Before voting in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | मतदान करण्यापुर्वी

Featured Books
Categories
Share

मतदान करण्यापुर्वी

मतदान करण्यापुर्वी आमचा विचार होणार काय?

मतदान करतांना आमचाही विचार व्हावा. लहान मुलांची खंत. त्यांनाही वाटतं की आम्हालाही मतदान करता,यावं. परंतु तसं मतदान करण्याचा त्यांना अधिकार नाही. कारण ते अठरा वर्षाचे नसतात व त्यांना देश चालविण्यासाठी कोणाला निवडून द्यायचं हे साधं कळत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याही काही मागण्या नसतात? त्यांच्याही मागण्या असतात. त्या मोठ्यांना कळत नाहीत. म्हणूनच कधीकधी देशाचं अहितही होत असतं. देशात घोटाळे होत असतात. कारण जेवढं लहाण्यांना कळतं. तेवढं मोठ्यांना कळत नाही. ते आपल्या निवडून आणलेल्या नेत्यांवर वचक ठेवत नाहीत. म्हणूनच असं घडतं. उदाहरणार्थ आपला मोबाईल. आपला मोबाईल आपल्याला तरी समजून घ्यावा लागतो. लहान मुलांना नाही.
लहान मुलांनाही भावभावना असतात. त्यांनाही मतदानाचं कळत नाही असं नाही. त्यांनाही मतदानाचं कळतं व ते आपल्या घरी एखाद्या पक्षाचं नाव जोरात घेत असतात. तसा त्या नेत्यांचा सर्वात जास्त प्रचार हीच लहान मुलं करतात. कारण त्यांचेवर बंधन नसतं. कोणताच कायदा त्यांना अडवू शकत नाही वा असं बोलला, तसं बोलला म्हणत नाही. तसं पाहिल्यास तेच निवडणुकीत सर्वात जास्त काम करीत असतात. जरी म्हटलं जातं की राजकारणापासून मुलांना दूर ठेवायला हवं.
अलिकडे लोकसभेची निवडणूक होवू घातली आहे व सर्वांनाच निवडणूकीचा रंग चढला आहे. यात बरेचसे नेते असे आहेत की जे आश्वासनच देत आहेत आणि या लहान मुलांना निवडणुकीतून वंचित ठेवावं असं सरकार जरी म्हणत असलं तरी मतदार जनजागृती करीत असतांना याच मुलांच्या हस्ते मतदान करण्यासाठी संकल्प आवेदन पत्र पालकांकडून भरुन घेवून प्रत्यक्षात नसेल तरी अप्रत्यक्षपणे या लहान मुलांचा निवडणुकीत सहभाग घेतलेलाच आहे. त्यामुळंच त्यांचं जर स्थान निवडणुकीत अप्रत्यक्षपणे आहे तर त्यांच्याही मागण्यांकडे दुर्लक्ष करु नये. त्यांच्याही मागण्या असतात. ते नेत्यांनी समजून घ्यायला हवं.
आता मोठी माणसं विचार करतील की लहान मुलांच्या मागण्या कोणत्या असतील? खाणं पिणं हे तर मायबापच पुर्ण करतात. वरुन शिक्षणही मायबापच पुर्ण करतात. मग त्या मुलांच्या मागण्या कोणत्या असतील? होय, शिक्षणच. चांगलं शिक्षण ही लहान मुलांची मागणी आहे. मग चांगलं शिक्षण त्यांना मिळत नाही काय? मिळतं, त्यांनाही चांगलंच शिक्षण मिळतं. परंतु शिक्षणात जो भेदभाव आहे ना. तो त्यांनाही पटत नाही. तो भेदभाव म्हणजे कॉन्व्हेंट शाळा व जि. परीषद शाळा. अलिकडील काळात गरीबांची मुलं ही जि. परीषदच्या शाळेत शिकत असतात. तर श्रीमंतांची मुलं कॉन्व्हेंटच्या शाळेत. अशावेळेस गरीबांच्या मुलांनाही वाटत असतं की त्यांचंही शिक्षण कॉन्व्हेंटला व्हावं. त्यांनाही कॉन्व्हेंटला शिकता यावं. परंतु असे होत नाही व कोणताच नेता असे करीत नाही. तसेच कोणतेच मायबाप ती मागणी मतदान करतांना लावून धरत नाहीत. ज्यामुळं नेत्यांना जाग येईल. शिवाय ती लहान मुलंही आपल्या मागणीनुसार आंदोलन करुच शकत नाहीत. कारण ती लहान असतात. आंदोलन वैगेरे त्यांना काही कळत नसतं. परंतु ती जसजशी मोठी होतात. तसतसा हाच भेदभाव त्यांच्या मनात वाढीस लागत असतो.
निवडणूकीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कोणताच नेता हा लहान मुलांची मागणी पुर्ण करीत नाही वा त्याबाबत आश्वासन देत नाही. त्याचं कारण आहे की कोणताच लहान मुलगा हा मतदानाच्या कक्षेत मोडत नाही व त्याला मतदान करता येत नाही व त्याला मतदान करण्याचा अधिकारही नाही. मात्र नेतेही त्याबाबत बोलणं करीत नसतात. याबाबतीत एक प्रसंग सांगतो. एक नेता बोलत होता विचारपीठावर. मोठमोठी आश्वासनं देत होता. तसंच म्हणत होता की देशात एकच करप्रणाली ठेवू.
एकच करप्रणाली ठेवू. सारेच तसे बोलत असतात नेते. परंतु कोणताच नेता असे बोलत नाही की देशातील मुलांसाठी एकच शिक्षण पद्धती ठेवू. सर्वांना निःशुल्क शिक्षण पद्धती ठेवू. मग ते महाविद्यालयीन शिक्षण का असेना. डॉक्टर, इंजिनिअरचं किंवा एखाद्या उद्योगाचं शिक्षण का असेना. परंतु तसा कोणताच नेता बोलणार नाही आणि करणारही नाही. याचं कारण असंच समजायला काही हरकत नाही की गरीबांच्या मुलांमध्ये महत्वाकांक्षा जरी असली तरी त्यांना मोठं होवू द्यायचं नाही. त्यांना डॉक्टर, इंजिनिअर जरी बनायचं असलं तरी त्यांच्याकडे पैसे नसल्यानं ते डॉक्टर, इंजिनिअर बनू शकणार नाही वा कोणत्याच मुलांना त्यांच्यात कुवत असतांनाही कोणतंच पैशाचं शिक्षण घेता येणार नाही. हं मोठमोठी आश्वासनं नक्कीच दिली जातील प्रत्येक निवडणुकीत. करप्रणालीही एकच आणली जाईल प्रत्येक निवडणुकीत. देशातील रस्त्यांचाही विकास केला जाईल. देशात सोयसुविधा चांगल्या केल्या जातील. प्रत्येकाला अन्नधान्य मोफत मिळेल. मग गरीब असला तरी. परंतु शिक्षण मोफत मिळणार नाही. त्यासाठी कोणी आंदोलन करणार नाही. ती आपली बाब नाही असं समजून ती जबाबदारी झटकणार आणि हेच होत आलंय आजपर्यंत. त्याचं कारण आहे नेत्यांच्या शाळा असणं. त्या शिक्षणसंस्थांमधून भरमसाठ पैसा कमवता येणं. अशाच शिक्षणसंस्थांमधून आजपर्यंत भरमसाठ पैसा कमवता आल्यानं नेते मालामाल बनले. कारण यावर कोणताच मतदार आजपर्यंत बोलला नाही. त्याला कळलं नाही. अन् कोणी कळूही दिलं नाही.
शिक्षण वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं परंतु ते निःशुल्क नसल्यानं गरीबांपर्यंत पोहोचेल तेव्हा ना. ते गरीबांपर्यंत पोहोचतच नाही. मग गरीब मंडळी गुरगुरणार कशी? ती निपचीत असतात मेंढरांसारखी. निवडणूक आली की एक पाव पितात. पाचशेची नोट घेतात. मतदान करतात व पुन्हा जैसे थे होवून पाच वर्षपर्यंत मेंढरांसारखीच गप्प राहतात. त्यांना माहीतही नसतं की यातील काही नेते हे त्यांच्यावर एखाद्या वाघ, सिंहांसारखी झडप घालतात व त्यांना नेस्तनाबूत करतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की इथं कुत्र्यालाही किंमत आहे. तीन ते वीस हजार रुपये. परंतु माणसाला नाही की जी मंडळी एका पव्व्यात व पाचशेच्या नोटेत समाधानी होतात. काल हाच दर शंभर रुपये होता.
नेते आपल्याआपल्या पद्धतीनं आश्वासन देत आहेत. ते लोकांना लुभावण्याचे प्रयत्न करीत आहेत. तसं पाहिल्यास प्रत्येक नेताच आश्वासन देत असतो. त्यानंतर निवडणूक झाली आणि ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी त्या दिलेल्या आश्वासनाची परिपुर्ती नाही केली तरी चालेल. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक नेताच आश्वासन देत असतो. हेच प्रत्यक्षात घडत असतं.
आश्वासन........ नेते मंडळी कोणतं आश्वासन देतात आणि ते कोणाला देतात? याचा विचार केल्यास निश्चीतच आपल्याला माहीत पडेल की नेते मंडळी आश्वासन हे आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या मतदार मायबापाला देत असतात. जे प्रत्यक्षात मतदार असतात. वेळप्रसंगी ते पायापोटीही लागत असतात. म्हणतात की आशीर्वाद द्या. परंतु एकदा का निवडून आले की ढुंकूनही पाहात नाही मतदारसंघात. मला आशीर्वाद देणारा माझा मतदार बंधू कसा आहे? तो सुखी समाधानी आहे की नाही? हेही कोणी पाहायला येत नाहीत.
नेता....... नेता असा असावा की त्यानं स्वाभीमानी असावं. त्याचं कार्य वाखाणण्याजोगंच असावं. त्यानं असं काम करावं की पाच वर्षानंतर त्याला मतदारांना लुभावण्यासाठी प्रयत्न करावा लागू नये. त्याला पाच वर्षानंतर बोलावंच लागू नये की त्यानं काय काय केलं. त्यानं असं चांगलं काम करावं की जे मतदाराला दिसावं व त्या मतदारानं त्याच चांगल्या कामाच्या बदल्यात मतदान करावं कोणताही मनात किंतू परंतु न ठेवता.
अलिकडील काळात असे नेते नाहीतच. अशा नेत्यांची वाणवा आहे. म्हणूनच अशा नेत्यांना प्रचारासाठी निघावं लागतं. प्रचारसभा घ्याव्या लागतात व मतदाराला निक्षून सांगावं लागतं की बाबांनो, मी तुमच्यासाठी अमूक अमूक काम केलं. कारण त्या नेत्यांना वाटतं की मतदार हे आंधळे आहेत व ते आंधळे असल्यानं माझी केलेली कोणतीच चांगली कामं त्यांना दिसली नाहीत.
नेते हे चांगली तशीच वाईट कामं करीत असतात. चांगली कामं ही वाखाणण्याजोगीच असतात की त्या भरवशावर ते निवडून येत असतात आणि वाईट कामं अर्थात घोटाळे करणं. त्या घोटाळ्याची शंका मनात असल्यानं ते पडतही असतात निवडणुकीतून. काही असे घोटाळे करुनही तरतात. त्याचं कारण असतं त्यांचं चांगलं काम करणं. एखाद्या नेत्यानं आपल्या मतदारसंघात जर चांगले कामं केले की बस. त्यानं कितीही प्रमाणात उच्च कोटीचे घोटाळे केले असले आणि विरोधक कितीही प्रमाणात त्या घोटाळ्यावर बरळत असले तरी ते निवडून येतात निवडणुकीत. त्याचं कारण असतं. त्याचं वागणं. तो नेता आपल्या मतदारसंघात अगदी सहानुभूतीपूर्वक वागणूक देत असतो आपल्या मतदारांना. त्यांच्या सुखदुःखात धावून जात असतो आवडीनं. त्या क्षेत्राचा विकास करीत असतो आणि त्या भागातील मतदारांना खुश ठेवत असतो. त्या नेत्याला जास्त सांगायची गरजच राहात नाही आपल्या मतदारसंघात. असे नेते घोटाळेबाज जरी असतील तरी आपल्या मतदारसंघाशी प्रामाणिक वागत असल्यानं मतदारसंघात भरपूर अशा फरकानं निवडून येत असतात. असे नेते आपल्या क्षेत्रातील जनतेसाठी देवच असतात. त्याचं कारण असतं, त्याचं विकास करणं व त्याचं प्रामाणिक असणं. असे बरेचसे नेते निवडून आले आहेत.
नेत्यांना तसं पाहिल्यास आश्वासनच द्यावं लागू नये. परंतु दर पाच वर्षानं त्याला जनतेसमोर जावं लागतं व आपण केलेल्या कार्याचा पाढा वाचावा लागतो. तो पाढा वाचतो. तरीही तो पडतो. कारण ज्या पाण्याचं तो वाचन करतो. त्या पाढ्यात पुरेसंही सत्यत्व नसतं. केवळ भोपाली असते.
देशात भ्रष्टाचार होतात. बरेचसे नेते जनतेशी प्रामाणिक वागत नाहीत. बेईमानी पद्धतीनंच वागतात. ते जनतेला आंधळी आहे असं समजतात. ते भ्रष्टाचार करतात, ते जनतेला आंधळी आहे असं समजूनच. त्यानंतर ते अप्रामाणिक वागतात जनतेशी. तेही जनतेले आंधळी आहे असं समजूनच. परंतु जनता आंधळी नसते. जनता ही जनार्दन असते. ती पाच वर्षपर्यंत त्या नेत्याचं वागणं लक्षात घेते. मग तो नेता कितीही बरळला तरी जनता ही पाच वर्षानंतर होणार असलेल्या निवडणुकीत नेत्याला धडा शिकवतेच.
अलिकडील काळात आश्वासनाचा जोर आहे. जनता ही कितीही डोळस असली तरी याच जनतेतील काही लोकं नेत्याला जाब विचारत नाहीत आणि आंधळंपणाचा बुरखा ओढून मतदान करते व फसते. ही देखील निवडणूक अशीच आहे. बरेचसे नेते जरी जनतेशी पाच वर्षपर्यंत जनतेशी प्रामाणिक वागले नसले तरी असे आश्वासनं देत आहेत की जसे तेच नेते एकमेव प्रामाणिक वागले व त्यांनी बरीचशी विकासाची कामे केली. परंतु विकास करणाऱ्याला सांगण्याची गरज नसते. कोण कसा हे जनतेला सारं समजतं. त्यानुसार मतदान करतांना जनता आपल्या अडचणींचा विचार करते. आपल्या सुविधांचा विचार करते आणि आपल्यावर कोणतीही संकटं येवू नये याचा विचार करते. ज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास ते मला वेतनवाढ कोणती सरकार जास्त लावेल याचा विचार करते. सामान्य नागरिक मला रस्ता, वीज, पाणी या मुलभूत गरजा कोण पुरवेल याचा विचार करते तर गरीब लोकं मला पाचही वर्ष अन्न धान्य कसं मोफत मिळेल याचा विचार करते. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. प्रत्येकाची विचार करण्याची प्रवृत्ती वेगवेगळी असते. महत्वाची सांगायचं झाल्यास प्रत्येक निवडणुकीत मतदान करणारा प्रत्यक्ष घटक मतदान करतांना आपल्या आपल्या स्वार्थाचा विचार करतात. परंतु त्या भोळ्याभाबड्यांचा विचार करीत नाहीत. ज्यांच्या मतदानाला परवानगी नसते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास लहान मुलांना मतदानाचा जरी अधिकार नसला तरी त्यांची बाजू मांडणारे वकील आज आपण आहोतच. लहान मुलांना मतदान करताच येत नाही म्हणून काय झाले. आपल्याला तर मतदान करायचा अधिकार आहे ना. आपल्याला तर कळतंय ना की कोणता नेता आपल्या आणि आपल्या मुलांच्या मागण्या पुर्ण करु शकतो. मग जो नेता शिक्षण निःशुल्क करण्याच्या गोष्टी करीत असेल वा गरीब मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था निःशुल्क पद्धतीने करुन देण्याचं आश्वासन देत असेल व जो त्या आश्वासनाची परिपुर्ती करणारा वाटत असेल. त्यालाच मतदान करायचं. कारण लहान मुलं आपली स्वतःची मुलं जरी असली तरी त्यांना मतदानाचा हक्कं नाही. त्याचं कारण म्हणजे ते अठरा वर्षाचे नाहीत. मग त्यांचं कोण ऐकणार? नेतेही जो मतदानाच्या कक्षेत मोडतो. त्याचाच विचार करुन त्यांचंच ऐकत असतो. परंतु आपण पालक तर सुज्ञ आहोत ना. आपण त्याचा विचार करावा व तसाच विचार करुन मतदान करावं. जेणेकरुन प्रत्येक गरीबांच्या मुलाला डॉक्टर, इंजिनिअर बनता येईल. उद्योगाचं शिक्षण निःशुल्क घेता येईल व आपलंही जीवन सुखी, समाधानी करता येईल. शिवाय शिक्षणात मुलांसमोर तरी हा कॉन्व्हेंटचा व हा जि. परीषदचा असा भेदभाव होणार नाही हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०