पाहताच पुढे आला व म्हणाला, “तुम्ही गायक आहात का?” मरिच कडाडला, “अरे, ते नतद्रष्ट सुर गायक आहेत”. ‘प्रतिदिन इंद्राच्या सभेत आकर्षला गेलो मी, ह्या कोमल निसर्गाच्या रूपाने’ हे गाणे गात असताना अशुतोष गोंधळला व तो दुसरीकडे वळणार इतक्यात मरिचने त्याच्या मानेवर प्रहार केला व त्याला घेऊन तो व शतग्रीव आपल्या गुप्त ठिकाणी निघाले.

 

अमरावती, देवलोक

अमरावती, देवलोकातील एक अद्भुत नगरी, देवांच्या आणि ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली. एके दिवशी अग्निदेव आणि वायूदेव अमृत प्राशन करत होते. त्यावेळी त्यांच्यात गहन संवाद सुरु होता. आपल्या पुत्राला,  हनुमानाला देवराज इंद्राची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी विनंती वायूदेवाने अग्निदेवाला केली. अग्नीला हनुमानाचा अत्यंत अभिमान होता. एकदा हनुमानाने चंपासुर नावाच्या राक्षसाच्या अत्याचारातून अग्निदेवाला वाचवले होते. त्या घटनेची आठवण अजूनही अग्निदेवाच्या मनात ताजी होती. वायूदेवाने अग्निदेवाला सांगितले की, “हनुमानाने आपल्या शौर्याने अनेक वेळा देवांचे रक्षण केले आहे. त्याला देवराज इंद्राची सेवा करण्याची संधी मिळावी, असे मला वाटते.” वायूदेवाच्या या विनंतीला अग्निदेवाने मान्यता दिली, परंतु त्याचवेळी वायूदेवाने अग्निदेवाला एक महत्त्वाची बातमी सांगितली. कलीपुरुष नावाचा अत्यंत शक्तिशाली आणि दुष्ट असुर देवलोकावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. या बातमीने अग्निदेवाला चिंता वाटू लागली.

 

अग्निदेव म्हणाले, “अमृताची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. या अमृताच्या स्वादाने माझ्या मनात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला आहे. आपण जरा आणखी अमृत पिऊया.”

 

परंतु वायूदेवाला या क्षणाची गहनता समजली होती. त्याने अग्निदेवाला कठोर शब्दात सांगितले, “हे अग्निदेव, ही युद्धाचे वेळ आहे. आपण लगेच आपल्या सैन्याला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत. कलीपुरुषाच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपल्याला सज्ज झाले पाहिजे.”

 

अग्निदेवाने वायूदेवाच्या या सूचनेला मान्यता दिली आणि त्याच्या आदेशानुसार सैन्याला युद्धाची तयारी करण्यास सांगितले. हनुमानाची शौर्यगाथा पुन्हा एकदा उजळून निघाली आणि देवलोकातील देवतांनी एकत्र येऊन कलीपुरुषाचा सामना करण्यासाठी सज्जता दाखवली.

 

अमरावतीतील वातावरणात एक नवचैतन्य आणि उमंग भरला गेला, कारण देवतांना माहीत होते की हनुमानासारख्या शूरवीराच्या मदतीने ते कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतात.

 

ईश्वरसुदन, असुर साम्राज्य

दशग्रीव, एक अत्यंत कुशल आणि धूर्त योद्धा, कलीपुरुषाच्या आदेशानुसार त्याच्या दंडकांचे पालन करीत होता. तो कलीपुरुषाला म्हणाला, “महाराज, आपण ह्यावेळी नक्कीच विजय मिळवू. आपल्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी आमची सेना सज्ज आहे. अमरावतीवर आपला हल्ला निश्चितच यशस्वी होईल.”

 

कलीपुरुष, आपल्या सेनापतीच्या शब्दांवर विश्वास ठेवून, हसत म्हणाला, “पृथ्वीलोकांवरील राजकारण्यासारखे आपण तोंडावर आपटणार तर नाही ना? आपले धोरण आणि योजना उत्तम आहेत, परंतु विजय मिळवण्यासाठी निर्धार आणि शौर्य आवश्यक आहे.” दशग्रीवने आपल्या राजाला आश्वासन दिले, “महाराज, आपण जिंकणारच आहोत. आपल्या सेनापतीच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली आमची सेना अत्यंत सक्षम आहे. आम्ही कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार आहोत. अमरावतीवर हल्ला करुन आपण तेथील देवतांना पराभूत करणारच.”

 

कलीपुरुषाने सेनेला अमरावतीच्या दिशेने चालायला सांगितलं. असुरांची सेना उत्साहाने भरून आणि विजयाच्या आशेने सज्ज होऊन, अमरावतीच्या दिशेने प्रस्थान केले. त्यांच्या नजरेत पराभवाचे कोणतेही चिन्ह नव्हते. ईश्वरसुदनमध्ये असुरांच्या जयजयकाराचा आवाज घुमू लागला आणि त्यांच्या पावलांचा आवाज युद्धाच्या घोषणेसारखा वाटू लागला.

 

कलीपुरुष आणि दशग्रीवाच्या नेतृत्वाखाली असुरांची सेना आता अमरावतीच्या देवतांशी भिडायला निघाली होती. ह्या संघर्षाच्या आगमनाने देव आणि असुरांच्या जगात एक नविन अध्याय उघडला जाणार होता. युद्धाच्या आवेशाने आणि विजयाच्या जिद्दीने भरलेल्या या असुर सेनेच्या तोंडाशी आता एक ऐतिहासिक संग्राम उभा होता.

 

पृथ्वीलोक, मुंबईच्या उत्तर भागात

मुंबईच्या उत्तर भागात एक गूढ वातावरण तयार झाले होते. येथे असुर मरिचचे दोन भाऊ माणसांना देवाविरुद्ध भडकवण्याचे काम करत होते. या दोघांच्या कार्यात प्रहोधर, जो मरिचचा सावत्र भाऊ होता, त्याचा महत्वाचा वाटा होता. तो देवानंद दास आणि राकेश मिश्रा यांना मदतीला घेऊन एक प्रक्षोभक भाषण करत होता. प्रहोधरच्या भाषणासाठी बरीच गर्दी जमली होती, ज्यामुळे वातावरण उग्र बनले होते.

 

प्रहोधरने आपल्या भाषणात देवतांवर टीका केली आणि देवता कशा स्वार्थी असतात, त्या मानवाला लाभ होईल असे वर कधीच देत नाहीत, असे मुद्दे मांडून माणसांचे मत असुरांच्या बाजूने वळवायचा प्रयत्न केला. तो म्हणाला, “देवता फक्त आपल्याच फायद्याचा विचार करतात. ते मानवांच्या दुःखांकडे दुर्लक्ष करतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांना त्यांच्याकडून कधीच मदत मिळत नाही. आपले खरे तारणहार असुरच आहेत.”

 

त्याच्या या वाक्यांमुळे बऱ्याच लोकांच्या मनात शंका आणि असंतोष निर्माण झाला. तेव्हा एक माणूस उभा राहिला आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, “तुम्ही अधर्मी, दुराचारी व पापी दानव आहात. त्यामुळे आम्ही धर्म, सत्य व न्यायाचे नेहमी पालन करणाऱ्या देवतांसोबतच खंबीरपणे उभे राहू.” त्याचे शब्द त्याच्या दृढ विश्वासाचे प्रतीक होते आणि त्याने प्रहोधरच्या विचारांना उघड आव्हान दिले.

 

ह्या शब्दांनी प्रहोधरच्या बाजूने असलेल्या माणसांना संताप आला. त्यांनी त्या देवतांच्या बाजूने असणाऱ्या माणसाला जोरजोरात मारले. त्या माणसाचे रक्त सांडले, पण त्याच्या मनातला विश्वास अजूनही अढळ होता. हा हिंसाचार बघून काही लोक भयभीत झाले, तर काहींना प्रहोधरच्या खोट्या विचारांची खरी प्रकृती समजली.

 

प्रहोधरने हिंसाचार पाहून आपले भाषण अधिक आक्रमक केले, पण त्याच्या शब्दांनी एकता आणि सामंजस्याऐवजी फक्त द्वेष आणि विघटन पसरवले. या घटनेने मुंबईच्या उत्तर भागातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनवले, जिथे लोकांच्या मनात देवता आणि असुरांच्या युद्धाची छाया घनदाट झाली.

 

पृथ्वीलोक, मुंबईच्या दक्षिण भागात

मुंबईच्या दक्षिण भागात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण तयार झाले होते. येथे मरीचचा दुसरा भाऊ अश्वासुर प्रहोधरच्या धर्तीवर प्रक्षोभक भाषण करत होता. त्याने गर्दी जमवून आपल्या वक्तृत्वाने लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. एका मोठ्या चौकात, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभे राहून अश्वासुरने आपले भाषण सुरू केले.

 

अश्वासुराने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाहिले व म्हणाला, “हे महाराज कोण?” तेव्हा एका माणसाने वाकून त्या पुतळ्याला नमस्कार केला व अभिमानाने म्हणाला, “ज्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केले, असे थोर राजे होते शिवाजी महाराज, हा त्यांचाच पुतळा आहे.” त्या माणसाच्या आवाजात शिवरायांबद्दलचा आदर आणि गर्व स्पष्ट जाणवत होता.

 

तो माणूस पुढे म्हणाला, “वंदन करतो तुम्हा शिवराया, राहू दे आभाळासारखी माया, आठवे शिवाजी राजा आज गं, इतिहास हा शिवपर्वताचा प्रत्येक मराठ्यांच्या गर्वाचा, आठवे शिवाजी राजा आज गं.” त्याच्या या वाक्यांमध्ये शिवाजी महाराजांबद्दलची अपार श्रद्धा आणि प्रेम व्यक्त होत होते.

 

अश्वासुरानेही त्या पुतळ्याला वाकून नमस्कार केला आणि आपल्या भाषणात पुढे म्हणाला, “शिवाजी महाराज खरोखरच महान राजा होते. पण आजच्या काळात, असुरसम्राट कलीपुरुष हा खरा आदर्श राजा आहे. तो न्याय, प्रगती आणि शक्तीचे प्रतीक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आपण एक नवीन युग घडवू शकतो.”

 

अश्वासुराच्या या शब्दांनी काही लोकांची मनं आकर्षित केली. त्याने कलीपुरुषाला देवतांच्या विरोधात उभा केले आणि असुरराज्याच्या महानतेचे गुणगान केले. ज्या माणसांना कलीपुरुषाच्या सैन्यात दाखल व्हायचे होते, त्यांनी अश्वासुराच्या मागोमाग चालायला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक नवीन दिशा मिळाल्याची भावना स्पष्ट दिसत होती.

 

अश्वासुराच्या भाषणामुळे दक्षिण मुंबईतील वातावरणात एक अनिश्चिततेची छाया पसरली होती. लोकांच्या मनात देवता आणि असुर यांच्या संघर्षाची जाणीव वाढत होती, आणि या नव्या घडामोडींमुळे पुढील संघर्ष कसा असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता.