प्रथमाचा कॉलेजचा आख्खा ग्रूप मस्त तयारी करून संपूर्ण दिवस मजा मस्ती करण्याच्या दृष्टीने सज्ज होऊन तिला सहलीला सोबत घेऊन जाण्यासाठी तिच्या घराबाहेर गाडी घेऊन तिची वाट पाहत थांबला होता. समन्वयीने प्रथमाला कॉल केला. प्रथमा वेळेची किती पक्की होती हे सर्वांना माहित होते. त्यामुळे दुसऱ्याच रिंगला प्रथमाने फोन उचलला आणि पुढच्या दोन मिनिटांत ती आणि तिची आई गेटपशी उभ्या होत्या.
प्रथमाने सगळ्यांना हाय केले. तितक्यात समन्वयीने गाडीचा दरवाजा आतून उघडला. प्रथमाने आपला बॅगपॅक गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की बंद केली आणि मधल्या सीटवर, समन्वयीच्या शेजारी येऊन बसली. प्रथमाची आई तिला सी ऑफ करण्यासाठी घराच्या गेटपाशी उभी होती. आईला बाय करून प्रथमा डिटॉक्स, रिजुविनेट होण्यासाठीच्या प्रवासावर अग्रेसर झाली.
गाडी मजल दरमजल करत आपल्या वेगाने अंतर पार करत होती. सगळे छान गप्पा गोष्टी करत, एन्जॉय करत, आजूबाजूच्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत सहलीच्या ठिकाणाकडे म्हणजेच त्यांच्या ट्रॅव्हल डेस्टिनेशनकडे ओसंडून भरलेल्या उत्साहाने कूच करत चालले होते.
प्रथमा ही त्यांच्यातीलच एक होऊन सहलीचा आणि प्रवासाचा आनंद उपभोगत होती. गाडीच्या काचेतून दिसणाऱ्या नयनरम्य निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत, मैत्रिणींशी गप्पा मारत, बसल्या बसल्या जमेल तसा, जमेल तितका डान्स करत, आरडा ओरडा, धमाल मस्ती आणि कल्ला करत ते लोक सहलीच्या ठिकाणी केव्हा येऊन पोहोचले ते त्यांना कळलेच नाही.
गाडी थांबताच सगळेजण एक दोन मिनिटं तर फक्त आळस देत होते. थोडा अवतार नीटनेटका करत आधी ते सगळे गाडीतून खाली उतरले. बसून बसून सर्वांना कंटाळा आला होता. आळस देणे हा बहुधा संपूर्ण शरीराची मरगळ घालवण्यासाठी निर्माण झालेला व्यायामाचा एक प्रकार असावा.
प्रथमाने देखील आपला अवतार नीट केला आणि तजेला येण्यासाठी, फ्रेश वाटण्यासाठी चेहऱ्यावर थोडे पाणी मारले.
आता कशी तरतरी आली होती. तितक्यात छान अलवार वाऱ्याची झुळूक आली आणि प्रथमाचे केस उडून त्यांच्या बटा तिच्या गालांशी आणि डोळ्यांवर रेंगाळू लागल्या. प्रथमाने डोळ्यांवरील बटा बाजूला केल्या व कपाळावरील बटेला फुंकर मारून बाजूला करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. हे फुंकर मारून केस उडवणे हा तिचा छंद होता किंवा सवय होती असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. प्रयत्न फसल्यानंतर हातानेच कपाळावरील केस बाजूला केले. त्यानंतर आपले तळहात एकमेकांवर घासून निर्माण झालेल्या ऊर्जेला आपल्या चेहऱ्यावर हस्तांतरित करत मोठ्याने श्वास घेत दोन्ही हात पसरून उभी राहिली. संपूर्ण विश्वाची नैसर्गिक, सकारात्मक आणि नितळ ऊर्जा बहुधा स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रथमा प्रयत्न करत होती.
थोडावेळ तशीच उभी राहिल्यानंतर प्रथमा आपल्या आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागली. अतिशय निसर्गरम्य असे ते वातावरण होते. प्रवास अवघा एक तासाचा झाला होता. त्यामुळे ट्रेकिंगसाठी भरपूर वेळ हातात होता.
ती इंटरव्ह्यूच्या तयारीत व्यस्त असल्या कारणाने, या वेळेस सहलीचे ठिकाण, ट्रेकिंगचे लोकेशन निवडण्यात तिचा नेहमी असतो तितका सहभाग नव्हता. ती सर्व जबाबदारी तिच्या फ्रेंड सर्कलने पार पडली होती. सर्वांना विचारून सर्वांना सोयीचा पडेल असा एक वीकएंड निवडायचा होता. प्रथमाने जसे त्यांना आपला इंटरव्ह्यू क्लिअर होऊन आपले सिलेक्शन झाल्याचे कळविले तसे सर्वांच्या सोयीने हा वीकएंड ठरवण्यात आला होता.
ग्रुपने ट्रेकिंगची तयारी व्यवस्थित प्लॅनिंग करून केली होती. लागणारे सर्व साहित्य, सेफ्टी आणि फर्स्ट एड किटस् बरोबर ठेवले होते.
हळूहळू सर्वांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. अर्थात त्यांच्यासोबत त्यांना बरेच वर्षे मार्गदर्शन करणारे त्यांचे ट्रेकिंग इन्स्ट्रक्टर देखील होते. ट्रेकिंग इन्स्ट्रक्टर म्हणजे त्यांच्या कॉलेजचा त्यांना दोन वर्ष सिनियर स्टुडंट. तो ही त्यांच्या ग्रुपचा एक अविभाज्य घटक होता. ट्रेक, सहली ऑर्गनाईज करण्यात बऱ्याचदा तोच पुढाकार घेत असे. यावेळेसही त्यानेच पुढाकार घेऊन सर्व ठरविले होते. आणि इतर सर्वांना त्याने सुचवलेले हे निसर्गरम्य डेस्टिनेशन खूप आवडले होते.
ट्रेकिंगला सुरुवात झाली होती...