make tuition free in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | शिक्षण निःशुल्क करा

Featured Books
Categories
Share

शिक्षण निःशुल्क करा

शिक्षण निःशुल्क करा. प्रवास नाही?

*अलिकडे बसमध्ये निःशुल्क सेवा सुरु आहे प्रवास करतांना. अगदी वयोवृद्ध माणसं की ज्याच्यानं चालणं होत नाही. तेही प्रवास करु लागले आहेत आज. कारण बसमध्ये त्यांना निःशुल्क प्रवासाची सोय आहे. शिवाय त्यांचं राहाणं गबाड्याचं दिसत नाही. चांगले ऐटीत दिसतात ते. बऱ्याचशा म्हाताऱ्यांच्या डोक्यावर टोपी असतेच. तसं पाहिल्यास स्वच्छ कपडे असतात. काहीजण धोतर, बंगाली व टोपीत व कडक इस्तरी मारलेल्या कपड्यात असतात की ज्यांच्या कपड्यांना एकसुद्धा डाग लागलेला नसतो. शिवाय हातात स्मार्टफोन असून तो स्मार्टफोन साधा सुधा नसतोच. तर तो कमीतकमी वीस हजार रुपये किंमतीच्याही पुढे असतो. विचारणा केल्यावर कोणी सरकारी नोकरीवर होतो, असं सांगतात तर कोणी अमूक अमूक उद्योगपती. साधा गरीब व असहाय्य म्हातारा एखादाच असतो.*
सरकारनं निःशुल्क प्रवासाची योजना काढली व त्यातून बरेचसे म्हातारे प्रवास करु लागले आहेत की जे गरीब नाहीत. ज्यात एखादाच गरीब दिसतो हे चित्र आहे. बऱ्याचशा म्हाताऱ्यांजवळ स्मार्टफोन दिसतो आणि नसेल स्मार्टफोन तर साधा डबीचा फोन तरी असतो. त्यांनासुद्धा विचारल्यास ते गरीब असल्याचं बोलतच नाही. चांगले श्रीमंत असल्याचं वक्तव्य करतात. हे चित्र दिसतं. प्रत्येकच बस्टॉपवर. आज बसस्थानकं म्हटली की चिकार गर्दीची ठिकाणं ठरली आहेत याचमुळं. शिवाय महिलांनाही अर्धी तिकीट सरकारनं दिली असून त्या गोष्टीचा उहापोह होत असल्याचं चित्र जाणवतं. असं वाटतं की यातून सरकारनं निदान एसटी बससेवेतून जे मिळवायला हवं होतं. त्यात नुकसान होत आहे.
एसटीची निःशुल्क सेवा. कोणाला हवी? जे श्रीमंत नाहीत, म्हणजेच गरीब आहेत. ज्यांच्याकडे खायला दाणे नाहीत. भरजरी कपडे नाहीत. जे गरीब आहेत. ज्यांच्याकडे साधे फोनसुद्धा नाहीत. ज्यांना एकच मुल आहे. दोन वा त्यापेक्षा जास्त मुले नाहीत. कारण मुलं असली तर ते गरीब असणारच. तसंच ज्यांच्याकडे मोठं सिमेंटचं घर नाही. अशा गरीबांना खरं तर बससेवा निःशुल्क द्यायलाच हवी. परंतु यात विचार असा की आता गरीब कसे ओळखायचे? अन् बसमध्ये जर गरीब ओळखायचे असतील तर कसे ओळखता येतील?
गरीब? गरीब लोकं हे बसमध्येच नाही तर कुठेही अगदी सहजच ओळखू येत असतात. ते त्याच्या अवतारावरुन. त्यांचे केसं अस्ताव्यस्त असतात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पायात चप्पल नसतेच आणि असलीच तर ती फाटकीच असते वा तुटकीफुटकी असते.
साधारणशी परिस्थिती असणारा व जो गरीब नाही, तो व्यक्ती. त्याला कितीही म्हटलं की तशा अवतारात वा विणा चप्पलनं गावाला जा वा प्रवास कर. तर तो तशा अवतारात प्रवासच करणार नाही. त्याचं कारण असते लाज. तो लाजेला घाबरेल व विचार करेल की जर माझ्या ओळखीचा एखादा व्यक्ती जर मला मिळाला तर तो काय म्हणेल मला. असा विचार करुन साधारण व्यक्ती वा श्रीमंत व्यक्ती प्रवासात चांगलेच कपडे परीधान करेल व चप्पलही चांगलीच वापरेल. हं, अपवादात्मक परिस्थितीत एखादाच व्यक्ती लाज श्रम सोडून असं करु शकते की तो आपली चांगली चप्पल व वस्त्रे पिशवीत ठेवून तशीच फाटकी चप्पल व वस्त्रे परीधान करुन प्रवास करु शकतो. याऊलट जो खरंच गरीब आहे. तो लाजेला घाबरणारच नाही. जे आहे त्याचेजवळ, त्याच पद्धतीनं तो वागेल, त्यात बेबनाव आणणार नाही. मग तो बसमध्ये प्रवास करणारा व्यक्ती असो की कुठेही जाणारा. आपल्या औकातीप्रमाणेच तो वागेल.
बसमध्ये निःशुल्क प्रवासाच्या सेवेबाबत सांगायचं झाल्यास एवढंच म्हणता येईल की यातून सरकारनं गोरगरीब जनतेच्याच भल्ल्याचा विचार केलेला आहे. परंतु तसा विचार केला असला तरी त्यातून फायदा हा गोरगरीब जनतेचा कमी आणि श्रीमंतांनाच जास्त मिळत आहे. चांगले चांगले श्रीमंत म्हातारे एसटी निःशुल्क आहे, म्हणून एसटीतून प्रवास करु लागले आहेत. त्यात प्रवास करणाऱ्या महिलाही गरीब वाटत नाहीत. शिवाय यातून कररुपात एसटी कर्मचाऱ्यांसाठी जाणारा पैसा हाही गरीबांचाच फुल नाही, परंतु पाकळीच्या स्वरुपात जात असतोच. त्यातच पोटाचा प्रश्न सोडवीत असतांना गरीबांजवळ गावं फिरायला वेळच नसतो. त्यामुळे ते गावं फिरत नाहीत. असे असतांना अशा श्रीमंत म्हाताऱ्यांना वा गर्भश्रीमंत महिलांना एसटी बसमध्ये प्रवास करण्याची सवलत का द्यावी? असा प्रश्न जनसामान्यांना नक्कीच पडल्याशिवाय राहात नाही. मात्र यावर कोणी बोलू शकत नाही. कारण सर्वजण आपल्याला काय करायचंय असाच विचार करतात व गप्प बसतात. मग एसटीचा फायदा होवो की नुकसान? राज्याचा फायदा होवो की नुकसान? कोणाला काहीच घेणं देणं नसतंच. ते कसेतरी जगत असतात. पोटाचे प्रश्न सोडवतांना कष्टाची ओढाताण करीत. आपल्या साधारणशः घरावर गोटे येवू नयेत. म्हणूनच आडाचे देड करुन अशी मंडळी कर भरत असतात सर्वप्रकारचा आणि निवडून आलेले सत्ताधीश या गरीब जनतेच्या पैशाची अशी विनामुल्याची सवलत देवून नासाडी करीत असल्याचं चित्र बघावयास मिळतं.
बसमध्ये वयोवृद्ध व्यक्तींना निःशुल्क प्रवासाची सेवा दिली. एक चांगली गोष्ट आहे. परंतु ती सेवा गरीबांना द्यावी. तेही त्यांचं सर्वेक्षण करुन व त्यांना निःशुल्क तिकीटाचे प्रवेशपत्र देवून. सरसकट निःशुल्क प्रवास सेवा देवूच नये की राज्याचं वा एस टी महामंडळाचं नुकसान होईल. शिवाय कर रुपात पैसे भरणाऱ्या जनतेचंही नुकसान होईल.
महत्वपुर्ण गोष्ट ही की एवढीच कृपा करायची आहे तर सर्व प्रकारचं शिक्षण निःशुल्क करावं. मग ते कितीही मोठं उच्च शिक्षण का असेना वा पुर्वप्राथमीक शिक्षण का असेना. कारण अशा उच्च शिक्षणातून वा शिक्षणातून देशाचं भविष्य घडत असतं. विद्यार्थी आपल्या स्वतःचं करीअर घडवू शकतात हे तेवढंच खरं. तसेच ते राज्याच्या आणि देशाच्याही विकासात हातभार लावू शकतात. शिवाय अशा निःशुल्क शिक्षणानं गोरगरीबांचीही मुलं सर्वच प्रकारचं शिक्षण अगदी हौसेनं घेवू शकतात आणि अशाच निःशुल्क शिक्षणानं सर्वच प्रकारच्या शिक्षणाच्या संधी गोरगरीबांच्या मुलांसाठीही अगदी सहजपणे व सुलभपणे निर्माण होवू शकतात यात शंका नाही. त्यामुळंच करायचंच असेल तर शिक्षण निःशुल्क करावं, प्रवासाला निःशुल्क करु नये. जेणेकरुन देशाचाच विकास करता येईल यात तसूभरही संशय नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०