relationship in Marathi Motivational Stories by Prof. Krishna Gaware books and stories PDF | संबंध

Featured Books
Categories
Share

संबंध


*संबंध*

एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो.

रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला. फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता. आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती.

परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले आजची वेळ संपली आहे, उद्या या.

मी त्याला विनंती केली की आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे, कृपया फी जमा करून घ्यावी.

क्लार्क चिडून म्हणाला, “तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथं घालवला याला मी जबाबदार आहे का? इथे सरकारने कामाकरता ज्यादा माणसे नेमली पाहिजेत. मी सकाळपासून इथे कामच तर करतोय ना."

माझा मित्र खूपच निराश झाला, तो म्हणाला, "चल आता उद्या परत येऊ." मी त्याला थांबवले व म्हणालो मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो, थांब जरा.

क्लार्कने आपली पिशवी उचलली व चालू लागला. मी त्याला काही बोललो नाही पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो. तो कॅन्टीनमध्ये गेला त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला व एकटाच सावकाश जेवू लागला.

मी त्याच्या समोरच्या बाकावर बसलो व त्याच्याशी बोलू लागलो. मी म्हणालो, "तुम्हाला तर खूप काम आहे तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल?” तो म्हणाला, “होय. मी तर मोठ मोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो. कित्येक आय. ए. एस., आय.पी.एस., आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात.
नंतर मी त्याला म्हणालो की तुझ्या ताटलीतील एक पोळी मी खाऊ का? तो हो म्हणाला. मी त्याच्या ताटलीतील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो.

मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो, "तुमची पत्नी खूपच रुचकर जेवण बनवते." त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पूढे चालू ठेवले.

मी त्याला म्हणालो तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात. खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात. तुम्ही आपल्या पदाचा (खुर्चीचा) मान राखता का? तुम्ही खूप भाग्यवान आहात की एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाही.

तो मला म्हणाला, "तुम्ही असं कसं म्हणू शकता ?"

मी म्हणालो, " तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आस्था असती, तर तुम्ही इतके कठोर वागला नसता.”

बघा तुम्हाला कोणी मित्रही नाहीत. ऑफिसच्या कँटीनमधे तुम्ही एकटेच जेवत बसला आहात. ऑफिसमधे पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता. लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता.

बाहेर गावाहून लोक येतात, सकाळपासून काम होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता,"सरकारला सांगा कामासाठी जादा माणसं नेमा."

अरे जादा माणसं नेमली तर तुमचे महत्त्व कमी नाही का होणार? कदाचित हे कामही काढून घेतले जाईल.

*आपापसातील संबंध वाढविण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे.* पण तुमचं दुर्दैव की याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात. मला काय, मी उद्या येईन, परवा येईन.
पण तुम्हाला चांगली संधी आली होती कुणावर तरी उपकार करण्याची... ती संधी तुम्ही घालवलीत.

मी म्हणालो, तुम्ही पैसा तर भरपूर मिळवाल पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे.

काय करणार पैशांच? तुमच्या रूक्ष वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत.

माझ बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला. तो म्हणाला, "साहेब, आपण खर बोललात. खरोखरच मी एकटा आहे. बायको भांडण करून माहेरी गेलीय. मुलांनाही मी आवडत नाही. आई आहे, पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही. सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो. रात्री घरीसुद्धा जावसं वाटत नाही. समजत नाही की माझं कुठं चुकतंय?

मी त्याला शांतपणे सांगितलं, "लोकांशी चांगले संबंध ठेवा. कोणाला मदत करता येत असेल तर करा." बघा इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे. माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतोय. त्याच्यासाठी धडपडतोय. म्हणून मला मित्र आहेत, तुम्हाला नाही.
तो उठला व म्हणाला या माझ्या खिडकीसमोर. तुमचा फॉर्म मी आजच जमा करतो. त्याने आमचे काम केले. नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला, मीपण दिला.

मधे कित्येक वर्षे गेली.

अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला...

साहेब, मी रविंद्रकुमार चौधरी बोलतोय, "काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी आला होतात आणि माझ्या बरोबर जेवलापण होतात. त्यावेळी तुम्ही मला
सांगितले होते की *पैशांऐवजी नातेसंबंध जोडा.* "
हां हां ,चौधरी साहेब, आठवलं, "बोला, कसे आहात तुम्ही?”

खुश होऊन तो म्हणाला, "साहेब त्यादिवशी आपण निघून गेलात मग मी खूप विचार केला. मला जाणवलं की खरोखर पैसे तर बरेच लोकं देऊन जातात, पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो. दुसऱ्याच दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो. ती तयारच नव्हती. ती जेवायला बसली होती तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो मला पण खाऊ घालशील का?

ती चकित झाली, रडायला लागली. माझ्याबरोबर येण्यास तयार झाली. मुले पण आली.

साहेब, आता मी नुसता पैसे नाही कमवत..नाती जोडतो.

साहेब, आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला. कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं.

पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्हाला यावं लागेल, मुलीला आशीर्वाद द्यायला. आमच्याशी संबंध जोडलाय तुम्ही.

तो बोलत राहिला, मी ऐकत राहिलो. मला वाटलं नव्हतं की त्याच्या जीवनात पैशांपेक्षा नातेसंबंधाना इतके महत्त्व प्राप्त होईल.

मित्रांनो, माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही. नियमांवर तर मशीन चालतात.
_____ ❤️_____