Buddhiman Bayko - 1 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | बुद्धिमान बायको - भाग १

Featured Books
Categories
Share

बुद्धिमान बायको - भाग १

बुद्धिमान बायको

भाग  १

वैशाख एका फॅक्टरीत मेंटेनेंस मॅनेजर होता, आणि त्या दिवशी सॉलिड चिडला होता. एक महत्वाचं मशीन बंद पडलं होतं. प्रॉडक्शन थांबलं होतं. सगळे प्रॉडक्शन वाले लोकं कोंडाळं करून उभे होते, आणि प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर केंव्हा सुरू होणार हे मशीन असा प्रश्न होता. फॉल्ट तर कळला होता, पण तो दुरुस्त करण्यासाठी जो पार्ट लागणार होता, तो फॅक्टरीच्या स्टोअर मधे उपलब्ध नव्हता. आता अश्या परिस्थितीत मशीन सुरू कसं होणार, हा यक्ष प्रश्न होता.

प्रॉडक्शन मॅनेजरने जाऊन जनरल मॅनेजरला परिस्थितीची जाणीव करून दिली. साहेब ताबडतोब मशीनपाशी आले.

“काय झालं वैशाख?” साहेबांनी विचारलं. वैशाख आधीच वैतागला होता, त्यात एकेरी नावाने कोण बोलतेय या विचाराने त्याने रागानेच वळून पाहिलं. समोर साहेबांना पाहून त्याने राग आवरला.

“मशीनचा ब्रेकडाऊन झालाय, आणि पार्ट आपल्या कडे नाहीये.” – वैशाख.

“मग आता?” – साहेब.

“काही नाही, मघा पासून देसी जुगाड लावण्याचा प्रयत्न करतो आहे, पण जमेल असं वाटत नाही.” – वैशाख.

“ठीक आहे. प्रयत्न चालू ठेव. स्टोअर ऑफिसर अजून आहेत का? असतील तर बोलवा त्यांना.” – साहेब.

बोलवायला गेलेला माणूस परत आला आणि त्याने सांगितले की स्टोअर चे साहेब घरी गेलेत. साहेबांनी घडयाळ पाहिलं. रात्रीचे आठ वाजले होते. परचेस वाले कोणी आहेत का ते बघायला . साहेबांनी सांगितलं. ते पण कोणी नव्हते. सर्वच घरी गेले होते. मग प्रॉडक्शन मॅनेजर कडे वळून साहेब म्हणाले,

“तुम्हाला पण हा त्रास होतो का? गोष्टी वेळच्या वेळी मिळत नाही का?”

“हो सर, स्टोअर खूपच अकार्यक्षम झालं आहे. पूर्वी परमेश्वरन साहेब होते तेंव्हा सर्व सर्व व्यवस्थि होतं. पण त्यांच्या जागेवर कोणीच आलं नाहीये म्हणून हा घोळ होतो आहे साहेब.” – प्रॉडक्शन मॅनेजर सेनगुप्ता.

“अरे, त्यांच्याच तालमीत तयार झालेले विनोदकुमार आहेत की, मग?” – साहेब.

“नाही सर त्यांना झेपत नाहीये, परत त्यांचा माणसांवर विशेष कंट्रोल पण नाहीये. सगळीच मनमानी सुरू आहे.” – सेनगुप्ता. वैशाख पण म्हणाला की सेनगुप्ता साहेब बरोबर बोलताहेत म्हणून.

“ओके, वैशाख तू प्रयत्न चालू ठेव, उद्या बघू. आज आत्ता काहीच करता येणं शक्य नाहीये.” असं बोलून साहेब चालले गेले. वैशाख रात्री दोन वाजे पर्यन्त प्रयत्न करत होता, पण पण शक्य झालं नाही. तुटलेल्या पार्ट चा पर्याय काही केल्या जमात नव्हता. शेवटी सेनगुप्ता म्हणाला,

“वैशाख, सोड आता, तू पण थकला आहे आणि काही शक्यता दिसत नाहीये. उद्या सकाळी पहिलं काम म्हणजे नवीन पार्ट आणणे आणि मशीन चालू करणे.”

रात्री GM सएब MD साहेबांना रिपोर्टिंग करत होते, तेंव्हा त्यांनाई मशीन च्या पार्ट बद्दल सांगितलं.

“आपले स्टोअर ऑफिसर काय करतात? एखाद्या पार्ट मुळे अख्ख्या दिवसांचं प्रॉडक्शन झालं नाही, हे कंपनीचं नुकसान कोण भरून देणार? अशी अक्षम्य चूक तो माणूस काशी करू शकतो? त्याला जाब विचारा. पण प्रथम सकाळीच कोणाला तर व्यक्तीश: पाठवून तो पार्ट मागवून घ्या.” – MD

“हो साहेब, पण मटेरियल मॅनेजर ची जागा ताबडतोब भरायला हवी आहे. परमेश्वरन साहेब जाऊन एक वर्ष झालं साहेब. ” – GM

“ओके. मी बोलतो HR मॅनेजरशी. तो पर्यन्त मला वाटतं तुम्हीच हातात घ्या स्टोअर. आपल्याला असा हलगर्जी पणा परवडणार नाही.” -MD

“ठीक आहे साहेब.” – GM.

 

सकाळी दुकानं उघडल्या नंतर पार्ट फॅक्टरीत आला, तो मशीनला लाऊन मशीन चालू करण्यात आली. प्रॉडक्शन सुरू झाल्या नंतर जनरल मॅनेजर साहेबांनी मीटिंग बोलावली. मीटिंग मधे सेनगुप्ता आणि वैशाखने इतक्या साऱ्या गोष्टी पुराव्यासह सांगितल्या की स्टोअर ऑफिसरला काही स्पष्टीकरण देताच आलं नाही. मग स्टोअर ऑफिसरला ला भरपूर झाड झटक करून झाल्यावर साहेब म्हणाले, की माझ्या मते तुम्हा दोघांपैकी कोणीतरी स्टोअर चा चार्ज घ्यावा, जेणेकरून कालच्या सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही.

“सर, मला प्रॉडक्शन आणि प्लॅनिंगच इतकं काम असतं की मी फारसा वेळ स्टोअर कडे देऊ शकणार नाही. वैशाखने त्यांच्या टीमला इतकं उत्कृष्ट ट्रेनिंग दिलं आहे की वैशाख स्टोअर साठी वेळ काढू शकेल.” – सेनगुप्ताने अतिशय चतुराईने बॉल वैशाख कडे टोलवला.

“सर मला वेळेवर हवे ते सामान मिळत नाही म्हणून मी तक्रार केली, पण स्टोअर कसं चालवायचं हे मला माहीत नाही. या बाबतीत कोणी अनुभवी माणूसच आपली मदत कटू शकेल. लवकरात लवकर स्टोअर मॅनेजरची नेमणूक व्हायला हवी.”–वैशाख.

“मी मॅनेजमेंटला यांची कल्पना दिली आहे. काय निर्णय होतो ते बघू, पण तो पर्यन्त तू स्टोअर सांभाळ. फूल फ्रीडम” – साहेब.

“साहेब, जर परिस्थिती माझ्यामुळे अजून बिघडली तर काय करायचं?” – वैशाख.

“वैशाख, तुला जारी नसला तरी आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तू स्टोअर उत्कृष्ट पणे सांभाळशील, इतकंच नव्हे तर अनेक फायदेशीर उपाययोजना पण करशील. आणि तुला मदत करायला विनोद कुमार आहेच, तू टेंशन घेऊ नकोस.”–साहेब.

झालं. शिक्का मोर्तब झालं. साहेबांनी एक सरक्युलर काढलं, आणि वैशाखला स्टोअर इनचार्ज बनवलं. चॅप्टर संपला. वैशाख दोन तास नुसता बसून विचार करत होता, पण त्याला काहीच सुचत नव्हतं. स्टोअर म्हणजे काही खायचं काम नव्हतं. विचार करत करतच तो घरी आला. तो लवकर घरी आला याचं ललनाला जरा आश्चर्यच वाटलं.

“लले, डोक्याचा भुगा झालाय, काहीतरी खायला दे. काहीतरी छानसं दे.” – वैशाख.

“काय देऊ? उपमा, पोहे करू?” – ललना.

“छ्या, नेहमी काय तेच तेच, तू असं कर बॉईल्ड एग दे. चांगली तीन अंडी उकड. आज अंडी खाऊया.”-वैशाख

“बॉईल्ड एग? तुम्हाला तर मुळीच आवडत नाही, आज कशी आवड बदलली?”–ललना

“काल पासून सगळंच विचित्र घडतंय, म्हंटलं न डोक्याचा भुगा झालाय” – वैशाख.

मग वैशाखने तिला काल पासून काय काय घडलं, ते थोडक्यात सांगितलं.

“बापरे, तुम्हाला स्टोअर ची काय माहिती आहे?” -ललना.

“तेच तर, काय करावं तेच समाजात नाहीये. बघू काय करता येतं ते “ – वैशाख

लालनाने त्यांच्या समोर अंडी आणून ठेवली.

“अरे, गडबड झाली, यावर मिरपूड हवी आहे. आपण आंब्याच्या रसावर मिरपूड घेतो, पण आंब्याचा सीजन तर संपला, मग आता मिरपूड नसेल. टेस्ट नाही येणार.” – वैशाख.

ललनाने मिरपूड आणली. वैशाखला आश्चर्यच वाटलं.

“हे कसं काय मॅनेज केलस तू? आत्ता केलीस?” – वैशाख.

“नाही, घरात प्रत्येक गोष्ट असतेच. तुम्हा लोकांना कळत नाही इतकंच.” – ललना.

“म्हणजे काय? मी काहीही मागीतलं तरी ते असेल?” – वैशाख.

“आत्ता लक्षात येते तुमच्या? आम्ही बायका दिवसभर काय करतो हाच समज आहे तुम्हा लोकांचा, पण खरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तोंडातून शब्द काढल्यावर गोष्टी तुमच्या समोर हजर असतात आणि हे तुमच्या कधीच लक्षात येत नाही.” – ललना.

“माय गॉड, हे माझ्या लक्षातच आलं नाही. लले, प्रॉब्लेम सुटला. अगदी घरच्या घरी सुटला.” – वैशाख.

“म्हणजे काय? मला समजलं नाही.” – ललना.

“नेव्हर माइंड, मी आलोच एक फोन करून.” – वैशाख.

वैशाखने साहेबांना फोन लावला.

“सर मला चार दिवस सुट्टी पाहिजे आहे.” – वैशाख.

“अरे, अचानक काय झालं? तब्येत बरी आहे न?” – साहेब.

“मी स्टोअर चं ट्रेनिंग घेणार आहे चार दिवस. मग बघा स्टोअर कसं अप टु डेट करतो ते.” – वैशाख.

“अरे पण तुझं डिपार्टमेंट कोण सांभाळेल?” – साहेब.

“चिंता करू नका साहेब, सगळे ट्रेंड आहेत. आणि मी आहेच अव्हेलेबल तशीच जरूर पडली तर. मी काही बाहेर गावी जात नाहीये.” – वैशाख.

“ओके” – साहेब.

“तुम्ही ट्रेनिंगला जाणार आहात? कुठे? आधी बोलला नाही?” – ललना.

“ट्रेनिंगच घेणार आहे, पण घरीच. आणि तूच देणार आहेस.” – वैशाख.

“शेवटी बायकोच सापडते ना चेष्टा करायला? नसेल सांगायचं तर नका सांगू.”-ललना

क्रमश:..........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दिलीप भिडे.