father man in Marathi Short Stories by Priyanka Kumbhar-Wagh books and stories PDF | बाप माणूस

Featured Books
Categories
Share

बाप माणूस

असे म्हणतात की आईबद्दल सगळेच लिहितात
पण बापाबद्दल कोणी काहीच लिहीत नाही
खरंतर, बापाशिवाय घरातलं साधं पान ही हलत नाही

बाप हा केवळ कुटुंबाचा प्रमुख व्यक्ती नसतो
कुटुंबाचा आधार बनून सगळ्यांना सोबत घेऊन चालतो
घरातील कर्ता पुरुष म्हणून कुटुंबाची जबाबदारी घेतो
पण स्वतःच्या ईच्छा, आकांक्षा मात्र बाजूलाच ठेवतो

बाप हा केवळ बाप नसतो, तो कधी घोडा ही होतो
मुलांचं संगोपन करता करता त्यांना अंगाखांद्यावर खेळवतो
कधी मुलांचं बोट धरून त्यांना शाळेत घेऊन जातो
तर कधी मुलं चुकल्यास त्यांना दोन धपाटे देखील देतो

बापाचं काळीज इतरांपेक्षा जरा कठोरच असते
बाहेरून पोलादासम कणखर तर आतून मृदू असते
कुटुंबावर दुःखाचे सावट कोसळल्यावर
बापाचे मन मात्र तीळ तीळ तुटत असते

कुटुंबाला सुखात ठेवण्यासाठी आयुष्यभर झटतो
पायातल्या चपला झिजे पर्यंत काबाड कष्ट करतो
दर पगाराला मुलांना खाऊ घेऊन येतो
बाप मात्र वर्षातून एकदाच कपडे घेतो

बापाची माया दिसत नसली तरी आभाळा एवढी असते
अथांग ,असिमीत आणि निरपेक्ष असे फक्त बापाचे प्रेम असते
फक्त बापाचे प्रेम असते...

'बाप' या एका शब्दातच जणू शंभर हत्तींचे बळ असल्याचा भास होतो. प्रेमळ, शिस्तबद्ध आणि निडर व्यक्तिमत्व म्हणजे 'बाबा' होय. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आई - वडिलांचे सर्वोच स्थान असते . आपण आई वडिलांमध्येच देवाचे स्वरूप पाहत असतो. आईची माया आणि वास्तल्य यामुळे घर प्रसन्न असते तर बाबांचे प्रेम आणि काळजी यांनी घर प्रफुल्लित असते. बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे एक महान व्यक्ती.

वडील हे घरातील कर्ते पुरुष असतात.त्यांचावर संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी असते. बाबा नेहमी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी झटत असतात . ते आपल्या मुलांच्या गरजा आणि सुखसोयी यांची पूर्तता करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात . ते कुटुंबाचा आधारस्तंभ असतात . माझे बाबा एक सक्षम पिता आहेत. बाबांचे कौतुक कितीही केले तरी कमीच वाटते. बाबांचे अथक परिश्रम पाहून माझ्या मनात नेहमी विचार येतात ,

काय गाऊ बाबा
तुमची अगणित महती
शब्द अपुरे पडतील
करण्यास तुमची स्तुती ||

तुम्ही आमचे पालनकर्ता
तुम्ही आमचे विघ्नहर्ता
तुम्ही आमचे कैवारी
सगळ्या दुःखास तारी ||

तुम्ही प्रेमाचा सागर
तुम्ही दयेचा डोंगर
तुम्ही मायेचा पाझर
आमचा एकमेव आधार ||

काय गाऊ बाबा
तुमची अगणित महती
शब्द अपुरे पडतील
करण्यास तुमची स्तुती ||

माझे बाबा श्री. अशोक कुंभार. अगदी सरळ आणि साधे व्यक्ती . आई-वडिलांचीआर्थिक परिस्थिती अतिशय गरीब असल्यामुळे त्यांनी लहान वयातच फार दुःख सोसले. लहान वयातच कष्ट करून दुःखाचे दिवस काढत ते मोठे झाले . आपल्याला जे सुख मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात .

आईने मला जन्म दिल्यानंतर बाबांमुळे माझं अस्तित्व सुरु झालं . बोट धरून चालायला शिकवणारे तर घोडा बनून मला हसवणारे माझे बाबा एक परिपूर्ण पिता आहेत. माझे बाबा माझ्यासाठी एक आदर्श आहेत. ते अतिशय प्रमाणिक आणि अपार कष्ट करणारे व्यक्ती आहेत. माझे बाबा खूप विनम्र आणि शांत स्वभावाचे आहेत. तसेच त्यांच्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे घर नेहमी आनंदात असते. दिवसरात्र मेहनत करून सुद्धा ते त्यांचा अमूल्य वेळ आपल्या कुटुंबासोबत आनंदाने घालवतात .

असं म्हणतात बाबांचे प्रेम दिसून येत नाही . पण खरंतर त्यांचे निरपेक्ष प्रेम हे त्यांच्या कष्टातून आणि कुटुंबाच्या काळजीतून लगेच जाणवते . भलेही ते कधी कधी रागवतात , चिडचिड करतात पण आपली मुले आजारी असली की रात्रभर जागून त्यांची काळजी घेतात . बाबांना नेहमी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची चिंता असते. ते मुलांसाठी आपल्या सुखाचा त्याग करणारे एकमेव मूर्तिमंत उदाहरण आहेत .

माझे बाबा हे एका वट वृक्षाप्रमाणे आहेत . ते सदैव आपल्या कुटुंबासाठी अनेक दुःख आणि वेदना सहन करतात आणि सगळ्यांना सुखी ठेवतात . आपल्या कुटुंबासाठी ते नेहमी संकटांशी संघर्ष करतात . अशा महान बाबांचे ऋण मला आजन्म फेडता येणार नाही. मला माझ्या बाबांचा खूप खूप हेवा वाटतो.


-प्रियांका कुंभार (वाघ).


(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )