पन्हाळा किल्ला ; एका ऐतिहासिक साक्षीचा ठेवा
अलिकडील काळात किल्ल्याला महत्व नसल्याचे जाणवते. त्याचं कारण आहे किल्ल्याची आजच्या काळात होत असलेली दुरावस्था. आपण जेव्हा जेव्हा किल्ला पाहतो. तेव्हा तेव्हा आपल्याला किल्ल्याची दुरावस्था होत असलेली आढळते.
किल्ल्याची दुरावस्था ही अतिशय विचार करणारी गोष्ट आहे. कारण अलिकडील काळात किल्ले पडत आहेत. पडक्या अवस्थेत आहेत.
किल्ला........ किल्ला आपल्या इतिहासाचा महान ठेवा आहे व त्या किल्ल्याला सुदृढ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कारण त्या काळात आपल्याच महापुरुषांनी आपल्याच देशाची अस्मिता टिकविण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. एक एक किल्ला लढवला. परंतु किल्ला जावू दिला नाही. शिवाय तसं बलिदान देवून स्वराज्य टिकवलं. शिवाय किल्ला असेल तर राज्य टिकतं, हाच उद्देश धरुन आपल्या महापुरुषांनी किल्ले बांधले. जे आज पडत आहेत. ज्यांची आजच्या काळात नुतनीकरण करण्याची गरज आहे. परंतु ते नुतनीकरण करीत नाहीत आजचे लोकं.
आज प्रत्यक्षदर्शी निदर्शनास येते की राजकारणात असलेले व निवडून आलेले राजकारणी हे आपले मोठमोठे बंगले बांधतात. ते अतिशय श्रीमंत आहेत. काही स्वतःला अशा हौतात्म्य पत्करणाऱ्या राजांचे वारस समजतात. त्यातील काही लोकं अतिशय गर्भश्रीमंत आहेत. तरीही या दोन्ही मंडळींपैकी कोणतीही व्यक्ती आपले स्वतःचे राहते बंगले बांधत असले तरी ते किल्ल्याची डागडुगी करीत नाहीत वा त्यात सुधारणा घडवून आणत नाहीत. आज बर्याचशा किल्ल्याचे बुरुज ढासळलेले असून बरेचसे किल्ले जमीनदोस्तही झालेले आहेत. काही ठिकाणी किल्ले शाबूत आहेत. परंतु ते स्थानिक लोकांच्या ताब्यात नाहीत. ते सरकारनं अशा लोकांना प्रदान केलेले आहेत की ज्यांनी त्या किल्ल्याला पाहणीसाठी येणाऱ्या लोकांसाठी खानावळी उघडल्या. अशा खानावळी की ज्यात राहायचीही सोय होते. शिवाय अशा खानावळीत राहून लोकं बिभत्स प्रकार घडवून आणतात.
विशेष सांगायचं म्हणजे त्या खानावळीत बिभत्स प्रकार घडो की काहीही होतो. त्यांना त्यांचं काहीही घेणंदेणं नसतं. हं, होईलच बदनामी तर ती त्या गावची. आपली नाही. अशा आविर्भावात खानावळ निर्माण कर्ते वागत असतात. शिवाय खानावळ निर्माण कर्ते हे काही त्या गावात राहात नाहीत. ते बऱ्याच लांबपर्यंत राहतात व ते खानावळीच्या ठिकाणी आपला एक मॅनेजर नियुक्त करुन कामकाज चालवत असतात. पैसा कमवीत असतात. परंतु खरं सांगायचं झाल्यास त्यांनाही किल्ल्याची डागडुगी करायला वेळ नाही. ते फक्त नि फक्त राहायला जागा देतात पर्यटकांना. शिवाय खाण्याच्या पुर्ण सोयी. असे पर्यटकही जेवन करायचंच असेल तर स्थानिक लोकांच्या हातचं जेवन करीत नाहीत. शिवाय त्यांच्या पडक्या घरात राहात नाहीत. जेणेकरुन त्यांनाही दोन पैशाची मदत होईल. त्यांनाही थोडासा का होईना रोजगार मिळेल.
काही किल्ले असेही आहेत की त्या किल्ल्याचं सरकारनं ऐतिहासिक महत्वच कमी केलं आहे. त्या किल्ल्यावरच चक्कं पक्के रस्ते काढले आहेत. ज्यातून त्या किल्ल्याचं स्वरुप साधारण बनलं आहे. जसा पन्हाळा किल्ला.
पन्हाळा किल्ला हा असाच एक ऐतिहासिक किल्ला की त्या किल्ल्यानं त्या काळात एक सिद्धी जौहरचा वेढा पाहिला. शिवाय त्या किल्ल्यानं बाजीप्रभूचा पराक्रम पाहिला. ती पावनखिंड आजही इतिहासात महान ठरली आहे. जी वीर बाजीप्रभूच्या बलिदानाची साक्ष देते. ती याच किल्ल्याच्या पराक्रमाची गाथा आहे. शिवाय याच किल्ल्यावरुन शिवरायांची सुटका करण्यासाठी रचलेला शिवरायांचा डाव तडीस नेणारा व बलिदानास पात्र ठरलेला दुसरा शिवाजी की जो हुबेहुब दिसायचा शिवरायांसारखा. तो शिवा काशिद याच भागातील नेमापूरचा. ते नावही पन्हाळ्याच्या पायथ्याशी असून त्याची समाधी या गावात आहे. शिवाय दुसऱ्याच मार्गाने पळून जाणारा शिवाजी, ज्याला राजदिंडी नाव दिलं आहे. तेही पन्हाळ्यावर आहे. पन्हाळ्यावर आजही शाळेला दिलेला शिवरायांचा राजमहाल आजही शाबूत आहे व त्या ठिकाणी शाळेचे वर्ग बसतात आणि ज्या ठिकाणी संभाजी राजे राहात होते, तिथं मंत्री खासदारांच्या पार्ट्या होतात असे गावकऱ्यांचे म्हणणे. किल्ल्यावर दोन मोठमोठे कोठारं आहेत की ज्यात कमीतकमी पाच लक्ष धान्याची पोती त्या काळात मावत होती. त्यामुळंच सिद्धी जौहरच्या लढ्याला चार महिने शिवरायांनी झुंज दिली तडाक्याची. किल्ल्याच्या आजुबाजूला दऱ्या असून त्या दऱ्यातून कोणताच शत्रू अगदी सहज किल्ल्यावर येवू शकत नसे अशी बांधणी आहे किल्ल्याची, ती आजही पाहायला मिळते. शिवाय ते दोन दरवाजे आजही शाबूत असून आपली शान राखून आहेत. त्यापैकी एक दरवाजा म्हणजे कोकण दरवाजा. या दरवाज्यातून शिवाजी महाराज त्या काळात कोकणातून यायचे. मात्र आज प्रशासनानं हा दरवाजा आम केलेला असून या दरवाज्यातून कोकणातून येणारी वाहतूक सुरु केलेली आहे. आता हा किल्ला अजिबात किल्ला वाटत नाही. तर त्यालाही प्रशासनानं आम करुन टाकलं आहे. लोकं या किल्ल्यावर पर्यटक म्हणून तर येतात. परंतु स्थानिक लोकांच्या सेवा स्विकारत नाहीत. साधी तोंडाला रुची आणणारी व गावकऱ्यांनी अतिशय मेहनत करुन गोळा केलेली जांभळं सुद्धा पर्यटक घेत नाहीत व दोन पैसे स्थानिक लोकांना देत नाहीत. मात्र फोटो काढण्यात ते मश्गुल असतात. ते खानावळीत कितीतरी रुपये खर्च करतात. परंतु स्थानिक पातळीवर साधे दहा रुपये खर्च करायला मागंपुढं पाहतात ही शोकांतिकाच आहे.
पन्हाळा एकमेव असा किल्ला आहे की जो आजही शाबूत आहे बराचसा. त्याचे बांधकाम जबरदस्त आहे आणि ते पाहण्यासारखे आहे. शिवाय पर्यटकांना आपल्या शाबूतपणानं वेड लावणारा आहे. या ठिकाणी गेल्यास ज्याला इतिहास माहीत आहे. त्याला तो नक्कीच आठवतो. तो सिद्धी जौहर आठवतो की जो त्या काळात जहरासारखाच होता. ती ताराबाई आठवते की जी याच किल्ल्यावर पुढील काळात कैदेत पडली होती औरंगजेबाच्या. परंतु हाती लागली नाही. तिही शिताफीनं पळून गेली होती. शिवाय आठवतो तो संभाजी राजा. ज्याचे हालहाल करुन औरंगजेबानं अतिशय क्रुरपणे हत्या केली. तोही काही काळ याच पन्हाळ्यावर अधिवास करीत होता आणि आठवतो शिवा काशिद. ज्याची समाधी याच भागात आहे. परंतु आज त्या किल्ल्याला किल्ल्यासारखं न ठेवल्यानं व प्रशासनानं आपली वापरच या किल्ल्यात नेल्यानं भविष्यात हा किल्ला तर शाबूत राहील. परंतु त्याचा इतिहास शाबूत राहीलच की काय? अशी चिंता सतावते. हा नेमका प्रशासनाचा प्रयत्न किल्ला शाबूत ठेवण्याचा आहे की आणखी कोणता? ते कळायला मार्ग नाहीच. परंतु तुर्तास मात्र पन्हाळ्यावर मोठमोठे हॉटेल उभारण्याची जणू स्पर्धाच लागली आहे असं चित्र दिसतं. हे जर थांबवलं नाही तर उद्या तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी पन्हाळ्यावरचं अस्तित्व संपेल व तो एक ऐतिहासिक किल्ला होता व त्याही किल्ल्यावर ऐतिहासिक कामगीरी झाली. तसाच तो किल्ला शिवाजी व ताराबाईनं काही काळ का होईना, लढवला. तसाच त्या किल्ल्यावर संभाजी राहात होता. त्या किल्ल्यासाठी शिवा काशिद व बाजीप्रभूंनी आपले प्राण दिले. हा सर्व इतिहास जग विसरेल आणि हा किल्ला फक्त मौजमजा करायचं व व्याभीचार करायचं केंद्र ठरेल यात शंका नाही. तेव्हा हे सर्व घडून येण्यापुर्वी तुर्तास तरी सावधान होणं गरजेचं आहे. कारण ते आपले किल्ले आहेत. लोकांनी त्या किल्ल्यांना आपले समजावे. आपल्यासारखेच त्या किल्ल्यालाही वागवावे. जेणेकरुन त्यांचा इतिहास टिकेल. तसंच त्यांचं अस्तित्वही. हे तेवढंच खरं. किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे. जर कोणी कोल्हापूरला गेलं तर पन्हाळा त्यांनी अवश्य पाहावा. तसंच फक्त पाहण्यासाठीच जावू नये तर त्याला चिकटून असलेला पुरातन इतिहास आपल्या नजरेच्या आठवणीत साठवून ठेवण्यासाठी व जतन करण्यासाठी जावे हेही तेवढंच खरं. शिवाय एक शेवटचं सांगायचं म्हणजे समजा तुम्ही जर किल्ला पाहायला गेलेच तर या किल्ल्यावर विकायला बसणाऱ्या स्थानिक लोकांच्या टोपल्यातील जांभळं अवश्य खा म्हणजे झालं आणि लागलीच तर मदत स्थानिक प्रशासनाला द्या. जेणेकरुन तुमच्या खर्चातून किल्ल्याची डागडुगी करता येईल व ऐतिहासिक असलेल्या आपल्याच स्मृतींना कायम स्वरुपात शाबूत ठेवता येईल यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०