Spirituality Ramayana in Marathi Spiritual Stories by गिरीश books and stories PDF | अध्यात्म रामायण

Featured Books
Categories
Share

अध्यात्म रामायण

अध्यात्म रामायण.
पार्वतीदेवी महादेवांना म्हणाल्या मला आपल्याकडून श्रीरामचंद्रांची कथा ऐकायची आहे. महादेव म्हणाले मी तुला महान असे अध्यात्मरामायण सांगतो.
तापत्रयाचे हरण करणारे असे अध्यात्मरामायण सावध चित्ताने ऐक.
हे ऐकून भक्त अज्ञान मुलक भयापासून मुक्त होतो. एकदा रावण व इतर राक्षसांच्या त्रासामुळे पृथ्वी गायीचे रुप धारण करून देवता व मुनींना घेऊन ब्रह्मदेवांना भेटण्यास गेली व आपले दुःख सांगितले.
ब्रह्मदेव या सर्वांना घेऊन क्षिरसागराच्या किनाऱ्यावर गेले व निर्मल भावनेने व भक्तिने भगवान विष्णूंची स्तोत्रांनी स्तुति केली. तेव्हा सहस्र सूर्यासमान तेजस्वी असे भगवान हरि पुर्व दिशेला प्रगट झाले. आभुषणे व कौस्तुभ मण्याच्या तेजाने सजलेले विष्णू ना पाहून ब्रह्मदेवांचे डोळे पण दिपले.
शंख,गदा,चक्र ही आयुधे असलेले आणि सोनेरी यज्ञोपवित व पितांबर नेसलेले विष्णू गरुडावर बसले होते.
ब्रह्मदेव म्हणाले मुमुक्षु त्यांचे प्राण, बुद्धी,मनाने ज्यांचे चिंतन करतात अशा तुम्हाला मी नमस्कार करतो.
या जगातील संसार रोगाचे आपली भक्ति हेच औषध आहे.
विष्णू ब्रह्मदेवाना म्हणाले तुमचे काय कार्य आहे. ब्रह्मदेव म्हणाले, पुलस्त्य चा मुलगा विश्रवा याचा मुलगा रावण राक्षसांचा राजा आहे. तो अंत्यंत अहंकारी झाला आहे.
तो तिन्ही लोकांना खुप पिडा देत आहे.
हे भगवान मी त्याचा मृत्यू मानवाचे हातून लिहिला आहे. यासाठी तुम्ही मनुष्य रुप धारण करून त्याचा वध करावा.
भगवान म्हणाले, कश्यप नी तपश्र्चर्या करून माझ्याकडून मी त्यांचा पुत्र व्हावा असा वर मागितला होता.
आता कश्यपनी राजा दशरथाचा जन्म घेतला आहे. मी कौशल्याच्या पोटी जन्म घेणार आहे व योगमाया जनकराजाकडे सीता म्हणून प्रगट होईल.
ब्रह्मदेव देवांना म्हणाले की रघुकुलात भगवान राम म्हणून जन्म घेणार आहेत.
तुम्ही पण वानर वंशात जन्म घ्या व आपल्या अंशापासून वानर पुत्रांना जन्म द्या. वानरवंश या कार्यात सहाय्यभूत ठरेल.
असे सांगून ब्रह्मदेव पृथ्वी ला आशिर्वाद देऊन ब्रह्मलोकी गेले. देव गण महाबलवान वानरांचे रुप घेऊन भगवानांना सहाय्य करण्यासाठी पृथ्वी वर राहू लागले.
महादेव म्हणाले, सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध व सत्यप्रिय व वीर परंतु पुत्र नसल्याने दुःखी असलेल्या दशरथ राजांनी आचार्य वसिष्ठ ना बोलावून घेतले व प्रणाम करून विचारले की स्वामी, मला सुलक्षणी पुत्रांची प्राप्ती कशी होईल ते सांगा. वसिष्ठ म्हणाले, तुला चार सामर्थ्यवान पुत्र होतील. तू शांताचे पति तपस्वी ऋष्यश्रृंग यांना बोलावून आम्हाला बरोबर घेऊन पुत्रेष्टि यज्ञ कर.
(शांता ही राजा दशरथाची कन्या असून तीला रोमपाद राजाला दत्तक दिले होते). तेव्हा राजाने ऋष्यश्रृंगना बोलावून मंत्री, मुनिजन, यांच्यासह यज्ञ आरंभ केला. यज्ञातून अग्निदेव सोन्याचे पात्रात प्रसाद घेऊन प्रगट झाले व राजाला म्हणाले हा प्रसाद तू आपल्या पत्नींना दे.
यामुळे तुला साक्षात परमात्मा पुत्र म्हणून लाभतील. त्यानंतर राजाने ऋष्यश्रृंगना व वसिष्ठ ऋषींना नमस्कार करून त्यांचे आशिर्वाद व परवानगी घेऊन तो प्रसाद दोन भाग करून महाराणी कौसल्या व कैकयी यांना दिला.
तेव्हा तेथे सुमित्रा राणी आल्या व कौसल्या ने आपल्या प्रसादातील अर्धा भाग तीला दिला व कैकयी ने पण अर्धा भाग दिला.
यथावकाश सर्व राण्या गर्भवती झाल्या व दहावा महिना लागल्यावर कौसल्याने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला.
चैत्र महिन्यातील पुनर्वसू नक्षत्रावर, कर्क लग्न, पाच ग्रह उच्च स्थानांवर व सूर्य मेषराशीत
असताना दुपारी परमात्मा जगन्नाथाचा अवतार झाला. आकाशातून दिव्य फुलांचा वर्षाव झाला. कौसल्या राणीला देवानी आपल्या मुळ रुपात दर्शन दिले.
कौसल्या म्हणाली, हे देवाधिदेव, आपल्याला नमस्कार. आपण पूर्ण पुरुषोत्तम आहात. आपल्या पोटात अनेक ब्रह्मांडे परमाणु प्रमाणे दिसतात पण आपण लोकांना माझ्या पोटातून जन्म घेत आहे असे दाखवत आहात यावरून आपण किती भक्तवत्सल आहात ते समजते.
हे देवा ! आता हे अलौकिक रुप सोडून कोमल असे बालरुप धारण करावे. भगवान म्हणाले ब्रह्मदेवानी प्रार्थना केल्याप्रमाणे रावणासह अन्य राक्षसांचा संहार करण्यासाठी मी हा अवतार घेतला आहे.
तुझ्या पुर्व तपस्येमुळेच तू माझे हे रुप पाहिले आहेस. नंतर भगवान बालरुपात येऊन रडू लागले. त्यांचे बालरुप शामवर्णी, सुंदर व तेजस्वी होते.