Sir comes and goes - 2 in Marathi Fiction Stories by Ketakee books and stories PDF | सर येते आणिक जाते - 2

The Author
Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

सर येते आणिक जाते - 2



आता प्रथमा नवीन ऑफिसमध्ये चांगलीच रुळली होती. नवीन दैनंदिनी, वातावरण याची तिला बऱ्यापैकी सवय झाली होती. धरा आणि ती तर काही दिवसांतच खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. ऑफिसमध्ये जवळ जवळ आठ तास त्या एकत्र घालवत होत्या. त्यामुळे साहजिकच त्यांना नवीन ऑफिसमधील नाविन्य आता कमी जाणवत होते.

त्यांच्या ट्रेनिंगचा शेवटचा टप्पा चालू होता. आज उद्यात बहुधा सगळ्यांचे प्लेसमेंट होणार होते. प्रथमा आणि धराला आपण दोघींनी एकाच प्रोजेक्टमध्ये जावे असे वाटत होते. त्यासाठी त्या दोघीही हाताची दोन बोटे क्रॉस करून(फिंगर्स क्रॉसड) बसल्या होत्या.

आज जेवतानाही दोघी याच विषयावर बोलत होत्या. मागील कंपनीतील अनुभव हा त्यांच्या गाठीशी होताच. तरी देखील प्लेसमेंटची उत्सुकता ही मात्र एखाद्या फ्रेशर सारखीच होती.

ग्रुप मधील एकेक जण कंपनीच्या टीम बरोबर जाऊ लागला होता. कदाचित प्रोजेक्टच्या इंटरव्ह्यू साठी बोलावत होते. असे दोन दिवस गेले तरीही अजून प्रथमा आणि धराला बोलावण्यात आले नव्हते. तिसऱ्या दिवशी धरा आणि अजून चार लोक यांना इंटरव्ह्यूसाठी नेले. प्रथामाला एकीकडे आनंद होत होता की आता धरा बहुधा प्रोजेक्टसाठी निवडली जाणार, पण दुसरीकडे कदाचित दोघीही वेगळ्या प्रोजेक्टमध्ये जातील याचेही वाईट वाटत होते. पण काहीही झाले तरी त्या दोघी एकाच ऑफिसमध्ये होत्या आणि राहणार होत्या. म्हणजे दररोज भेट होत राहणार होती. या विचारासरशी प्रथामाची कळी खुलली, आणि डोक्यातील अस्वस्थ करणारे विचार बाजूला पडले.

एक तासाने वगैरे धरा अगदी आनंदी मन:स्थितीत परत आली. सामान घेत घेत जास्त काही न बोलता डोळ्यांनी आणि चेहऱ्यावरील हावभावांनी सारे काही सांगून गेली. प्रथमाला हे पाहून खूप आनंद झाला.

प्रथमाला ऑल द बेस्ट म्हणून धरा सामान घेऊन तिच्या सेलेक्टेड कँडिडेटसच्या ग्रुप सोबत निघून गेली.

प्रथमा अजूनही तिला बोलावण्याची, तिच्या सिलेक्शनची वाट पाहत होती.

फायनली शेवटच्या पाच लोकांमध्ये तिचा नंबर लागला. इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले. एका छानशा प्रशस्त केबीनमध्ये सिलेक्शन कमिटी समोर हे पाच लोक बसले होते. सुरवातीला सर्वांनी स्वतःचे इनट्रोडक्शन दिले. मागील प्रोजेक्ट आणि त्याच्या अनुभवाबद्दल सर्वांना विचारण्यात आले. हळूहळू मग प्रश्न आणि त्यांची काठिण्य पातळी वाढत गेली. पण प्रथमाने आपले मनोबल खचू दिले नाही. इतर लोकही तिला तोडीस तोड होते. त्यामुळे किती जणांना ते निवडतील याचा तसा काही अंदाज तिला अद्याप येत नव्हता. त्यामुळे इंटरव्ह्यू नंतरचा काही वेळ प्रथमा थोडी अस्वस्थ होती. मन मोकळे करण्यासाठी जवळ धरा देखील नव्हती. ती असती तर कदाचित टेंशन मुळे आलेला हा अस्वस्थपणा तिला एवढा जाणवला नसता.

त्या सर्वांना तिथेच केबिन बाहेर थांबण्यास सांगण्यात आले होते. सर्वांसाठीच फार नर्वस मोमेंट्स होते ते.

जवळ जवळ अर्ध्या तासानंतर त्यांना रिझल्ट कळविण्यात आला. पाचही लोकांची त्या प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली होती. त्या सर्वांना काय आनंद झाला होता तो शब्दांत सांगणे कठीणच.

पाचही लोकांना आता चहा प्यावासा वाटत होता. इंटरव्ह्यू बराच वेळ चालल्यामुळे त्यांना कमालीचा क्षीण आला होता. तो घालवण्याचा एकमेव सोपा उपाय म्हणजे चहा हाच होता.

सगळे कॅफेटेरियाच्या दिशेने निघाले. प्रथमा ही त्यांच्या सोबत होती. पण ती सध्या धराला खूप मिस करत होती. "ती इकडे असायला हवी होती यार" प्रथमा स्वतःशीच अशी मनातल्या मनात बोलत होती. तितक्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला. धराचा मेसेज होता. "काय झाले?"

प्रथमाने आनंदाच्या भरात तिच्या मेसेजला रिप्लाय केला. धराला देखील फार आनंद झाला. दोघींनी ही ऑफिस नंतर त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटण्याचे ठरविले.

प्रथमाला आता खूप छान वाटत होते. धरा आणि तिची मैत्री अगदीच प्राथमिक टप्प्यात होती. भेटून फक्त पंधरा दिवस झाले होते. पण मैत्रीच्या छटा गडद व्हायला सुरुवात झाली होती.