सहल अगदीच छान आणि एकंदरीत ठरविल्याप्रमाणे पार पडली होती. प्रथमाचा कामाचा क्षीण या सहलीमुळे कुठल्या कुठे पळून गेला होता. आता ती नव्या जोमाने नवीन ऑफिसच्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज होणार होती.
घरी येऊन आईला सहलीबद्दल संपूर्ण माहिती दिली. आईलाही प्रथमाचा उत्साहाने द्विगुणित झालेला चेहरा ती वर्णन करत होती त्याहीपेक्षा खूप काही जास्त सांगून गेला.
प्रथमा जेवण वगैरे आटोपून आपल्या खोलीत आली. आल्यापासून तिने बॅग जशीच्या तशी, फक्त खोलीत नेऊन टाकली होती, कशालाही हात देखील लावला नव्हता. नाही म्हंणले तरी दिवसभरा नंतरचा थोडा थकवा, मरगळ होताच. त्यामुळे तिला आता प्रचंड झोप येत होती.
ती बेडवर आडवी होण्याच्या तयारीत असतानाच तिचा फोन व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाली. डोळ्यांत इतकी झोप होती की तो फोन बॅगेत कुठल्या कप्प्यात ठेवला आहे, हे देखील तिला आठवत नव्हते. ते शोधण्यापासून तयारी होती. तिने अर्धवट झोपेतच कसाबसा फोन शोधून काढला, पाहिले तर धराचा फोन होता.
ती ट्रीपच्या ग्रुप बरोबर आणि एकंदरीत सर्व ॲक्टिविटीज मध्ये एवढी रममाण झाली होती की तिचे इतर कोणत्याच गोष्टींकडे लक्ष गेले नव्हते. अगदी फोनकडेही नाही. त्यामुळे ऑफिस आणि धराचा विषय तिच्या डोक्यातून काही काळापुरता बाजूला पडला होता.
पण धराचे नाव स्क्रीनवर पाहताच प्रथमाला खूप आनंद झाला. झोपेला थोडी बगल देऊन, धराशी जमेल तेवढ्या थोड्या गप्पा मारून, उद्या तिला ऑफिसमध्ये भेटण्याच्या तयारीने प्रथमा झोपी गेली.
ऑफिसमध्ये आल्यापासूनच प्रथामाने अगदी मन लावून काम सुरू केले. नवीन प्रोजेक्टमध्ये रुळण्यासाठी, तसेच कामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी तेथील सिनियर त्यांना मदत करत होते. ती देखील त्या सर्व नवीन गोष्टी समजून घेत होती. तिथले कामाचे वातावरण, आजूबाजूचे तसेच टीम मधील लोक, आपल्याला तिथे लवकरात लवकर ऍडजस्ट होण्यासाठी साधारण काय करावे लागेल याचा अंदाज बांधत बांधत, आजूबाजूचे सारे बारकाईने ऑबझर्व करत होती.
त्यांची सिलेक्ट झालेली संपूर्ण टीम एकत्र काम, जेवण करत होती. त्यामुळे ती देखील आज दिवसभर त्यांच्याबरोबरच होती. टीमला सोडून तिला धराला भेटता आले नाही. तिने टी टाईमला कॅफेटेरिया मधून धराला मेसेज केला होता. पण धरा देखील तिच्या टीम बरोबर व्यस्त होती. त्यामुळे प्रथमाला जे तिला न भेटता येण्याचे वाईट वाटत होते ते कमी झाले होते
पण नेहमीप्रमाणे त्या दोघीही ऑफिस नंतर त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी भेटल्या. घरी निघेपर्यंत त्यांना जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गप्पा मारल्या. आणि आपली विकडेजची दैनंदिनी ही साधारण अशीच, म्हणजे ऑफिस मध्ये संपूर्ण कामावर लक्ष्य केंद्रीत आणि ऑफिस सुटल्यावर प्रथमा आणि धराची भेट, राहणार होती. एकंदरीत काय तर व्यस्त राहणार हे दोघींनाही कळले होते.
प्रथमा आई, घर, ऑफिस, आणि स्वतःच्या आयुष्याशी निगडित सर्व ॲक्टिव्हिटीज आणि जबाबदाऱ्या यांमध्ये स्वतःला झोकून देऊन प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के देण्याचा आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत होती. या सर्वांत तिची खूप धावपळ होत होती. पण यालाच सो कॉल्ड शहरातील आयुष्य म्हणतात, नाही का...!!
दिवसांमागून दिवस जात होते. प्रथमा आता ऑफिसमध्ये चांगलीच रुळली होती. प्रोजेक्टचे काम तिच्या अंगवळणी पडले होते. टीम बरोबर छान बाँडींग होत चालले होते. जसा तिने तिच्या डोक्यामध्ये आराखडा तयार केला होता, साधारण त्याप्रमाणे सर्व गोष्टी अजून तरी चालल्या होत्या. पण कधी तरी पुढे चॅलेंजेस येणार, आपण विचार करतो किंवा ठरवतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे समोर येणार किंवा घडणार हे तिला माहीत होते. तशी तिने स्वतःची सर्व बाजूने मानसिक तयारी केली होती. आणि अगदीच तसे काही ट्रॅक सोडून, कक्षे बाहेरचे घडलेच तर त्याला निर्धाराने सामोरे जाण्याचा प्रयत्न करणे, आणि लढत राहणे एवढेच काय ते आपल्या हातात आहे असे प्रथामाने स्वतःला निक्षून सांगितले होते