सुमित ने श्वेता ला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला पण श्वेता च्या मनातून ती पंख्याला लटकलेली बाई काही जाऊ शकली नाही.
रात्री सगळ्यांचे गप्पा मारत मारत जेवणं आटोपले. आत्या आणि श्वेता गेस्ट रूम मध्ये झोपल्या. सुमित-सुपर्णा सुद्धा त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेले.
श्वेता ला बराच वेळ झोप लागली नाही. आत्या मात्र गाढ झोपल्या. श्वेता चे बाळ सुद्धा झोपी गेले. अखेर रात्री बाराच्या पुढे श्वेता चा डोळा लागला.
साधारण एखाद्या तासाने श्वेताला कोणीतरी कानाशी पुटपुटतेय असं वाटलं आणि त्याच्या पाठोपाठ तिला अत्यंत घाणेरडा वास आला. तिने डोळे किलकीले करून पाहिले तर तिचे डोळे उघडे ते उघडेच राहिले.
कारण एक बटबटीत काजळ लावलेली टकली बाई श्वेता च्या अगदी कानाजवळ बसली होती आणि ती तिचे बोटभर लांब नख असलेल्या हातांनी श्वेताच्या बाळाला घेऊ पाहत होती. "मला बाळ हवंय...","मुझे बच्चा चाहिये...." असं श्वेताच्या कानाशी पुटपुटत होती. ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून जोसेफाईन होती.
तिला बघताच श्वेताचा घसा कोरडा पडला. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तिने हाताने आत्याला म्हणजे तिच्या आईला जागे केले. आत्याने कूस बदलून श्वेता कडे पाहण्यासाठी मान वळवली आणि त्यांचा जबडा उघडा तो उघडाच राहिला. समोरचे दृश्य पाहून त्यांनी मोठ्याने किंकाळी फोडली. ते ऐकून सुमित आणि सुपर्णा धडपडत त्यांच्या खोलीत आले आणि त्यांनी पटापट रूम मधील लाईट लावले. लाईट लावल्यावर त्यांना जे दृश्य दिसलं ते फारच भीषण होतं. जोसेफाईन हवेत उलटी लटकली होती आणि तीने बाळाला हातात धरलं होतं, ती तोंडाने अगदी खरखरीत आवाजात " मुझे बच्चा चाहिये.... ","मुझे बच्चा चाहिये...." असे ओरडत होती. श्वेताचे बाळ जोरजोरात रडत होते. सुमित सुपर्णा आत्या आणि श्वेता ला काय करावं ते काही सुचत नव्हतं. सुमित त्या बाई वर जोर्रात ओरडला, " ए बाई!! ठेव त्या बाळाला. कोण आहेस तू? आणि इथे का आलीस? ", असं सुमित ने म्हणताच जोसेफाईन ने 270 डिग्री मध्ये तिची मान वळवली आणि तिचे पांढरे शुभ्र डोळे सुमित कडे रोखले. ते पाहून सुमितच्या अंगातून एक थंड लहर फिरली.
ती बाई काही ऐकत नाही हे बघून सुपर्णा ला काय सुचलं काय माहित पण ती वेगाने आत किचन मध्ये गेली आणि तिने देवघरातील पूजेचे तीर्थ एका वाटीत घेऊन गेस्ट रूम मध्ये आणले आणि लगेच तिने ते जोसेफाईन च्या अंगावर टाकले. ते तीर्थ पडताच अंगावर निखारा पडल्यासारखा जोसेफाईन विव्हळली आणि तिने बाळाला फेकून दिले तेवढ्यात सुमित ने बाळाला वरचेवर अलगद झेलले आणि श्वेता कडे दिले. तोपर्यंत जोसेफाईन अदृश्य झाली होती.
काही मिनिटं सगळेजण सुन्न बसून राहिले मग श्वेता म्हणाली," तरी मी काल तुम्हांला सांगितलं की एक बाई पंख्याला लटकलेली मी पाहिली तेव्हा तुमचा विश्वास बसला नाही. आता सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं न? "
"म्हणूनच ती लिफ्ट मधली बाई फ्लॅट नंबर 1002 म्हंटल्यावर आपल्याकडे विचित्र नजरेने बघत होती.", आत्या.
"म्हणूनच मला पाय घासण्याचा, काहीतरी ठोकण्याचा आवाज आणि उग्र दर्प आला असावा", सुमित
"मलाही काल संध्याकाळी ठोकण्याचा आवाज आणि घाण वास आला.", सुपर्णा
"सुमित हे घर साधं नाहिये, बाधित आहे बाधित!! ही जी बाई आपल्याला दिसली तिने नक्की ह्या घरात आत्महत्या केलेली दिसतेय. तुला कोणी हे घर सुचवलं? त्याने तुला ह्याची कल्पना द्यायला हवी होती.", आत्या काळजीने म्हणाल्या.
"अगं माझ्या एका कलीग ने सुचवलं पण त्यालाही कदाचित हे माहित नसावं नाहीतर त्याने मला नक्की सांगितलं असतं.", सुमित
"तुम्हाला सगळ्यात आधी हे घर रिकामं करून दुसरीकडे जागा शोधायला हवी.",श्वेता
"घरमालकाच्या कानावर ही ही गोष्ट घालावी लागेल.", असं म्हणून सुमित ने घरमालकाला फोन लावला पण घरमालकाने ह्याबद्दल काहीच माहित नाही असे सांगितले.
"कोणाला माहित खरंच घरमालकाला माहित आहे की नाही?", श्वेता म्हणाली.
क्रमश :